पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान वाराणसीत

पंतप्रधान वाराणसीत

दिनदयाळ हस्तकला संकुलाचे लोकार्पण,

वाराणसी-वडोदरा महामना एक्सप्रेसला हिरवा झेंडा,

अनेक विकास प्रकल्पांचा प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी इथे “दिनदयाळ हस्तकला संकुल-अर्थात व्यापार सुलभीकरण केंद्राचे” लोकार्पण केले. नोव्हेंबर 2014 मध्ये पंतप्रधानांनी या केंद्राचा शिलान्यास केला होता. आज त्यांनी या केंद्राला भेट दिली. लोकार्पण सोहळ्यापूर्वी या केंद्रात विकसित करण्यात आलेल्या सुविधांची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ लिंक द्वारे ‘महामना एक्सप्रेस’ला हिरवा झेंडा दाखवला. या गाडीमुळे वाराणसी आणि गुजरात मधील सूरत आणि वडोदरा शहरे जोडली जाणार आहेत.

पंतप्रधानांनी वाराणसी शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पणही केले. तसेच फलक अनावरणही केले. उत्कर्ष बँकेच्या बँक सेवांचे उद्‌घाटनही पंतप्रधानांनी केले. तसेच बँकेच्या मुख्यालय इमारतीचे भूमिपूजनही केले.

पंतप्रधानांनी व्हिडीओ लिंक द्वारे वाराणसीतल्या जनतेसाठी जल रुग्णवाहिका सेवा आणि जल शववहन सेवेचे लोकार्पण केले. त्यांनी विणकर आणि त्यांच्या मुलांना ‘टुल-किट’ आणि सौर दिव्यांचे वाटपही केले.

एकाच व्यासपीठावरुन एकाच कार्यक्रमात 1 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले आहे आणि त्यांचा पायाभरणी समारंभ झाला आहे, असे पंतप्रधानांनी या वेळी बोलतांना सांगितले.

“व्यापार सुविधा केंद्र”, हे वाराणसीतल्या मोठ्या प्रकल्पांसाठी एक असल्याचे ते म्हणाले. या केंद्रामुळे कारागिर आणि विणकरांना त्यांची कला आणि कौशल्य जगासमोर मांडता येईल आणि त्यांच्या उज्वल भविष्याला चालना मिळेल असेही पंतप्रधानांनी सांगितले. सर्व पर्यटकांनी या केंद्राला भेट द्यावी, या करता त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. या मुळे हस्तकला-वस्तूंच्या मागणीत वाढ होईल तसेच वाराणसीच्या पर्यटन क्षमतेला चालना मिळून शहराच्या अर्थव्यवस्थेलाही गती येईल, असे ते म्हणाले.

सर्व प्रश्नांवर विकासाद्वारे उत्तर मिळते, असेही पंतप्रधानांनी सांगितले. गरीबांच्या आणि भावी पिढ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यावर सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे, या संदर्भात उत्कर्ष बँकेच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

आज सुरु करण्यात आलेल्या ‘जल रुग्ण्वाहिका’ आणि जल शव वाहिनी बद्दल बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, हे दोन्ही उपक्रम जल मार्गांद्वारे सुद्धा विकास करण्याच्या इच्छाशक्तीचे उदाहरण आहेत. महामना एक्सप्रेस संदर्भात बोलतांना पंतप्रधानांनी सांगितले की 2014मध्ये त्यांनी लोकसभा लढवली होती, आता वाराणसी आणि वडोदरा हे दोन मतदार संघ रेल्वेने जोडले गेले आहेत.

आज देश वेगाने प्रगती करत असून, देश हिताच्या दृष्टीने दृढ निर्णय घेतले जात आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. देशाच्या पश्चिम भागातल्या विकासाशी पूर्व भारताच्या विकासाचे साधर्म्य साधता यावे, असे सांगून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आज सुरु करण्यात आलेले प्रकल्प मोठी भूमिका निभावतील, असे पंतप्रधानांनी सांगितले.

B.Gokhale /S.Tupe/J.Patankar/D.Rane