पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (28 जानेवारी 2018

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! 2018 या वर्षामध्ये ‘मन की बात’च्या माध्यमातून आज पहिल्यांदाच आपल्याशी संवाद साधतोय. दोन दिवसांपूर्वींच आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला. या कार्यक्रमाला दहा देशांचे प्रमुख सन्माननीय अतिथी उपस्थित होते, असं इतिहासात यंदा प्रथमच घडलं.

माझ्या प्रिय देशवासियांनो, मी आज प्रकाश त्रिपाठी यांच्या पत्राचा उल्लेख करणार आहे. त्यांनी ‘नरेंद्रमोदीअॅप’वर एक लांबलचक पत्र लिहिलं आहे आणि त्यांच्या पत्रातल्या सर्व विषयांना स्पर्श करावा, असं खूप आग्रहानं सांगितलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, 1 फेब्रुवारी रोजी अंतराळामध्ये जाणाऱ्‍या कल्पना चावलाची पुण्यतिथी आहे. कोलंबिया अंतराळ यान दुर्घटनेमध्ये कल्पना चावला आपल्‍या सर्वांना कायमचं सोडून गेली. मात्र अवघ्या दुनियेतल्या लाखो युवकांना एक आगळी प्रेरणा तिनं दिली. आपल्या दीर्घपत्राचा प्रारंभ प्रकाश भाईंनी कल्पना चावलाच्या स्मरणानं केला, याबद्दल मी, भाई प्रकाशजींचा आभारी आहे. कल्पना चावला या अंतराळ कन्येला आपण फार लवकर गमावलं, ही आपल्या सगळ्यांसाठीच खूप दुःखद गोष्ट आहे. परंतु कल्पना चावलानं  संपूर्ण विश्वाला विशेषतः भारतामधल्या हजारो कन्यांना एक महान संदेश दिला की, स्त्री-शक्तीसाठी कोणतीही मर्यादा असू शकत नाही. इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प असेल, विशेष काही करून दाखवण्याचा मनाचा पक्का निर्धार, निश्चय असेल तर काहीही अशक्य नाही. भारतामध्ये आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला वेगानं  प्रगती करीत आहेत, पुढं जात आहेत आणि देशाची मान उंचावत आहेत, हे पाहिल्यानंतर खूप आनंद होतोय.

प्राचीन काळापासून आपल्या देशातल्या महिलांना दिला जाणारा सन्मान, त्यांचं समाजातलं  स्थान आणि त्यांनी दिलेलं  योगदान, ही संपूर्ण दुनियेच्या दृष्टीने खूप मोठी, नवलाची गोष्ट आहे. भारतामध्ये महान विदुषींची एक मोठी परंपरा आहे. वेदांमधील ऋचांची निर्मिती करण्यामध्ये भारतातल्या अनेक विदुषींचे महत्वपूर्ण योगदान आहे. लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशी  न जाणो कित्येक नावं  घेता येतील. आज ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असं आपण म्हणतो, परंतु प्राचीन काळी रचलेल्या आमच्या शास्त्रांमध्ये, स्कंद-पुराणांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की:—

दशपुत्र, समाकन्या, दशपुत्रान प्रवर्धयन्!

यत् फलं लभतेमर्त्‍य, तत् लभ्यं कन्यकैकया!!

या श्लोकाचा अर्थ असा आहे की, एक कन्या दहा मुलांच्या बरोबरीची असते. दहा पुत्रांमुळे जितके पुण्य मिळेल, तेवढेच पुण्य एका कन्येकडून मिळणार आहे. या श्लोकावरून आपल्या समाजात महिलेला असलेलं महत्व दिसून येतं. आणि म्हणूनच आपल्या समाजामध्ये स्त्रियांना ‘शक्ती’ असं मानलं जातं, तसा दर्जा दिला जातो. ही स्त्री शक्ती संपूर्ण देशाला, संपूर्ण समाजाला, आपल्या कुटुंबाला एकतेच्या धाग्यामध्ये बांधून ठेवत असते. मग वैदिक काळातल्या लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी यांच्या सारख्या महान विद्वत्ता असलेल्या विदुषी असो की, अक्का महादेवी आणि मीराबाईसारख्या महान ज्ञानी आणि भक्ती मार्गातल्या संत असो, किंवा अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या शासन व्यवस्था पाहणाऱ्‍या असो अथवा राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखी शूर रणरागिणी असो, स्त्री शक्ती नेहमीच आपल्याला प्रेरणा देत आहे. त्याचबरोबर देशाचा मान-सन्मान वृध्दिंगत करत आहे.

