पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद

माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना नमस्कार! आकाशवाणीच्या माध्यमातून ‘मन की बात‘ करता-करता तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. आज हा 36वा भाग आहे. ‘मन की बात’ एकप्रकारे भारताची सकारात्मक शक्ती आहे, देशाच्या कानाकोप-यामध्ये जी भावना आहे, इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, कुठे-कुठे तक्रारीही आहेत; लोकांच्या मनात जो भावतरंग निर्माण होतो, ‘मन की बात’ मुळे त्या सर्व भावनांशी मला जोडण्याची एक मोठी, अद्‌भूत संधी मिळाली आणि ही गोष्ट माझ्या मनाची आहे, असे मी कधी म्हणालो नाही. ही ‘मन की बात‘ देशवासियांच्या मनाशी जोडली गेली आहे. त्यांच्या भावनांशी जोडली आहे, त्यांच्या आशा-अपेक्षांशी जोडली गेली आहे आणि ज्यावेळी ‘मन की बात’ मध्ये मी काही सांगतो, त्यावेळी देशाच्या प्रत्येक भागातून लोक मला आपली गोष्ट पाठवतात, त्यापैकी आपल्याला कदाचित मी खूपच कमी सांगू शकतो, परंतु मला तरी खूप मोठा खजिना मिळतो. मग ई-मेल ने असो, दूरध्वनीच्या माध्यमातून असो, ‘मायगव्ह’वर असो, नरेंद्र मोदी अॅपवर असो, इतक्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचतात. त्यापैकी बहुतांश तर मला प्रेरणा देणाऱ्याव असतात. खूप गोष्टी, सरकारमध्ये सुधारणा करण्यासाठी असतात. काही व्यक्तिगत तक्रारीही असतात. तर काही सामुहिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी केल्या जातात आणि मी तर महिन्यातून एकदा अर्धा तास आपला घेतो, परंतु लोक तीस दिवस ‘मन की बात’ वर आपल्या गोष्टी पाठवत असतात. त्याचा परिणाम असा झाला आहे की, सरकारमध्येही संवेदनशीलता आली आहे. समाजाच्या सर्व स्तरामध्ये दुर्लक्षित झालेल्या क्षमतेकडे आता लक्ष जात आहे, असा सहज अनुभव येत आहे आणि म्हणून ‘मन की बात’चा हा तीन वर्षांचा प्रवास देशवासियांच्या भावनांचा, अनुभूतीचा एक आगळा प्रवास आहे. कदाचित इतक्या कमी कालावधीत देशाच्या सामान्य माणसांच्या भावनांना समजून-जाणून घेण्याची संधी मला प्राप्त झाली आहे आणि त्यासाठी मी देशवासियांचा खूप आभारी आहे. ‘मन की बात’मध्ये मी नेहमीच आचार्य विनोबा भावे यांच्या एका गोष्टीचे स्मरण ठेवले आहे. आचार्य विनोबा नेहमी म्हणायचे, ‘ अ-सरकारी, असरकारी’ म्हशणजे परिणाम करणारे. मी सुद्धा ‘मन की बात’ ला या देशाच्या जनतेला केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय रंगापासून ही गोष्ट दूर ठेवली आहे. त्या त्यावेळी जो विषय पेटलेला आहे, ज्याविषयी आक्रोश आहे, त्यामध्ये वाहून जाण्याऐवजी एका स्थिर मनाने, आपल्याशी संलग्न राहण्याचा, जोडण्याचा प्रयत्न केला आहे. आता तीन वर्षानंतर, समाज संशोधक, विद्यापीठे, संशोधक बुद्धिजीवी, माध्यम तज्ज्ञ नक्कीच याचे विश्लेषण करतील, हे मला माहिती आहे. अधिक- उणे अशा प्रत्येक गोष्टीचा साकल्याने विचार करतील आणि माझा विश्वास आहे की, असा साकल्याने केलेला विचारच भविष्यात ‘मन की बात’ साठी अधिक उपयोगी ठरेल. त्यामधून नवे चैतन्य, नवी ऊर्जा मिळेल. मी एकदा ‘मन की बात’ मध्ये सांगितले होते की, आपण भोजन करताना ते वाया जाऊ नये म्हणून जितके आवश्यक आहे, तितकेच घ्यावे, अन्न वाया जात आहे, याविषयी चिंता करण्याची गरज आहे. यानंतर मी पाहिले की, देशाच्या कानाकोपऱ्याततून मला खूप मोठ्या संख्येने पत्रे आली. अनेक सामाजिक संघटना, अनेक नवयुवक याविषयी आधीपासूनच काम करत आहेत. जे अन्न ताटामध्ये टाकून दिले जाते, ते एकत्र करून त्याचा सदुपयोग कशा पद्धतीने करता येईल, यासाठी काम करणारे अनेक लोक आहेत, हे माझ्या लक्षात आले. मला आनंद झाला. खूप खूप आनंद झाला.

