Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

गुजरातमधील राजकोट येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

गुजरातमधील राजकोट येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण


भारत माता की जय!

भारत माता की जय!

मंचावर उपस्थित गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी मनसुख मांडविया, गुजरात प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि संसदेतील माझे सहकारी सी. आर. पाटील, मंचावर विराजमान अन्य सर्व मान्यवर आणि राजकोटच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, नमस्कार!

आजच्या या कार्यक्रमात देशातील अनेक राज्यांमधून इतर लोकही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, हे सर्वजण दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. त्या सर्वांचेही मी मनापासून अभिनंदन करतो.

एक काळ होता, जेव्हा देशातील सर्व प्रमुख कार्यक्रम दिल्लीतच व्हायचे. मी भारत सरकारला दिल्लीतून बाहेर आणून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले आणि आज राजकोटला पोहोचले आहे. आजचा कार्यक्रमही याचाच साक्षीदार आहे. आज या एकाच कार्यक्रमातून देशातील अनेक शहरांमध्ये विकासकामांचे लोकार्पण  आणि पायाभरणी होणे , एक नवी परंपरा सुरु होत आहे. काही दिवसांपूर्वी मी जम्मू-काश्मीरला भेट दिली होती. तिथून जम्मू येथून मी एकाच वेळी आयआयटी भिलाई, आयआयटी तिरुपती, ट्रिपल आयटी डीएम कुर्नूल, आयआयएम बोधगया, आयआयएम जम्मू, आयआयएम विशाखापट्टणम आणि आयआयएस कानपूरच्या संकुलाचे उद्घाटन केले. आणि आता आज राजकोटमधून – एम्स राजकोट , एम्स रायबरेली, एम्स मंगलगिरी, एम्स भटिंडा, एम्स कल्याणी चे लोकार्पण  झाले आहे. पाच एम्स, विकसित होत असलेला भारत , अशाच जलद गतीने काम करत आहे आणि कामे पूर्ण करत आहे.

मित्रहो,

आज मी राजकोटला आलो आहे , तर मला खूप जुन्या गोष्टी आठवत आहेत. कालचा दिवस माझ्या आयुष्यातील एक खास दिवस होता. माझ्या निवडणूक प्रवासाच्या प्रारंभात राजकोटची मोठी भूमिका आहे. 22 वर्षांपूर्वी, 24 फेब्रुवारी रोजी राजकोटने मला पहिल्यांदा आशीर्वाद दिला आणि मला आमदार म्हणून निवडून दिले. आणि आजच्या  25 फेब्रुवारी या दिवशी मी आयुष्यात प्रथमच राजकोटचा आमदार म्हणून गांधीनगर विधानसभेत शपथ घेतली होती . तेव्हा तुम्ही अपार प्रेम आणि विश्वास देऊन मला तुमचा ऋणी बनवलेत . मात्र आज 22 वर्षांनंतर मी राजकोटमधील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना अभिमानाने सांगू शकतो की मी तुमचा विश्वास सार्थ ठरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. आज संपूर्ण देश इतके प्रेम देत आहे , इतके आशीर्वाद देत आहे, तर या यशात राजकोटचा  देखील वाटा आहे. आज जेव्हा संपूर्ण देश तिसऱ्यांदा रालोआ सरकारला  आशीर्वाद देत आहे, आज जेव्हा संपूर्ण देशाला अबकी बार-400 पार हा विश्वास वाटत असताना मी पुन्हा नतमस्तक होऊन राजकोटमधील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना वंदन करतो. मी पाहतोय की पिढ्या बदलल्या तरी मोदींबद्दलची आपुलकी कोणत्याही वयोमर्यादेच्या पलीकडे आहे.  हे जे तुमचे ऋण आहे, ते व्याजासह , विकासाच्या माध्यमातून फेडण्याचा मी प्रयत्न करतो.

