पीएम्इंडिया
माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार.
‘मन की बात‘ मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांसोबत सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. 2026 चं अर्धं वर्ष आता संपत आलं आहे. या सहा महिन्यांत आपण ‘मन की बात‘ मध्ये आपल्या देशबांधवांच्या अनेक कामगिरींवर चर्चा केली आहे. जून महिन्यातही देशानं असे काही मैलाचे दगड गाठले आहेत, ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटेल. हे यश राष्ट्राची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता यांच्याशी जोडलेलं आहे. अलीकडेच मला कोलकाता इथे एका नौदल कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. तिथे आयएनएस दूनागिरी, आयएनएस संशोधक आणि आयएनएस अग्रय ही जहाजं भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आली. या जहाजांच्या आरेखनापासून ते निर्मितीपर्यंत सर्व काही स्वदेशी आहे.
मित्रांनो, जून महिन्यातच देशानं हवाई वाहतूक क्षेत्रात मोठं यश मिळवलं आहे. सी-295 विमान ‘मेड इन इंडिया‘ असून या विमानानं आपलं पहिलं उड्डाण पूर्ण केलं आहे. भारतात अशी 40 विमानं तयार केली जात आहेत. यामुळे एमएसएमई आणि एअरोस्पेस क्षेत्राला नवी ताकद मिळत आहे. रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि आत्मनिर्भर भारताचा संकल्पदेखील अधिक दृढ होत आहे. या महिन्यात DRDOने स्वदेशी ‘‘Long Range Land Attack Cruise Missile’’चीही यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र DRDOच्या प्रयोगशाळा आणि भारतीय औद्योगिक भागीदार यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे. म्हणजेच, आज समुद्रापासून आकाशापर्यंत आपला भारत अधिक सुरक्षित तसंच आत्मनिर्भर होत आहे.
मित्रांनो, जून महिन्यात आणखी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, ज्यामध्ये संपूर्ण जग भारताच्या प्रयत्नांमध्ये सामील झालं होतं आणि हा कार्यक्रम होता ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस‘. यावेळी जगभरात 2500 हून अधिक ठिकाणी योगाभ्यासाच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांनी विविध ठिकाणी आयोजित केलेल्या योगविद्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या महिन्यात अहमदाबाद इथे झालेल्या ‘जागतिक योगासन स्पर्धे‘चीही खूप चर्चा झाली. यामध्ये भारतानं एकूण 114 पदकं जिंकली, ज्यात 102 सुवर्णपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पदक तालिकेत भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. मी सर्व विजयी खेळाडूंचं मनःपूर्वक अभिनंदन करतो.
मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राचा आत्मा म्हणजे त्याची जनता. आणि जेव्हा त्या देशातली जनता एखादा संकल्प करते, तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाही. राष्ट्रउभारणीतली लोकसहभागाची ही ताकद भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे आणि आपण या लोकसहभागाचा पुन्हा पुन्हा अनुभव घेत आहोत.
मित्रांनो, पश्चिम आशियातली युद्धाची परिस्थिती पाहता, मी देशवासियांना काही विनंत्या केल्या होत्या. मी म्हटलं होतं की शक्यतोवर काही काळ सोनं खरेदी करणं टाळावं. मी लोकांना परदेशात सुट्ट्या घालवणंही टाळण्यास सांगितलं होतं, तसंच कारपूलिंगला प्रोत्साहन देण्याचं आवाहन केलं होतं. मी शेतकऱ्यांना रासायनिक खतमुक्त शेती करण्याचं, शेतजमिनी वाचवण्याचं आणि शक्य तितकं नैसर्गिक खत वापरण्याचं आवाहन केलं होतं. मित्रांनो, मी देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आभारी आहे की त्यांनी माझ्या आवाहनाला केवळ पाठिंबाच दिला नाही, तर ते सर्व बाजूंनी सहकार्यही करत आहेत. अनेक कुटुंबांनी मला संदेश पाठवून त्यांचे अनुभव सांगितले आहेत. अनेक कुटुंबांनी ठरवलं आहे की ते यावेळी कुटुंबातल्या लग्नांसाठी सोनं खरेदी करणार नाहीत. गरज पडल्यास ते जुन्या सोन्याचा पुनर्वापर करून नवीन दागिने बनवतील. अनेक लोकांनी समाज माध्यमांवर असंही लिहिलं आहे की त्यांनी यावेळी आपले परदेश दौरे कसे पुढे ढकलले आहेत !
