पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (29 ऑक्टोबर 2017)

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार! दीपावलीनंतर सहा दिवसांनी साजरा केला जाणारा छठपर्व, आपल्या देशातल्या निष्ठापूर्वक साजरा केल्या जाणाऱ्या सणांपैकी एक आहे! ज्यामध्ये आहारापासून वेशभूषेपर्यंत पारंपारिक नियमांचं यामध्ये पालन केलं जातं. छठपूजेचं अनुपम पर्व निसर्ग आणि निसर्गाच्या उपासनेशी पूर्णपणे जोडलं गेलं आहे. सूर्य आणि जल, हे महापर्व छठ उपासनेच्या केंद्रस्थानी आहेत, तर बांबू आणि मातीपासून बनवलेली भांडी आणि कंदमुळं, या पूजाविधीत उपयुक्त ठरणारी सामग्री आहे.आस्थेच्या या महापर्वात उगवत्या सूर्याची उपासना आणि मावळत्या सूर्याच्या पूजेतून दिला जाणारा संदेश  अद्वितीय संस्कारांनं परिपूर्ण आहे. दुनिया तर उगवत्याची पूजा करते, परंतु छठपुजेत आपल्याला त्यांची आराधना करण्याचाही संस्कार देते की, ज्यांचं मावळणं निश्चित आहे. आपल्या जीवनातल्या स्वच्छतेचं महत्वही या सणात सामावलं आहे. छठपुजेपूर्वी संपूर्ण घराची स्वच्छता, त्याचबरोबर, नदी, तलाव, किनारे, पूजास्थळ असलेल्या घाटांची स्वच्छता सर्व लोक मोठ्या उत्साहानं करतात. सूर्यवंदना अथवा छठपूजा – पर्यावरण संरक्षण, रोग निवारण आणि अनुशासनाचं पर्व आहे.

सर्वसामान्यपणे काही मागून खाणं, हे कमीपणाचं, हीन भावाचं समजलं जातं; परंतु छठपुजेत सकाळच्या अर्ध्यानंतर प्रसाद मागून खाणं, ही एक विशेष परंपरा आहे. प्रसाद मागून खाण्याच्यामागे हे कारण सांगितलं जातं की, त्यामुळे अहंकार नष्ट होतो. अहंकार ही एक अशी भावना आहे की, जी व्यक्तीच्या प्रगती मधला अडसर ठरते. भारताच्या या महान परंपरेचा लोकांना अभिमान असणं, हे अत्यंत स्वाभाविक आहे. प्रिय देशबांधवांनो, मन की बात ची प्रशंसा होते, त्यावर टीकाही होत राहिली. परंतु मी जेव्हा ‘मन की बात’ च्या प्रभावाकडे पाहतो, तेव्हा माझा विश्वास दृढ होतो की, देशाच्या जनमानसाबरोबर ‘मन की बात’ शंभर टक्के ॠणानुबंधात बांधली गेली आहे. खादी आणि हातमागाचं उदाहरणं घ्या. गांधी जयंतीला मी नेहमी हातमाग, खादीसाठी आग्रह करतो आणि त्याचा परिणाम काय आहे, हे जाणून आपल्याला आनंदच होईल. मला सांगितलं गेलंय की या महिन्यातल्या 17 ऑक्टोबरला, धनत्रयोदशीच्या दिवशी, दिल्लीच्या खादी ग्रामोद्योग भवन स्टोअरमध्ये एक कोटी वीस लाख रुपयांच्या विक्रमी विक्रीची नोंद झाली. खादी आणि हातमागाची, एकाच स्टोअरमधून एवढ्या मोठ्या प्रमाणावर विक्री होणं, हे ऐकून आपल्याला आनंद झाला असेल, संतोष झाला असेल. दीपावली दरम्यान, खादीच्या ‘गिफ्ट कुपन’ मधल्या विक्रीत जवळ जवळ 680 टक्के वाढ झाली आहे. खादी आणि हँडीक्राफ्ट-हस्तकला वस्तूंच्या विक्रीमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत, यावर्षी जवळपास 90 टक्के वाढ झाल्याचं दिसतं. आज युवक, वयस्कर, महिला, प्रत्येक वयोगटातले लोक खादी आणि हातमागाला पसंती देतात, हे चित्र पाहायला मिळतं. मी कल्पना करू शकतो की, या व्यवसायातून किती विणकर परिवारांना, गरीब परिवारांना, हातमागावर काम करणाऱ्या कुटुंबाना किती लाभ झाला असेल. पूर्वी ‘खादी फॉर नेशन’ होतं, आणि आम्ही ‘खादी फॉर फॅशन’ विषयी सांगितलं. परंतु, मागच्या काही काळापासूनच्या अनुभवातून मी म्हणू शकतो की, ‘खादी फॉर नेशन’ आणि ‘खादी फॉर फॅशन’ नंतर आता ‘खादी फॉर ट्रान्सफर्मेशन’ ची जागा खादीनं घेतली आहे. खादी गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या जीवनात, हातमाग गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या जीवनात, परिवर्तन साधून, त्यांना सक्षम, सशक्त, शक्तिशाली होण्यासाठीचं ते साधन बनते आहे. ग्रामोद्योगासाठी ही मोठी भूमिका आहे.