एकदा मी ‘मन की बात’मध्ये महाराष्ट्राचे एक सेवानिवृत्त शिक्षक श्रीमान् चंद्रकांत कुलकर्णी यांच्याविषयी बोललो होतो. त्यांना सोळा हजार रूपये निवृत्ती वेतन मिळते. आपल्या या निवृत्ती वेतनामधून, त्यांनी पाच हजार रुपयांचे 51 पोस्ट डेटेड चेक स्वच्छता कार्यासाठी दान म्हणून दिले होते. आता यानंतर स्वच्छतेसाठी, अशा प्रकारे काम करण्यासाठी कितीतरी लोक पुढे आले आहेत, हे मी पाहतो आहे.

एकदा मी हरियाणाच्या एका सरपंचाची ‘सेल्फी विथ डॉटर’ ही गोष्ट पाहिली आणि मी ‘मन की बात’मध्ये हे सगळ्यांना सांगितले. पाहता पाहता, फक्त भारतामध्येच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये ‘सेल्फी विथ डॉटर’ अशी मोठी मोहीमच सुरू झाली. हा फक्त समाज माध्यमाचा मुद्दा नाही. प्रत्येक कन्येला एक नवीन आत्मविश्वास, नवा अभिमान निर्माण करणारी ही घटना बनली. प्रत्येक माता-पित्याला आपल्या कन्येबरोबर सेल्फी काढावासा वाटू लागला. प्रत्येक कन्येला माझेही महात्म्य आहे, मलाही काही महत्व आहे, असे वाटू लागले.

काही दिवसांपूर्वी मी भारत सरकारच्या पर्यटन विभागाबरोबर चर्चा करत होतो. मी बाहेर फिरायला जाणाऱ्याी लोकांना सांगितले, तुम्ही ‘अतुलनीय भारत’ या विषयावर जिथे कुठे जाणार, तिथली छायाचित्रे पाठवा. लाखों छायाचित्रे आली. भारताच्या प्रत्येक कोनाकोपऱ्याेतून आली. ही एकप्रकारे पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्यांासाठी एक खूप मोठी ठवे आहे. एक छोटीशी घटना किती मोठी चळवळ निर्माण करू शकते, याचा या ‘मन की बात’मुळे मी अनुभव घेतला. ‘मन की बात’ सुरू होऊन तीन वर्षे झाली, याविषयी आज मी विचार करीत होतो, त्यावेळी गत तीन वर्षातल्या अनेक घटना माझ्या मनाला स्पर्शून गेल्या. देश योग्य मार्गाने जाण्यासाठी प्रत्येक क्षणी विचार केला जात आहे. देशाचा प्रत्येक नागरिक दुसऱ्यामच्या भल्यासाठी, समाजातील चांगल्या गोष्टींसाठी, देशाच्या प्रगतीसाठी, काही ना काहीतरी करू इच्छितो. माझ्या या तीन वर्षांच्या ‘मन की बात‘च्या अभियानामध्ये मी देशवासियांना समजून घेतले आहे, जाणून घेतले, त्यांच्याकडून शिकलो आहे. कोणत्याही देशासाठी ही सर्वात मोठी संपत्ती असते. एक खूप मोठी ताकद असते. मी देशवासियांना अगदी हृदयापासून नमन करतो.

मी एकदा ‘मन की बात‘ मध्ये खादीविषयी चर्चा केली होती. खादी एक वस्त्र नाही तर, विचार आहे, असे म्हणालो होतो. मी पाहिले की, अलिकडच्या दिवसांमध्ये खादीविषयी रूची वाढली आहे. मी अगदी स्वाभाविकपणे सांगितले होते की, कोणी खादीधारी बनावे, म्हणून मी काही हे सांगत नाही. परंतु अनेकानेक प्रकारचे कापड असते. त्यामध्ये खादी एक का असू नये? घरामध्ये चादर असेल, रूमाल असेल, पडदे असतील. अनुभव असा आहे की, तरूण पिढीमध्ये खादीचे आकर्षण वाढले आहे. खादीच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे. याचा संबंध गरीब कुटुंबाना थेट रोजगार मिळण्याशी आहे. 2 ऑक्टोबरपासून खादीला सवलत दिली जाते. खूप चांगली, भरपूर सवलत दिली जाते. मी पुन्हा एकदा आग्रह करू इच्छितो की, खादीचे जे अभियान सुरू झाले आहे, ते आपण असेच यापुढेही सुरू ठेवावे. खादीची खरेदी आपण केली तर गरीबाच्या घरामध्ये दीपावलीचा दीपक उजळणार आहे, या भावनेतून आपण काम केले पाहिजे. या कार्यामधून आपल्या देशातल्या गरीबाला ताकद मिळणार आहे आणि म्हणूनच हे काम आपल्याला केले पाहिजे. या खादीविषयी आकर्षण वाढल्यामुळे खादी क्षेत्रामध्ये काम करणारे, तसेच भारत सरकारमधील खादीशी संबंधित असणाऱ्या लोकांमध्ये एका नव्या पद्धतीने विचार करण्याचा उत्साह निर्माण झाला आहे. नवे तंत्रज्ञान कसे आणता येईल, उत्पादन क्षमता कशी वाढवता येईल, सौर ऊर्जेवर हातमाग कसे आणता येईल? जुनी 20 -20, 25-25, 30-30 वर्षांपासून बंद पडलेली पद्धती आहे, ती आता पुनर्जीवित कशी करता येईल, याचा विचार सुरू आहे.