मित्रांनो, कारपूलिंगबद्दल लोकांनी आपले अनेक अनुभव सांगितले आहेत. जे लोक दररोज आपापल्या वाहनांनी एकाच दिशेनं प्रवास करायचे, त्यांनी आता एकत्र प्रवास करायला सुरुवात केली आहे. लोक शक्य असेल तेव्हा बस आणि मेट्रोचा वापर करत आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत होत आहे. त्याचप्रमाणे, देशाच्या विविध भागांमध्ये नैसर्गिक खतांच्या वापरात वाढ झाल्याचं वृत्त आहे. मित्रांनो, मला आनंद वाटतो की आपण भारतीय या जागतिक संकटाचा एकत्रितपणे सामना करत आहोत. मला खात्री आहे की लोकसहभागाची ही शक्ती आपल्याला बळकट करेल, आपल्याला यशस्वी करेल.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्या देशात वाढदिवस आणि लग्नसोहळे हे केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता संपूर्ण समाजाचे उत्सव बनलेले असतात. प्रत्येक कुटुंबाला आपला आनंद इतरांसोबत वाटून घ्यायचा असतो. लोक पाहुण्यांना भेटवस्तूही देतात. मित्रांनो, महाराष्ट्रात नांदेड इथल्या एका कुटुंबानं आपला आनंद वाटून घेण्यासाठी असं काही केलं आहे, जे चर्चेचा विषय बनलं आहे. इथे नांदेडच्या बहादूरपुरा गावात पेठकर कुटुंब राहते. या कुटुंबाला वाटलं की, जर आनंद वाटून घ्यायचाच असेल, तर अशी एखादी गोष्ट दिली पाहिजे जी कुटुंबाला कठीण काळात आधार देऊ शकेल. आपल्या घरी झालेल्या लग्नाच्या निमित्तानं, या कुटुंबानं गावातल्या सुमारे साडेतीन हजार लोकांसाठी अपघात विम्याची व्यवस्था केली. प्रत्येक व्यक्तीला एक लाख रुपयांचं विमा संरक्षण देण्यात आलं. या उपक्रमामागची भावना खूप हृदयस्पर्शी आहे. अपघातानंतर कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, हे या कुटुंबानं पाहिलं होतं. अशा वेळी एक छोटीशी मदतही मोठा आधार ठरू शकते.
मित्रांनो, सरकार देशभरातल्या कोट्यवधी कुटुंबांना सुरक्षा कवच पुरवत आहे. ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने‘अंतर्गत केवळ 20 रुपयांच्या वार्षिक हप्त्यात म्हणजेच एका वर्षाच्या फक्त 20 रुपयांच्या हप्त्यात 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा मिळतो. आतापर्यंत 58 कोटींहून अधिक लोक या योजनेत सामील झाले आहेत. यापैकी अंदाजे 28 कोटी आपल्या माता, भगिनी, कन्या आणि महिला आहेत. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, या योजनेअंतर्गत पीडित कुटुंबांना 3,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत मिळाली आहे.