श्रीमान राजन भट्ट यांनी नरेंद्र मोदी अॅपवर लिहिलंय की, ते माझ्या सुरक्षा दलाबरोबरच्या दीपावलीतल्या अनुभवाविषयी जाणून घेऊ इच्छितात. आणि त्यांना हे ही जाणून घ्यायचं आहे, आमची सुरक्षा दलं दिवाळी कशी साजरी करतात. श्रीमान तेजस गायकवाड यांनीही नरेंद्र मोदी अॅपवर विचारलं आहे की, आमच्याकडची मिठाई सुरक्षा दलापर्यंत पोचवण्याची व्यवस्था होऊ शकते का? आम्हालाही आमच्या वीर सुरक्षा बलाची आठवण येते. आम्हाला वाटतं की, आमच्या घरची मिठाई देशाच्या जवानांपर्यंत पोचायला पाहिजे. दीपावली आपण सर्वांनी खूप उत्साहात साजरी केली असेल. माझ्यासाठीही ही दिवाळी, यावेळी एक विशेष अनुभव घेऊन आली. मला पुन्हा एकदा सीमेवर तैनात शूर सुरक्षा बलांसमवेत दिवाळी साजरी करता आली. यावेळी, जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये सुरक्षा बलांसमवेत दीपावली साजरी करणं, माझ्यासाठी अविस्मरणीय राहिलं.

सीमेवर ज्या,  कठीण आणि विषम परिस्थितीशी सामना करत, आपलं सुरक्षा बल देशाचं रक्षण करतं, तो संघर्ष, समर्पण आणि त्यागासाठी सर्व देशवासियांसह मी सुरक्षा बलाच्या प्रत्येक जवानाचा आदर करतो. जेव्हा आपल्याला वेळ मिळेल, निमित्त मिळेल, त्यावेळी जवानांचे अनुभव जाणून घेतले पाहिजे, त्यांची गौरवगाथा श्रवण केली पाहिजे. आपल्यापैकी अनेक लोकांना माहिती नसेल की, आपले जवान केवळ आपल्या सीमेचं रक्षण करत नाहीत, तर विश्वशांतीसाठी महत्वाची भूमिका सांभाळत आहेत. यूएन पीसकीपर म्हणून संपूर्ण जगात ते हिंदुस्थानचं नाव उज्वल करत आहेत. काही दिवसांपूर्वी 24 ऑक्टोबरला जगभरात यूएन डे – संयुक्त राष्ट्र दिवस साजरा झाला. संपूर्ण विश्वात शांतता स्थापित करण्याच्या संयुक्त राष्ट्रांच्या प्रयत्नांना, त्यांच्या सकारात्मक भूमिकेबाबत सर्वाना माहिती आहे. आणि आपण तर ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणजेच हे विश्वच माझा परिवार, असं मानणारे आहोत. या विश्वासामुळेच सुरुवातीपासूनच यूएनच्या विविध पुढाकारात, भारत सक्रीय आहे.

