Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चंदीगडमध्ये आरोग्यसेवा, शिक्षण आणि रस्ते पायाभूत सुविधांशी संबंधित 4,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चंदीगडमध्ये आरोग्यसेवा, शिक्षण आणि रस्ते पायाभूत सुविधांशी संबंधित 4,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण


नवी दिल्ली,17 जुलै 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंदीगडमध्ये आरोग्य, शिक्षण आणि रस्ते पायाभूत सुविधांशी संबंधित 4,700 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.  सुनियोजित राष्ट्रीय विकासाचे एक आदर्श उदाहरण अशी  या शहराची ओळख असून येथील उत्तम जीवनशैली आणि सुलभ जीवनमानासाठी देखील ते ओळखले जाते यावर त्यांनी  भर दिला. या क्षेत्रावर ‘माँ चंडी’ची  दैवी कृपा असल्याचे सांगत, त्यांनी या शहराच्या निरंतर आणि सुनियोजित विकासाप्रति प्रशासनाची असलेली दृढ कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली. “चंदीगडच्या विकासाला विद्यमान सरकारचे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे,” असे मोदी म्हणाले.

देशाच्या न्यायव्यवस्थेत दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या ऐतिहासिक आणि व्यापक बदलांची आठवण करून देताना, पंतप्रधानांनी वसाहतकालीन दंडात्मक कायद्यांकडून न्याय-आधारित चौकटीकडे झालेल्या स्थित्यंतराचा उल्लेख केला.”भारतीय न्याय संहितेची अंमलबजावणी चंदीगडमधूनच सुरू झाली,” असे मोदी यांनी नमूद केले.

शहरी परिसराचे आधुनिकीकरण करण्यासाठी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीबाबत बोलताना  ,पंतप्रधानांनी ‘इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर’,’स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट’ आणि ‘डिजिटल गव्हर्नन्स’ यांसारख्या परिवर्तनकारी उपक्रमांचा उल्लेख केला. आरोग्य,शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या उद्घाटनाबद्दल नागरिकांचे अभिनंदन करताना, त्यांनी या भविष्यवेधी सुधारणांना चालना देणारी मोठ्या प्रमाणावरील भांडवली गुंतवणुक अधोरेखित केली.”शहराला हाय-टेक बनवण्याच्या या मोहिमेसाठी अडीच हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च करण्यात आली आहे,” असे मोदी यांनी नमूद केले.

प्रादेशिक प्रगतीसाठी समर्पित आपल्या विस्तृत दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना पंतप्रधानांनी हरियाणा मधील जिंद येथील आपल्या आधीच्या कार्यक्रमाचा आणि पंजाब मधील त्यांच्या नियोजित जालंधर दौऱ्याचा उल्लेख केला. आपला सध्याचा दौरा हा शेजारील राज्यांना अखंडपणे जोडणारा एक महत्त्वपूर्ण भौगोलिक आणि प्रशासकीय दुवा असल्याचे त्यांनी सांगितले. आपले चंदिगढ अत्यंत प्रभावीपणे हरियाणा आणि पंजाबला जोडत आहे, असे ते म्हणाले.

त्यांनी स्थानिक शहरी विकासाचा व्यापक प्रादेशिक परिणाम विशद केला. शेजारील हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर राज्यांतील जनजीवनावर चंदीगड मधील प्रगतीचा अत्यंत प्रभावी परिणाम झाला आहे, असे ते म्हणाले. विशेषतः या शहराची प्रादेशिक आरोग्यसेवा वितरण क्षेत्रातील अपरिहार्य आणि मध्यवर्ती भूमिका त्यांनी अधोरेखित केली. या संपूर्ण क्षेत्रांत वैद्यकीय सेवांसाठी चंदीगड हे एक मोठे केंद्र असल्याचे ते म्हणाले.

