पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांच्या देशातील जनतेला शुभेच्छा

स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधानांच्या देशातील जनतेला शुभेच्छा

71 व्या स्वातंत्र्यदिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला संबोधित केले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या, थोर स्त्री-पुरुषांचे त्यांनी स्मरण केले.गोरखपूर दुर्घटना आणि नैसर्गिक आपत्तीत भारताची जनता खांद्याला खांदा भिडवून त्यांच्या सोबत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

भारत छोडो आंदोलनाची 75 वर्षे, चंपारण्य सत्याग्रहाची शताब्दी,बाळ गंगाधर टिळक यांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सवाचा 125 वा वर्धापनदिन याच वर्षात असल्याने हे वर्ष विशेष असल्याचे ते म्हणाले.

1942 आणि 1947 च्या मधे राष्ट्राने सामूहिक शक्तीचे दर्शन घडवले, त्याचा कळसाध्याय म्हणजे भारताचे स्वातंत्र्य. अशाच सामूहिक निर्धाराचे दर्शन घडवत 2022 पर्यंत आपण न्यू इंडिया अर्थात नव भारत घडवायचा आहे.आपल्या देशात प्रत्येक नागरिक समान आहे यावर भर देतानाच आपण सर्व एकजुटीने गुणात्मक परिवर्तन घडवू शकतो असे पंतप्रधान म्हणाले.

“चलता है” अर्थात असू दे, असेच चालायचे, ही मनोवृत्ती सोडून त्याजागी “बदल सकता है ” म्हणजे बदलू शकतो ही वृत्ती बाणवायला हवी, असे आवाहन त्यांनी केले.

भारताच्या सुरक्षेला आपले प्राधान्य असून लक्ष्यभेदी हल्ल्याने ते अधोरेखित झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.जगात भारताची शान उंचावत आहे.दहशतवादाविरोधातल्या लढाईत अनेक देश भारताला सहकार्य करत आहेत.देशाला आणि गरिबांना लुटणारे आता शांततेची झोप घेऊ शकत नाहीत, प्रामाणिकपणाचा आज उत्सव होत असल्याचे, विमुद्रीकरणासंदर्भात बोलताना ते म्हणाले.काळ्या पैशाविरोधातला लढा जारीच राहील असे आश्वस्त करतानाच पारदर्शकतेसाठी तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल असे सांगून डिजिटल व्यवहारांसाठी त्यांनी जनतेला प्रोत्साहन दिले.
वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी म्हणजे सहकार्यात्मक संघीयवादाचे उत्तम उदाहरण आहे.आर्थिक समावेशकतेसाठीच्या उपक्रमाद्वारे गरीबही, देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.जलद गती आणि प्रक्रियेची सुलभता याद्वारे सुप्रशासनावर त्यांनी भर दिला. जम्मू-काश्मीरविषयी बोलताना, .”ना गोली से, ना गाली से, परिवर्तन होगा गले लगाने से”,अपशब्दांनी अथवा गोळ्यांनी नव्हे तर स्नेहपूर्ण गळाभेटीने प्रश्न सुटू शकतो असे ते म्हणाले.

यावर्षी विक्रमी धान्य उत्पादनाबद्दल ,शेतकरी आणि कृषी वैज्ञानिकांची त्यांनी प्रशंसा केली.या वर्षी सरकारने 16 लाख टन डाळीची खरेदी केल्याचं सांगून याआधीच्या वर्षापेक्षा ही खरेदी खूपच जास्त असल्याचे ते म्हणाले.
तंत्रज्ञानाच्या बदलत्या स्वरूपामुळे, रोजगारासाठी विविध कौशल्यांची गरज निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.रोजगार मिळवणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बनण्याच्या दृष्टीने युवकांना घडवण्यात येत असल्याचे ते म्हणाले. तिहेरी तलाक मुळे त्रास सोसावा लागणाऱ्या महिलांचा उल्लेख करत या प्रथेविरुद्ध उभे राहणाऱ्यांच्या धैर्याची त्यांनी प्रशंसा केली.या लढ्यात संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले.

भारत,शांतता, एकता आणि सलोखा यांचा पाईक आहे. जातीयवादाने कोणाचे भले होणार नाही तर नुकसानच होईल. श्रद्धेच्या नावाखाली हिंसाचाराला थारा देण्याचा त्यांनी तीव्र निषेध केला आणि हे खपवून घेतले जाणार नाही असे बजावले. भारत छोडो चळवळीत भारत छोडो अशी घोषणा होती मात्र सध्याच्या काळात भारत जोडो ची साद आहे असे ते म्हणाले.

देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागाच्या विकासाकडे प्रामुख्याने लक्ष पुरवण्यात येत असल्याचे सांगून सरकार, भारताला, विकासाच्या नव्या पथावर नेत असल्याचे त्यांनी सांगितले.

पुराण शास्त्रातल्या वचनांचा उल्लेख करत, योग्य वेळी एखादे काम पूर्ण केले नाही तर त्याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही,असे सांगून टीम इंडियाने, नव भारत बनवण्याचा संकल्प करण्याची हीच वेळ असल्याचे ते म्हणाले.

जिथे गरिबाकडे पक्के घर असेल, वीज असेल,पाणी असेल, जिथे,शेतकऱ्याला विवंचना नसतील, तो सुखाची झोप घेऊ शकेल,आजच्यापेक्षा त्याचे उत्पन्न आजच्यापेक्षा दुप्पट असेल,जिथे,युवकांना, महिलांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी संधी उपलब्ध असेल, जिथे, दहशतवाद,जातीयवाद, भ्रष्टाचाराला थारा नसेल आणि भारत जो, स्वच्छ, तंदुरुस्त असेल असा नव भारत घडवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.

शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या सन्मानार्थ एक संकेत स्थळ जारी केल्याची घोषणा त्यांनी केली.

******

A.Sharma/S.Tupe./S.Kane/Anagha