उत्तर प्रदेशात वाराणसी सेवापूरमध्ये आता सेवापुरीचा खादी आश्रम 26 वर्षांपासून बंद पडला होता. परंतु आता तो पुनर्जीवित केला गेला आहे. त्यााच्यालशी अनेक संघटनांना जोडण्यात आले आहे. अनेक लोकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या. काश्मीरमधल्या पंपोर इथे खादी आणि ग्रामोद्योगने बंद पडलेले आपले प्रशिक्षण केंद्र पुन्हा एकदा सुरू केले आणि काश्मीरकडे तर या क्षे़त्रामध्ये योगदान देण्यासाठी खूप काही आहे. आता हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू झाल्यामुळे नवीन पिढीला आधुनिक पद्धतीने निर्मिती करणे, कापड विणणे, नव्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश करण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. मला यामुळे खूप चांगले वाटते की, मोठे मोठे कॉर्पोरेट हाऊस ज्यावेळी भेटवस्तू देतात, त्यावेळी त्यांनी अलिकडे खादीच्या वस्तू देण्यास प्रारंभ केला आहे. लोकांनीही एकमेकांना भेट देताना खादीच्या वस्तू द्यायला सुरूवात केली आहे. अगदी सहजपणाने एखादी गोष्ट कशी पुढे जाऊ शकते, याचा अनुभव आपण सगळे घेत आहोत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, गेल्या महिन्यात ‘मन की बात‘ मध्ये आपण सगळ्यांनी एक संकल्प केला होता आणि आपण ठरवले होते की, गांधी जयंतीच्या आधी 15 दिवस देशभरामध्ये स्वच्छता उत्सव साजरा करणार. स्वच्छतेने जन-मनाला जोडणार. आपल्याव आदरणीय राष्ट्रपतीजींनी या कार्याला प्रारंभ केला आणि संपूर्ण देश त्याजमध्येज सहभागी झाला. अबाल-वृद्ध, पुरूष असो की महिला, शहर असो की खेडेगाव, प्रत्येकजण आज या स्वच्छता मोहिमेचा भाग बनले आहेत. मी ज्यावेळी म्हणतो की, ‘संकल्प से सिद्धी’ आता ही स्वच्छता मोहीम एक संकल्प-सिद्धीच्या दिशेने कशी पुढे जात आहे, हे आपण सगळे पाहत आहोत. प्रत्येकजण या आंदोलनाचा स्वीकार करतोय, सहकार्य करतोय आणि साकार करण्यासाठी काही ना काहीतरी आपले योगदान देत आहे. मी आदरणीय राष्ट्रपतीजींचे आभार मानतो. परंतु त्याबरोबरच देशाच्या प्रत्येक वर्गाने याला आपले काम मानले आहे. प्रत्येकजण या स्वच्छता आंदोलनाशी जोडला गेला आहे. मग ती व्यक्ती क्रीडा क्षेत्रातली असेल, की सिनेजगतामधले लोक असतील, शैक्षणिक क्षेत्रातले असतील, शाळां असेल, महाविद्यालय असेल, विद्यापीठ असेल, बळीराजा असेल, श्रमजिवी असेल, अधिकारी असेल, लिपिक असेल, पोलीस असेल, लष्करी जवान असेल, प्रत्येकजण या स्वच्छता आंदोलनाशी जोडला गेला आहे. सार्वजनिक ठिकाणी एकप्रकारे दबाव निर्माण झाला आहे; इतका की, आता सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता असेल तर लोक थेट विचारतात. तिथे काम करणाऱ्यांकमध्ये आता दबाव जाणवू लागला आहे. मी अशा गोष्टींना चांगले मानतो आणि माझ्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे, ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानामध्ये पहिल्या केवळ चारच दिवसांमध्ये जवळपास 75 लाखांपेक्षा जास्त लोक, 40 हजारांपेक्षा जास्त कार्यक्रमांमधून सहभागी झाले आणि असे मी पाहिले आहे की, काही लोक तर सातत्याने काम करीत आहेत, योग्य तो परिणाम येईपर्यंत काम करतच राहणार असा निर्धार या लोकांनी केला आहे. यावेळी आणखी एक गोष्ट पाहिली. एक गोष्ट असते की, आपण कुठेतरी स्वच्छता करायची, दुसरी गोष्ट असते की, आपण जागरूक राहून अस्वच्छता नाही करायची, परंतु स्वच्छता जर स्वभाव बनवायचा असेल तर एका वैचारिक आंदोलनाचीही आवश्यकता असते. यावेळी ‘स्वच्छता ही सेवा’च्या अभियानाच्याह जोडीने अनेक स्पर्धा झाल्या. अडीच कोटींपेक्षा जास्त मुलांनी स्वच्छता या विषयावरच्या निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला. हजारो मुलांनी चित्रे काढली. आपल्या कल्पनांचा वापर करून स्वच्छता विषयावर चित्रे काढली. अनेक लोकांनी कविता लिहिल्या आणि या दिवसांमध्ये मी तर आपल्या बालसाथीदारांनी, लहान-लहान बालकांनी जी चित्रे पाठवली आहेत, ती समाज माध्यमांमध्ये पोस्ट करतोय. त्यांचा गौरव करीत आहे. ज्यावेळी स्वच्छतेचा विषयी येतो, त्यावेळी मी प्रसार माध्यमातल्या लोकांचे आभार मानणे कधीही विसरत नाही. या लोकांनी हे आंदोलन खूप चांगल्या भावनेने पुढे नेले आहे. आपापल्या पद्धतीने तेही या स्वच्छता आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. आमच्या देशातली इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे, मुद्रित प्रसार माध्यमे