पीएम्इंडिया

श्री.चंद्रशेखर

November 10, 1990 - June 21, 1991 | Janata Dal (S)

श्री.चंद्रशेखर

श्री. चंद्रशेखर यांचा जन्म 1 जुलै 1927 रोजी उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यामधील इब्राहीमपट्टी या गावामध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. 1977 ते 1988 या कालावधीमध्ये ते जनता पक्षाचे अध्यक्ष होते.
शालेय जीवनापासूनच चंद्रशेखर राजकारणाकडे आकर्षित झाले होते. एक आदर्शवादी, जहाल मतवादी, क्रांतिकारी उत्साह असणारी व्यक्ती म्हणून ते सर्वपरिचित होते. 1950-51 दरम्यान अलाहाबाद विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयातील पदव्युत्तर शिक्षण संपादन केल्यानंतर त्यांनी समाजवादी चळवळीत भाग घेतला. आचार्य नरेंद्र देव यांच्या निकट सहवासाचे सौभाग्य त्यांना लाभले. बलिया जिल्हा प्रजा समाजवादी पक्षाचे सचिव म्हणून ते निवडून आले होते. त्यानंतर एका वर्षात ते उत्तरप्रदेश राज्य प्रजा समाजवादी पक्षाचे सहसचिव म्हणून निवडून आले. 1955-56 साली त्यांनी उत्तरप्रदेश राज्य प्रजा समाजवादी पक्षाचे सरचिटणीस म्हणून कार्यभार स्विकारला.
1962 मध्ये उत्तर प्रदेशातून ते राज्यसभेवर निवडून आले. जानेवारी 1965 मध्ये त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यानंतर 1967 साली ते काँग्रेस संसदीय पक्षाचे सरचिटणीस म्हणून निवडले गेले. उपेक्षित व मागास समाजाच्या वेगवान विकासामध्ये व त्यांच्यासाठी धोरण आखण्यामध्ये श्री. चंद्रशेखर यांनी संसद सदस्य या नात्याने उल्लेखनीय सहभाग नोंदवला. याचाच एक भाग म्हणून, त्यांनी जेव्हा मक्तेदारी असलेल्या संस्थांमधील असमान विस्तारावर हल्ला चढवला तेव्हा सत्ताधाऱ्यांशी त्यांचा संघर्ष झाला.
ते एका ‘युवा तुर्क’ नेत्याच्या रूपाने समाजासमोर आले. त्यांनी दृढविश्वास, ध्यैर्य व सचोटीने स्वार्थाविरुद्ध लढा दिला. 1969 साली त्यांनी ‘यंग इंडिअन’ नावाचे साप्ताहिक सुरु केले व त्याचे संपादनही केले. त्या काळातील सर्वात जास्त उल्लेखनीय संपादकीयांपैकी एक म्हणून हे साप्ताहिक नावाजलेले होते. आणीबाणीच्या काळात (जून 1975 ते मार्च 1977) ‘यंग इंडिअन’ बंद पाडले होते. फ़ेब्रुवारी 1989 मध्ये हे साप्ताहिक नव्याने सुरु करण्यात आले. या साप्ताहिकाच्या संपादकीय सल्लागार मंडळाचे चंद्रशेखर अध्यक्ष होते.
श्री. चंद्रशेखर नेहमी व्यक्तिगत राजकारणाविरोधात उभे राहिले. वैचारिक व सामाजिक बदलाच्या राजकारणाला त्यांनी पाठींबा दिला. हे विचारच त्यांना 1973-75 च्या अशांत व अस्थिर दिवसांदरम्यान श्री. जयप्रकाश नारायण आणि त्यांच्या आदर्शवादी जीवनाच्या अधिक जवळ घेऊन गेले. यामुळे ते लवकरच कॉंग्रेस पक्षांतर्गत असंतोषाचे कारण बनले.
25 जून 1975 ला आणीबाणी जाहीर झाल्यावर अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली त्यांना अटक करण्यात आली, तेव्हा ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या उच्च मंडळांपैकी, केंद्रीय निवडणूक समिती व कार्यकारी समितीचे सदस्य होते.
श्री. चंद्रशेखर सत्ताधारी पक्षाच्या त्या सदस्यांपैकी होते, ज्यांना आणीबाणीच्या काळात अटक करून कारावासात पाठविले होते.
सत्तेच्या राजकारणाला त्यांनी कायम विरोध केला. लोकशाही मुल्ये तसेच सामाजिक परिवर्तानाप्रती कटिबद्धतेच्या राजकारणाला ते महत्त्व देत असत. आणीबाणीच्या काळात तुरुंगवासादरम्यान त्यांनी हिंदी भाषेत एक रोजनिशी लिहिली होती. जी नंतरच्या काळात ‘मेरी जेल डायरी’ या नावाने प्रकाशित झाली होती. ‘सामाजिक परिवर्तनाची गतिशीलता’ हे त्यांच्या लेखांचे एक प्रसिद्ध संकलन आहे.
श्री. चंद्रशेखर यांनी 6 जानेवारी 1983 ते 25 जून 1983 पर्यंत दक्षिणेकडील कन्याकुमारीपासून नवी दिल्ली स्थित राजघाट (महात्मा गांधींची समाधी) दरम्यान जवळपास 4260 किलोमीटर अंतर पदयात्रा केली होती. देशातील जनतेला भेटणे व त्यांच्या समस्या जाणून घेणे, हे त्यांच्या या पदयात्रेचे एकमेव उद्दिष्ट होते.
देशातील मागास भागातील लोकांना शिक्षण देण्यासाठी तसेच तळागाळापर्यंत काम करण्यासाठी त्यांनी सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश आणि हरियाणा सहित देशातील विविध भागात जवळपास पंधरा भारत यात्रा केंद्रांची स्थापना केली.
1984 ते 1989 चा छोटा कालावधी सोडला तर 1962 पासून ते संसद सदस्य होते. 1989 मध्ये आपल्या बलिया मतदासंघातून आणि बिहारमधील महाराजगंज मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि दोन्ही जागी ते जिंकूनही आले. नंतर त्यांनी महाराजगंजची जागा सोडून दिली.
श्री. चंद्रशेखर यांचा विवाह श्रीमती दुजा देवी यांच्याशी झाला होता. त्यांना पंकज व नीरज ही दोन मुले आहेत.