प्रकाश त्रिपाठी यांनी आपल्या पत्रामध्ये अनेक उदाहरणांचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, आपल्या धाडसी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी ‘सुखोई-30’ या लढावू विमानातून केलेला प्रवास त्यांना प्रेरणा देणारा वाटतो. वर्तिका जोशी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाच्या महिला कर्मचाऱ्‍यांनी ‘आय.एन.एस.व्ही.-तारिणी’ च्या माध्यमातून संपूर्ण विश्वाची परिक्रमा करण्याचा उपक्रम सुरू केला आहे, त्याचाही उल्लेख त्रिपाठी यांनी पत्रामध्ये केला आहे. भावना कंठ, मोहना सिंह आणि अवनी चतुर्वेदी या तीन धाडसी महिला लढावू वैमानिक बनल्या आहेत. त्या आता ‘सुखोई -30’ मध्ये प्रशिक्षण घेत आहेत. क्षमता वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सर्व महिला कर्मचाऱ्‍यांनी दिल्ली ते अमेरिकेतल्या सॅन फ्रॅन्सिसकोपर्यंत आणि पुन्हा दिल्लीपर्यंत एअर इंडियाचे प्रवासी विमान नेले होते. विशेष म्हणजे या विमानामध्ये सर्वच्या सर्व महिला कर्मचारी होत्या. त्रिपाठी, आपण म्हणता आहात ते अगदी खरंच आहे. आज सर्व क्षेत्रात फक्त महिला आहेत असं नाही किंवा त्या सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत असंही नाही तर, त्या नेतृत्व करत आहेत. आज अशी अनेक क्षेत्रं आहेत, की त्यामध्ये आमच्या महिलांनीच सर्वप्रथम काही विशेष कामगिरी करून दाखवली आहे. अशी कामगिरी करून आमच्या महिला, मैलाचा एक दगड स्थापन करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी माननीय राष्ट्रपतींनी एका नवीन गोष्टीचा प्रारंभ केला.

ज्या महिलांनी आपआपल्या क्षेत्रात अगदी पहिल्यांदा वेगळं काही केलं आहे, अशा असामान्य कामगिरी करणाऱ्‍या महिलांच्या एका समुहाची राष्ट्रपतीजींनी भेट घेतली. या समुहामध्ये कोण कोण होतं तर, पहिली महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन, पहिली महिला अग्निशामक, पहली महिला बसचालक, अंटार्टिकामध्ये पोहोचणारी पहिली महिला, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये पाऊल टाकणाऱ्‍या पहिल्या महिला होत्या. आमच्या महिला शक्तीने समाजातील रूढीप्रियतेच्या शृंखला तोडण्याचं असामान्य कार्य केलं आणि एक नवे कीर्तिमान स्थापित केले. त्यांनी दाखवून दिलं की, कठोर परिश्रम, अथक प्रयास केला आणि संकल्प दृढ असेल तर कितीही संकटं आली, कोणतेही अडथळे निर्माण झाले, तरी त्यांना पार करून, बाजूला सारून एक नवा मार्ग तयार करता येवू शकतो. आता हा मार्ग आपल्या केवळ समकालीन लोकांनाच नाही, तर येणाऱ्‍या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत असतो. नवीन पिढीमध्ये एक नवा उत्साह आणि जोश भरण्याचं कार्य करतो. या जिद्दी पहिल्या महिलांच्या कार्याची माहिती देणारे पुस्तकही तयार करण्यात आलं आहे. या पुस्तकामुळं असामान्य स्त्री शक्तीची माहिती संपूर्ण देशाला मिळू शकणार आहे. त्यांच्या जीवनावरून आणि त्यांनी केलेल्या कार्यावरून प्रेरणा घेता येणार आहे. हे पुस्तक ‘नरेंद्र मोदी वेबसाईट’ वरसु़द्धा ‘ई-बूक’ स्वरूपामध्ये उपलब्ध आहे.