देशाची किती मोठी सेवा करू शकतात, हे या ‘स्वच्छता ही सेवा’ आंदोलनामध्ये आपण पाहू शकतो. अलिकडेच काही दिवसांपूर्वी माझे कोणीतरी श्रीनगरचा 18 वर्षाचा नवयुवक बिलाल डार याच्याविषयी माहिती देवून लक्ष वेधून घेतले. आपल्याला हे ऐकून आनंद वाटेल की, श्रीनगरच्या नगरपालिकेने बिलाल डार या तरूणाला स्वच्छतेसाठी आपला ‘सदिच्छा दूत’ म्हणून बनवले आहे. आता ज्यावेळी ‘सदिच्छा दूत’ याविषयी बोलले जाते, त्यावेळी आपल्याला वाटते, की कदाचित हा युवक चित्रपट कलाकार असेल किंवा कदाचित तो क्रीडाजगताचा नायक असेल. नाही, असे काहीही नाही. बिलाल डार आपल्या वयाच्या 12-13 व्या वर्षापासून गेली पाच-सहा वर्षे स्वच्छतेचे काम करतोय. आशियातला सर्वात मोठा तलाव श्रीनगरजवळ आहे, या तलावामध्ये प्लॅस्टिक असेल, पॉलिथीन असेल, वापरलेल्या बाटल्या असतील, कचरा, घाण असेल तो सगळे काही काढून तलाव स्वच्छ करतोय. त्यातून थोडीफार कमाईही करतो. कारण त्याच्या वडिलांचा फारच लवकर कर्करोगाने मृत्यू झाला आहे. परंतु बिलालने जगण्यासाठी लागणारे उत्पन्नाचे साधन शोधतानाच त्याची सांगड स्वच्छतेशी घातली आहे. बिलाल दरवर्षी 12 हजार किलोपेक्षा जास्त कचरा साफ करतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. श्रीनगर नगरपालिकेचेही मी अभिनंदन करतो. स्वच्छतेविषयी बिलालसारख्यास श्रमजीवी युवकाला सदिच्छा दूत बनवण्याची कल्पना पुढे आणून त्यांनी हे पाऊल उचलले हे विशेष आहे. श्रीनगर हे पर्यटनाचे केंद्र आहे. हिंदुस्तानच्या प्रत्येक नागरिकाला श्रीनगरला जावे, असे मनात असते आणि तिथेच स्वच्छतेचे इतके मोठे काम व्हावे, ही खूप मोठी गोष्ट आहे. मला आनंद आहे की, त्यांनी बिलाल याला फक्त सदिच्छा दूत बनवले असे नाही. स्वच्छतेचे काम करणाऱ्या बिलाल याला यावेळी एक गाडी दिली आहे, गणवेश दिला आहे आणि तो इतर ठिकाणी जावूनही लोकांना स्वच्छतेविषयी शिक्षित करतो. स्वच्छता ठेवण्यासाठी प्रोत्साहन देतो. त्याच्या शिकवण्याचा परिणाम दिसून येईपर्यंत तो पाठपुरावा करीत राहतो. बिलाल डार हा वयाने लहान आहे, परंतु स्वच्छतेची आवड असणाऱ्याा प्रत्येकाच्या दृष्टीने तो प्रेरणा बनला आहे. मी बिलाल डार याचे खूप अभिनंदन करतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ही गोष्ट आपण स्वीकार केली पाहिजे की, भावी इतिहास हा इतिहासाच्या गर्भातून जन्म घेत असतो आणि ज्यावेळी इतिहासाचा विषय निघतो, त्यावेळी महापुरूषांचे स्मरण होणे तर अतिशय स्वाभाविक आहे. हा ऑक्टोबर महिना आपल्या अनेक महापुरूषांचे स्मरण करण्याचा महिना आहे. महात्मा गांधी यांच्यापासून ते सरदार पटेल यांच्यापर्यंत या ऑक्टोबरमध्ये इतके महापुरूष आमच्यासमोर आहेत. या महापुरूषांनी 20 व्या आणि 21 व्या शतकामध्ये आम्हा लोकांना दिशा दाखवली. आमचे नेतृत्व केले. आम्हाला मार्गदर्शन केले आणि देशासाठी त्यांनी खूप कष्ट झेलले. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती आहे. 11 ऑक्टोबरला जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांची जयंती आहे आणि 25 सप्टेंबरला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आहे. नानाजी आणि दीनदयाळजी यांचे तर हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या सगळ्या महापुरूषांचा एक केंद्र-बिंदू कोणता होता? त्यां च्याळमध्येा एक गोष्ट समान होती आणि ती म्हणजे देशासाठी जगायचे, देशासाठी काहीतरी करायचे आहे, केवळ उपदेश द्यायचा नाही. आपल्या जगण्यातून, आयुष्याद्वारे काही करून दाखवायचे. गांधीजी, जयप्रकाशजी, दीनदयाळजी ही मंडळी असेच महापुरूष आहेत. ते सत्तास्थानांपासून कैक कोस दूर राहिले आहेत. परंतु जन-जीवनाबरोबर मात्र क्षणोक्षणी जगत राहिले. संघर्ष करत राहिले आणि ‘सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय’ असे काही ना काहीतरी करत राहिले. नानाजी देशमुख राजकीय जीवन सोडून ग्रामोदयच्या कार्यात मग्न राहिले आणि ज्यावेळी आज त्यांचे शताब्दी वर्ष साजरे केले जात आहे, त्यावेळी त्यांच्या ग्रामोदयाच्या कामाबद्दल आदर वाटणे खूप स्वाभाविक आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती श्रीमान अब्दुल कलामजी ज्यावेळी नवयुवकांशी संवाद साधत होते, त्यावेळी नेहमीच नानाजी देशमुख यांच्या ग्रामीण विकासाविषयी बोलत असत. मोठ्या आदराने ते नानाजींचा, त्यांीच्याय कामाचा उल्लेख करीत असत आणि ते स्वतःसुद्धा नानाजींचे कार्य पाहण्यासाठी गावांमध्ये गेले होते.

