पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाला पंतप्रधानांचे राज्यसभेत वक्तव्य

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत प्रत्युत्तर दिले.

विमुद्रीकरणावर सदनातील काही सदस्यांनी आपली मते मांडली आणि काही चर्चाही झाली. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांविरुद्धची लढाई हा राजकीय लढा नाही तसेच तो एखाद्या पक्षाविरुद्धचाही लढा नाही. भ्रष्टाचाराने गरीब आणि मध्यमवर्गीयांवर विपरित परिणाम केला आहे. गरीबांचे हात सक्षम करण्यासाठी यंत्रणेची फसवणूक करणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असे पंतप्रधान म्हणाले.

विमुद्रीकरणानंतर 700 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून ही संख्या वाढत असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

आज देश दोन भागांमध्ये विभागला गेला असून एका भागात देशातील जनता आणि केंद्र सरकार आहे तर दुसऱ्या भागात राजकीय नेत्यांचा गट आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले.

चुकीच्या गोष्टींचा प्रभाव समाजावर पडू नये म्हणून आज भारत प्रयत्नशील आहे. प्रत्यक्ष बदल करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि देशाच्या क्षमतेला कमी लेखू नये असे त्यांनी सांगितले.

सर्व प्रकारच्या संस्था राजकारणापासून अलिप्त ठेवल्या पाहिजेत असे सांगत भारतीय रिझर्व्ह बँकेला कोणत्याही प्रकारच्या वादात ओढता कामा नये असे पंतप्रधान म्हणाले.

प्रशासनाशी संबंधित बाबींचा उल्लेख करताना सर्वसामान्य माणसाची ताकद वाढविण्यासाठी बरेच काही करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. सरकारच्या ई-मार्केटप्लेसच्या माध्यमातून शासकीय पुरवठा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणल्याचेही त्यांनी नमूद केले.

स्वच्छ भारत आणि त्याबाबत जनजागृतीच्या संदेशाचा प्रसार केल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील स्वच्छतेचे प्रमाण वाढल्याचेही त्यांनी नमूद केले. स्वच्छता ही लोकचळवळ झाली पाहिजे असे सांगत, आपण सर्वांनी यासाठी एकत्रित काम केले पाहिजे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

“एक भारत, श्रेष्ठ भारत” उपक्रमांतर्गत आपल्या सर्वांना देशातील विविध भागांची संस्कृती आणि क्षमता जाणून घेण्याची आणि त्याचे कौतुक करण्याची संधी प्राप्त झाली आहे असे ते म्हणाले.

B.Gokhale/M.Pange/P.Malandkar