पीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (25 मार्च 2018)

माझ्या प्रिय देशबांधवानो, नमस्कार! आज रामनवमीचा पवित्र उत्सव आहे. रामनवमीच्या या पावन पर्वानिमित्त सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा! पूजनीय बापूंच्या आयुष्यात ‘राम नामाचे किती महत्त्व होते, हे आपण त्यांच्या जीवनात प्रत्येक क्षणी पहिले आहे. काही दिवसांपूर्वी 26 जानेवारीला जेव्हा आसियान राष्ट्रातले सगळे प्रमुख इथे आले होते, तेव्हा त्यांच्यासोबत त्या देशातली कला पथकंही इथे आली होती. आणि अतिशय अभिमानाची गोष्ट म्हणजे, त्यांच्यातल्या बहुतांश देशांनी आमच्यासमोर रामायणच सादर केलं. म्हणजे राम आणि रामायण केवळ भारतातच नाही तर जगातल्या या भूमीवर, आसियान राष्ट्रांमध्ये आजही तितकंच प्रभावी आणि प्रेरणादायी आहे. मी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा देतो.

माझ्या प्रिय देशबांधवानो नेहमीप्रमाणेच यावेळीही मला तुम्हा सर्वांची पत्रे, ईमेल, फोन कॉल आणि प्रतिक्रिया मोठ्या संख्येने मिळाल्या आहेत. कोमल ठक्कर यांनी ‘माय-गोव्ह’वर संस्कृतचे ऑनलाईन वर्ग सुरु करण्याबद्दल जे लिहिलं आहे, ते मी वाचलं. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असताना तुमचं संस्कृतवरचं प्रेम बघून मला खूप बरं वाटलं. याबाबत संबंधित विभागांकडून जे प्रयत्न सुरु आहेत, त्याची माहिती तुमच्यापर्यत पोचवायला मी सांगितलं आहे. ‘मन की बात’चे जे श्रोते संस्कृत संदर्भात काम करताहेत, त्यानांही माझी विनंती आहे, की कोमलजींची कल्पना प्रत्यक्षात कशी साकार करता येईल, यावर विचार करावा.

बिहारच्या नालंदा जिल्ह्यातल्या बराकर गावचे श्रीयुत धनश्याम कुमारजी यांनी नरेंद्र मोदी app वर लिहिलेली प्रतिक्रिया मी वाचली. जमिनीच्या घटत्या जलपातळीवर तुम्ही जी चिंता व्यक्त केली आहे, ती निश्चितच खूप महत्त्वाची आहे.

कर्नाटकच्या श्रीयुत शकल शास्त्रीजी यांनी शब्दांचा अतिशय चपखल वापर करत असे लिहिले की ‘आयुष्मान भारत’ तेव्हाच शक्य आहे जेव्हा ‘आयुष्मान भूमी’ असेल. आणि ‘आयुष्मान भूमी’ तेव्हाच होईल जेव्हा आपण या भूमीवरच्या प्रत्येक प्राण्याची काळजी करू. येत्या उन्हाळ्यात सर्व पशु-पक्ष्यांसाठी बाहेर पाणी ठेवण्याचा आग्रह तुम्ही सर्वांना केला आहे, श्रीयुत शकल शास्त्रीजी, तुमच्या भावना मी सर्व श्रोत्यांपर्यत पोचवल्या आहेत.

श्रीयुत योगेश भद्रेशाजी यांचे म्हणणे आहे की मी यावेळी युवकांच्या आरोग्याविषयी बोलावे. त्यांच्या मते आपण जर इतर आशियाई देशांशी तुलना केली, तर भारतीय युवक शारीरिकदृष्ट्या दुर्बळ आहेत. योगेशजी, मी विचार केला की यावेळी मी आरोग्याच्या विषयावर सर्वांशी विस्ताराने चर्चा करेन- सुदृढ भारतावर चर्चा करेन. आणि तुमच्यासारखे काही युवक एकत्र येऊन सुदृढ भारतासाठी मोहीमही हाती घेऊ शकता.

