पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘प्रगती’ या बहुआयामी मंचाद्वारे पंतप्रधानांनी साधला संवाद

‘प्रगती’ या बहुआयामी मंचाद्वारे पंतप्रधानांनी साधला संवाद

तत्पर प्रशासन आणि वेळेत अंमलबजावणीसाठीच्या बहुआयामी ‘प्रगती’ या मंचाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला.

रेल्वे विषयक तक्रारी हाताळण्यासंदर्भातल्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. अधिकाऱ्यांसंदर्भात भ्रष्टाचाराच्या तक्रारी मोठ्याप्रमाणात आल्याची दखल घेऊन, भ्रष्टाचाराबाबत दोषी आढळणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी दिले. अपघातानंतरच्या मदतीसाठीच्या दूरध्वनी क्रमांकसहीत सर्व तक्रारी आणि चौकशीसाठी एकत्रित एकच दूरध्वनी क्रमांक ठेवण्यासंदर्भात रेल्वेने लक्ष घालावे, असेही त्यांनी सूचवले.

महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओदिशा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि नागालँड यासह विविध राज्यातल्या रेल्वे, रस्ते आणि ऊर्जा क्षेत्रासह महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधानांनी घेतला.

मुंबई मेट्रो, तिरुपती-चेन्नई महामार्ग, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमधले प्रलंबित रस्ते प्रकल्प, जम्मू-काश्मीर आणि ईशान्यकडच्या महत्वाच्या विद्युत पारेषण वाहिन्या याबाबतही पंतप्रधानांनी माहिती घेतली.
बालकांच्या संपूर्ण लसीकरणासाठीच्या इंद्रधनुष्य अभियानाचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. याबाबत फारशी प्रगती न झालेल्या 100 जिल्ह्यांमध्ये नियोजित वेळेतच उद्दिष्टपूर्ती गाठण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. एकही बालक लसीविना राहू नये, याची खातरजमा करण्यासाठी राष्ट्रीय छात्र संघटना आणि नेहरु युवा केंद्रासारख्या युवक संस्थांना सहभागी करुन घेता येईल, असेही त्यांनी सुचविले.

स्वच्छता कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतांना स्वच्छता पंधरवड्यांना चळवळीचे स्वरुप द्यावे, असेही ते म्हणाले. एलईडी बल्ब सारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे त्यांनी अमृत अभियानाचा आढावा घेतांना अधिकाऱ्यांना सुचविले.

2022 मध्ये भारतीय स्वातंत्र्यांच्या 75व्या वर्षापर्यंत परिवर्तन घडविण्यासाठी ठोस आराखडा आणि उद्दिष्ट घेऊन पुढे या असे आवाहन त्यांनी सर्व सचिव राज्यांच्या मुख्य सचिवांना केले. महात्मा गांधीजींच्या 150व्या जयंती दिनी 2019 पर्यंत स्वच्छतेसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले.

N.Sapre/N.Chitale/D.Rane