पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (30 जुलै 2017)

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. माणसाचे मन असे असते की वर्षाकाळ त्याला मोठा मनमोहक वाटतो. पशू,पक्षी, झाडे, निसर्ग – सगळेच पावसाच्या आगमनाने प्रफुल्लित होऊन जातात. मात्र हाच पाऊस कधी कधी विक्राळ रूप धारण करतो आणि तेव्हा जाणीव होते की पाण्यामध्ये विनाश घडवून आणण्याचीही केवढी मोठी ताकद आहे. निसर्ग आपल्याला जीवन देतो, आपले पालनपोषण करतो, पण कधीकधी पूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये दिसणारे त्याचे भीषण रूप भयंकर विनाशकारी ठरते. बदलणारे ऋतूचक्र आणि पर्यावरणात जे काही बदल घडून येत आहेत त्यांचा खूपच मोठा नकारात्मक परिणामही होत आहे. गेल्या काही दिवसांत भारताच्या काही भागांमध्ये विशेषत: आसाम, ईशान्येकडील राज्ये, गुजरात, राजस्थान, बंगालचा काही भाग अतिवृष्टीमुळे नैसर्गिक संकटांना सामोरा जात आहे. पूरग्रस्त क्षेत्रांवर संपूर्ण देखरेख ठेवली जात आहे. व्यापक स्तरावर बचावकार्य केले जात आहे. जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मंत्रिमंडळातील माझे सहकारीही पोहोचत आहेत. राज्यांची सरकारेसुद्धा आपापल्या पद्धतीने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करीत आहेत. भारत सरकारच्या वतीने सेनेतील जवान असोत, वायूसेनेचे लोक असोत, एनडीआरएफचे लोक असोत, निमलष्करी दल असो, सगळेच अशा काळात आपत्तीग्रस्तांच्या सेवेत स्वत:ला झोकून देतात. पूरामुळे जनजीवन बरेच विस्कळीत होऊन जाते. शेते, पशूधन, पायाभूत सुविधा, रस्ते, वीजवितरण, संपर्काची साधने सगळ्यावरच त्याचा परिणाम होतो. विशेषत: आमच्या शेतकरी बांधवांना याची मोठीच झळ बसते. त्यांच्या पिकांचे, शेतांचे जे नुकसान होते ते लक्षात घेता या काळात आम्ही विमा कंपन्यांना आणि विशेषत: पिकविमा कंपन्यांनाही अधिक कार्यतत्पर बनविण्याच्या दृष्टीने योजना बनवली आहे जेणेकरून शेतकऱ्यांचे दावे त्वरीत मंजूर व्हावेत आणि पूरपरिस्थितीचे निवारण करण्यासाठी 24X7 कंट्रोल रूम हेल्पलाइन नंबर 1078 सतत काम करीत आहे. लोक आपल्या अडचणी सांगतही आहेत. पावसाळ्याच्या आधी बहुतांश जागांवर मॉक ड्रील करून संपूर्ण सरकारी प्रणाली तयार केली गेली आहे. एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली. जागोजागी ‘आपदा मित्र’ तयार करणे, ‘आपदा मित्रां’ना do & don’ts चे प्रशिक्षण देणे, स्वयंसेवक म्हणून कोण कोण काम करेल हे निश्चित करणे, एक लोकसंघटन उभे करत अशा परिस्थितीमध्ये काम करणे हा त्या तयारीचा भाग आहे. या दिवसांत हवामानाचा जो अंदाज व्यक्त केला जातो त्याला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इतकी प्रगती बऱ्याच अंशी कारणीभूत आहे. अंतराळ विज्ञानाचाही त्यात मोठा वाटा राहिला आहे व या साऱ्यामुळे हे अंदाज बऱ्यापैकी अचूक असतात. हळुहळू आपण सारेसुद्धा हवामानाच्या अंदाजानुसार आपल्या कामकाजाचे वेळापत्रक तयार करू शकतो. यातून संभाव्य नुकसान टाळता येऊ शकेल.