काही दिवसांपूर्वी फ्रान्सच्या राष्ट्रपतीनीं काशी इथे भेट दिली. वाराणसीच्या श्रीयुत प्रशांत कुमार यांनी लिहीले आहे की त्या दौऱ्यातल्या भेटींची सगळी दृश्य मनाला स्पर्श करणारी होती, प्रभाव पाडणारी होती. आणि त्यांनी आग्रह केला की ते सगळे फोटो, सगळे व्हिडीओ, सोशल मिडीयावर टाकायला हवेत. प्रशांतजी भारत सरकारने ते सगळे फोटो आणि विडीओ त्याच दिवशी सोशल मिडीया आणि नरेंद्रमोदी app वर शेअर केले होते. आता तुम्ही ते फोटो लाईक करा आणि रिट्वीट करा आणि आपल्या मित्रांपर्यत पोचवा.

चेन्नईहून अनघा, जयेश आणि इतर खूप मुलांनी ‘एक्झाम वॉरियर’ पुस्तकाच्या मागे जी कृतज्ञता कार्डे दिली आहेत, त्यावर त्यांनी त्यांच्या मनात जे जे विचार आले ते मला लिहून कळवले आहे. अनघा, जयेश आणि इतर सगळ्या मुलांनो, मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या या पत्रांमुळे माझा दिवसभराचा थकवा पळून जातो. इतकी पत्रे,इतके फोन कॉल्स, प्रतिक्रिया, या सगळ्यातले जे काही मला वाचायला मिळालं, जे ऐकायला मिळालं, त्यातल्या अनेक गोष्टी माझ्या मनाला भिडल्या. आज जरी मी तेवढ्याच गोष्टी सांगायच्या ठरवल्या तरी महिनो न महिने मला सतत तेच सांगावे लागेल.