दीनदयाळ उपाध्यायजी हे महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच समाजाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या माणसाविषयी बोलत होते. दीनदयाळजी ही समाजाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या गरीब, पीडित, शोषित, वंचित यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी बोलायचे; हा बदल मग – शिक्षणाच्या माध्यमातून, रोजगाराच्या माध्यमातून कशा प्रकारे परिवर्तन घडवून आणता येवू शकते, याची चर्चा करीत होते. या सर्व महापुरूषांचे स्मरण करणे म्हणजे उपकार नाही. या महापुरूषांचे स्मरण आपण यासाठी केले पाहिजे की, आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग मिळाला पाहिजे. पुढे जाण्याची दिशा मिळाली पाहिजे.

यापुढच्या ‘मन की बात‘मध्ये मी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी जरूर बोलणार आहे. मात्र 31 ऑक्टोबरला संपूर्ण देशामध्ये ‘रन फॉर युनिटी’ म्हणजे ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना राबवली पाहिजे. देशाच्या प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये मोठ्या संख्येने ‘रन फॉर युनिटी’चे कार्यक्रम झाले पाहिजेत. ऋतूही असा आहे की, धावताना मोठी मौज वाटणार आहे. सरदारसाहेबांसारखी लोहाची शक्ती मिळवण्यासाठी हेही आवश्यक आहे. सरदारसाहेबांनी संपूर्ण देशाला एकत्र आणले होते. आता आपणही एकतेसाठी धावून एकतेचा मंत्र पुढे नेला पाहिजे.

आपण लोक खूपच सहजपणाने, स्वाभाविकपणे म्हणतो, ‘विविधतेमध्ये एकता-भारताची विशेषता’. विविधतेचा आपण गौरव करतो, परंतु आपण कधी या विविधतेचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला आहे का? मी हिंदुस्तानच्या माझ्या या देशवासियांना पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो की, विशेष करून माझ्या या युवापिढीला सांगू इच्छितो की, आपण एका जागृत अवस्थेमध्ये आहोत. या भारताच्या विविधतेचा अनुभव घ्या. त्या विविधतेला स्पर्श करा, त्याचा सुगंध अनुभवा, आपल्या लक्षात येईल, आपल्या आतमध्ये दडलेल्या वेगळ्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी आपल्या देशामधली ही विविधता एक खूप मोठी शाळा म्हणून काम करते. उन्हाळी सुट्टी आहे, दिवाळीचे दिवस आहेत, आपल्या देशात कुठे ना कुठे बाहेर जाण्याचे ठरतेच. लोक पर्यटक म्हणून बाहेरगावी जातातच आणि ते खूप स्वाभाविक आहे. परंतु कधी कधी चिंतेचा विषय वाटतो की, आपले लोक तर आपला देश पहातच नाहीत. देशातली विविधता जाणून घेतच नाहीत. देश समजून घेत नाहीत. मात्र चकचकाटाच्या प्रभावाखाली येऊन परदेशवारी करणे त्यांना जास्त आवडते. तुम्ही बाहेरच्या देशात जरूर जा, माझा त्याला विरोध नाही. परंतु कधीतरी आपल्या देशातली ठिकाणेही पाहावीत की! उत्तर भारतातल्या व्यक्तीला दक्षिण-भारत कसा आहे, हे माहिती आहे का? पश्चिम भारतातल्या व्यक्तीला पूर्व-भारतामध्ये काय आहे हे माहिती आहे का? आमचा देश किती विविधतेने नटलेला आहे.

महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद, आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलामजी यांच्या आयुष्याचकडे पाहिले तर एक गोष्ट पुन्हा पुन्हा लक्षात येते ती म्हणजे, या सगळ्यांनी ज्यावेळी भारत भ्रमण केले, त्यावेळी त्यांना भारत पाहून-समजून घेता आला आणि त्याचवेळी त्यांना या भारतासाठीच जगायचे आणि या देशासाठीच प्राण अर्पण करायचे अशी एक नवी प्रेरणा मिळाली. या सर्व महापुरूषांनी भारताचे व्यापक भ्रमण केले होते. आपल्या कार्याच्या प्रारंभीच त्यांनी भारत जाणून, समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्यामध्येच भारत जगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कधी आपण आपल्या देशाच्या विविध राज्यांना, विविध समाजांना, समुदायांना, त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, यांच्याकडे एक विद्यार्थी म्हणून पाहून त्या शिकण्याचा, समजून घेण्याचा, तसे जगण्याचा प्रयत्न करू शकतो का ?