मित्रांनो, अशाच प्रकारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाही तितकीच महत्त्वाची आहे. ही योजना एखाद्या व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्या कुटुंबाला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण प्रदान करते. याचा वार्षिक हप्ता फक्त 436 रुपये आहे म्हणजेच दिवसाला जेमतेम दीड रुपया. या योजनेत आतापर्यंत 27 कोटींहून अधिक लोक सामील झाले आहेत. या योजनेअंतर्गत देशभरातील सुमारे 11 लाख कुटुंबांना सुमारे 22 हजार कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. हे आकडे खूप मोठे आहेत. या आकड्यांमागे लाखो कुटुंबांच्या स्वतःच्या कथा आहेत. कुठेतरी एका आईला तिच्या मुलांचं शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत मिळाली तर कुठेतरी एका पत्नीला घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी आधार मिळाला. मित्रांनो, कधीकधी एक मोठी सुरक्षा अगदी लहान रकमेनं आणि एका लहान पावलानं सुरू होऊ शकते; अगदी एक लहानसा निर्णयही मोठा फरक घडवू शकतो. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की या योजनांबद्दलची माहिती तुमच्या कुटुंबांपर्यंत पोहोचवा.
माझ्या प्रिय देशबांधवांनो, ‘मन की बात‘ मध्ये आपण आता एका अशा विषयावर बोलणार आहोत जो हजारो वर्षे जुना आहे आणि मानवी समाजात हजारो वर्षांपासून खोलवर रुजलेला आहे. हा विषय आहे अंधश्रद्धेचा. अंधश्रद्धा ही अनेकदा निव्वळ एक चुकीची समजूत नसते. ती भीती निर्माण करते आणि जेव्हा भीती मनाचा ताबा घेते, तेव्हा माणूस सत्य पाहणं थांबवतो. अंधश्रद्धेत बुडालेले लोक तर्क आणि सत्य जाणून न घेता असे निर्णय घेऊ लागतात ज्यामुळे मोठं नुकसान होतं. त्याच वेळी, समाजात असेही लोक आहेत जे विज्ञान, अनुभव आणि तर्काच्या आधारावर त्या समजुतींना आव्हान देतात. अंधश्रद्धेपासून विश्वासापर्यंतचा हा प्रवास सोपा नाही आणि आज मी तुम्हाला अशाच एका यशस्वी प्रवासाबद्दल नक्कीच सांगू इच्छितो.
मित्रांनो, आसाममध्ये एक पक्षी आढळतो. त्याचं नाव आहे ‘हरगिला‘. हा ‘हरगिला‘ एक दुर्मिळ पक्षी आहे. निसर्ग स्वच्छ ठेवण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावतो. तथापि, आसामच्या काही भागांमध्ये त्याला फार पूर्वीपासून अशुभ मानलं जात होतं. लोकांना तो आपल्या आजूबाजूला दिसलेला आवडत नसे. कधीकधी तर ज्या झाडांवर हरगिलाची घरटी बांधली जात असत, ती झाडंदेखील तोडली जात. कल्पना करा, पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणारा ‘हरगिला‘ हा पक्षी लोकांच्या भीतीचा बळी ठरला. याच काळात जीवशास्त्रज्ञ पूर्णिमा देवी बर्मन यांनी हे सर्व पाहिलं. लोकांच्या मनात रुजलेले गैरसमज दूर करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांनी महिलांशी संवाद साधला, त्यांना विज्ञानाच्या आधारे परिस्थिती समजावून सांगितली आणि हळूहळू महिला या मोहिमेत सामील होऊ लागल्या. मग एक मोठा बदल सुरू झाला. एकेकाळी अशुभ मानल्यामुळे हाकलला जाणारा हा पक्षी गावांचं प्रतीक बनला. ‘हरगिला‘ला वाचवण्यासाठी हजारो ग्रामीण महिला पुढे आल्या – आज त्या ‘हरगिला आर्मी‘ म्हणून ओळखल्या जातात. या महिलांनी समाजाशी संघर्षही केला. त्यांनी समाजाला शिक्षित करण्यासाठी आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी रात्रंदिवस काम केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की जेव्हा अचूक माहिती दिली जाते तेव्हा जुन्या विचारांमध्येही बदल होऊ शकतो.