आज देश आणि समाजामध्ये होत असलेल्या सकारात्मक परिवर्तनामध्ये या देशातल्या महिला शक्तीने खूप महत्वपूर्ण भूमिका आहे. आज ज्यावेळी आपण महिला सशक्तीकरणाविषयी चर्चा करीत आहोत, त्यावेळी मी एका रेल्वे स्थानकाचा इथे उल्लेख करू इच्छितो. आता एक रेल्वे स्थानक आणि महिला सशक्तीकरण या दोन्ही गोष्टींचा नेमका काय संबंध आहे, असा विचार आपल्या मनात आला असेल. ज्या रेल्वे स्थानकामध्ये सर्व महिला कर्मचारीवर्ग आहे, असं भारतातलं पहिलं रेल्वे स्थानक म्हणजे मुंबईमधलं माटुंगा रेल्वेस्थानक आहे. या स्थानकामध्ये सर्व विभागांमध्ये महिला कर्मचारी आहेत. मग व्यावसायिक विभाग असो, रेल्वे पोलिस असेल, तिकीट तपासनीस असेल किंवा उद्घोषणा असेल. ‘पॉईंट पर्सन’ म्हणूनही महिलाच कार्यरत आहेत. माटुंगा रेल्वे स्थानकामध्ये 40 पेक्षा जास्त महिला कर्मचारी वर्ग आहे. प्रजासत्ताक दिनाचे पथसंचलन  पाहिल्यानंतर व्टिटर आणि इतर समाज माध्यमावर अनेक जणांनी लिहिले की, संचलनामध्ये लक्षवेधी गोष्ट म्हणजे ‘बीएसएफ बायकर कॉंटिनजेंट’मध्ये सर्व महिला सहभागी झाल्या होत्या. या महिला अतिशय साहसी प्रयोग करीत होत्या आणि या दृष्यांनी परदेशातून आलेल्या पाहुण्यांनाही अचंभित केलं. त्यांना ही दृष्ये नवलपूर्ण वाटली. सशक्तीकरण आणि आत्मनिर्भरता या दोन्ही शब्द एकच आहेत. आज आमच्या महिला नेतृत्व करीत आहेत. तसेच त्या आत्मनिर्भर बनत आहेत. अशाच प्रकारच्या एका गोष्टीचे मला आज इथं स्मरण होत आहे. छत्तीसगढच्या आमच्या आदिवासी महिलांनीही खूप कमाल करून दाखवली आहे. त्यांनी एक नवा आदर्श समोर ठेवला आहे. आदिवासी महिलांविषयी ज्यावेळी चर्चा होते, त्यावेळी सर्वांच्या मनामध्ये एक विशिष्ट चित्र निर्माण होत असतं. त्यामध्ये जंगल असतं, पायऱ्‍या-पायऱ्‍यांची डोंगर-दरीतली वाट असते. त्यावरून जळावू सरपणाचा भारा आपल्या डोक्यावर घेवून जाणाऱ्‍या महिला असतात. परंतु छत्तीसगढच्या आमच्या या आदिवासी महिलांनी, स्त्री-शक्तीने देशासमोर एक नवे चित्र निर्माण केले आहे. छत्तीसगढमधला दंतेवाडा जिल्ह्याचा परिसर माओवादाच्या प्रभावाखाली आहे. हिंसाचार, अत्याचार, बॉम्ब, बंदुका, पिस्तूल यांच्या जोरावर, आणि धाकावर माओवाद्यांनी इथं अतिशय भीतिदायक वातावरण निर्माण केलं आहे. अशा धोकादायक क्षेत्रामध्ये आदिवासी महिला ‘ई-रिक्षा’ चालवून आत्मनिर्भर बनत आहेत. अतिशय कमी कालावधीमध्ये ई-रिक्षा चालवण्याच्या कार्यामध्ये असंख्य महिला सहभागी झाल्या आहेत आणि त्यांच्या या चांगल्या कृतीमुळे तीन लाभ होत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे स्वयंरोजगारामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्याचे काम होत आहे. महिलांच्या पुढाकारामुळे माओवादी प्रभावित क्षेत्राचा कायापालट होत आहे आणि त्याबरोबरच पर्यावरण संरक्षणाच्या कामालाही खूप चांगलं बळ मिळत आहे. या कार्यामध्ये पुढाकार घेत असलेल्या दंतेवाडा जिल्हा प्रशासनाचे खूप कौतुक आहे. या कार्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यापासून ते महिलांना ई-रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण देण्यापर्यंत कार्य प्रशासनानं केलं. महिलांच्या यशामध्ये जिल्हा प्रशासनानं खपू महत्वाची भूमिका पार पाडली. 