आपल्या सर्वांना माहिती आहेच की, भारताच्या घटनेची प्रस्तावना आणि यूएन चार्टरची प्रस्तावना या दोन्हीत ‘वुई द पिपल’ या शब्दांनी सुरु होते. भारतानं नारी समानतेवर नेहमीच जोर दिला आहे आणि मानवी हक्काबाबत यूएनचं घोषणापत्र हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. त्याच्या इनिशियल फ्रेममध्ये जे प्रपोज करण्यात आलं ते म्हणजे ‘‘ऑल मेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल’’ भारताच्या प्रतिनिधी हंसा मेहता यांच्या प्रयत्नांनी त्यात बदल करण्यात आला आणि नंतर ‘‘ऑल ह्युमन बिईंग्ज आर बॉर्न फ्री अँड इक्वल’’ याचा स्वीकार झाला. तसं पहायला गेलं तर हा छोटासा बदल, परंतु एका सशक्त विचाराचं दर्शन त्यामधून होतं. यू एन अम्ब्रेलाच्या माध्यमातून भारतानं जे महत्वाचं योगदान दिलं ते म्हणजे  यू एन पीसकीपिंग ऑपरेशन्समध्ये असलेली भारताची भूमिका! संयुक्त राष्ट्रांच्या शांती-रक्षा मिशनमध्ये, भारतानं नेहमीच सक्रीय भूमिका बजावली आहे. आपल्यापैकी बहुतेकांना बहुधा ही माहिती पहिल्यांदाच मिळाली असेल.

अठरा हजाराहून अधिक भारतीय सुरक्षा बलांनी यू एन पीसकीपिंग ऑपरेशन्समध्ये आपली सेवा दिली आहे. सद्यस्थितीत साधारणपणे सात हजार सैनिक ‘‘यू एन पीसकीपिंग’’ मध्ये जोडले गेलेत आणि संपूर्ण जगात हा तिसरा उच्चांकी क्रमांक आहे. 2017 च्या ऑगस्टपर्यंत, भारतीय जवानांनी, 71 पीसकीपिंग मधल्या किमान 50 ऑपरेशन्समध्ये सेवा रुजू केली आहे. हे शांतीचे प्रयत्न कोरिया, कंबोडिया, लाओस, व्हिएतनाम, काँगो, सायप्रस, लीब्रिया, लेबनॉन, सुदान या काही देशांमधून झाले. काँगो आणि दक्षिण सुदानमध्ये, भारतीय सेनेच्या हॉस्पिटलमध्ये 20 हजार रुग्णांवर उपचार झाले आणि अगणित लोकांना वाचवलं गेलं. भारतीय सुरक्षा बलानी, विविध देशातल्या लोकांची केवळ सुरक्षा केली नाही तर त्या लोकांची मनंही जिंकली. भारतीय महिलांनीही शांतता निर्माण करण्यात महत्वाची, अग्रणी भूमिका निभावली आहे.  भारत हा एकमेव देश असा आहे की लीब्रियात शांती-अभियान मिशनमध्ये, भारतानं महिला पोलीस युनिट पाठवलं, हे खूप कमी लोकांना माहिती आहे.

आणि भारताचं हे पाऊल जगातल्या देशांसाठी प्रेरणा देणारं ठरलं. यानंतर सर्व देशांनी आपली महिला पोलीस युनिट पाठवणं सुरु केलं. भारताची भूमिका केवळ शांती अभियानापुरती संबंधित नाही, तर 85 देशांत शांती-अभियानाचं प्रशिक्षण भारत देतो आहे, हे ऐकून आपल्याला अभिमान वाटेल. महात्मा गांधी आणि गौतम बुद्धांच्या या भूमीतून आपल्या बहादूर शांतीरक्षकांनी विश्वभर शांती आणि सद्भावाचा संदेश दिला आहे. शांती-अभियान, हे सोपं काम नाही. आपल्या सुरक्षा रक्षकांना दुर्गम भागात जाऊन हे कार्य करावं लागतं. वेगळ्या-वेगळ्या लोकांच्या सहवासात राहावं लागतं. भिन्न परिस्थिती आणि संस्कृती समजावून घ्यायला लागते. त्यांना तिथल्या आवश्यकता, वातावरणाशी सांभाळून घ्यावं लागतं. आज जेव्हा आमचे बहादूर, यू एन पीसकीपर्सच्या आठवणी काढतात, तेव्हा ते कॅप्टन गुरुबचन सिंग सलारिया यांना कसे विसरतील? ज्यांनी  आफ्रिकेतल्या काँगो इथं शांततेसाठी लढताना आपलं सर्वस्व समर्पित केलं होतं. त्यांच्या स्मृतीनं प्रत्येक देशवासियाची छाती गौरवानं फुलून जाते. ते एकमेव यू एन पीसकीपर होते, वीर पुरुष होते, ज्यांना परमवीर चक्रानं गौरवण्यात आलं. लेफ्टनंट जनरल प्रेमचंदजी यांनी सायप्रसमध्ये विशिष्ट ओळख निर्माण केली. 1989 मध्ये, 72व्या वर्षी त्यांना नामिबियात, ऑपरेशनसाठी फोर्स कमांडर म्हणून नियुक्त केलं आणि त्यांनी, त्या देशाचं स्वातंत्र्य निश्चित करण्यासाठी आपली सेवा दिली. जनरल थिमय्या, जे भारतीय सेनाप्रमुख होते, त्यांनीही सायप्रसमध्ये यू एन पीसकीपिंग फोर्सचं नेतृत्व केलं आणि शांती काऱ्यात सर्वस्व झोकून दिलं. शांती दूताच्या रूपातून नेहमीच भारतानं शांती, एकता आणि सद्भावनेचा संदेश दिला. आमचा विश्वास आहे की, प्रत्येकानं शांती, सद्भावानं जगावं आणि अधिक चांगल्या, तसंच शांतीपूर्ण भविष्य निर्माण करण्याच्या दृष्टीनं पुढे वाटचाल करावी.