मित्रहो,

मी तुम्हा सर्वांचीही माफी मागतो, तसेच विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि तिथे जे नागरिक बसले आहेत त्यांचीही माफी मागतो कारण आज मला यायला थोडा उशीर झाला, तुम्हाला थांबावे लागले. मात्र त्यामागचे कारण हे होते की आज द्वारका येथे भगवान द्वारकाधीशांचे दर्शन घेऊन आणि त्यांना नमन करून मी राजकोटला आलो आहे.  द्वारका ते बेट द्वारका यांना जोडणाऱ्या सुदर्शन सेतूचे उद्घाटनही मी केले आहे. द्वारकेच्या या सेवेसोबतच आज मला एका अद्भुत आध्यात्मिक साधनेचा लाभही मिळाला आहे. प्राचीन द्वारका, ज्याबाबत म्हटले जायचे की स्वतः भगवान श्रीकृष्णाने ती वसवली होती आणि आज ती समुद्रात पाण्याखाली गेली आहे.आज मला खोल समुद्रात जाण्याचे भाग्य लाभले आणि आत खोलवर गेल्यावर मला त्या समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णाच्या  द्वारकेचे दर्शन घडले, जे अवशेष आहेत, त्यांना स्पर्श करून, त्यांची पूजा करून जीवन धन्य बनवण्याचे आणि तिथे काही क्षण भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करण्याचे सौभाग्य मला लाभले. माझ्या मनात खूप दिवसांपासून ही इच्छा होती की भगवान श्रीकृष्णाने वसवलेली  द्वारका जरी पाण्याखाली असली तरी एक दिवस मी तिथे जाऊन नतमस्तक होईन आणि आज मला ते भाग्य लाभले. द्वारकेबद्दल प्राचीन ग्रंथांमध्ये वाचून, पुरातत्वशास्त्रज्ञांचे शोध जाणून घेतल्यावर आपल्याला आश्चर्य वाटते. आज समुद्रात खोलवर गेल्यावर मी तेच दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आणि त्या पवित्र भूमीला स्पर्श केला. मी तिथे प्रार्थना केली आणि ‘मोरपीस अर्पण केले. त्या अनुभवाने मला किती भावनाविवश केले आहे हे शब्दात व्यक्त करणे माझ्यासाठी कठीण आहे. समुद्राच्या खोल पाण्यात, मी आपल्या भारताच्या वैभवाचा आणि त्याच्या विकासाचा स्तर किती उंचावला आहे याचा विचार करत होतो.  मी समुद्रातून जेव्हा बाहेर आलो तेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या आशिर्वादाबरोबरच  द्वारकेची प्रेरणा माझ्यासोबत घेऊन आलो आहे. ‘विकास आणि वारसा ’ या माझ्या संकल्पनेला एक नवीन शक्ती मिळाली आहे , नवी ऊर्जा मिळाली आहे, आज माझ्या विकसित भारताच्या ध्येयाशी दैवी शक्ती जोडली गेली आहे.

मित्रहो,

आजही तुम्हाला आणि संपूर्ण देशाला 48 हजार कोटींहून अधिक किमतीचे प्रकल्प मिळाले आहेत. आज न्यू मुंद्रा-पानिपत पाईपलाईन प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. त्यामुळे गुजरातमधील कच्चे तेल पाइपद्वारे थेट हरियाणाच्या रिफायनरीपर्यंत पोहोचेल. आज राजकोटसह संपूर्ण सौराष्ट्राला रस्ते, पूल, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, वीज, आरोग्य, शिक्षण अशा अनेक सुविधा मिळाल्या आहेत.आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आता एम्स देखील राजकोटला समर्पित केली आहे आणि त्यासाठी राजकोटचे , संपूर्ण सौराष्ट्रचे आणि संपूर्ण गुजरातचे खूप खूप अभिनंदन! आणि आज देशात ज्या ज्या भागांमध्ये एम्सचे लोकार्पण होत आहे तेथील सर्व नागरिक,  बंधू-भगिनींचे मी  मनःपूर्वक अभिनंदन करतो.

मित्रहो,

आजचा दिवस केवळ राजकोट आणि गुजरातसाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. जगातील 5 व्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे आरोग्य क्षेत्र कसे असायला हवे ? विकसित भारतात आरोग्य सुविधांचा स्तर कसा असेल? याची एक झलक आज आपण राजकोटमध्ये पाहत आहोत. स्वातंत्र्यानंतर 50 वर्षांपर्यंत देशात एकच एम्स होते आणि ते देखील दिल्लीत होते . स्वातंत्र्याच्या 7 दशकांमध्ये केवळ 7 एम्सना मंजुरी देण्यात आली . मात्र त्याही कधी पूर्ण झाल्या नाहीत. आणि आज बघा, गेल्या 10 दिवसात , अवघ्या 10 दिवसात 7 नवीन एम्सची  पायाभरणी आणि लोकार्पण झाले आहे. म्हणूनच मी म्हणतो की गेल्या 6-7 दशकात जे झाले नाही ,  त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक वेगाने आम्ही देशाचा विकास करत आहोत आणि तो देशवासीयांच्या चरणी समर्पित करत आहोत. आज, 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 200 हून अधिक आरोग्य सेवा संबंधी पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण झाले आहे. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालये, मोठमोठ्या रुग्णालयांची सॅटेलाईट सेंटर, गंभीर आजारांवर उपचार करणारी मोठी रुग्णालये यांचा समावेश आहे.

मित्रहो,

आज देश म्हणत आहे , मोदी की गॅरंटी  म्हणजे आश्वासनांच्या पूर्ततेची गॅरंटी आहे . मोदी की गॅरंटी वर हा अतूट विश्वास का आहे, याचे उत्तरही एम्समध्ये मिळेल. मी राजकोटला गुजरातमधील पहिल्या एम्सचे आश्वासन दिले होते.  3 वर्षांपूर्वी पायाभरणी केली आणि आज उद्घाटन केले – तुमच्या सेवकाने आश्वासन पूर्ण केले.  मी पंजाबला एम्सचे आश्वासन दिले होते , भटिंडा एम्सची पायाभरणीही मीच केली होती आणि आज मी त्याचे लोकार्पण देखील करत आहे  – तुमच्या सेवकाने आश्वासन  पूर्ण केले.

***

 NM/Sushama K/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai