पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र राष्ट्राला समर्पित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र देशाला समर्पित केले. विशेष म्हणजे एप्रिल 2015 मध्ये या संस्थेचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्याच हस्ते झाला होता.

हे केंद्र डॉ. आंबेडकरांची शिकवण आणि त्यांची देशाविषयीची दृष्टी आजच्या युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला.

याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय सामाजिक-आर्थिक परिवर्तन केंद्र उभारण्यात आले आहे. देशातल्या सामाजिक आणि आर्थिक मुद्दयांवर संशोधन करण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले. सामाजिक-आर्थिक मुद्दयांना धरुन देशाचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी हे केंद्र वैचारिक व्यासपीठ म्हणून भूमिका बजावेल, असेही पंतप्रधान म्हणाले.

देशात विविध काळात विचारवंत आणि द्रष्टया नेत्यांनी समाजाला दिशा दिली. राष्ट्र बांधणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्यासाठी देश कायम त्याचा ऋणी राहिल, असे पंतप्रधान म्हणाले. आजच्या युवकांनी डॉ. आंबेडकरांची दृष्टी आणि त्यांच्या कल्पनांचा अभ्यास करावा अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. त्यासाठीच सरकारने डॉ. आंबेडकरांच्या जीवन कार्याशी संबंधित स्थळांना धार्मिक स्थळ म्हणून विकसित केले आहे. यासंदर्भात त्यांनी दिल्लीतील अलिपूर, मध्य प्रदेशातील महू, मुंबईतील इंदू मिल, नागपूरची दिक्षा भूमी आणि लंडन येथील डॉ. आंबेडकर यांचे निवासस्थान या स्थळांचा उल्लेख केला. ही पंचतीर्थ आजच्या पिढीसाठी डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठीचा मार्ग आहे, असे त्यांनी सांगितले. डॉ. आंबेडकर यांच्या आर्थिक दृष्टीला आदरांजली म्हणून सरकारने डिजिटल व्यवहारांसाठी भीम ॲप सुरु केले, असेही मोदी म्हणाले.

डिसेंबर 1946 मध्ये राज्यघटना सभेत डॉ. आंबेडकरांनी केलेल्या भाषणातील उताऱ्याचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, अत्यंत खडतर आणि संघर्षाचे जीवन जगूनही डॉ. आंबेडकरांकडे देशाला समस्यातून बाहेर काढण्याची प्रेरणादायी दृष्टी होती. आजही आपण डॉ. आबेडकरांच्या स्वप्नातला भारत निर्माण करु शकलो नाही, अशी खंत व्यक्त करतानांच आजच्या पिढीमध्ये सामाजिक कुप्रथांना पूर्णपणे नष्ट करण्याची क्षमता आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

राजकीय लोकशाही ही सामाजिक लोकशाहीत रुपांतरीत केली पाहिजे या डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा त्यांनी उल्लेख केला. यादृष्टीने गेल्या तीन वर्षात सरकारने सामाजिक लोकशाही रुजवण्यासाठी केलेल्या कामांची त्यांनी माहिती दिली. जनधन योजना उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत अभियान, विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना आणि अलिकडेच सुरु झालेल्या सौभाग्य योजनेतून तळागाळातील लोकांमध्ये सामाजिक सुरक्षा योजना पोहचविण्याचा प्रयत्न त्यांनी अधोरेखित केला. सरकारच्या सर्व योजना आणि प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो, असे सांगत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र त्याचे मूर्तिमंत उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले. शेतकऱ्यांसाठी असलेल्या मृदा आरोग्य कार्ड योजना त्याशिवाय इंद्रधनुष आणि ग्रामीण विद्युतीकरण योजनांची त्यांनी माहिती दिली. देशात स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी सरकारने स्टॅन्ड अप इंडिया योजना सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातला नवा भारत घडविण्यासाठी सरकार कटिबध्द आहे, असे ते म्हणाले. या भारतात सगळयांना समान संधी आणि हक्क असतील. हा समाज जाती भेदापासून मुक्त असेल आणि तंत्रज्ञानाच्या बळावर प्रगतीची वाटचाल करणारा असेल, असे ते म्हणाले. 2022 पर्यंत डॉ. आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकानेच आपले योगदान दयावे असे आवाहन त्यांनी केले.

B.Gokhale/R.Aghor/Anagha