यावेळी जास्तीत जास्त पत्र मुलांनी पाठवली आहेत, त्यांनी परीक्षेबद्दल लिहीले आहे. सुट्टीतले आपले प्लान्स मला सांगितले आहेत. उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांना पाणी मिळत नाही, त्याची चिंता केली आहे. शेतकरी मेळावे आणि शेतीसंबधी ज्या ज्या गोष्टी देशात घडताहेत, त्यांच्याबद्दल शेतकरी बंधू-भगिनींनी पत्र पाठवली आहेत. जलसंवर्धनाविषयी काही जागृत नागरिकांनी उपाययोजना सुचवल्या आहेत. जेव्हापासून आपण एकमेकांशी रेडियोच्या माध्यमातून ही ‘मन की बात’ सुरु केली आहे, तेव्हापासून मी एक पद्धत अनुभवतो आहे. उन्हाळ्यात जास्तीत जास्त पत्र उन्हाळ्याशी संबधित विषयांवर येतात. परीक्षेच्या आधी विद्यार्थ्याची परीक्षेच्या काळजीविषयीची पत्र येतात. सणासुदीच्या काळात आपले सणवार,आपली संस्कृती, परंपरा यांच्याविषयीची पत्रे येतात. म्हणजेच मनातल्या गोष्टी ऋतुमानानुसार बदलतात आणि कदाचित हे ही खरं आहे की आपल्या मनातल्या या गोष्टी इतर कोणाच्यातरी आयुष्यातला ऋतूही बदलवतात आणि का बदलवणार नाही? तुमच्या या गोष्टींमध्ये, उदाहरणामध्ये, इतकी प्रेरणा, इतकी उर्जा, इतकी आपुलकी आणि देशासाठी काहीतरी करण्याची दृढ भावना असते! ह्या गोष्टींमध्ये तर पूर्ण देशाचा मूड बदलण्याची ताकद आहे. जेव्हा तुमच्या पत्रात मला वाचायला मिळत की कसे आसामच्या करीमगंज इथले रिक्षाचालक अहमद अली यांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर गरीब मुलांसाठी नऊ शाळा बनवल्या आहेत – तेव्हा मला त्यात आपल्या देशाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे दर्शन होते. जेव्हा मला कानपूरच्या डॉ अजित मोहन चौधरी यांची गोष्ट ऐकायला मिळाली, ते फुटपाथवर जाऊन गरिबांना अन्न देतात आणि मोफत औषधोपचारही करतात – तेव्हा त्या गोष्टीतून मला देशातला बंधूभाव अनुभवण्याची संधी मिळते. 13 वर्षांपूर्वी, वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे कोलकात्याचे टैक्सीचालक सैदुल लस्कर यांच्या बहिणीचा दुर्दैवी मृत्यू झाला – त्यानंतर उपचाराअभावी पुन्हा कोणत्याही गरीबाचा मृत्यू होऊ नये या निश्चयातून त्यांनी रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेतला. आपला हा निश्चय पूर्ण करण्यासाठी त्यानी घरातले दागिने विकले, दान मागून पैसे जमा केले. त्यांच्या कॅबमधून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी खूप मदत केली. एका इंजीनीयर मुलीने तर आपला पहिला संपूर्ण पगारच दिला. अशा तऱ्हेने, 12 वर्षे पैसे जमा केल्यानंतर अखेर सैदूल लस्कर यांच्या भगीरथ प्रयत्नांना यश आलं. आज त्यांच्या संकल्पामुळे आणि त्यांच्या कठोर मेहनतीमुळे,कोलकात्याजवळ पुनरी गावात त्यानी सुमारे 30 खाटांची व्यवस्था असलेले रुग्‍णालय बनवले आहे. हीच आहे नव्या भारताची ताकद! जेव्हा उत्तरप्रदेशातील एक महिला अनेक संघर्षांचा सामना करुनही 125 शौचालये बांधते आणि महिलांना त्यांचा हक्क मिळवून देते, त्यांना त्यासाठी प्रेरित करते, तेव्हा देशातल्या मातृशक्तीचे दर्शन होते. असे अनके प्रेरणा पुंज माझ्या देशाची ओळख बनले आहेत. आज संपूर्ण जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. आज जेंव्हा भारताचे नाव मोठ्या गौरवाने घेतले जाते, तेव्हा त्यामागे, भारतमातेच्या या पुत्र आणि कन्यांचा पुरुषार्थ लपला आहे! आज देशभरात युवकांमध्ये, महिलांमध्ये, मागास, गरीब लोकांमध्ये, मध्यमवर्गात, सर्व वर्गातल्या लोकांमध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे की आम्ही पुढे जाऊ शकतो, आमचा देश पुढे जाऊ शकतो. आशा – अपेक्षांनी भारलेले, आत्मविश्वासाचे एक सकारात्मक वातावरण तयार झाले आहेत. हाच आत्मविश्वास, हीच सकारात्मकता, नव-भारताचा आपला संकल्प साकार करेल.

माझ्या प्रिय देशबांधवानो, पुढचे काही महिने, आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी खूप महत्वाचे आहेत. म्हणूनच, मला शेतीशी संबधित खूप पत्र आली आहेत. यावेळी मी दूरदर्शनच्या डीडी किसान वाहिनीवर शेतकऱ्यांसोबत जी चर्चा होते, त्या कार्यक्रमाचे विडीओ मागवून पाहिलेत. आणि मला असं सांगावसं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने या वाहिनीवरच्या चर्चा पहायला हव्यात आणि तसे प्रयोग आपल्या शेतातही केले पाहिजेत. महात्मा गांधींपासून ते शास्त्रीजी असोत, लोहियाजी असोत, चौधरी चरणसिंगजी असोत किंवा मग चौधरी देवीलालजी असोत, सर्वानीच शेती आणि शेतकरी या दोहोंना देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि सर्वसामान्य जीवनाचा अविभाज्य घटक मानलं. माती, शेती आणि शेतकरी यांच्यावर महात्मा गांधी यांचेही खूप प्रेम होते, त्यांच्या या भावना त्यांच्या या वाक्यातून आपल्याला कळतात, ते म्हणाले होते-

‘To forget how to dig the earth and to tend the soil, is to forget ourselves.’