माझ्या प्रिय देशबांधवानो, आपली पुण्यभूमी, अशा महान व्यक्तिमत्वांनी सुशोभित झाली आहे, ज्यांनी निस्वार्थ भावनेनं मानवतेची सेवा केली आहे. सिस्टर निवेदिता, ज्यांना आपण भगिनी निवेदिता म्हणतो, त्याही या असामान्य लोकांपैकी एक आहेत. त्या आयर्लंडमध्ये मार्गारेट एलिझाबेथ नोबेल म्हणून जन्मल्या. परंतु, स्वामी विवेकानंद यांनी त्यांना निवेदिता हे नाव दिलं. निवेदिताचा अर्थ आहे, पूर्ण रुपात समर्पित! नंतर, त्यांनी नावाला अनुरूप असं कार्य करून स्वतःला सिद्ध केलं. काल सिस्टर निवेदिता यांची दीडशेवी जयंती झाली. स्वामी विवेकानंद यांच्या काऱ्यानं त्या इतक्या प्रभावित झाल्या की, आपल्या सुखी जीवनाचा त्याग केला आणि आपलं जीवन गरिबांच्या सेवेसाठी समर्पित केलं. सिस्टर निवेदिता, ब्रिटीश राजमध्ये होणाऱ्या अत्याचारांनी खूप व्यथित झाल्या. इंग्रजांनी केवळ आपल्या देशाला गुलाम बनवलं नाही तर त्यांनी आपल्याला मानसिकरित्याही गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला. आपल्या संस्कृतीला कमी लेखुन हीन-भावना निर्माण करणं, हे नेहमी चालत आलं होतं. भगिनी निवेदिताजी यांनी भारतीय संस्कृतीच्या गौरवाला पुनर्स्थापित केलं.  राष्ट्रीय चेतना जागृत करून लोकांना एकसंध ठेवायचं काम त्यांनी केलं. त्यांनी जगभरातल्या विविध देशात जाऊन सनातन धर्म आणि दर्शनाबाबत होणाऱ्या विरोधी प्रचाराविरुद्ध आवाज उठवला.