काही गोष्टींचा अमिट ठसा आपण उठवतो, असं काही लोक बोलतात, असं आपण वारंवार ऐकत आलो आहोत. आता ही वेगळी गोष्ट कोणती, तर ती म्हणजे, ‘फ्लेक्झिबिलिटी’ म्हणजेच ‘लवचिकता’, परिवर्तन. जे काही कालबाह्य आहे, ते सोडून दिलं पाहिजे. जिथं आवश्यक आहे, तिथं सुधारणा करून त्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि आपल्या समाजाचे एक विशेषत्व म्हणजे आत्मसुधारणा करण्याचा अव्याहत प्रयत्न, स्वतःमध्ये बदल, सुधारणा घडवून आणणे ही भारतीय परंपरा आहे. ही संस्कृती आपल्याला वारसा म्हणून मिळाली आहे. कोणत्याही समाज जीवनाचा परिचय हा, त्याच्यातील स्वतःहून केलेला बदल, सुधारणा घडवण्याचे तंत्र विकसित झाले आहे की नाही, यावरून होत असतो. सामाजिक कुप्रथा, आणि वाईट चालीरिती, पद्धती यांच्या विरूद्ध आपल्या देशामध्ये व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अलिकडेच काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये एक चांगला प्रयत्न केला गेला. सामाजिक कुप्रथांना अगदी मुळासकट नष्ट करण्यासाठी राज्यामध्ये 13 हजार किलोमिटरपेक्षा जास्त लांब मानवी शृंखला बनवण्यात आली. ही विश्वातली सर्वात लांब मानवी साखळी होती. या मोहिमेमध्ये लोकांनी बालविवाह, हुंडा देणे यासारख्या वाईट प्रथांच्या विरोधात समाजात जागरूकता निर्माण केली. हुंडा आणि बालविवाह यांच्यासारख्या कुप्रथांच्या विरोधात लढा देण्याचा संकल्प संपूर्ण राज्याने केला. अबालवृद्ध या मोहिमेमध्ये अतिशय उत्साहामध्ये सहभागी झाले होते. युवावर्ग, माता, भगिनी सगळेजण या मोहिमेमध्ये सहभागी झाले. पाटण्याच्या ऐतिहासिक गांधी मैदानापासून प्रारंभ झालेली ही मानवी शृंखला राज्याच्या सीमेपर्यंत अतूट राहून जोडली गेली. समाजातल्या सर्व लोकांना विकासाचा खऱ्‍या अर्थाने लाभ मिळण्याची आवश्यकता आहे, यासाठी आपला समाज अशा कुप्रथांपासून मुक्त झाला पाहिजे. चला तर मग, आपण सगळेजण मिळून अशा कुप्रथांना समाजातून समूळ नष्ट करण्याची प्रतिज्ञा घेवू या आणि एक नव भारत, एक सशक्त आणि समर्थ भारत निर्माण करू या. मी बिहारच्या जनतेचे, राज्याचे मुख्यमंत्री, तिथले प्रशासन आणि मानवी शृंखलेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे कौतुक करतो. या लोकांनी समाजाला कल्याणाच्या दिशेने नेण्यासाठी इतक्या व्यापक प्रमाणावर विशेष प्रयत्न केले, हे कौतुकास्पद आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, कर्नाटकमधल्या म्हैसूरच्या एका सद्गृहस्थांनी ‘मायगव्ह’वर लिहिलेले आहे की, त्यांच्या पित्यासाठी दरमहिन्याला सहा हजार रूपये त्यांना खर्च करावे लागत होते. परंतु जन-औषधी केंद्राविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तिथूनच औषधांची खरेदी करायला सुरूवात केली आहे. आता त्यांचा वडिलांच्या औषधाचा खर्च 75 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यांची अशी इच्छा आहे की, ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये मी आपल्याशी यावर बोलावं, जेणेकरून जन-औषधीविषयी जास्तीत जास्त लोकांना माहिती समजली पाहिजे. आणि जनतेला त्याचा लाभ घेता आला पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून अनेक लोकांनी याविषयावर मला आपलं मनोगत लिहून कळवले आहे. बरेचजण सांगतही असतात. ज्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे अशा अनेक लोकांचे व्हिडिओ समाज माध्यमांवर मी सुद्धा पाहिले आहेत आणि खरंच सांगतो, अशी माहिती मिळाली की, खूप आनंद होतो. मनामध्ये खोलवर संतुष्टीचा भाव निर्माण होतो. आणि आणखी एक मला खूप चांगलं वाटलं ते इथं नमूद करतो, ते म्हणजे श्रीयुत दर्शन यांच्या मनात आलेला विचार. आपल्याला जसा लाभ झाला, तसाच तो इतरांनाही झाला पाहिजे, असा विचार त्यांनी केला, हे विशेष आहे. या योजनेमागचा उद्देश आहे की, आरोग्य सुविधा सर्वांना परवडणारी असली पाहिजे. आणि ‘ईज ऑफ लिव्हिंग‘यासाठी सर्वांना प्रोत्साहन देण्याचा उद्देशही आहे. जन-औषधी केंद्रांमध्ये मिळणारी औषधं ही बाजारामध्ये विकली जाणाऱ्‍या ब्रँडेड औषधांपेक्षा जवळपास 50 ते 90 टक्के स्वस्त असतात. त्यामुळे जनसामान्य, विशेषतः रोज औषधं घेणाऱ्‍या वरिष्ठ नागरिकांना खूप मोठी आर्थिक मदत मिळते. त्यांची मोठी बचत होते. यामध्ये खरेदी केली जाणारी ‘जेनरिक’ औषधं ही जागतिक आरोग्य संघटनेनं निश्चित केलेल्या मानकांप्रमाणे असतात. याच कारणामुळे चांगल्या दर्जाची औषधं स्वस्त दरामध्ये उपलब्ध होवू शकत आहेत. आज देशभरामध्ये तीन हजारापेक्षा जास्त जन-औषधी केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत. यामुळे केवळ औषधं स्वस्त मिळत आहेत असं नाही, तर वैयक्तिक उद्योजकांनाही रोजगाराची एक नवी संधी निर्माण होत आहे. स्वस्त औषधं प्रधानमंत्री भारतीय जन-औषधी केंद्रांमध्ये आणि रूग्णालयांच्या ‘अमृत स्टोअर्स’मध्ये उपलब्ध आहेत. या सगळ्या योजनेमागे एकमेव उद्देश आहे, तो म्हणजे, देशातल्या गरीबातल्या गरीब व्यक्तीला दर्जेदार आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध झाली पाहिजे. त्यामुळे एक स्वस्थ आणि समृद्ध भारताचे नाते निर्माण करता येणार आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, महाराष्ट्रमधून श्रीयुत मंगेश यांनी ‘नरेंद्र मोदी मोबाईल अॅप’वर एक छायाचित्र पाठवलं आहे. या छायाचित्राच्या वेगळेपणामुळं माझं लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. या छायाचित्रामध्ये एक नातू आपल्या आजोबांच्या बरोबर ‘क्लिन मोरणा नदी’ या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाला होता. मला माहिती मिळाली की, अकोल्याच्या नागरिकांनी स्वच्छ भारत मोहिमेमध्ये ‘मोरणा नदी’ स्वच्छ करण्यासाठी कार्यक्रम सुरू केला आहे. काही वर्षांपूर्वी मोरणा नदी अगदी बारमाही वाहत होती. परंतु नंतर मात्र ती हंगामी, ‘पावसाळी-बरसाती’ झाली. आणखी एक त्रासदायक गोष्ट म्हणजे नदीच्या पात्रामध्ये जंगली गवत, जलपर्णी फोफावली होती. नदी आणि तिच्या काठांवरही मोठ्या प्रमाणावर कचरा, घाण फेकला जात होता. गावकरीवर्गाने एक कृती आराखडा तयार केला आणि मकर संक्रांतीच्या आधी एक दिवस, 13 जानेवारी रोजी ‘स्वच्छ मोरणा मोहीम’ तयार केली. त्यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये चार किलोमीटर क्षेत्रामध्ये चौदा स्थानांवर मोरणा नदीच्या दोन्ही काठांची स्वच्छता करण्यात आली. ‘स्वच्छ मोरणा मोहीम’ या चांगल्या कामामध्ये अकोल्यातले सहा हजारांपेक्षा जास्त नागरिक आणि शंभरपेक्षा जास्त स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयाचे विद्यार्थी, मुले, वृद्ध, महिला, भगिनी, माता अशा सर्वजण सहभागी झाले होते. 