म्हणजेच, माती खोदणे आणि मातीची निगा राखणे जर आपण विसरलो, तर त्याचा अर्थ, आपण स्वतःलाच विसरलो, असा होईल! तसेच, लालबहादूर शास्त्रीही झाडे, रोपं आणि वनस्पतींच्या रक्षणावर आणि उत्तम कृषी संरचनेवर भर देत असत. डॉ राममनोहर लोहिया यांनी तर आपल्या शेतकऱ्याना चांगले उत्पन्न, उत्तम सिंचन सुविधा आणि त्याचं आयुष्य सुनिश्चित करण्यासाठी, तसेच अन्न आणि दूध उत्पादन वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचा आग्रह धरला होता. 1979 साली, आपल्या भाषणात, चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान वापरण्याचा, नवे संशोधन करण्याचा, ते वापरण्याचा आग्रह केला होता. त्याच्या गरजेवर भर दिला. काही दिवसांपूर्वी मी दिल्लीत झालेल्या कृषी उन्नती मेळाव्याला गेलो होतो. तिथे शेतकरी बांधव आणि शास्त्रज्ञांशी माझी चर्चा झाली. शेतीशी संबंधित अनेक अनुभव जाणून घेणे, समजणे, शेतीशी संबधित नवी संशोधने समजून घेणे – हा सगळा माझ्यासाठी एक सुखद अनुभव तर होताच, पण ज्या गोष्टीने मी सर्वाधिक प्रभावित झालो, ती गोष्ट म्हणजे, मेघालय आणि तिथल्या शेतकऱ्यांची मेहनत! खूप कमी क्षेत्रफळ असलेल्या या राज्याने मोठी कामगिरी केली आहे. मेघालयच्या आपल्या शेतकऱ्यानी वर्ष 2015- 16 दरम्यान, गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत विक्रमी उत्पादन घेतले आहे. जेव्हा उद्दिष्ट निश्चित असेल, दृढ संकल्प असतील, ते साकार करण्याची इच्छाशक्ती असेल, तर ते पूर्ण करता येतात हे त्यांनी आपल्या अनुभवातून सिद्ध करून दाखवलं आहे. आज शेतकऱ्यांच्या श्रमाला तंत्रज्ञानाची जोड मिळते आहे, ज्यामुळे कृषी उत्पादकाना मोठं बळ मिळालं आहे. मला जी पत्र आली आहेत, त्यात अनेक शेतकऱ्यांनी पिकाच्या किमान आधारभूत मूल्याविषयी म्हणजेच हमीभावाविषयी लिहिलं आहे, आणि त्यांची इच्छा होती की मी यावर विस्ताराने बोलावं.

बंधू-भगिनीनो, यंदाच्या अर्थसंकल्पात, शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य किंमत मिळावी या दृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हे निश्चित करण्यात आले आहे की अधिसूचीत पिकांना त्यांच्या उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट जास्त हमीभाव दिला जाईल. सविस्तर सांगायचं झाल्यास, हमीभावासाठी जो उत्पादन खर्च लक्षात घेतला जाईल,त्यात शेतावर जे मजूर काम करतात, त्यांची मजुरी, पशूंची मेहनत आणि खर्च, भाड्याने घेतलेली यंत्र, उपकरणं किंवा जनावरं, बियाणांची किंमत, वापरलेल्या सर्व प्रकारच्या खतांची किंमत, राज्य सरकारला दिलेला भू महसूल, भांडवलावर दिलेले व्याज, शेतजमीन भाडेपट्यावर असेल तर त्याचे भाडे आणि एवढेच नाही, तर शेतकरी स्वतः जी मेहनत करतो किंवा त्याच्या कुटुंबातलं कोणी जर शेतात काम करत असेल, तर त्याच्या श्रमाचे मूल्यही उत्पादन खर्चात जोडले जाईल.