मित्रांनो, मी नेहमी म्हणतो, जो खेळतो, त्याचाच विकास होतो. आज देशात अशा खेळणाऱ्या आणि फुलणाऱ्या तरुणांची संख्या खूप वेगाने वाढतेय. पूर्वीच्या तुलनेत आता खूप जास्त तरुण खेळाला करिअर म्हणून स्वीकारत आहेत. मला नागालँडच्या अशा दोन रंजक प्रयत्नांबद्दल माहिती मिळाली आहे. पहिला प्रयत्न आहे ‘नागालँड बेबी लीग’. हे नाव ऐकून तुम्हाला ही लहान मुलांची एखादी साधारण लीग असेल, असं वाटलं असेल, पण तसं नाहीये. ही ५ ते १२ वर्षे वयोगटातील छोट्या-छोट्या, फुलांसारख्या मुलांची एक असामान्य लीग आहे. बाल फुटबॉल खेळाडूंची ही एक अशी लीग आहे, जी त्यांच्या वेगाला आणि प्रतिभेला प्रोत्साहन तर देतेच, शिवाय त्यांची ओळखही निर्माण करते. याची सुरुवात नागालँडच्या जास्तीत जास्त मुलांना फुटबॉलशी जोडण्याच्या उद्देशाने झाली होती. पाच ते बारा वर्षांपर्यंतची मुलं आणि मुली यात भाग घेऊ शकतात. या लीगने आता तीन वर्षं पूर्ण केली आहेत. या लीगचा मुलांच्या मनावर खूप चांगला परिणाम झाला आहे.
मित्रांनो, नागालँडमध्ये आणखी एक चांगला प्रयत्न होत आहे. त्याचं नाव आहे, ‘नागालँड वीमेन फुटसाल लीग‘. कदाचित हे ‘फुटसाल‘ तुमच्यासाठी एक नवीन नाव असेल. मी तुम्हाला सांगतो, फुटसालला इनडोअर फुटबॉलसुद्धा म्हटलं जातं. यात एका संघात फक्त पाच खेळाडू असतात. या खेळाचं मैदान फुटबॉलच्या मैदानापेक्षा आकाराने खूप लहान असतं. यामुळे खेळाडूंना खूप जलद निर्णय घ्यावे लागतात. त्यांना तंत्राचा आणि कौशल्याचा उत्तम वापर करावा लागतो. नागालँडची वीमेन फुटसाल लीग तिथल्या मुलींना आपली प्रतिभा दाखवण्याची एक उत्तम संधी देत आहे. मी अशा उपक्रमांसाठी नागालँडच्या लोकांचं कौतुक करतो. असे प्रयत्न देशाच्या इतर भागांनाही मोठी प्रेरणा देतात.
मित्रांनो, हे तंत्रज्ञानाचं युग आहे. रोज नवीन संशोधन होतंय. नवनवीन एआय नवनिर्मिती समोर येत आहेत. या काळात एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. लोकांची सर्जनशीलता कशी टिकवून ठेवायची? नवीन तंत्रज्ञानासोबत पुढे जाताना आपण आपल्या मुळांशी कसं जोडलेलं राहायचं? या प्रश्नांची अचूक उत्तरं ‘नालंदा विद्यापीठा‘ने शोधली आहेत. आपलं हजारो वर्षांचं जुनं नालंदा विद्यापीठ आता एका नव्या अवतारात भारताचं भवितव्य घडवत आहे. दोन वर्षांपूर्वी मला नालंदा विद्यापीठाच्या नवीन परिसराचं उद्घाटन करण्याची मोठी संधी मिळाली होती. नालंदा विद्यापीठाने आपल्या शास्त्रार्थाची प्राचीन परंपरा पुन्हा जिवंत केली आहे. शास्त्रार्थ हे केवळ आपलं म्हणणं मांडण्याचं साधं माध्यम नाहीये. ही वाद-संवाद आणि मंथनाची एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. यात तर्कासहित, पुराव्यासहित आपली बाजू मांडणं खूप गरजेचं असतं आणि त्यात तुम्ही चांगलंच निष्णात असायला हवं. दुसऱ्यांचे विचार शांतपणे ऐकण्याची आणि समजून घेण्याची मोठी शिकवणही या शास्त्रार्थाच्या प्रक्रियेतून मिळते. नालंदा विद्यापीठाने शास्त्रार्थाला आपल्या पदवीदान समारंभाचा मुख्य भाग बनवलं, याचा मला आनंद आहे. यात भाग घेणारे जवळपास निम्मे विद्यार्थी इतर देशांमधून आले होते. एका प्राचीन परंपरेला आजच्या काळाशी जोडण्याचा हा प्रयत्न अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. यासाठी मी नालंदा विद्यापीठाचं खूप-खूप अभिनंदन करतो. देशातल्या इतर विद्यापीठांनीही अशा उपक्रमांचा नक्की विचार करावा, असा आग्रह मी त्यांना करेन.
