पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांचा वडनगर दौरा, इंद्रधनुष्य अभियानाचे उद्‌घाटन सार्वजनिक सभेलाही केले संबोधित

पंतप्रधानांचा वडनगर दौरा, इंद्रधनुष्य अभियानाचे उद्‌घाटन सार्वजनिक सभेलाही केले संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे मूळ गाव, गुजरातमधील वडनगर येथे भेट दिली. पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा वडनगरला पहिलाच दौरा होता.

वडनगरमधल्या नागरिकांनी रस्त्यावर दुतर्फा गर्दी करुन पंतप्रधानांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधानांनी हटकेश्वर मंदिरात पूजा केली. त्यांच्या शाळेलाही त्यांनी भेट दिली.

त्यानंतर पंतप्रधानांनी वडनगर येथील जीएमईआरएस वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. या महाविद्यालयाच्या सेवेविषयी माहिती देणाऱ्या कोनशिलेचेही त्यांच्या हस्ते अनावरण झाले. पंतप्रधानांनी यावेळी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.

पंतप्रधानांच्या हस्ते इंद्रधनुष्य या लसीकरण मोहिमेच्या शेवटच्या टप्प्याचा शुभारंभ झाला. लसीकरणाची मोहिम पूर्ण करण्यासाठी या शेवटच्या टप्प्यात काम केले जाईल. या टप्प्यात नागरी भागांचे ज्या ठिकाणी लसीकरण कमी झाले आहे अशा भागांवर भर दिला जाईल. त्याशिवाय पंतप्रधानांनी यावेळी आयएमटीसीएचओ या मोहिमेचा शुभारंभ करत आरोग्य सेवकांना ई-टॅबलेटस्‌चे वाटप केले. या मोहिमेंतर्गंत, आशा कार्यकर्त्यांच्या कामात सुधारणा करण्यासाठी मोबाईल फोन ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. त्याशिवाय मोदी यांच्या हस्ते काही विकास कामांचेही उद्‌घाटन झाले.

सभेला जमलेल्या मोठया समुदायाला पंतप्रधानांनी संबोधित केले. पंतप्रधान म्हणून या आपल्या गावात हा पहिलाच दौरा असून नागरिकांच्या स्वागतानी आपल्याला अतिशय आनंद झाला आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. मी आज आयुष्यात जे काही मिळवले आहे ते याच भूमीत माझ्यावर झालेल्या संस्कारांमुळे ! असेही पंतप्रधान म्हणाले. तुम्हा सर्वांचे आर्शीवाद घेऊन मी इथून परत जातो आहे आणि मी तुम्हाला वचन देतो की, देशासाठीही मी आणखी कठोर परिश्रम करेन.

आरोग्य क्षेत्र, विशेषत: इंद्रधनुष्य अभियानाचा शुभारंभ करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. गरीब आणि सर्वसामान्यांना वैद्यकीय सुविधांचा फायदा व्हावा यासाठी सरकार अविरत काम करत असून त्याचाच भाग म्हणून सरकारने स्टेंटच्या किंमती कमी केल्या आहेत याचा त्यांनी उल्लेख केला.

वैद्यकीय विद्यार्थ्यांसोबत झालेल्या संवादाचा उल्लेख करत समाजाची सेवा करणारे अधिकाधिक डॉक्टर्स आज देशाला हवे आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/R.Aghor/Anagha