त्याशिवाय, शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य बाजारभाव मिळावा, यासाठी देशभरात, कृषी बाजाीरात सुधारणा करण्याचे कामही व्यापक स्तरावर चालू आहे. गावातल्या स्थानिक मंड्या, घाऊक बाजार आणि मग जागतिक बाजारपेठ एकत्र याव्यात यासाठी प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी फार दूर जावे लागू नये यासाठी, देशातल्या 22 हजार ग्रामीण बाजारांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरवून त्यांना अत्याधुनिक केले जात आहे. त्यानंतर त्यांना कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि ई-नाम प्लॅटफॉर्मशी जोडले जाणार आहे. म्हणजेच, शेतीला देशातल्या कोणत्याही बाजारपेठेशी जोडण्याची व्यवस्था तयार केली जात आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, यावर्षी महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंती वर्ष महोत्सवाची सुरुवात होते आहे. ही आपल्यासाठी एक ऐतिहासिक संधी आहे. देशाने हा महोत्सव कसा साजरा करायला हवा? स्वच्छ भारत हा आपला संकल्प तर आहेच, त्याशिवाय, आपण सव्वाशे कोटी नागरिक एकत्र येऊन गांधीजीना उत्तमात उत्तम श्रध्दांजली कशी वाहू शकतील? काय नवे कार्यक्रम हाती घेतले जाऊ शकतात? काय नवनव्या पद्धती, कल्पना राबवल्या जाऊ शकतात? माझी तुम्हा सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही ‘माय गोव्ह’च्या माध्यमातून तुमचे विचार सर्वांपर्यत पोचवा. “गांधी 150”या संकल्पनेचा लोगो कसा असावा? घोषवाक्य काय असावे? याविषयी आपल्या कल्पना सांगा. आपण सगळ्यांनी मिळून बापूंना एक स्मरणीय श्रद्धांजली वाहू या. आणि बापूंचे स्मरण करून, त्याच्यापासून प्रेरणा घेत, आपल्या देशाला एका नव्या उंचीवर पोचवायचे आहे.

“नमस्कार, आदरणीय पंतप्रधान महोदय, मी गुरगावहून प्रीती चतुर्वेदी बोलते आहे. पंतप्रधान महोदय, आपण ‘स्वच्छ भारत अभियानाला’ आपण जसे यशस्वी केले आहे, तसेच आता देशात, निरोगी भारत अभियान राबवण्याची वेळ आली आहे. हे अभियानही यशस्वी करण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही जनता, सरकार आणि विविध संस्थांना कसे एकत्र आणत आहात? त्याविषयी आम्हाला काही माहिती द्या….. धन्यवाद!