प्रसिद्ध राष्ट्रवादी आणि तमिळ कवी सुब्रमण्यम भारती, आपली क्रांती कविता पुदुमर्इ पेन्न, न्यू वूमन आणि महिला सशक्तीकरणासाठी विख्यात आहेत. असं मानलं जातं की, त्यांची प्रेरणा भगिनी निवेदिता या होत्या. भगिनी निवेदिताजी यांनी महान वैज्ञानिक जगदीशचंद्र बसू  यांनाही सहाय्य केलं. आपल्या लेख आणि संमेलनाच्या माध्यमातून बसू यांचं संशोधन आणि प्रचारात सहाय्य केलं. भारताची हीच एक सुंदर विशेषता आहे की, आपल्या संस्कृतीमध्ये अध्यात्मिकता आणि विज्ञान एकमेकांना सहाय्यकारी आहेत. सिस्टर निवेदिता आणि वैज्ञानिक जगदीशचंद्र बसू याचं उत्तम उदाहरण आहे. 1899 मध्ये कोलकात्यात भीषण प्लेग झाला. पाहता पाहता शेकडो लोक गतप्राण झाले. सिस्टर निवेदिता यांनी स्वतःच्या आरोग्याची तमा न बाळगता नाले, आणि रस्त्यांच्या सफाईचं काम सुरु केलं. त्या एक अशा महिला होत्या की, आरामशीर जीवन जगू शकत होत्या, मात्र त्या गरिबांच्या सेवेशी जोडल्या गेल्या. लोकांनी, त्यांच्या या त्यागातून  प्रेरणा घेऊन सेवा काऱ्यात त्यांना सहाय्य केलं. त्यांनी आपल्या काऱ्यातून लोकांना स्वच्छता आणि सेवेची शिकवण दिली. त्यांच्या समाधीवर लिहिलंय की, ‘‘हियर रिपोजेस सिस्टर निवेदिता हू गेव्ह हर ऑल टू इंडिया’’ – इथं सिस्टर निवेदिता विश्रांती घेत आहेत, ज्यांनी आपलं सर्वस्व भारताला दिलं.’’ निःसंशय, त्यांनी हेच केलं आहे. प्रत्येक भारतीयानं भगिनी निवेदिता यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन स्वतः, त्या सेवा-मार्गावर चालायचा प्रयत्न करावा, यासारखी, अशा महान व्यक्तित्वाला, यापेक्षा अधिक उपयुक्त, योग्य अशी श्रद्धांजली असू शकत नाही.

फोन कॉल : माननीय पंतप्रधानजी, माझं नाव डॉक्टर पार्थ शाह आहे. 14 नोव्हेंबर आम्ही बालदिन म्हणून साजरा करतो, कारण हा प्रथम प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचा हा जन्मदिवस…या दिवशी जागतिक मधुमेह दिन पाळला जातो. मधुमेह हा केवळ मोठ्यांचा आजार नाही तर बहुतांशी मुलांनाही होतो. या आव्हानासंदर्भात आपण काय करू शकतो?

आपल्या फोन कॉलबद्दल आभार. सर्वप्रथम, आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी साजरा होणाऱ्या बालदिनाच्या सर्व बालकांना खूप शुभेच्छा! मुलं ही नव्या भारत निर्माणाचे हिरो आहेत. पूर्वी आजार मोठ्या वयात व्हायचे, ही आपली चिंता रास्त आहे. आजार जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात यायचे- ते आता लहान मुलांमध्येही दिसत आहेत. मुलांना मधुमेह होतो, हे ऐकून आश्चर्य वाटतं.  पूर्वीच्या काळी अशा आजारांना राज-रोग म्हटलं जायचं. राज-रोग म्हणजे असे आजार की, की संपन्न, सुखवस्तू – आरामशीर जीवन जगणाऱ्याना व्हायचे. युवकांमध्येही असे आजार अपवादानेच असायचे. मात्र, आता आमची जीवन शैली बदलली आहे. अशा आजारांना आजकाल लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणून ओळखलं जातं. युवावस्थेत अशा प्रकारचे  आजार होणं म्हणजे शारीरिक कृती कमी आणि आहार-विहाराच्या पद्धतीत होणारे बदल! समाज आणि कुटुंबांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं, ही आवश्यकता आहे. जेव्हा आपण यावर विचार कराल तेव्हा लक्षात येईल की, काहीही वेगळं करण्याची आवश्यकता नाही. फक्त आवश्यकता आहे, ‘छोट्या मोठ्या गोष्टी योग्य पद्धतीनं, नियमित करत आपल्या सवयी बदलण्याची, आपला स्वभाव बदलण्याची!