पर्यटनामध्ये मूल्यवर्धन अशाचवेळी होईल की, ज्यावेळी आपण फक्त मुलाखतकर्ता म्हणून परमुलुखात न जाता, एक विद्यार्थी म्हणून जावू आणि त्यांचे जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करू. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मला हिंदुस्तानातल्या पाचशेपेक्षा जास्त जिल्ह्यांमधे जाण्याची संधी मिळाली असेल. साडेचारशेपेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये तर मला रात्रीचा मुक्काम करण्याचीही संधी मिळाली आहे आणि आज ज्यावेळी मी भारतामध्ये ही मोठी जबाबदारी सांभाळतोय, त्यावेळी केलेल्या भ्रमंतीचा अनुभव मला खूप कामी येत आहे. कोणतीही गोष्ट समजण्यासाठी मला खूप सोपे जाते. अजिबात वेळ लागत नाही. तुम्हा सगळ्यांना माझा आग्रह आहे की, या विशाल भारतामध्ये ‘‘विविधतेमध्ये एकता’’ अशी फक्त घोषणा नाही, आपल्या अपरंपार शक्तीचे भंडार आहे. या सगळ्यांचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घ्या. ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ याचे स्वप्न यामध्येच दडलेले आहे. आपल्याकडे खाण्या-पिण्याचे कितीतरी प्रकार आहेत. पूर्ण आयुष्यभर रोज एक नवनवा पदार्थ आपण खात राहिलो तरी इतके असंख्य प्रकार आहेत की पुन्हा पहिला पदार्थ येणार नाही. आता, ही आमच्या पर्यटनाची एक मोठी ताकद आहे. माझा आपल्याला आग्रह आहे की, या सुट्टीमध्ये घराबाहेर जायचे म्हणून नाही, फक्त एक बदल पाहिजे, म्हणून घराबाहेर जायचे असे नाही, तर काही जाणून घेण्यासाठी, काही समजून घेण्यासाठी म्हणून बाहेर पडा. भारताला आपल्या आतमध्ये सामावून घ्या. कोटी कोटी जणांच्याक विविधतेला आपल्या आतमध्ये जागा द्या, अगदी आत्मसात करा. या अनुभवांमुळे आपले जीवन समृद्ध होईल. आपल्या विचारांच्या कक्षा विस्तारतील आणि अनुभवापेक्षा मोठा शिक्षक दुसरा कोण असू शकतो? सामान्यपणे ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पर्यटन होत असते. लोक बाहेर पडतात. मला विश्वास आहे की, यावेळीही तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेलात तर माझ्या त्या पहिल्या् अभियानाला पुढे घेवून जाणार आहात. तुम्ही कुठेही जा, आपला अनुभव ‘शेअर’ करा. फोटो ‘शेअर’ करा. ‘हॅश टॅग इनक्रेडिबलइंडिया’ यावर तुम्ही छायाचित्रे जरूर पाठवा. तिथल्या लोकांशी तुमचे भेटणे झाले, तर त्यांची छायाचित्रे पाठवा. फक्त इमारतींची छायाचित्रे नाहीत, फक्त नैसर्गिक सौदर्यांची छायाचित्रे नाहीत तर तिथल्या जनजीवनाविषयी काही विशेष गोष्टी तुम्ही लिहा. आपल्या प्रवासाविषयी चांगले निबंध लिहून काढा. ‘मायगव्ह’वर पाठवून द्या. नरेंद्र मोदी अॅपवर पाठवून द्या. माझ्या मनात एक विचार येत आहे की, आपण भारतामध्ये पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या राज्यातली सात उत्तमातील उत्तम पर्यटन स्थाने कोणती होऊ शकतात. प्रत्येक भारतीयाला आपल्या राज्यातल्या त्या सात विशेष स्थानांविषयी माहिती असली पाहिजे. शक्य झालं तर त्या सातही स्थानी गेले पाहिजे. आपण या स्थानांविषयी काही माहिती देवू शकतो का? नरेंद्र मोदी अॅपवर ही माहिती आपण उपलब्ध करू शकतो का? हॅशटॅग इंनक्रेडिबलइंडिया यावर ही माहिती आपण देवू शकतो का? तुम्ही विचार करा, एका राज्यातले सगळे लोक अशी चांगली माहिती देवू लागले तर मी सरकारमध्ये सांगेन की, आलेल्या माहितीची छाननी करावी आणि समान कोणत्या सात गोष्टी प्रत्येक राज्यातून आल्या आहेत, त्याविषयी प्रचार साहित्य तयार करावे. याचा अर्थ एक प्रकारे जनतेच्या अभिप्रायांमधूनच पर्यटन स्थानांना प्रोत्साहन कसे देता येईल ? याचा विचार होईल. अगदी याचप्रमाणे देशभरामधील आपण ज्या ज्या गोष्ट पाहिल्या आहेत, त्यापैकी आपल्याला सर्वात चांगल्या वाटलेल्या सात गोष्टी निवडायच्या आहेत. त्या सर्वोकृष्ट सात चांगल्या गोष्टी इतरांनीही पहाव्यात, त्याविषयी माहिती जाणून घ्यावी, असे तुम्हाला वाटत असलेल्या, तुमच्या पसंतीच्या त्या सात विशेष गोष्टींची माहितीही ‘मायगव्ह’ वर, नरेंद्र मोदी अॅपवर जरूर पाठवा. भारत सरकार त्यावर काम करेल. तशीच उत्तम स्थाने असतील तर त्यावर माहितीपट बनवणे, चित्रफीत बनवणे, प्रचार साहित्य तयार करणे, यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. आपण निवडलेल्या स्थानाचा, गोष्टीचा सरकार स्वीकार करेल. या, माझ्याबरोबर जोडले जा. या ऑक्टोबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंतच्या कालावधीचा उपयोग देशाच्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्हीही एक मोठे, महत्वपूर्ण भागिदार बनू शकता. त्यासाठी मी आपल्याला आमंत्रण देत आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, एक माणूस म्हणून अनेक गोष्टी माझ्या मनाला स्पर्शून जातात. माझ्या मनात तरंग उठवतात. माझ्या मनावर काही गोष्टी अमिट ठसा उमटवून जातात. शेवटी मी आपल्याप्रमाणेच एक माणूस आहे. काही दिवसांपूर्वीची घटना आहे. कदाचित आपल्याही लक्षात ही गोष्ट आली असेल. महिला-शक्ती आणि देशभक्ती यांचे अनोखे उदाहरण आपण देशवासियांनी पाहिले आहे. भारतीय लष्कराला लेफ्टनंट स्वाती आणि निधी यांच्या रूपाने दोन वीरांगना मिळाल्या आहेत. या दोघीही असामान्य वीरांगना आहेत. असामान्य यासाठी की, स्वाती आणि निधी या दोघींचेही पती भारतमातेची सेवा करता करता शहीद झाले होते. आपण कल्पना करू शकतो की, इतक्या लहान वयामध्ये संसार उद्ध्वस्त झाला तर मनःस्थिती कशी असेल? परंतु शहीद कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक यांनी या कठीण परिस्थितीला सामोरे जातानाच मनात ठाम निर्धार केला आणि त्या भारतीय सेनेमध्ये भर्ती झाल्या. 11 महिने कठोर परिश्रम करून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले. याचप्रमाणे निधी दुबे, यांचे पती मुकेश दुबे लष्करामध्ये नायक म्हणून कार्यरत होते आणि मातृभूमीसाठी शहीद झाले. तर त्यांची पत्नी निधी यांनी निर्धार केला की आपण सेनेत भर्ती व्हायचे आणि त्यांनी निर्धार पूर्ण केला. प्रत्येक देशवासियाला आपल्या या मातृ-शक्ती विषयी, आपल्या या वीरांगनांविषयी आदर वाटणे स्वाभाविक आहे. मी या दोन्ही भगिनींचे अगदी हृदयापासून खूप खूप अभिनंदन करतो. या दोघींनीही देशाच्या कोटी कोटी जणांना एक नवी प्रेरणा दिली आहे. एक नवचैतन्य जागे केले आहे. या दोन्ही भगिनींचे खूप खूप अभिनंदन.