धन्यवाद! तुम्ही योग्यच सांगत आहात आणि मी समजतो की ‘स्वच्छ भारत’ आणि ‘निरोगी भारत’ ही दोन्ही अभियान परस्परांना पूरक आहेत. आरोग्याच्या क्षेत्रात आज देश पारंपरिक दृष्टीकोनाच्या पुढे गेला आहे. देशात आरोग्याशी संबंधित सगळी कामं करण्याची जबाबदारी पूर्वी केवळ आरोग्य मंत्रालयाची आहे असं समजलं जात असे. मात्र आता सगळी मंत्रालये आणि विभाग, मग, ते स्वच्छता मंत्रालय असो, आयुष मंत्रालय असो, रसायन आणि खते विभाग, ग्राहक मंत्रालय असो किंवा मग महिला आणि बालविकास मंत्रालय असो, किंवा राज्य सरकारं असोत, सगळे विभाग एकत्र येऊन निरोगी भारतासाठी काम करत आहेत. आरोग्याच्या प्रतिबंधात्मक उपायांसह, परवडणाऱ्या आरोग्य सुविधांवर भर दिला जात आहे. आरोग्याची प्रतिबंधात्मक काळजी हा सगळ्यात स्वस्त आणि सोपा उपाय आहे. त्यामुळे आपण आरोग्याची काळजी घेण्यासाठी जितके अधिक जागृत असू तितके जास्त लाभ व्यक्ती, कुटुंब आणि समाजाला मिळतील. आयुष्य निरोगी बनवण्यासाठी पहिली आवश्यकता आहे – स्वच्छतेची! आपण सर्वानी एक देश म्हणून गेल्या चार वर्षात स्वच्छता अभियान यशस्वी करण्याचा संकल्प केला आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की गेल्या चार वर्षात सार्वजनिक स्वच्छतेचे क्षेत्र दुपटीने वाढून 80 टक्क्यांवर पोचले आहे. त्यशिवाय देशभरात आरोग्य सुविधा केंद्र स्थापन करण्याच्या दिशेने व्यापक स्तरावर काम सुरु आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य निगा राखण्याच्या क्षेत्रात योगाभ्यासाने आज जगभरात आपली नवी ओळख निर्माण केली आहे. योगामुळे शरीर निरोगी राहते आणि सुदृढही! आपल्या सगळ्यांच्या योगाविषयाच्या कटीबद्धतेमुळेच योग आज एक जनचळवळ बनले आहे, घराघरात पोचले आहे. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला – म्हणजेच 21 जूनला अजून 100 दिवस शिल्लक आहेत. गेल्या तीन वर्षात, प्रत्येक आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमात देश आणि जगातल्या प्रत्येक ठिकाणी लोकांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला.

यावर्षीही, आपण स्वतः योग करू आणि आपले पूर्ण कुटुंब, मित्रपरिवार आणि इतर सर्वांना योग करण्यासाठी प्रेरित करू, असा आपण निश्चय करुया. नव्या, आकर्षक पद्धतीनी योग मुले, युवावर्ग आणि ज्येष्ठ नागरीकांपर्यत तसेच प्रत्येक वयोगटातल्या महिला आणि पुरुषांपर्यंत पोचवून त्याला अधिकाधिक लोकप्रिय करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. तसे तर देशातल्या दूरचित्रवाहिन्या आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमं वर्षभर योगविषयक विविध कार्यक्रम करत असतातच. पण आजपासून योगदिवसापर्यत एक अभियान म्हणून योगाविषयी जागृती निर्माण करणारे काही कार्यक्रम केले जाऊ शकतात का?

माझ्या प्रिय देशबांधवानो, मी योगशिक्षक तर नाही, हो, मात्र योगाभ्यासी नक्कीच आहे. मात्र काही लोकांनी आपली कल्पकता वापरून मला योगशिक्षकही बनवले आहे. माझे योग करतानाचे काही थ्रीडी ऍनिमेटेड व्हिडिओ बनवले आहेत. मी तुम्हा सगळ्यांपर्यत हे व्हिडीओ पोचवेन म्हणजे आपण एकत्र आसन आणि प्राणायामाचा अभ्यास करू शकू. आरोग्य सुविधा सर्वांना सहज उपलब्ध असाव्यात आणि स्वस्तही! त्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या असाव्यात, सुलभ असाव्यात यासाठीही व्यापक स्तरावर प्रयत्न सुरु आहेत.

आज देशभरात, 3 हजारपेक्षा जास्त जनऔषधी केंद्र उघडली गेली आहेत. तिथे 800 पेक्षाही अधिक औषधं अत्यंत माफक दरात उपलब्ध आहेत. आणखी नवी केंद्रे सुरु करण्याचे कामही सुरु आहे. ‘मन की बात’ च्या श्रोत्यांना माझी विनंती आहे की त्यांनी या जनऔषधी केंद्रांची माहिती गरजू लोकांपर्यत नक्की पोहोचवावी, म्हणजे त्यांचा औषधांचा खर्च खूप कमी होईल, त्यांची खूप मोठी सेवा होईल. हृदयरोग्यांसाठी आवश्यक स्टेंटची किंमत 85 टक्क्यापर्यत कमी करण्यात आली आहे. गुडघेरोपण शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या उपकरणांची किंमत नियंत्रित करून 50 ते 70 टक्क्यांपर्यत कमी केली आहे. ‘आयुष्मान भारत”योजनेअंतर्गत सुमारे 10 कोटी कुटुंबे म्हणजे, सुमारे 50 कोटी नागरिकांच्या उपचारांसाठी एका वर्षात पाच लाख रुपये भारत सरकार आणि विमा कंपन्या मिळून देणार आहेत. देशात सध्या असलेल्या 479 वैद्यकीय महाविद्यालयातील एकूण जागांची संख्या वाढवून 68 हजार करण्यात आली आहे. देशभरातल्या लोकांना उत्तम उपचार आणि आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी, विविध राज्यांमध्ये, नवी एम्स रुग्णालये उघडली जात आहेत. प्रत्येक तीन जिल्ह्यांसाठी एक नवे वैद्यकिय महाविद्यालय सुरु केले जाईल. संपूर्ण देशाला 2025 पर्यत क्षयरोगमुक्त करण्याचं आमचं लक्ष्य आहे.

हे खूप मोठं काम आहे. प्रत्येक व्यक्तीपर्यत यासाठी जागृती करण्याची गरज असून त्यासाठी तुमची मदत हवी आहे. क्षयरोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या सर्वाना एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, 14 एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. अनेक वर्षांपूर्वी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशात औद्योगीकरणाची गरज व्यक्त केली होती. उद्योगांमुळे गरीबातल्या गरीब व्यक्तीला देखील रोजगार उपलब्ध करून देता येईल, असे त्यांचे मत होते. आज देशात ‘मेक इन इंडिया’ अभियान यशस्वीपणे सुरु आहे. अशावेळी, डॉ आंबेडकरांनी भारत औद्योगिक महाशक्ती बनण्याचे जे स्वप्न बघितले होते, तेच आम्हाला प्रेरणा देत आहे. भारत देश आज जगाच्या अर्थव्यवस्थेत तेजस्वी तारा म्हणून नावारूपाला आला आहे. जगात सर्वात जास्त थेट परदेशी गुंतवणूक आज भारतात होत आहे. सगळं जग गुंतवणूक, संशोधन आणि विकासाचं केंद्र म्हणून भारताकडे बघत आहे. औद्योगिक विकास शहरातच शक्य आहे असा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार होता आणि म्हणूनच त्यांनी शहरीकरणावर भर दिला. त्यांच्या ह्याच विचारांना पुढे नेत आज देशातल्या मोठ्या शहरांत आणि छोट्या शहरांत चांगले रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण, डिजिटल जोडणी या सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘स्मार्ट सिटी अभियान’ आणि नागरी अभियानाची सुरवात करण्यात आली. बाबासाहेबांचा स्वयंपुर्णतेवर दृढ विश्वास होता. एखाद्याने दारिद्र्यातच आयुष्य काढावे हे त्यांना मान्य नव्हते. याबरोबरच, गरिबांना काहीतरी थातुरमातुर सुविधा देऊन किवा मदत देऊन त्यांची गरिबी दूर होणार नाही, असेही त्यांचे मत होते. आज “मुद्रा योजना”, ‘स्टार्ट अप इंडिया”, “स्टँड अप इंडिया’ यासारखे उपक्रम देशात युवा संशोधक आणि युवा उद्योजक घडवत आहेत.

भारतात 1930 आणि 1940 च्या दशकात जेंव्हा फक्त रस्ते आणि रेल्वे यांचीच चर्चा होत होती तेंव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बंदरे आणि जलमार्गांची चर्चा सुरु केली होती. त्यांनीच जलशक्ती ही राष्ट्र शक्तीच्या रुपात बघितली होती. देशाच्या विकासात जलमार्गांचं महत्व ओळखून त्यावर भर दिला होता. अनेक नदी खोरे प्राधिकरण, पाण्याशी संबंधित वेगवेगळे आयोग स्थापन करणे ही बाबासाहेबांचीच दूरदृष्टी होती. आज देशात जलमार्ग आणि बंदरे विकसित करण्यासाठी ऐतिहासिक प्रयत्न होत आहेत. भारताच्या वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावर बंदरे विकसित होत आहेत आणि जुन्या बंदरांमधल्या पायाभूत सुविधा मजबूत केल्या जात आहेत.

