Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन

मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांचे निवेदन


माननीय पंतप्रधान अन्वर इब्राहिम महोदय, दोन्ही देशांच्या प्रतिनिधीमंडळातील मान्यवर सदस्य, माध्यम प्रतिनिधीबंधू-भगिनींनो,
नमस्कार!
सलामत पागी!

सर्वप्रथम, माझे जिवलग मित्र पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी केलेल्या आत्मीय आणि स्नेहपूर्ण स्वागताबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
गेल्या वर्षी आसियान शिखर परिषदेसाठी माझी मलेशिया भेट होऊ शकली नव्हती. परंतु, मी माझ्या मित्राला लवकरच मलेशियात येण्याचे आश्वासन दिले होते.
आणि आज, 2026 मधील माझ्या पहिल्याच परदेश दौऱ्यात मी मलेशियात उपस्थित राहिल्याचा मला विशेष आनंद आहे.

मित्रांनो,
भारत आणि मलेशिया यांच्यातील संबंध विशेष स्वरूपाचे आहेत. आपण समुद्री शेजारी आहोत. शतकानुशतके आपल्या दोन्ही देशांतील जनतेमध्ये सखोल आणि आत्मीय संबंध राहिले आहेत. आज भारतीय वंशाच्या लोकसंख्येच्या दृष्टीने मलेशिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. आपल्या सभ्यता, सामायिक सांस्कृतिक वारसा आणि लोकशाही मूल्यांनी आपण परस्परांशी घट्टपणे जोडलेले आहोत.

मित्रांनो,
गेल्या काही वर्षांत आपल्या परस्पर संबंधांना नवी गती मिळाली आहे. आणि त्यामध्ये माझे मित्र पंतप्रधान अन्वर इब्राहीम यांचे विशेष योगदान राहिले आहे.
ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रांतील आपले सहकार्य अधिक बळकट झाले आहे. डिजिटल अर्थव्यवस्था, जैवतंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रांत परस्पर गुंतवणुकीत वाढ झाली आहे. पर्यटन तसेच लोकांमधील परस्पर संबंधही अधिक दृढ झाले आहेत. या सर्व उपलब्धींमधून प्रेरणा घेत, आज आम्ही आपल्या भागीदारीला अभूतपूर्व गती आणि अधिक सखोलता देण्याचा निर्णय घेतला आहे.

मित्रांनो,

सुरक्षा क्षेत्रात दहशतवादविरोधी सहकार्य, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि सागरी सुरक्षेतील समन्वय अधिक बळकट करू. संरक्षण क्षेत्रातील सहकार्यही अधिक व्यापक करू. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानासह सेमीकंडक्टर, आरोग्य आणि अन्नसुरक्षा या क्षेत्रांतील भागीदारीला पुढे नेऊ. आज आयोजित मुख्य कार्यकारी अधिकारी  मंचामुळे व्यापार आणि गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. धोरणात्मक विश्वासाच्या बळावर आपण आर्थिक परिवर्तनाचा मार्ग निर्माण करू.

मित्रांनो,
काल मला मलेशियातील भारतीय प्रवासी बांधवांशी भेटण्याची संधी मिळाली. पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनीही आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सुमारे 30 लाख भारतीय प्रवासी हा आपल्या दोन्ही देशांमधील जिवंत दुवा आहेत आणि ती आपली मोठी ताकद आहेत. त्यांच्या कल्याणासाठी उचललेली पावले आपल्या संबंधांना अधिक मानवी स्पर्श देतात. मलेशियातील भारतीय कामगारांच्या संरक्षणासाठी सामाजिक सुरक्षा करार, पर्यटनासाठी मोफत ई-व्हिसा, तसेच यूपीआय या डिजिटल पेमेंट प्रणालीची मलेशियात अंमलबजावणी, ही पावले दोन्ही देशांच्या नागरिकांचे जीवन अधिक सोपे करतील. कारण कोणतीही भागीदारी तेव्हाच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरते, जेव्हा तिचा लाभ थेट लोकांपर्यंत पोहोचतो.

मित्रांनो,
तमिळ भाषेवरील आपले सामायिक प्रेमही भारत आणि मलेशियाला एकमेकांशी जोडते. मलेशियात शिक्षण, माध्यमे आणि संस्कृतीत तमिळ भाषेची ठळक उपस्थिती आहे. आज झालेल्या ऑडिओ-व्हिज्युअल करारामुळे चित्रपट आणि संगीत, विशेषतः तमिळ चित्रपट, आपल्या दोन्ही देशांच्या लोकांना आणखी जवळ आणतील, असा मला विश्वास आहे. आपल्या तरुणांसाठी विद्यापीठ देवाणघेवाण, स्टार्ट-अप सहकार्य आणि कौशल्य विकासाच्या अधिक संधी निर्माण करत आहोत. तसेच, वाढत्या संबंधांना बळ देण्यासाठी मलेशियात नवे वाणिज्य दूतावास सुरू करण्याचाही निर्णय घेतला जाणार आहे.

मित्रांनो,

इंडो-पॅसिफिक क्षेत्र जगाच्या विकासाचे प्रमुख केंद्र म्हणून पुढे येत आहे. आसियानसोबत संपूर्ण इंडो-पॅसिफिक प्रदेशात विकास, शांतता आणि स्थैर्य यासाठी आपण कटिबद्ध आहोत. भारत आसियानच्या केंद्रस्थानी भूमिकेला प्राधान्य देतो. मलेशियाच्या यशस्वी आसियान अध्यक्षतेबद्दल मी आपले पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन करतो. मलेशियासारख्या मित्र देशांच्या सहकार्याने भारत आसियानसोबतचे संबंध अधिक व्यापक करेल. आसियान- भारत व्यापार करार, म्हणजेच आयटिगा, याच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी, यावरही आपण सहमती दर्शविली आहे.

मित्रांनो,
आज आपण प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांवरही अर्थपूर्ण चर्चा केली. जागतिक पातळीवरील अस्थिरतेच्या या काळात भारत आणि मलेशियामधील वाढती मैत्री दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.आजच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक आहेत, असा आपला सामायिक दृष्टिकोन आहे. शांततेसाठी होणाऱ्या सर्व प्रयत्नांना आपण पाठिंबा देत राहू. आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर आपला संदेश स्पष्ट आहे,
कोणतीही दुहेरी भूमिका नाही- कोणतीही तडजोड नाही.

महोदय,
भारत- मलेशिया संबंधांबद्दल असलेल्या आपल्या कटिबद्धतेचे आम्ही मनःपूर्वक कौतुक करतो. चला, समृद्ध मलेशियाचे आपले स्वप्न आणि विकसित भारताचा आमचा संकल्प आपण एकत्रितपणे साकार करूया. आपल्या मैत्रीपूर्ण सहकार्याबद्दल, आत्मीय स्वागताबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल मी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानतो. भारतात आपले स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत.
मनःपूर्वक धन्यवाद.
जुम्पा लागी!

***

शिल्पा पोफळे/राज दळेकर/परशुराम कोर