जेव्हा मी ‘मन की बात’ ची तयारी करतो तेव्हा माझ्यापेक्षा देशाचे नागरिक याची अधिक तयारी करताना मला दिसतात. यावेळी तर जीएसटीच्या विषयावर मला खूप पत्रे आली, खूप सारे फोनकॉल्स आले आहेत आणि अजूनही लोक जीएसटीविषयी आनंद व्यक्त करत आहेत, त्याचबरोबर कुतुहलही व्यक्त करत आहेत. त्यातला एक फोनकॉल तुम्हालाही ऐकवतो :-

‘नमस्कार, पंतप्रधान जी, मी गुडगाववरून नीतू गर्ग बोलतेय. मी तुमचे सनदी लेखाकार दिनाचे भाषण ऐकले आणि खूप प्रभावित झाले. अशाच प्रकारे आपल्या देशात गेल्या महिन्याच्या याच तारखेला वस्तू आणि सेवा कर – जीएसटीची सुरुवात झाली. या निर्णयाबाबत सरकारने जशी अपेक्षा केली होती तसेच परिणाम एका महिन्यानंतर मिळत आहेत किंवा नाही हे आपण सांगू शकाल काय? मला याबाबतचे तुमचे विचार ऐकण्याची इच्छा आहे. धन्यवाद.

जीएसटी लागू होऊन जवळजवळ एक महिना झाला आहे आणि त्याचे फायदेही दिसू लागले आहेत. जीएसटीमुळे गरीबाच्या गरजेच्या वस्तूंच्या किंमती कशा कमी झाल्या आहेत, वस्तू कशा स्वस्त झाल्या आहेत याबद्दल एखादी गरीब व्यक्ती मला पत्र लिहिते तेव्हा मला खूप समाधान मिळते, आनंद वाटतो. जीएसटी हे काय प्रकरण हे माहीतच नसल्याने सुरुवातीला भीती वाटत होती, पण आता त्याबद्दल शिकतोय-समजून घेतोय तसतसे काम आधीपेक्षा सोप झाल्यासारखे वाटतेय असे पत्र इशान्येच्या दुर्गम डोंगरांत, जंगलांत राहणारी एखादी व्यक्ती लिहिते. व्यापार अधिक सोपा झाला आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ग्राहकांचा व्यापारीवर्गावरचा विश्वास वाढीस लागला आहे. वाहतूक आणि मालाच्या ने-आणीचे काम करणाऱ्या लॉजिस्टिक्स क्षेत्रावर जीएसटीचा काय परिणाम झालाय हे मी आताच पहात होतो. कशाप्रकारे ट्रक्सची ये-जा वाढली आहे, अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ कसा कमी होत आहे, महामार्ग मोकळे झाले आहेत, ट्रक्सचा वेग वाढल्यामुळे प्रदूषणही कमी झाले आहे, सामान वेगाने योग्य स्थळी पोहोचत आहे हे दिसून येत आहे. या सर्व सुविधा तर आहेतच, पण त्याचबोरबर आर्थिक गती साधण्यासाठीही याचे पाठबळ मिळत आहे. याआधी वेगवेगळ्या कररचना असल्याने वाहतूक आणि मालवाहतूक क्षेत्राची बहुतांश संसाधने कागदपत्रांचे व्यवस्थापन करण्यासाठी वापरली जायची आणि त्यांना प्रत्येक राज्यामध्ये आपापली नवी नवी गोदामे बनवावी लागायची. जीएसटी ज्याला मी good and simple tax म्हणतो, खरोखरीच या कराने आपल्या अर्थव्यवस्थेवर एक खूपच सकारात्मक प्रभाव टाकला आहे आणि हे खूप कमी वेळात साधले गेलेय. ज्या वेगाने हा बदल सुरळीतपणे घडून आलाय, ज्या वेगाने हे स्थानांतर झाले आहे, नव्याने नोंदणी झाल्या आहे त्याने संपूर्ण देशात विश्वासाचे वातावरण तयार केले आहे. अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील विद्वान, व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील विद्वान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विद्वान संशोधन करून भारताच्या जीएसटीच्या प्रयोगाला एका आदर्श व्यवस्थेच्या रूपात कधी ना कधी जगासमोर मांडतीलच. जगातील अनेक विद्यापीठांसाठी हे एक अभ्यासावे असे उदाहरण, एक केस-स्टडी बनेल. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर इतका मोठा बदल घडून आला आहे आणि इतक्या करोड लोकांच्या सहभागाने इतक्या विशाल देशामध्ये हा कर लागू करणे, त्याला यशस्वीपणे पुढे नेणे ही यशस्वीतेची एक मोठी झेप आहे. सारे विश्व याचा नक्कीच अभ्यास करेल आणि जीएसटी लागू करण्यामध्ये सर्व राज्यांची भागीदारी आहे. सर्व राज्यांची ती जबाबदारी आहे. सारे निर्णय राज्यांनी आणि केंद्राने मिळून, सर्वसंमतीने घेतले आहेत. परिणामी प्रत्येक सरकारने प्राधान्याने अपेक्षा मांडली, की जीएसटीमुळे गरीबाच्या अन्नधान्याच्या खर्चावर काही अतिरीक्त भार पडू नये. एखाद्या वस्तूची जीएसटीच्या आधी काय किंमत होती, नव्या परिस्थितीमध्ये काय किंमत असेल याची सर्व माहिती मोबाइलवरील GST App वर उपलब्ध आहे हे तर तुम्हाला चांगलेच माहीत आहे. एक देश-एक कर : One nation-one tax. किती मोठे स्वप्ने पूर्ण झालेय. जीएसटीच्या बाबतीत मी पाहिले आहे की ज्याप्रकारे तालुक्यापासून ते भारतसरकारपर्यंत सगळ्या स्तरावरील सरकारी अधिकाऱ्यांनी जे परिश्रम घेतले आहेत, ज्या समर्पित भावनेने काम केले आहे, त्यातून सरकार आणि व्यापाऱ्यांमध्ये, सरकार आणि ग्राहकांमध्ये एक खेळीमेळीचे वातावरण तयार झाले आहे. या अधिकाऱ्यांच्या कामाने विश्वास वृद्धिंगत करण्याच्या कामी खूप मोठी भूमिका निभावली आहे. मी या कार्यासाठी सर्व मंत्रालयांचे, सर्व विभागांचे, केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. जीएसटी म्हणजे भारताच्या सामूहिक शक्तींच्या विजयाचे एक उत्तम उदाहरण आहे. हा एक नवा ऐतिहासिक विजय आहे. आणि ही केवळ एक करसुधारणा नाही, तर एका नव्या प्रामाणिक संस्कृतीला बळ देणारी व्यवस्था आहे. एकप्रकारे सामाजिक सुधारणेची मोहिमही आहे. इतके मोठे काम सुरळीतपणे पार पाडल्याबद्दल मी पुन्हा एकदा कोटी कोटी देशवासियांना कोटी-कोटी वंदन करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑगस्ट महिना हा क्रांतीचा महिना असतो. लहानपणी सहजच या गोष्टी आपल्या कानावर पडलेल्या असतात. या महिन्याला क्रांतीचा महिना म्हणून संबोधले जाते याचे कारण 1920 सालच्या ऑगस्ट महिन्यात ‘असहकार आंदोलन’ सुरू झाले होते. 9 ऑगस्ट 1942 रोजी ‘भारत छोडो आंदोलना’ला सुरुवात झाली होती ज्याला ऑगस्ट क्रांतीच्या नावाने ओळखले जाते आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. एकप्रकारे ऑगस्ट महिन्यात अनेक अशा घटना घडल्या आहेत ज्या स्वातंत्र्याच्या इतिहासाशी विशेषत्वाने जोडलेल्या आहेत. यावर्षी आपण ‘भारत छोडो’ ‘Quit India Movement’ या आंदोलनाचे 75 वे वर्ष साजरे करणार आहोत. मात्र खूप कमी लोकांना या गोष्टीची माहिती असेल की ‘भारत छोडो’ हा नारा डॉ. युसूफ मेहर अली यांनी दिला होता. 9 ऑगस्ट 1942 या दिवशी काय झाले होते हे आपल्या नव्या पिढीने जाणून घ्यायला हवे. 1857 पासून ते 1942 पर्यंत स्वातंत्र्याच्या ध्यासाने देशवासी संघटित होत राहिले, संघर्ष करीत राहिले, सहन करत राहिले, इतिहासाची ही पाने म्हणजे भव्य भारताच्या निर्मितीसाठीचे आमचे प्रेरणास्त्रोत आहेत. आमच्या स्वातंत्र्यवीरांनी त्याग, तपस्या, बलिदान दिले आहे. याहून मोठी प्रेरणा कोणती असू शकेल? ‘भारत छोडो आंदोलन’ भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वपूर्ण संघर्ष होता. याच आंदोलनाने संपूर्ण देशाला ब्रिटिश राजवटीतून मुक्त होण्याचा संकल्प घेण्यास तयार केले होते. हा तोच काळ होता, जेव्हा इंग्रजांच्या राजवटीविरोधात भारतीय जनमानस, हिंदुस्थानाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, गावे असोत, शहरे असोत, सुशिक्षित असोत, अशिक्षित असोत, गरीब असोत, श्रीमंत असोत, प्रत्येक जण खांद्याला खांदा भिडवून भारत छोटो आंदोलनाचा भाग बनले होते. जनतेचा आक्रोश टिपेला पोहोचला होता. महात्मा गांधीच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखो भारतीय ‘करो या मरो’ हा मंत्र घेऊन आपले आयुष्य संघर्षात झोकून देत होते. देशाच्या लाखो नवयुवकांनी आपले शिक्षण सोडून दिले होते, पुस्तके बाजूला सारली होती. आजादीचा बिगुल वाजला आणि ते सारे निघाले. 9 ऑगस्ट, ‘भारत छोडो आंदोलनाचे’ आवाहन महात्मा गांधींनी केले तर खरे, पण सर्व मोठ्या नेत्यांना इंग्रज राजवटीने तुरुंगात टाकले आणि हाच तो काळ होता जेव्हा देशाच्या दुसऱ्या पिढीतील नेतृत्वाने – डॉ.लोहिया, जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या महापुरुषांनी प्रमुख भूमिका निभावली होती.

‘असहकार आंदोलन’ आणि ‘भारत छोडो आंदोलन’ – 1920 आणि 1942 – या दोन्ही घटनांमध्ये गांधीजींची दोन वेगवेगळी रूपे दिसतात. ‘असहकार आंदोलन’ चे रूप-रंग वेगळे होते आणि 42 साली अशी परिस्थिती आली, तीव्रता इतकी वाढली की महात्मा गांधींसारख्या महापुरुषाने ‘करो या मरो’ चा मंत्र दिला. या सर्व यशाच्या मागे जन-समर्थन होते, जन-सामर्थ्य होते, जन-संकल्प होता, जन-संघर्ष होता. सारा देश एक होऊन लढत होता. कधी कधी मला वाटते, इतिहासाच्या पानांना थोडे जोडून पाहिले तर भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा 1857 साली उभारला गेला. 1857 पासून सुरू झालेला स्वातंत्र्याचा हा लढा 1942 पर्यंत प्रत्येक क्षणी देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात चालू होता. या लांबलचक कालखंडाने देशवासियांच्या मनात स्वातंत्र्याबद्दल उत्कट भावना जागवली. प्रत्येक जण त्या दिशेने काही ना काही करण्यासाठी कटिबद्ध झाला. पिढ्या बदलल्या, पण संकल्प ढळला नाही. लोक येत गेले, जोडले जात गेले, निघून जात राहिले, नवे लोक येत गेले आणि इंग्रजांच्या राजवटीला उलथवून टाकण्यासाठी देश हरक्षणी प्रयत्न करत होता. 1857 पासून 1942 पर्यंत चाललेल्या या परिश्रमांनी या आंदोलनासाठी अशी परिस्थिती तयार केली की 1942 साली त्याचा कळस गाठला गेला आणि ‘भारत छोडो’ चा बिगुल असा वाजला की पाच वर्षांच्या आतच 1947 साली इंग्रजांना इथून जावे लागले 1942 ते 1947 – पाच वर्षं, एक अशी लोकभावना तयार झाली होती की स्वातंत्र्याच्या संकल्पपूर्तीच्या त्या पाच निर्णायक वर्षांच्या रूपात संपूर्ण देश यशस्वीपणे स्वातंत्र्य प्राप्त करण्यास कारणीभूत ठरला. ही पाच वर्षं निर्णायक होती.
आता मी तुम्हाला या गणिताशी जोडून घेऊ इच्छितो. 1947 साली आपण स्वतंत्र झालो. आज 2017 साल चालू आहे. त्या घटनेला जवळजवळ 70 वर्षं झाली. दरम्यानच्या काळात सरकारे आली-गेली. व्यवस्था बनल्या, बदलल्या, बहरल्या, वाढल्या. देशाला समस्यामुक्त करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रयत्न केले. देशात रोजगार वाढावा यासाठी, गरीबी दूर व्हावी यासाठी, विकास साध्य व्हावा यासाठी प्रयत्न झाले. आपापल्या पद्धतीने त्यासाठी कष्टही उपसले गेले. यशही मिळाले. अपेक्षाही उंचावल्या. जसे 1942 ते 1947 हे संकल्पसिद्धीचे पाच वर्ष होते. त्याच प्रकारे 2017 ते 2022 हा संकल्प सिद्धीच्या प्रवासातील पाच वर्षांचा कालखंड आता आपल्यासमोर असल्याचे मी पाहतोय. 2017 चा हा 15 ऑगस्ट आपण संकल्प पर्वाच्या रूपात साजरा करावा आणि 2022 मध्ये जेव्हा स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षं पूर्ण होतील तेव्हा तो संकल्प आपण पूर्णत्वास नेऊ. देशाच्या सव्वाशे कोटी नागरिकांनी 9 ऑगस्ट या क्रांतीदिनाचे स्मरण करावे आणि येत्या 15 ऑगस्टला प्रत्येक भारतवासीयाने असा संकल्प करावा की एक व्यक्ती म्हणून, एक नागरीक म्हणून या देशासाठी मी अमुक इतके काम करेन, कुटुंबाचा भाग म्हणून अमुक काम करेन, समाजाचा भाग म्हणून अमुक जबाबदारी उचलेन, गाव आणि शहराचा भाग म्हणून असे असे करेन, सरकारी विभागाचा भाग म्हणून हे प्रयत्न करेन, सरकारचा भाग म्हणून अमुक काम करेन. करोडो करोडो संकल्प केले जावेत. करोडो संकल्प पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न व्हावा. मग मी म्हटल्याप्रमाणे जशी 1945 ते 1947 ही पाच वर्षं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कामी निर्णायक ठरली त्याचप्रमाणे 2017 ते 2022 ही पाच वर्षं भारताचे भविष्य घडविण्याच्या कामी निर्णायक बनू शकतील आणि आपल्याला बनवायची आहेत. पाच वर्षांनंतर देश स्वातंत्र्यप्राप्तीची 75 वर्षं साजरी करेल. तेव्हा आज आपण सर्वांनी हा दृढ संकल्प करूया. 2017 साल आपण संकल्प वर्ष बनवूया. याच ऑगस्ट महिन्यात आपण हा संकल्प करू, या संकल्पाशी स्वत:ला जोडून घेऊ. अस्वच्छता- भारत छोडो, गरीबी – भारत छोडो, भ्रष्टाचार- भारत छोडो, आतंकवाद – भारत छोडो, जातीयवाद – भारत छोडो, संप्रदायवाद – भारत छोडो. आज ‘करेंगे या मरेंगे’ या घोषणेची नव्हे तर नव्या भारताच्या या संकल्पाशी जोडून घेण्याची, या कामाला जुंपून घेण्याची, तनामनाने झटून यश मिळवण्याची आहे. या संकल्पाला उरी बाळगतच जगायचे आहे, लढायचे आहे. या, यंदाच्या ऑगस्ट महिन्यात 9 ऑगस्टला संकल्पापासून त्याच्या सिद्धतेपर्यंतचे एक महाअभियान चालवू. प्रत्येक भारतवासी, सामाजिक संस्था, स्थानिक यंत्रणा, शाळा, महाविद्यालये, वेगवेगळ्या संघटना – नवभारतासाठी प्रत्येकाने काही ना काही नवा संकल्प करू या. एक असा संकल्प जो पुढील पाच वर्षांत आपण सिद्ध करून दाखवू. युवकांच्या संघटना, विद्यार्थ्यांच्या संघटना, स्वयंसेवी संस्था इत्यादी सामूहिक चर्चांचे आयोजन करू शकतात. नव्या नव्या कल्पना पुढे मांडू शकतात. एक राष्ट्र म्हणून आपल्याला कुठे पोहोचायचे आहे? एक व्यक्ती या नात्याने त्यात माझे काय योगदान असू शकते? आपण या संकल्प पर्वाचा भाग बनू.

आजकाल आपण आणखी कुठे असू वा नसू ऑनलाइन नक्कीच असतो. म्हणूनच मी आज विशेषत: ऑनलाइन जगात वावरणाऱ्या माझ्या तरुण मित्रांना हे आमंत्रण देतोय की नव्या भारताच्या निर्मितीमध्ये त्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण पद्धतीने योगदान देण्यासाठी पुढे यावे. तंत्रज्ञानाचा वापर करत व्हिडिओ, पोस्ट, ब्लॉग, आलेख, नवनव्या संकल्पना अशा सर्व गोष्टी घेऊन यावे. या मोहिमेला एका जन-आंदोलनाचे रूप द्यावे. NarendraModiApp वरही तरुण मित्रांसाठी ‘Quit India Quiz’ सुरू केले जाणार आहे. भारत छोडो विषयावरील ही प्रश्नावली हा देशाच्या युवकांना देशाच्या गौरवशाली इतिहासाशी आणि स्वातंत्र्यलढ्याच्या नायकांशी त्यांचा परिचय करून देण्याचा एक प्रयत्न आहे. तुम्ही याचा व्यापक स्तरावर प्रचार आणि प्रसार कराल असे मी मानतो.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, 15 ऑगस्ट, देशाच्या प्रधान सेवकाच्या रूपाने मला लाल किल्ल्यावरून देशाशी संवाद साधण्याची संधी मिळते. मी तर केवळ निमित्त-मात्र आहे. तिथे केवळ ती एक व्यक्ती बोलत नसते. लाल किल्लावरून सव्वाशे कोटी देशवासीयांचा आवाज गुंजतो. त्यांच्या स्वप्नांना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न होतो आणि मला या गोष्टीचा आनंद वाटतो की गेली सलग तीन वर्षे 15 ऑगस्टच्या निमित्ताने त्या दिवशी मी काय बोलावे, कोणत्या मुद्यांचा आपल्या भाषणात समावेश करावा यासंदर्भातील सूचना देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून माझ्यापर्यंत पोहोचतात. MyGov वर किंवा NarendraModiApp वर आपले विचार नक्की पाठवा. मी स्वत: ते वाचतो आणि 15 ऑगस्टला जितका वेळ मला मिळतो त्यात हे विचार मांडण्याचा प्रयत्न करेन.

गेल्या तिन्ही वेळेला मला माझ्या 15 ऑगस्टच्या भाषणांच्याबाबतीत एक तक्रार सतत ऐकू आली की माझे भाषण जरा लांबते. यावर्षी ते थोडे छोटे व्हावे अशी कल्पना मी मनोमन तरी केली आहे. जास्तीत जास्त 40-45-50 मिनिटांत मी ते पूर्ण करेन. हा स्वत:साठीच नियम बनवण्याचा प्रयत्न आहे, माहीत नाही तो मला पाळता येईल की नाही. पण यावेळी माझे भाषण छोटे कसे करता येईल यादृष्टीने प्रयत्न करून बघणार आहे. पाहू या त्यात यश मिळतेय की नाही ते.

देशवासीयांनो आज मला आणखी एका विषयावर बोलायचे आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक सामाजिक अर्थशास्त्र आहे. आणि त्या अर्थशास्त्राला कधीही कमी लेखून चालणार नाही. आपले सण, उत्सव म्हणजे काही फक्त आनंद-उत्फुल्लतेचे प्रसंग असतात असे नाही. आपले उत्सव, आपले सण म्हणजे सामाजिक सुधारणेचे माध्यमही असतात. पण त्याचबरोबर आपल्या प्रत्येक सणाचा गरीबातील गरीबाच्या आर्थिक जगण्याशी थेट संबंध असतो. काही दिवसांतच रक्षाबंधन, जन्माष्टमी, त्यानंतर गणेशोत्सव, त्यानंतर चौथ चंद्र, त्यानंतर अनंत चतुर्दशी, दुर्गा पूजा, दिवाळी असे एकामागून एक, एकामागून एक सण येणार आहेत आणि हीच वेळ आहे जेव्हा गरीबांना आपल्या अर्थार्जनाला जोड देण्याची संधी मिळते. आणि या सणांमध्ये एक सहज स्वाभाविक आनंदही मिसळतो. सणांमुळे नात्यांत गोडवा योतो, कुटुंबातील स्नेह वाढतो, समाजात बंधुभाव जागा होतो. व्यक्तीपासून सर्वांपर्यंत एक