चाळीसच्या दशकात चर्चेचे मुख्य मुद्दे असायचे, दुसरं महायुद्ध, शीतयुध्द आणि फाळणी. त्यावेळी, डॉ आंबेडकरांनी एक प्रकारे ‘टीम इंडिया’ या भावनेचा पाया रचला. त्यांनी संघराज्य व्यवस्थेचं महत्व यावर चर्चा केली आणि देशाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्यांनी एकत्र येऊन काम करण्यावर भर दिला. आज आम्ही शासनाच्या प्रत्येक विभागामध्ये सहकारी संघराज्य व्यवस्था, तसेच त्याच्याही पुढे जाऊन, स्पर्धात्मक सहकारी संघराज्य व्यवस्था हा मंत्र घेतला आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर माझ्यासारख्या करोडो मागासवर्गीयांचे प्रेरणास्थान आहेत. जीवनात पुढे जाण्यासाठी श्रीमंत किंवा प्रतिष्ठित कुटुंबातच जन्म घेण्याची गरज नाही, तर भारतात गरीब कुटुंबात जन्म घेणारे देखील मोठी स्वप्ने बघू शकतात, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करु शकतात आणि त्यात यशस्वी देखील होऊ शकतात, हे त्यांनी आम्हाला दाखवून दिले.

अनेकदा अनेक लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची हेटाळणी केली. त्यांचे पाय खेचण्याचे प्रयत्न केले. गरीब आणि मागास कुटुंबातला हा मुलगा जीवनात पुढे जाणार नाही, काही बनू शकणार नाही, जीवनात यशस्वी होणार नाही यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण नव-भारताचे चित्र वेगळे आहे. हा असा भारत आहे जो आंबेडकरांचा आहे, गरीबांचा आहे, मागासवर्गीय लोकांचा आहे. डॉ आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल ते 5 मे याकाळात ‘ग्राम-स्वराज्य अभियान’ आयोजित केलं जाणार आहे. यात देशभर ग्रामविकास, गरिबांचं कल्याण आणि सामाजिक न्याय या विषयांवर वेगवेगळे कार्यक्रम होतील. या कार्यक्रमात अधिकाधिक संख्येने सहभागी व्हा, अशी माझी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे’.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, येत्या काही दिवसांत भगवान महावीर जयंती, हनुमान जयंती, ईस्टर, बैसाखी सारखे अनेक सण येत आहेत. भगवान महावीर जयंती म्हणजे त्यांचा त्याग आणि तपश्चर्या यातून शिकवण घेण्याचा दिवस आहे. अहिंसेचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर यांचे जीवन आणि शिकवण आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सर्व देशबांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा ! ईस्टर म्हटला की प्रभू येशूचे प्रेरणादायी उपदेश आठवतात. त्यांनी मानवजातीला शांती, सद्भावना, न्याय, दया आणि करुणा हा संदेश दिला. एप्रिलमध्ये पंजाब आणि पश्चिम भारतात बैसाखीचा उत्सव साजरा केला जातो. त्याचकाळात बिहारमध्ये जुडशीतल आणि सातुवाईन, आसाम मध्ये बिहू, तर पश्चिम बंगालमध्ये पोईला वैशाखची धूम असेल. हे सगळे सण कुठल्या ना कुठल्या रुपात आपल्या शेती आणि बळीराजाशी संबंधित आहेत. हे सण म्हणजे आपल्याला अन्नधान्य देणाऱ्या निसर्गाचे आभार मानण्याचे माध्यम आहेत. पुन्हा एकदा, येणाऱ्या सणांच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. अनेक अनेक धन्यवाद!

N.Sapre/AIR/D.Rane