20 जानेवारीलाही अशाच प्रकारे मोरणा स्वच्छतेची ही मोहीम सुरू ठेवली होती. आता जोपर्यंत मोरणा नदी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत अकोलेकर दर शनिवारी सकाळी ही मोहीम अशीच सुरू ठेवणार आहेत, अशी माहिती मला मिळाली आहे. यावरून एक दिसून येतं की, जर माणसानं काही करायचंच, असा निर्धार केला, तर काही अशक्य आहे, असं अजिबात काही नाही. जन-आंदोलनाच्या माध्यमातून मोठमोठी कार्य करून परिवर्तन घडवून आणता येवू शकते. अकोल्याच्या जनतेचं, तिथल्या जिल्हा आणि नगरपालिका प्रशासनाचं आणि या कामाला जन-आंदोलनाचं स्वरूप देवून त्या कामामध्ये सहभागी होत असलेल्या सर्व नागरिकांचं, त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. आपण करीत असलेला प्रयत्न देशाच्या अन्य भागातल्या लोकांनाही एक नवी प्रेरणा देण्याचं काम करणार आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, सध्या पद्म पुरस्कारांविषयी खूप चर्चा सुरू आहे, आपणही नक्कीच ती ऐकत असणार. याविषयी वर्तमानपत्रांमध्ये, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर सुरू असलेल्या चर्चेने लक्ष वेधलं जातं. या पुरस्काराच्या सूचीकडे आपण थोडं काळजीपूर्वक पाहिलं, तर आपल्याला नक्कीच अभिमान वाटेल. आपल्यामध्ये वेगवेगळ्या  क्षेत्रात कार्य करणारे किती महान लोक आहेत, हे पाहून अभिमान वाटणं स्वाभाविक आहे. आज आपल्या देशामध्ये सामान्य  व्यक्ती कोणाच्याही, कसल्याही शिफारसीशिवाय एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहोचू शकतो. प्रत्येक वर्षी पद्म पुरस्कार देण्याची परंपरा आहे. परंतु गेल्या तीन वर्षांपासून या पुरस्काराची संपूर्ण प्रक्रिया बदलण्यात आली आहे. आता कोणीही नागरिक या पुरस्कारासाठी कुणाचंही नाव सुचवू शकतो. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता आली आहे. आपल्याही आता लक्षात आलं असेल की, खूप सामान्य वाटत असलेल्या परंतु असामान्य कार्य करणाऱ्‍या लोकांना पद्म पुरस्कार मिळत आहेत. जे लोक सर्वसामान्यपणे मोठ-मोठ्या शहरांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर, किंवा कोणत्याच समारंभांमध्ये दिसत नाहीत, अशा लोकांना पद्म पुरस्कार दिले गेले आहेत. आता पुरस्कार देण्यासाठी त्या व्यक्तीच्या ओळखीपेक्षा त्या व्यक्तीने केलेल्या कामाचं महत्व लक्षात घेतलं जात आहे आणि त्याचा परिचय करून दिला जात आहे. आपण सर्वांनी ऐकलंही असेल, अरविंद गुप्ताजी यांचं कार्य जाणून आपल्याला खरंच आनंद होईल. आय आय टी कानपूरचे विद्यार्थी असलेल्या अरविंदजींनी लहान मुलांसाठी खेळणी तयार करण्याच्या कामामध्ये त्यांनी आपलं आयुष्य वेचलं आहे. गेली चार दशके, ते कचऱ्‍यामधून खेळणी तयार करतात. मुलांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करण्यासाठी ते सतत कार्यरत आहेत. बेकार, फेकून दिलेल्या वस्तूंमधून मुलांनी शास्त्रीय प्रयोग करावेत, त्यामागचे विज्ञान जाणून घ्यावे, यासाठी ते निरंतर प्रयत्न करीत आहेत. यासाठी त्यांनी देशभरातल्या तीन हजार शाळांमध्ये जावून वेगवेगळ्या  18 भाषांमध्ये बनवलेली चित्रफीत त्यांनी दाखवली आणि मुलांना प्रेरणा दिली. त्यांची विज्ञान जिज्ञासा वाढवण्याचा प्रयत्न केला. किती अद्‌भूत, असामान्य कार्य त्यांनी केलं आहे. एखाद्या गोष्टीसाठी किती समर्पण केलं आहे. अशीच गोष्ट कर्नाटकच्या सीताव्वा जोद्दती यांची आहे. त्यांना ‘महिला सशक्तीकरणाची देवी’ असं उगाच नाही संबोधल्या जात. गेल्या तीन दशकांपासून बेलागवीमधल्या असंख्य महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यात सीताव्वाचे मोठे योगदान आहे.  वयाच्या सातव्या वर्षी  देवदासी म्हणून त्‍यांनी स्वत:ला ‘समर्पित’  केलं होतं. परंतु सीताव्वांनी आपलं संपूर्ण आयुष्य देवदासींच्या कल्याणासाठी खर्च केलं. इतकंच नाही, तर त्यांनी दलित महिलांच्या कल्याणासाठीही महान कार्य केलं आहे. आपण मध्य प्रदेशातल्या भज्जू श्याम यांच्याविषयी बरंच काही ऐकलं असेल. भज्जू श्याम यांचा जन्म एका अतिशय गरीब, आदिवासी कुटुंबामध्ये झाला होता. पोटापाण्यासाठी म्हणून ते एक साधी नोकरी करीत होते. परंतु त्यांना पारंपरिक आदिवासी चित्रकला, रंगकाम करण्याचा छंद होता. या छंदामुळेच त्यांना केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये सन्मान मिळाला आहे. नेदरलँड, जर्मनी, इंग्लंड, इटली यासारख्या अनेक देशांमध्ये त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आली आहेत. परदेशामध्ये भारताचे नाव गाजवणाऱ्‍या भज्जू श्यामजी यांची प्रतिभा ओळखून त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. केरळच्या आदिवासी महिला लक्ष्मीकुट्टी यांची गोष्ट ऐकून तर आपल्याला सुखद आश्चर्य वाटेल. लक्ष्मीकुट्टी या कल्लार इथं शिक्षिका आहेत. आणि आत्तासुद्धा त्या अगदी घनदाट जंगलामध्ये आदिवासी भागामध्ये ताडांच्या पानांपासून बनवलेल्या झोपडीमध्ये वास्तव्य करतात. त्यांनी आपल्या स्मरणनोंदींच्या आधारे पाचशेपेक्षा जास्त वनौषधी बनवल्या आहेत. जंगलातल्या अनेक जडी-बुटींच्या मदतीनं त्यांनी औषधं बनवली आहेत. सर्पदंशावर अगदी रामबाण उपाय ठरणारे औषध त्यांनी तयार केलं आहे. लक्ष्मीजी आपल्याला असलेल्या वनौषधीच्या ज्ञानाच्या मदतीने अथक समाजसेवा करत आहे. अशा या प्रसिद्धी परांङ्‌मुख व्यक्तींना शोधून काढून त्यांनी केलेल्या समाज कार्याचा गौरव म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