मी तर असं म्हणेन की, कुटुंबांनी असा प्रयत्न जागरूकतेनं करावा की, मुलांना मोकळ्या मैदानात खेळायची सवय लागेल. परिवारातल्या मोठ्या लोकांनीही मुलांशी शक्यतो खेळायचा प्रयत्न करावा. मुलांना उदवाहनानं म्हणजेच लिफ्टनं जाण्यायेण्याऐवजी, जिना चढून जाण्याची सवय लावावी. रात्री भोजनानंतर, पूर्ण परिवारानं मुलांसमवेत चालायला जायचा प्रयत्न करावा. योगा फॉर यंग इंडिया! हा योग, विशेषत: आमच्या युवक मित्रांना निरामय जीवनशैली आत्मसात करायला आणि लाईफस्टाईल डिसऑर्डरपासून बचाव करण्यात साह्यकारी होईल. शाळेपूर्वी 30 मिनिटे योग, याची विशेषता ही आहे की, योग सहज आणि सर्वसुलभ आहे. आणि मी हे एवढ्यासाठी सांगतो की, योग, कोणत्याही वयोगटातली व्यक्ती सहजगत्या करू शकते. सहज एवढ्यासाठी की, सोप्या पद्धतीनं शिकता येतो आणि सर्वसुलभ एवढ्यासाठी की, कुठंही तो करता येतो. त्यासाठी विशेष साधन-साहित्याची, मैदानाची आवश्यकता नाही. मधुमेह नियंत्रणासाठी योग, किती उपयुक्त आहे, यावर संशोधन सुरु आहे.

AAIMS मध्येही यावर अभ्यास सुरु आहे. आणि आतापर्यंत आलेले निष्कर्ष बरेच उत्साहवर्धक आहेत. आयुर्वेद आणि योग याकडे केवळ उपचाराच्या माध्यमातून न पाहता, ते आपल्या जीवनात अंगीकारावं.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, खास करून माझ्या युवा मित्रांनो, क्रीडा क्षेत्रात मागच्या काही दिवसात चांगल्या बातम्या आल्यात. विविध क्षेत्रात आपल्या क्रीडापटूंनी देशाचं नाव उज्वल केलं आहे. हॉकीत भारतानं शानदार खेळी करत एशिया कप हॉकी ट्रॉफी जिंकली. आपल्या खेळाडूंनी सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन केलं आणि याच बळावर भारत दहा वर्षानंतर एशिया कपचा चँम्पियन झाला. यापूर्वी 2003 आणि 2007 मध्ये भारत  एशिया कप चँम्पियन झाला होता. या हॉकी चमूला आणि त्यांच्या पथकातल्या साऱ्यांना, देशबांधवांकडून खूप खूप शुभेच्छा!

हॉकीनंतर बॅडमिंटनमध्येही चांगलं वृत्त आहे. बॅडमिंटन स्टार किदाम्बी श्रीकांतनं उत्कृष्ट खेळ करत डेन्मार्क ओपन ट्रॉफी जिंकून देशाच्या गौरवात भर घातली. इंडोनेशिया ओपन आणि ऑस्ट्रेलिया ओपननंतर त्यांचा हा तिसरा सुपर सिरीज प्रीमियर पुरस्कार आहे. या युवासाथीच्या योगदानाबद्दल आणि भारताचा सन्मान वाढवल्याबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देतो. अभिनंदन करतो.

मित्र हो, या महिन्यात फिफा अंडर सेव्हंटीन वर्ल्ड कपचं आयोजन झालं. जगभरातले अनेक संघ भारतात आले आणि फुटबॉल मैदानावर त्यांनी आपलं कौशल्य दाखवलं. मलाही एक सामना पहायची संधी मिळाली. खेळाडू-प्रेक्षकांत प्रचंड उत्साह होता. वर्ल्ड कपचा हा मोठा इव्हेंट, पूर्ण विश्व आपल्याला पाहत होतं. एवढा मोठा सामना आणि युवा क्रीडापटूंची उर्जा, उत्साह, काहीही करण्याची उर्मी हे सर्व पाहून मी मुग्ध झालो. वर्ल्ड कपचं आयोजन यशस्वी झालं आणि सर्व संघांनी सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं. भलेही भारताला चषक नाही मिळाला, मात्र भारतीय खेळाडूंनी सर्वांची मनं जिंकली. भारतासह सर्व जगानं खेळाचा हा महोत्सव एन्जॉय केला आणि ही पूर्ण स्पर्धा फुटबॉल प्रेमींसाठी रोमांचक आणि मनोरंजक झाली… फुटबॉलचं भविष्य उज्वल असल्याचे संकेत मिळत आहेत. पुन्हा एकदा मी सर्व खेळाडूंचं, त्यांच्या सहकार्यांचं आणि सर्व क्रीडाप्रेमींचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो.