स्थानिक वैद्यकीय संस्थांमधील प्रगत आरोग्यसेवा सुविधांच्या व्यापक विस्ताराची घोषणा करताना पंतप्रधानांनी माता आणि शिशु केंद्र,  न्यूरोसायन्सेस सेंटर आणि क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक यांसारख्या महत्त्वपूर्ण नवीन सुविधांचा परिचय करून दिला. या प्रकल्पांमुळे लाखो लोकांना आणखी चांगल्या उपचार सुविधा मिळतील, असे त्यांनी सांगितले.

2015 मध्ये या संस्थेच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिल्याची आठवण करुन देताना पंतप्रधानांनी गेल्या दशकात साध्य झालेल्या असाधारण क्षमता बांधणीची प्रशंसा केली. ही प्रगती सतत  सुरु ठेवणाऱ्या प्रशासकीय चमू , शैक्षणिक कर्मचारी आणि वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या क्षमता विस्तारण्यासाठी योगदान देणाऱ्या येथील प्राध्यापकांचे आणि युवा डॉक्टरांचे मी मनःपूर्वक कौतुक करतो, असे त्यांनी सांगितले.

सुदृढ सार्वजनिक आरोग्य आणि कठोर स्वच्छतेच्या मानकांमध्ये असलेला थेट संबंध अधोरेखित करत, पंतप्रधानांनी देशभरात सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या शुभारंभाची आठवण करून दिली.त्यांनी कोट्यवधी शौचालयांच्या उभारणीपासून ते उघड्यावर शौच करण्याच्या प्रथेला आळा घालण्यापर्यंत राबवण्यात आलेल्या व्यापक संरचनात्मक बदलांची माहिती दिली. तसेच स्वच्छता क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शहराचे त्यांनी कौतुक केले.स्वच्छता आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनावी यासाठी विविध उपक्रम सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.  

असाधारण नागरी समर्पणाबद्दल एका स्थानिक निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याचा विशेष उल्लेख करत,’झाडू योद्धा’ म्हणून सर्वत्र ओळखले जाणारे इंदरजित सिंग सिद्धूजी यांनी तळागाळात स्वच्छता चळवळ सुरु केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. या प्रेरणादायी सामुदायिक प्रयत्नांना प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने औपचारिक मान्यता देण्याच्या  सरकारच्या निर्णयाचे त्यांनी अभिमानपूर्वक कौतुक केले. या नवजागृती बद्दल आमच्या सरकारने त्यांना यावर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित केले, असे पंतप्रधान म्हणाले.

सार्वजनिक स्वच्छता ही एखाद्या दिवसापूर्वी मर्यादित मोहीम नसून ती जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे, असे सांगून पंतप्रधानांनी आजच्या दिवसाच्या कार्यक्रमात विशेष ‘स्वच्छतेने स्वागत’ मोहिमेचा समावेश केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी नागरिकांचे कौतुक केले आणि रोगप्रतिबंधात अशा उपक्रमाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. “देशभरात अनेक आजारांना प्रतिबंध करण्यासाठी स्वच्छता मोहिमा अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत,” हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

देशाच्या आरोग्यसेवा क्षमतेबद्दल पूर्वी जगभरात व्यक्त केल्या जात असलेल्या चिंतेवर भाष्य करताना, पंतप्रधानांनी संकटकाळात दिसून येणाऱ्या ऐतिहासिक संशयवादाची तुलना कोरोना महामारीच्या काळात देशाने दाखवलेल्या सक्रिय नेतृत्वाशी केली. कोरोना महामारीच्या काळात भारताने मदत मागण्याऐवजी इतर देशांना मदत केली, हे त्यांनी अभिमानाने नमूद केले. आज भारत गुंतागुंतीच्या वैद्यकीय उपचारांसाठी एक प्रमुख जागतिक केंद्र बनला आहे, असे ते म्हणाले.“आमच्या सरकारने भारताची क्षमता पूर्णपणे बदलली आणि जगाचा आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही आमूलाग्र बदलला,” असे मोदी म्हणाले.