मित्रांनो, आपल्या मुळांशी जोडलेलं राहून तरुणांना नव्या तंत्रज्ञानासाठी तयार करण्याचा आणखी एक छान प्रयत्न होत आहे. दिल्लीतली सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्स मध्ये बी. टेक. अभ्यासक्रम सुरू करणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाला भारताच्या पारंपरिक ज्ञानाशी जोडण्याच्या दिशेने टाकलेलं हे एक अतिशय महत्त्वाचं पाऊल आहे. यामुळे भारतीय भाषांसाठी नवीन एआय साधनं तयार करायला खूप मदत मिळेल. तसंच, आपले प्राचीन ग्रंथ आणि हस्तलिखितं डिजिटल रूपात जतन करण्याच्या कामालाही नवी गती मिळेल. या उत्तम प्रयत्नासाठी मी सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीला खूप-खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो, आज भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतेय. आपली गाणी, आपलं संगीत आणि आपलं अध्यात्म जगभरातले लोक समजून घेत आहेत आणि ते आत्मसातही करत आहेत. भारतापासून हजारो किलोमीटर दूर कॅरिबियन समुद्रात डॉमिनिकन रिपब्लिक नावाचा एक देश आहे. तिथे भारतीयांची संख्या जेमतेम १०० किंवा कदाचित त्याहूनही कमी असेल. तरीही, तिथे भारतीय संस्कृती आणि अध्यात्माशी जोडलेला एक खूप छान प्रयत्न होतोय. तिथे स्पॅनिश बोलणाऱ्या काही लोकांनी मिळून एक टीम बनवलीय. या टीमचं नाव आहे, ‘ब्रह्मकमळ डोमिनिकाना‘. या टीमचे सदस्य एकत्र येऊन वैदिक साहित्याचा अभ्यास करतात. ते वैदिक मंत्रांचे उच्चार करायलाही शिकत आहेत. त्यांना याचं कोणतंही रीतसर प्रशिक्षण मिळालेलं नाही. पण फक्त ध्वनीमुद्रण ऐकून त्यांनी वैदिक मंत्रांचे अगदी अचूक उच्चार शिकून घेतले आहेत. आज ते अनेक मंत्रांचा खूप चांगल्या प्रकारे जप करतात. यामध्ये पुरुष सूक्तम, श्री सूक्तम, श्री रुद्रम, दुर्गा सूक्तम आणि देवी महात्म्यम या मंत्रांचा समावेश आहे. भारतापासून इतक्या दूर राहून आपल्या परंपरा शिकण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. मी ‘ब्रह्मकमळ डोमिनिकाना‘च्या तिथल्या सर्व सदस्यांना त्यांच्या या प्रयत्नांसाठी खूप शुभेच्छा देतो. जे लोक भारतीय संस्कृती जगभरात लोकप्रिय करण्यासाठी असे सतत प्रयत्न करत आहेत, त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो.