माझ्या प्रिय देशबांधवानो, स्वच्छ भारत या विषयावर मला जितके लोक लिहितात, त्यांच्या भावनांना न्याय देण्यासाठी मला ‘मन की बात’ हा कार्यक्रम रोज करावा लागेल आणि केवळ स्वच्छता या विषयावरच मन की बात समर्पित करावा लागेल. काही लहान मुलं त्यांच्या प्रयत्नांचे फोटो पाठवतात तर युवा वर्गाचा एखादा किस्सा त्यामध्ये असतो. कुठे स्वच्छतेबाबतच्या नवीन उपक्रमाची कथा असते तर एखाद्या अधिकाऱ्याच्या जोशामुळे झालेलं परिवर्तनाची बातमी असते. काही दिवसापूर्वीच मला विस्तृत अहवाल प्राप्त झाला, ज्यात महाराष्ट्रातल्या चंद्रपूर किल्ल्यामधल्या कायापालटाची कहाणी आहे. तिथं इकॉलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन नावाच्या एका स्वयंसेवी संस्थेनं चंद्रपूर किल्ल्यात स्वच्छता अभियान केलं. दोनशे दिवस चाललेल्या या अभियानात लोकांनी न थांबता, न थकता, एका संघभावनेनं किल्ल्याच्या स्वच्छतेचं काम केलं. सलग दोनशे दिवस! आधीचे आणि आताचे असे दोन्ही फोटो त्यांनी मला पाठवले. फोटो पाहताना मी मंत्रमुग्ध झालो आणि जो कुणी हे फोटो पाहिल, ज्याच्या मनात आसपासच्या अस्वच्छतेनं निराशा आली असेल, त्यालाही कधी वाटलं असेल की स्वच्छतेचं स्वप्न कसं पूर्ण होईल- तर माझं लोकांना सांगणं आहे की, इकॉलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनच्या युवकांची, त्यांनी घेतलेल्या कष्टांची, उमेदीची, त्यांच्या संकल्पाची जिवंत प्रतिमा या फोटोतून तुम्ही पाहू शकता. ते पाहून आपल्यातली निराशा विश्वासात बदलेल. स्वच्छतेचे हे भगीरथ प्रयत्न, सौंदर्य, सांघिकता आणि सातत्याचं अद्भुत उदाहरण आहे. किल्ला हे तर आमच्या वैभवाचं प्रतीक! ऐतिहासिक वारश्यांची, वास्तूंची सुरक्षा आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी आपणा सर्व देशवासीयांची आहे. मी इकॉलॉजिकल प्रोटेक्शन ऑर्गनायझेशनच्या सर्व टीमला आणि चंद्रपूरवासीयाना शुभेच्छा आणि अभिनंदन करतो.

माझ्या प्रिय देशबांधवानो, आगामी चार नोव्हेंबरला आपण सर्व गुरु नानक जयंती साजरी करू. गुरु नानक देवजी, शिखांचे पहिले गुरूच नाहीत तर ते जगद्गुरू आहेत. त्यांनी संपूर्ण मानवता कल्याणाचा विचार केला, त्यांनी सर्व जातींना एकसमान संबोधलं. महिला सक्षमीकरण आणि महिला सन्मानावर त्यांनी भर दिला. गुरु नानक देवजी यांनी 28 हजार किलोमीटर्सची यात्रा केली आणि या प्रवासादरम्यान, त्यांनी सत्य मानवतेची शिकवण दिली. त्यांनी लोकांशी संवाद साधला, त्यांनी सत्य, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेचा मार्ग दाखवला! सामाजिक समतेचा संदेश दिला आणि ही शिकवण केवळ बोलून दाखवली नाही तर आपल्या काऱ्यातून दाखवली. त्यांनी लंगर सुरु केला, त्यातून लोकांमध्ये सेवा-भाव निर्माण झाला. एकत्र बसून भोजन ग्रहण केल्यामुळे लोकांमध्ये एकता आणि समानतेचा भाव जागृत झाला. गुरु नानक देवजींनी सार्थक जीवनाचे तीन संदेश दिले- परमात्म्याचं नामस्मरण करा, श्रम करा, काम करा, आणि गरजवंताना सहाय्य करा. आपली तत्वं सांगण्यासाठी गुरु नानक देवजींनी ‘गुरबाणी’ ची रचना केली. येणाऱ्या 2019 मध्ये आपण गुरु नानक देवजी यांचं साडेपाचशेवं प्रकाश वर्ष साजरं करणार आहोत. चला तर मग, आपण त्यांच्या संदेश आणि शिकवणीच्या मार्गावर वाटचालीचा प्रयत्न करूयात.