आज इथं आणखी एका नावाचा उल्लेख करण्याचा मोह मला होतोय. पश्चिम बंगालमधल्या 75 वर्षांच्या सुभाषिनी मिस्त्री यांचीही पद्म पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सुभाषिनी मिस्त्री या महिलेने रूग्णालय बांधण्यासाठी दुसऱ्‍यांच्या घरांमध्ये भांडी घासली, भाजी विकली. सुभाषिनीजी ज्यावेळी 23 वर्षांच्या होत्या, त्यावेळी औषधोपचार मिळू शकले नाहीत, या कारणामुळे त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. आयुष्यात आलेल्या या संकटामुळे त्यांना गरीबांसाठी रूग्णालय निर्माण करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. आज त्यांच्या अथक परिश्रमांद्वारे निर्मित रूग्णालयामध्ये हजारो गरीबांवर मोफत औषधोपचार केले जात आहेत. आपल्या या बहुरत्ना वसुंधरेवर असे अनेक नर-रत्न आहेत, अनेक नारी-रत्न आहेत. परंतु त्यांना कोणीसुद्धा ओळखत नाही, त्यांचा कुणालाही परिचय नाही, अशी माझी पूर्ण खात्री आहे. अशा व्यक्तींना सन्मान दिला नाही, किंवा त्यांचा परिचय करून दिला नाही तर आपल्याच समाजाचे नुकसान होते. पद्म पुरस्कार हे एक माध्यम आहे. मी देशवासियांना सांगू इच्छितो की, आपल्या आजूबाजूला समाजासाठी कार्यरत असणारे, समाजासाठीच जगणारे, आपलं आयुष्य समर्पित करणारे, काही ना काही तरी विशेष ध्येय उराशी बाळगून जीवनभर कार्य करणारे लक्षावधी लोक आहेत. कधीना कधी त्यांना समाजासमोर आणलं पाहिजे. असे लोक मान-सन्मानासाठी अजिबात काम करत नाहीत. परंतु त्यांचं कार्य आपल्याला प्रेरणा देणारं असतं, कधी शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये अशा लोकांना बोलावून त्यांचे अनुभव आपण ऐकले पाहिजेत. पुरस्कारापेक्षा पुढे जावून समाजामध्येंही त्यांच्यासाठी वेगळे प्रयत्न केले गेले पाहिजेत.