प्रिय देशबांधवांनो, मेघालयची ओळख तिथल्या ढगांमुळे आणि तिथल्या सुंदर निसर्गामुळे आहे. जो मेघालयला जातो, त्याला तिथल्या लोकांचा जिव्हाळा दीर्घ काळ लक्षात राहतो. पण, मेघालयचं आणखी एक खास वैशिष्ट्य आहे, त्याबद्दल आज मी ‘मन की बात‘मधून तुमच्याशी बोलणार आहे. ते म्हणजे मेघालयातले रूट ब्रिज. रस्ता या अर्थाने ‘रुट‘ नाही, तर झाडांच्या मुळांचा ‘रूट‘. या रूट ब्रिजची कहाणी खूपच रंजक आहे. हे पूल काही दिवसांत किंवा काही वर्षांत बनत नाहीत. ते तयार व्हायला अनेक दशकं लागतात. रबराच्या झाडांच्या मुळांना हळूहळू एक विशिष्ट दिशा दिली जाते. ही मुळं पाण्याच्या प्रवाहांच्या पलीकडे नेली जातात. मग काळाच्या ओघात तीच मुळं एका अतिशय मजबूत पुलाचं रूप घेतात. या पुलांचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य आहे. हे जिवंत पूल आहेत! काळानुसार, ते अधिकाधिक मजबूत होत जातात. यातून मेघालयच्या लोकांची अप्रतिम सर्जनशीलता दिसून येते. यामागे त्यांची वर्षानुवर्षांची चिकाटी आणि निसर्गाबद्दलचा सखोल आदर दडलेला आहे. माणूस निसर्गाशी एकरूप होऊन किती अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. ही आपल्या देशाची, या मातीची एक अमूल्य संपत्ती आहे. आता भारताने मेघालयातल्या या रूट ब्रिजचा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट नेटवर्कमध्ये समावेश करण्यासाठी अर्ज केला आहे.
मित्रांनो, हवामान बदलामुळे या रूट ब्रिजेससमोर अनेक मोठी आव्हानंही उभी राहतात. अशा वेळी मेघालयच्या लोकांनी या नैसर्गिक वारशाच्या संवर्धनाची जबाबदारीही उत्तम प्रकारे पार पाडली आहे. पूर्वी अशा पुलांची संख्या किती आहे, हे शोधून काढणंही सोपं नव्हतं. स्थानिक लोकांनीच त्यांची मोजदाद करायला सुरुवात केली. यानंतर तिथल्या समुदायांनी या पुलांच्या देखभालीची जबाबदारीही स्वीकारली. आज स्थानिक लोक १२० हून अधिक रूट ब्रिजेसची देखभाल करत आहेत. काही गट दरवर्षी या पुलांच्या स्थितीची तपासणी करतात. काहींनी आजूबाजूचा परिसर मजबूत करण्यासाठी नर्सरीसुद्धा तयार केली आहे. अशा प्रकारे, यांच्या संवर्धनासाठी एक पूर्ण परिसंस्था तयार झाली आहे. तुम्ही पाहिलंच असेल, या वर्षी हेली वार जी यांना ‘पद्म पुरस्काराने‘ सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातली ५० हून अधिक वर्षं या रूट ब्रिजेसच्या देखभालीसाठी वेचली आहेत. त्यांचं हे समर्पण आपल्या सर्वांसाठी खूप प्रेरणादायी आहे. मित्रांनो, तुम्ही कधी या रूट ब्रिजेसना भेट दिली असेल, तर त्यांचे फोटो सोशल मीडियावर नक्की शेअर करा. तुमचे फोटो पाहून इतर लोकांनाही मेघालयच्या या अनोख्या वारशाबद्दल जाणून घेण्याची मोठी प्रेरणा मिळेल.
