पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संसदेच्या, मध्यरात्री झालेल्या ऐतिहासिक सत्राद्वारे भारतात वस्तू आणि सेवा कर प्रणालीचा उदय

s20170701110499

संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात मध्यरात्री झालेल्या ऐतिहासिक सत्राद्वारे मध्यरात्रीपासून वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटण दाबून वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू केली. त्यापूर्वी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी उपस्थितांना संबोधित केले.

हा दिवस, देशाचे भविष्य निश्चित करण्यासाठी निर्णायक कलाटणी देणारा असल्याचे पंतप्रधान यावेळी बोलतांना म्हणाले. भारताचे स्वातंत्र्य राज्यघटनेचा स्वीकार यासारख्या अनेक ऐतिहासिक घटनांचे हे मध्यवर्ती सभागृह साक्षी ठरल्याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. वस्तू आणि सेवा कर हे सहकार्यात्मक संघीय रचनेचे उदाहरण असल्याचे ते म्हणाले.

कठोर परिश्रमाने सर्व अडथळयांवर मात करता येते आणि अतिशय कठीण उद्दिष्टही साध्य करता येते असे चाणक्यांनी सांगितल्याचा उल्लेख त्यांनी केला. सरदार पटेल यांनी देशाची राजकीय एकात्मता निश्चित केली त्याप्रमाणे वस्तू आणि सेवा कर देशात अर्थविषयक एकात्मता आणेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रसिध्द शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी प्राप्तीकर ही जगातली समजण्यासाठीची सर्वात मोठी कठीण गोष्ट असल्याचे म्हटले होते. त्याचे स्मरण करत वस्तू आणि सेवा करामुळे एक राष्ट्र, एक कर प्रणाली सुनिश्चित होईल असे पंतप्रधान म्हणाले. वस्तू आणि सेवा करामुळे वेळ आणि पैशाचीही बचत होईल. राज्यांच्या सीमेवरच्या नाक्यांवर वाहनांना ताटकहावे लागणार नसल्यामुळे तिथला विलंब टळेल त्यामुळे इंधनाची बचत होईल आणि पर्यावरणालाही मदत होईल असे पंतप्रधान म्हणाले. वस्तू आणि सेवा कर प्रणाली सुलभ, अधिक पारदर्शी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी उपयुक्त अशा आधुनिक कर व्यवस्थापनाकडे नेणारी राहील.

जीएसटी म्हणजे “गुड अँड सिंपल टॅक्स” असे वर्णन करुन या उत्तम आणि सुलभ करामुळे जनतेचा फायदाच होईल असे पंतप्रधान म्हणाले. सामाईक उद्दिष्ट , सामाईक निर्धार समाजाच्या हिताकडे नेतो अशा अर्थाच्या ऋगवेदातला श्लोकाचा त्यांनी उल्लेख केला.

B.Gokhale/N.Chitale/Anagha