माझ्या प्रिय देशवासियांनो, दरवर्षी 9 जानेवारी रोजी आपण प्रवासी भारतीय दिवस साजरा करतो. पूज्य महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेवरून दिनांक 9 जानेवारी रोजी भारतात परतले होते. या दिवशी आपण भारत आणि जगभरामध्ये वास्तव्य करीत असलेल्या भारतीयांमध्ये अतूट बंधन आहे, त्याबद्दल जणू उत्सव साजरा करत असतो. यावर्षी प्रवासी भारतीय दिवसानिमित्त आपण एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी विश्वभरामध्ये असलेल्या भारतीय वंशाच्या सर्व लोकप्रतिनिधी, महापौर यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मलेशिया, न्यूझिलंड, स्वित्झर्लंड, पोर्तूगाल, मॉरिशस, फिजी, टांझानिया, केनिया, कॅनडा, ब्रिटन, सुरिनॅम, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका तसेच आणखीही अनेक देशांमधून भारतीय वंशाचे महापौर, खासदार-लोक प्रतिनिधी सहभागी झाले होते, हे जाणून आपल्याला नक्कीच आनंद वाटेल. जगाच्या पाठीवर असलेल्या अनेक देशांमध्ये वास्तव्य करणारे मूळ भारतीय वंशाचे हे लोक जिथं आहेत, तिथं त्या देशांची सेवा तर करीत आहेतच, त्याचबरोबर ही मंडळी आपल्या देशाशी-भारताशी असणारे संबंधही मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, याचा मला खूप आनंद होत आहे. यावेळी युरोपीय संघ, युरोपियन युनियन यांनी मला एक दिनदर्शिका पाठवली आहे. त्यामध्ये त्यांनी युरोपमधल्या वेगवेगळ्या  देशांमध्ये वास्तव्य करत असलेल्या भारतीयांनी विविध क्षेत्रांमध्ये दिलेले योगदान अतिशय चांगल्या पद्धतीने नोंदवले आहे. आमचे मूळ भारतीय वंशाचे जे असंख्य लोक विभिन्न देशांमध्ये वास्तव्य करत ते वेगवेगळ्या  क्षेत्रात कार्यरत आहेत. कोणी सायबर सुरक्षा क्षेत्रात आहेत, तर कोणी आयुर्वेद क्षेत्रात काम करत आहेत. काहीजण आपल्या सुमधूर संगीताने समाजाचे मनोरंजन करून दाद मिळवत आहे. तर काहीजण आपल्या कवितांनी लोकांची करमणूक करीत आहेत. काहीजण हवामान बदल याविषयावर संशोधन करत आहे. काहीजण भारतीय ग्रंथांवर काम करत आहेत. कोणी एकानं मालमोटार चालवून तिथं गुरूव्दारा निर्माण केले  आहे. तर कोणी मशिद बांधली आहे. याचाच अर्थ जिथं कुठं आपले लोक आहेत, तिथं त्यांनी या भूमीला कोणत्या ना कोणत्या प्रकारानं सुसज्जित केले आहे. युरोपियन युनियनने एक उल्लेखनीय कार्य करून, मूळ भारतीय वंशाच्या लोकांची ओळख निर्माण केल्याबद्दल आणि दिनदर्शिकेच्या माध्यमातून संपूर्ण दुनियेतील लोकांना ही माहिती दिल्याबद्दल मी युरोपीय युनियनला धन्यवाद देवू इच्छितो.