प्रिय देशबांधवांनो, आपलं गाव स्वच्छ असावं, आपलं शहर सुंदर दिसावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. पण आपल्या आजूबाजूला जो कचरा साठतो, तो कोण साफ करतं? याचा थांबून विचार क्वचितच केला जातो. बहुतांश लोक हेच गृहीत धरून चालतात की ही दुसऱ्या कोणाची तरी जबाबदारी आहे आणि तोच ती साफसफाई करेल. पण आपल्यात असेही काही लोक असतात, ज्यांच्या विचारसरणीने आपल्याला खूप प्रेरणा मिळते. मला मध्य प्रदेशातल्या राजगढ जिल्ह्यामधल्या ब्यावरा इथल्या काही बहिणींबद्दल जाणून घेण्याची छान संधी मिळाली. त्यांनी आपल्या आजूबाजूला पसरलेला प्लास्टिकचा कचरा हटवण्याचा संकल्प केला. कोणीतरी येऊन बदल घडवेल, असा विचार त्यांनी केला नाही. त्यांनी स्वतःच शहरभरातून प्लास्टिकचा कचरा आणि रिकाम्या बाटल्या गोळा करायला सुरुवात केली. हळूहळू हा प्रयत्न पुढे वाढत गेला आणि मग त्या प्लास्टिकचं रुपांतर ‘इको-ब्रिक्स‘मध्ये झालं. आज याच इको-ब्रिक्सचा वापर सार्वजनिक ठिकाणं सुंदर बनवण्यासाठी केला जातोय. राजगढमध्ये गेल्या काही महिन्यांत शेकडो किलो प्लास्टिक रिसायकल करून त्याचा उत्तम वापर करण्यात आलाय. म्हणजे, जे प्लास्टिक पूर्वी शहरात प्रदूषण पसरवायचं, आज तेच या बहिणींच्या प्रयत्नांमुळे शहराचं सौंदर्य वाढवण्यात मोलाचं योगदान देतंय. मी ब्यावराच्या सर्व बहिणींचं आणि या अभियानाशी जोडल्या गेलेल्या सर्व मित्रांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, अनेक लोकांनी मला पत्र लिहून एका खास विषयावर बोलण्याची सूचना केली आहे. हा विषय ‘गणेशोत्सवा‘शी जोडलेला आहे. तसं पाहिलं तर ‘गणेशोत्सवा‘ला अजून बराच वेळ बाकी आहे, पण या विषयावर आताच बोललं पाहिजे असा लोकांचा आग्रह आहे. खरं तर, गणपतीच्या मूर्ती बनवण्याचं काम खूप आधीपासूनच सुरू होतं. मूर्ती बनवणारे, मूर्तींच्या व्यापाराशी जोडले गेलेले लोक आतापासूनच कामाला लागतात. म्हणूनच माझा तुम्हा सर्वांना एक आग्रह आहे. तुम्ही असा प्रयत्न करा की तुमच्या घरी, सोसायटीत किंवा आजूबाजूच्या ठिकाणी गणपती बाप्पाच्या ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल, ती आपल्या देशाच्या मातीपासून बनलेली असावी, ती आपल्या कुंभारांच्या आणि स्थानिक कलाकारांच्या हातांनी तयार झालेली असावी. जे लोक गणपतीच्या मूर्ती बनवतात, त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं. आणि जे लोक मूर्ती खरेदी करतात, त्यांनीही गणपती बाप्पाची मूर्ती कशापासून बनली आहे आणि ती कोणत्या देशात तयार झाली आहे, हे नक्की पहावं. ‘प्लास्टर ऑफ पॅरिस‘पासून बनलेल्या मूर्ती अजिबात खरेदी करू नका. मित्रांनो, मातीच्या मूर्ती पूजेनंतर सहजपणे पाण्यात विरघळून जातात. यामुळे आपल्या नद्या, तलाव आणि पर्यावरणाचं रक्षण होतं. आपली श्रद्धाही टिकून राहते आणि निसर्गाप्रती असलेलं आपलं कर्तव्यही पूर्ण होतं. आपण स्थानिक कारागिरांकडून मूर्ती विकत घेतो, तेव्हा आपण ‘व्होकल फॉर लोकल‘चा संकल्प अधिक बळकट करतो. यावेळच्या ‘गणेशोत्सवात‘ आणि अशा प्रत्येक उत्सवात आपण या सगळ्या गोष्टींचा नक्कीच गांभीर्याने विचार करू आणि देशाच्या हिताची पावलंही उचलू, याची मला खात्री आहे.