माझ्या प्रिय देशबांधवानो, दोन दिवसांनी म्हणजे 31 ऑक्टोबरला आपण सरदार वल्लभभाई पटेलजींची जन्म-जयंती साजरी करू. आपल्याला माहिती आहे की, अखंड आधुनिक भारताचा पाया त्यांनी रचला होता. भारतमातेच्या या महान संतानाच्या जीवनातून आपण आज खूप काही शिकू शकतो. 31 ऑक्टोबरला श्रीमती इंदिरा गांधीही जग सोडून गेल्या. सरदार वल्लभभाई पटेल यांची विशेषता म्हणजे, ते केवळ परिवर्तनवादी विचार देत नसत, तर ते साध्य करण्यासाठी जटील समस्येतून व्यावहारिक उपाय शोधण्यात ते वाकबगार होते. विचारांना साकार करणं यात ते कुशल निपुण होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताला एका सूत्रात गुंफण्याचं कार्य केलं. हे सुनिश्चित केलं की, कोट्यवधी भारतीयांना एक राष्ट्र आणि एक संविधान यांच्या छत्रछायेत आणता येईल. त्यांच्या निर्णयक्षमतेनं सर्व अडचणींना पार करण्याचं सामर्थ्य त्यांनी दिलं. जिथं सन्मान करण्याची आवश्यकता होती, तिथं सन्मान केला. जिथं बळाचा प्रयोग करण्याची गरज निर्माण झाली, तिथं त्यांनी बळाचा वापर केला. त्यांनी एक उद्दिष्ट निश्चित केलं आणि त्या उद्दिष्टाबरोबर दृढनिश्चयानं ते मार्गस्थ झाले. देशाला एकत्रित ठेवायचं कार्य केवळ तेच करू शकत होते. त्यांनी अशा एका राष्ट्राचं स्वप्न पाहिलं की, जिथले सर्व लोग समान असतील. मला असं वाटतं की, सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार सदा सर्वदा प्रेरणा देणारे आहेत. त्यांनी म्हटलं होतं, ‘‘जाती-पंथाचा कोणताही भेद आम्हाला थांबवू शकत नाही, सर्व भारताची मुलं-मुली आहेत, आपण देशावर प्रेम केलं पाहिजे आणि परस्पर प्रेम-सद्भावनेवर भविष्य घडवलं पाहिजे. सरदार साहेबांचे हे विचार आजही आमच्या न्यू इंडियाच्या व्हीजनसाठी प्रेरक आहेत, समयोचित आहेत. आणि त्यांचा जन्मदिवस ‘‘राष्ट्रीय एकता दिवस’’ म्हणून साजरा होतो. देशाला अखंड राष्ट्राचं स्वरूप देण्यात त्यांचं योगदान अतुलनीय आहे. सरदार साहेबांच्या जयंतीनिमित्तानं, 31 ऑक्टोबरला देशभर ‘‘रन फॉर युनिटी’’ चं आयोजन केलं जाईल, ज्यामध्ये देशभरातून बालक, युवा, महिला, सर्व वयोगटातले नागरिक सहभागी होतील. माझा सर्वांना आग्रह आहे की, आपणही रन फॉर युनिटी – आपल्या सद्भावनेच्या या उत्सवात सहभागी व्हावं.

प्रिय देशबांधवानो, दिवाळी सुट्टीनंतर, नव्या संकल्पासह, नव्या निश्चयासह, आपण सर्व दैनंदिन जीवनात आला असाल. माझ्या वतीनं देशबांधवाना त्यांची सर्व स्वप्नं साकार होवो, अशी शुभकामना! खूप खूप धन्यवाद. 

 

 

S.Tupe/AIR/D.Rane