माझ्या प्रिय देशवासियांनो, नवरात्राचा उत्सव आणि दिवाळीचा सण या मधल्या काळामध्ये देशातल्या युवापिढीसाठी एक मोठी संधी आली आहे. 17 वर्षाखालील फिफा विश्व चषक स्पर्धा यावर्षी आपल्या देशात होत आहे. मला विश्वास आहे की, चहुबाजूंनी फुटबॉलचा घोष ऐकू येवू लागणार आहे. प्रत्येक वयोगटातल्या पिढीला फुटबॉलविषयी आवड वाढीस लागेल. हिंदुस्तानातल्या शाळांच्या, महाविद्यालयांच्या मैदानांमध्ये आपले नवयुवक खेळताना दिसले नाहीत, असे होऊच शकणार नाही. चला, हे संपूर्ण जग भारताच्या भूमीवर खेळण्यासाठी येत आहेत, मग आपणही खेळाला आपल्या जीवनाचा भाग बनवू या.

माझ्या प्रिय देशवासियांनो, नवरात्रीचे पर्व सुरू आहे. माता दुर्गाच्या पूजेचा काळ आहे. संपूर्ण वातावरण कसे पवित्र सुगंधाने भारले गेले आहे. चारही दिशांना आध्यात्मिक वातावरण, उत्सवाचे वातावरण, भक्तीचे वातावरण आहे आणि हे संपूर्ण पर्व शक्तीच्या साधनेचे पर्व मानले जाते. शारदीय नवरात्र म्हणून हे पर्व साजरे केले जाते. याच काळात शरद ऋतुला प्रारंभ होणार आहे. नवरात्राच्या या पवित्र पर्वात मी देशवासियांना अनेक-अनेक शुभेच्छा देतो. माता शक्तीला प्रार्थना करतो की, देशाच्या सामान्य जनतेच्या जीवनाविषयीच्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात आणि आमच्या देशाने नवीन उंची गाठावी. प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्याचे सामर्थ्यह या देशामध्ये यावे. देश तेजगतीने पुढे जावा आणि दोन हजार बावीस (2022) मध्ये स्वातंत्र्याच्याा 75व्या वर्षी ‘स्वातंत्र्यासाठी बलिदान करणाऱ्यांेचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न व्हातवा. सव्वाशे कोटी देशवासियांचा संकल्प, अथक परिश्रम, अथक पुरूषार्थ आणि संकल्पाला साकार करण्यासाठी पाच वर्षाचा पथदर्शक कार्यक्रम बनवून आपण पुढे वाटचाल करायची आहे. यासाठी माता शक्तीने आपल्याला आशिर्वाद द्यावा, आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सण, उत्सव साजरे करा आणि उत्साहही वाढवा.

खूप खूप धन्यवाद!

S.Tupe/AIR/D.Rane