मित्रांनो, आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आपल्या देशातले लोक आहेत. देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होत असलेले छोटे-मोठे प्रयत्न आपल्याला बरंच काही शिकवतात. जेव्हा मनात ठाम संकल्प असतो आणि समाजाची भक्कम साथ मिळते, तेव्हा कोणताही मोठा बदल नक्कीच घडवून आणता येऊ शकतो, हेच या प्रयत्नांतून दिसून येतं. तुम्ही तुमच्या आजूबाजूला होत असलेल्या अशा प्रयत्नांबद्दल मला आवर्जून लिहित राहा. तुमचे विचार आणि तुमच्या सूचना पाठवत राहा, काय सांगावं, तुमच्या आजूबाजूला सुरु झालेला एखादा छोटासा उपक्रम संपूर्ण देशासाठी मोठी प्रेरणा ठरेल! पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. देशवासियांच्या काही नवीन प्रयत्नांवर आपण नक्की चर्चा करू.
तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आणि हो! जलसंचय तर आपल्याला करायचाच आहे. पावसाच्या पाण्याचा एक-एक थेंब आपल्याला वाचवायचा आहे. ‘कॅच द रेन‘ हे अभियान आपल्याला अजिबात ढिलं पडू द्यायचं नाहीये. त्यामुळे, पावसाचा थेंब न् थेंब आपण सगळ्यांनी मिळून वाचवूया, असा माझा खास आग्रह आहे.
खूप-खूप धन्यवाद. नमस्कार.
***
हर्षल अकुडे/आकाशवाणी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
#MannKiBaat has begun. Do hear! https://t.co/KxXEVbfnmI
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026
This month, India has witnessed several achievements that make every citizen proud. These achievements have further strengthened India's journey towards self-reliance.#MannKiBaat pic.twitter.com/CkEa0CiFJP
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026
International Day of Yoga once again united people across the world.
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026
India's outstanding performance at the World Yogasana Championship made the occasion even more special.#MannKiBaat pic.twitter.com/mXUX9W5Bv4
A thoughtful gesture by a family in Maharashtra...#MannKiBaat pic.twitter.com/1uZiS2eOrC
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026
Affordable social security schemes are providing families across India with financial protection and support during times of need.#MannKiBaat pic.twitter.com/2KXB40ITwN
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026
An inspiring community-led movement in Assam has shown how awareness and collective effort can transform mindsets and protect nature.#MannKiBaat pic.twitter.com/6aIkb7Clpu
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026
Grassroots sporting initiatives are empowering young talent... Here are two commendable efforts from Nagaland.#MannKiBaat pic.twitter.com/2F25YC5sQW
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026
Nalanda University is making a commendable effort to connect India's ancient tradition of 'Shaastraarth' with the needs of the modern world.#MannKiBaat pic.twitter.com/1Sibd2DDSI
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026
A noteworthy initiative by the Central Sanskrit University...#MannKiBaat pic.twitter.com/fzcMD7sOiL
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026
A remarkable initiative in the Dominican Republic reflects the growing global appeal of India's culture and traditions.#MannKiBaat pic.twitter.com/if4tZ3YWkX
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026
Meghalaya's root bridges are a remarkable example of harmony between people and nature. #MannKiBaat pic.twitter.com/bpvT4lR3rG
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026
An inspiring initiative by women in Madhya Pradesh is transforming plastic waste into eco-bricks. #MannKiBaat pic.twitter.com/w7RmFnq4Xe
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026
This Ganesh Utsav, let us choose eco-friendly clay idols crafted by local artisans.#MannKiBaat pic.twitter.com/ct7pYNrER6
— PMO India (@PMOIndia) June 28, 2026