सहज प्रवास होतो. ‘अहम् पासून वयम्’ च्या दिशेने जाण्याची संधी तयार होते. आणि अर्थव्यवस्थेबद्दल सांगायचे झाले तर राखीच्या सणाच्या कित्येक महिने आधीपासून शेकडो कुटुंबं छोट्या छोट्या घरगुती उद्योगांच्या माध्यमातून राख्या बनवायला सुरुवात करतात. खादीपासून ते रेशमी धाग्यांपर्यंत न जाणो किती प्रकारच्या राख्या तयार होतात आणि आजकाल तर लोक होममेड, घरच्या घरी बनवलेल्या राख्यांना जास्त पसंती देऊ लागले आहेत. राख्या बनवणारे, राख्या विकणारे, मिठाईवाले, हजारो-शेकडो लोकांचा व्यवसाय या सणाशी जोडला जातो. आमच्या गरीब बंधू-भगिनींची कुटुंब यावरच तर चालतात. आपण दिवाळीमध्ये दिवे लावतो. ते केवळ प्रकाशाचे पर्व आहे, केवळ एक सण आहे, घराच्या सजावटीपुरतेच या दिव्यांचे महत्त्व आहे असे नाही. त्याचा थेट संबंध मातीचे छोटे छोटे दिवे बनविणाऱ्या त्या गरीब कुटुंबाशी आहे. पण आज सण आणि सणांशी जोडलेल्या गरीबांच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलतानाच मी पर्यावरणाचा मुद्दाही मांडू इच्छितो.

कधी कधी मला वाटते की देशवासी माझ्याहूनही अधिक जागरुक, अधिक सक्रीय आहेत. गेल्या एका महिन्यापासून पर्यावरणाबद्दल सजग असलेल्या नागरिकांकडून मला सतत पत्रे येत आहेत. आणि त्यांनी मला आग्रह केला आहे की गणेशोत्सवाच्या संदर्भात पर्यावरणस्नेही म्हणजेच इको-फ्रेंडली गणेशामूर्तींबद्दल मी वेळेआधीच बोलावे जेणेकरून लोक आतापासूनच मातीच्या मूर्तीची निवड करण्याचा बेत आखू शकतील. मी सर्वप्रथम या जागरुक नागरिकांचा आभारी आहे. त्यांनीच मला आग्रह केला की मी आधीच हा विषय मांडावा. यावर्षीच्या सार्वजनिक गणेशात्सवाचे एक विशेष महत्त्व आहे. लोकमान्य टिळकांनी या महान परंपरेची सुरुवात केली होती. यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाचे 125वे वर्ष आहे. सव्वाशे वर्षं आणि सव्वाशे कोटी नागरिक – लोकमान्य टिळकांनी ज्या मूळ हेतूने समाजाच्या एकतेसाठी आणि समाजात जागृती आणण्यासाठी, सामूहिकतेचे संस्कार जागविण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभ केला होता, त्याच हेतूला अनुसरून यावर्षीसुद्धा पुन्हा एकदा आपण निबंध स्पर्धांचे आयोजन करू या, चर्चेसाठीच्या सभा भरवू या, लोकमान्य टिळकांच्या योगदानाची आठवण जागवू या. आणि पुन्हा टिळकांची जी भावना होती त्या दिशेने या गणेशोत्सवाला कसे घेऊन जाता येईल हे पाहू या. त्या भावनेला नव्याने कसे जागवता येईल याचा विचार करतानाच पर्यावरणाच्या रक्षणासाठी इको-फ्रेंडली गणेशमूर्ती, मातीपासून बनविलेल्या गणेशमूर्ती घरी आणण्याचा संकल्प पाळला जावा. आणि ही गोष्ट मी खूप आधीपासून सांगतोय, तेव्हा तुम्ही सगळे या संकल्पाशी जोडले जाल याची मला खात्री आहे. आणि यातून या मूर्ती बनविणाऱ्या गरीब कारागीरांना, गरीब कलाकारांना रोजगार मिळेल, गरीबांचे पोट भरेल. या, आपण आपल्या उत्सवांना गरीबांशी जोडून घेऊ या, गरीबांच्या अर्थव्यवस्थेशी जोडूया, आपल्या सणांचा आनंद गरीबांच्या घरचा आर्थिक लाभाचा सण बनावा, अर्थप्राप्तीचा आनंद या सणातून त्यांना मिळावा यादृष्टीने आपण सगळ्यांनीच प्रयत्न करायला हवेत. मी सर्व देशवासियांना येणाऱ्या अनेक सणांसाठी, उत्सवांसाठी खूप-खूप शुभेच्छा देतो.

