पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी गुजरातच्या पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले, अहमदाबाद विमानतळवरील उच्चस्तरीय बैठकीत पूर मदत कार्याचा घेतला आढावा

पंतप्रधानांनी गुजरातच्या पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले, अहमदाबाद विमानतळवरील उच्चस्तरीय बैठकीत पूर मदत कार्याचा घेतला आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज गुजरातच्या पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले.

पंतप्रधानांनी अहमदाबाद विमानतळावर आयोजित उच्चस्तरीय बैठकीत पूर मदत कार्याचा देखील आढावा घेतला. या बैठकीला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, इतर वरिष्ठ मंत्री, राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, आपत्ती निवारण संस्था आणि पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

पुरामुळे झालेल्या नुकसानीचे आणि सुरू असलेल्या मदत कार्याची माहिती यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली.

भारतीय वायू दलासह मदत कार्यात सहभागी असलेल्या सर्व संस्थांना पंतप्रधानांनी सूचना दिल्या की, त्वरित बचाव आणि मदत कार्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. त्यांनी स्वच्छता आणि आरोग्याच्या महत्त्वावर जोर दिला आणि या मुद्यांना देखील सर्वोच्‍य प्राधान्य दिले पाहिजे असे सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की, सर्व विमा कंपन्या तसेच पीक विम्याची प्रकरणे हाताळणाऱ्या कंपन्यांनी, संपत्ती, पीक आदींच्या नुकसानीचे मूल्यमापन लवकरात लवकर करावे आणि विम्याची रक्कम त्वरित मिळण्यासंदर्भात पावले उचलावीत जेणेकरून पूरबाधित लोकांना त्वरित मदत मिळेल.

पुरामुळे बाधित झालेला पाणी, वीज पुरवठा आणि दूरसंवाद तातडीनं पूर्ववत करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या.

अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले की, मागील आठवड्यापासून गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. बचाव कार्यासाठी उद्यापासून आणखी 10 हेलिकॉप्टर तैनात करण्यात येणार असून मदत कार्याची व्याप्ती अधिक वाढवण्यात येणार आहे. ते म्हणाले की, ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील नुकसानीचे मूल्यमापन केले जाईल आणि त्यानंतर लघु आणि दीर्घ उपाययोजना केल्या जातील. राज्य सरकार आणि इतर संस्थांनी ज्याप्रकारे आतापर्यंत पूरपरिस्थिती हाताळली आहे त्यासाठी पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले.

पुरात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी 2 लाख तर गंभीर जखमी झालेल्या लोकांसाठी 50 हजार रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली. एसडीआरएफ अंतर्गत तत्काळ अतिरिक्त 500 कोटी रुपयांची मदत देखील मोदींनी यावेळी जाहीर केली. पुराचे हे आव्हान गुजरातमधील लोकं आणि गुजरात सरकार यशस्वीरित्या पेलतील आणि या परिस्थितीमुळे ते अधिक कणखर होतील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र सरकार गुजरातमधील लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले.

B.Gokhale/S.Mhatre/P.Kor