ज्यांनी आपल्या सर्वांना एक नवा मार्ग दाखवला, त्या पूज्य बापूजींची दिनांक 30 जानेवारी रोजी पुण्यतिथी आहे. हा दिवस आपण ‘शहीद दिवस‘ म्हणून पाळतो. या दिवशी आपण देशाच्या रक्षणासाठी प्राण पणाला लावणाऱ्‍या महान शहीदांना 11 वाजता श्रद्धांजली अर्पण करतो. शांती आणि अहिंसेचा मार्ग हाच बापूंचा मार्ग,  मग भारत असो अथवा दुनिया, व्यक्ती असो अथवा कुटुंब किंवा समाज. पूज्य बापू ज्या आदर्शांचे पालन करत जगले, पूज्य बापूंनी ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या, त्या आजच्या काळाच्या कसोटीवर योग्य ठरतात. त्या गोष्टी काही फक्त निव्वळ सिद्धांत नव्हत्या. आजच्या वर्तमानातही पावलो पावली त्या गोष्टी किती योग्य होत्या ते आपल्याला जाणवतं. अशावेळी आपण जर बापूंच्या मार्गावरून पुढे जाण्याचा संकल्प केला, जितकं शक्य आहे, तितकी, तशी, मार्गक्रमणा केली तर यापेक्षा मोठी श्रद्धांजली कोणती होवू शकते?

माझ्या प्रिय देशवासियांनो ! आपणा सर्वांना नववर्ष 2018च्या शुभेच्छा देवून मी आपल्या वाणीला विराम देतो.

खूप खूप धन्यवाद!

नमस्कार !

 

 

 

 

B.Gokhale/AIR/D.Rane