माझ्या प्रिय देशवासीयांनो, आपण सतत हे पाहत आहोत की शिक्षणाचे क्षेत्र असो की आर्थिक क्षेत्र, सामाजिक क्षेत्र असो वा क्रीडा क्षेत्र असो – आपल्या मुली देशाचे नाव उज्ज्वल करत आहेत. नवी नवी उंची गाठत आहेत. आम्हा देशवासीयांना आपल्या या मुलींबद्दल गर्व वाटत आहे, अभिमान वाटत आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच आमच्या मुलींनी महिला क्रिकेट विश्वचषक सामन्यांत आपल्या खेळाचे दिमाखदार प्रदर्शन केले. मला याच आठवड्यात त्या सर्व खेळाडूंना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्याशी बोलून खूप चांगले वाटले, पण मला हे ही जाणवले की विश्वचषक जिंकता न आल्याचे खूप दडपण त्यांच्या मनावर होते. त्यांच्या चेहऱ्यावर हे दडपण, त्याचा ताण दिसत होता. मी माझे एक वेगळे विश्लेषण त्यांना सांगितले. मी म्हटले, ‘हे पहा, आजकाल प्रसिद्धीमाध्यमांचा असा काळ आहे की त्यात अपेक्षा वाढवल्या जातात. इतक्या वाढवल्या जातात की जेव्हा यश मिळत नाही तेव्हा त्याच आकांक्षा आक्रोशात बदलतात. आपण असे अनेक खेळ पाहिले आहेत ज्यात भारताचे खेळाडू जर अपयशी झाले तर देशाचा राग त्या खेळाडूंवर व्यक्त होतो. काही लोक आपली मर्यादा सोडून अशा गोष्टी बोलतात, अशा गोष्टी लिहितात ज्या खूप वेदनादायी असतात. पण असे पहिल्यांदाच झालेय की आमच्या मुलींना विश्वचषक जिंकता आला नाही तरीही देशाच्या सव्वाशे कोटी नागरिकांनी त्या पराजयाचे ओझे आपल्या खांद्यावर घेतले. त्याचा जरासाही भार या मुलींवर पडू दिला नाही. इतकेच नाही तर त्या मुलींनी जे काम केले त्याचे कौतुक केले, गौरव केला. मला हा एक सुखद बदल वाटला आणि मी या मुलींना सांगितले की असे सौभाग्य फक्त तुमच्याच वाट्याला आले आहे. तुम्ही आपला पराजय मनातून काढून टाका. तुम्ही सामना जिंकला असेल किंवा नसेल पण तुम्ही सव्वाशे कोटी देशवासियांना जरूर जिंकून घेतले आहे. खरोखरीच आपल्या देशाची तरुण पिढी, विशेषत: आपल्या मुली देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी खूप काही करत आहेत. मी पुन्हा एकदा देशाच्या तरुण पिढीचे, विशेषत: आपल्या मुलींचे मनापासून खूप-खूप अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, मी पुन्हा एकदा स्मरण करतोय ऑगस्ट क्रांतीचे, पुन्हा एकदा स्मरण करतोय 9 ऑगस्टचे, पुन्हा एकदा स्मरण करतोय 15 ऑगस्टचे आणि पुन्हा एकदा स्मरण करतोय 2022 सालाचे जेव्हा स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. प्रत्येक देशवासीयाने संकल्प करावा आणि प्रत्येक देशवासीयाने पुढील पाच वर्षांत तो संकल्प सिद्ध करण्यासाठीचा आराखडा आखावा. आपल्या सगळ्यांना देशाला नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे, घेऊन जायचे आहे आणि घेऊन जायचेच आहे. या, आपण एकत्र येऊन पुढील वाट चालू या, काही ना काही करत राहू या. देशाचे भाग्य, भविष्य उत्तम बनणारच या विश्वासाने पुढे जाऊ या. खूप-खूप शुभेच्छा. धन्यवाद !

S.Tupe/AIR/D.Rane