बारा वर्षांच्या समर्पित धोरण अंमलबजावणीमुळे हा आमूलाग्र बदल घडला असल्याचे सांगून,पंतप्रधानांनी वैद्यकीय वंचना दूर करण्याच्या आणि सर्व नागरिकांना परवडणारी, उच्च-दर्जाची आरोग्यसेवा सुनिश्चित करण्याच्या मूलभूत प्रतिज्ञेची आठवण करून दिली.“गेल्या बारा वर्षांतील देशाचे यश हे याच संकल्पाचा थेट परिणाम आहे,” असे त्यांनी सांगितले.

देशभरातील वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या वेगवान विस्ताराची सूची देताना, पंतप्रधानांनी 2014 नंतर 15 नवीन एम्सला मिळालेली मंजुरी, शेकडो वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना आणि विशेष रुग्णालयांचा झपाट्याने झालेला प्रसार यावर प्रकाश टाकला. त्यांनी 2022 मध्ये चंदीगड येथे होमी भाभा कर्करोग रुग्णालयाच्या उद्घाटनाचा अभिमानाने उल्लेख केला आणि हे रुग्णालय आता हजारो रुग्णांना तज्ञांमार्फत सेवा देत असल्याचे सांगितले. “अलीकडच्या वर्षांत, भारताने आपल्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधांचा वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर विस्तार केला आहे,” असे ते म्हणाले.

तळागाळातील वैद्यकीय उपलब्धतेवर लक्ष केंद्रित करत, पंतप्रधानांनी क्रिटिकल केअर ब्लॉक्स आणि सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्यसेवा मजबूत करण्यात आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाच्या भूमिकेचा सविस्तर आढावा घेतला. देशभरात सुमारे 1.75 लाख आयुष्मान आरोग्य मंदिरे सध्या शहरी, ग्रामीण आणि आदिवासी अशा सर्वच स्तरांवर महत्त्वपूर्ण तपासणी आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरवत आहेत, असे त्यांनी सांगितले. “प्रत्येक गावात प्राथमिक आरोग्य सुविधांचा झपाट्याने विकास करण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे,” याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्रांतिकारी वापरावर प्रकाश टाकत, पंतप्रधानांनी तज्ञ डॉक्टरांचा वैद्यकीय सल्ला सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल ई-संजीवनी मिशनची प्रशंसा केली.

त्यांनी सांगितले की दुर्गम भागातील लोक आता कष्टदायक प्रवास न करता तज्ज्ञांशी संपर्क साधू शकतात. “आज देशभरात 48 कोटींहून अधिक टेलिमेडिसिन सल्लामसलती यशस्वीरित्या पार पडल्या आहेत,” असे मोदी यांनी नमूद केले.

वैद्यकीय सुधारणांची व्याप्ती वाढल्यामुळे जीव वाचविण्यात झालेल्या परिणामाचे मूल्यांकन करताना पंतप्रधानांनी सांगितले की आता 90 टक्क्यांहून अधिक प्रसूती अत्यंत सुरक्षित संस्थात्मक आरोग्य सेवा केंद्रांमध्ये होत आहेत. माता मृत्यू दरात तब्बल 86 टक्क्यांची घट झाली असून देशभरात बाल मृत्यू दरातही मोठी घट नोंदविली गेली आहे, ही आकडेवारी त्यांनी मांडली. “आरोग्य सेवांच्या प्रचंड विस्तारामुळे बाल मृत्यू दरातही मोठी घट झाली आहे,” यावर मोदी यांनी भर दिला.

उपचार क्षेत्रातील प्रगती आणि आरोग्य संवर्धनाच्या सक्रिय उपाययोजनांमध्ये समतोल साधत प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेवर सरकारने दिलेल्या भरावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. पोषण अभियान, मिशन इंद्रधनुष्य, योग प्रसार, एचपीव्ही लसीकरण मोहिमा आणि यू-विन प्लॅटफॉर्म यांसारख्या सर्वसमावेशक उपक्रमांमुळे मोठ्या लोकसंख्येचे आरोग्यावरील संभाव्य संकटांपासून संरक्षण होत असल्याचे त्यांनी सांगितले.“अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रयत्नांमुळे कोट्यवधी लोकांचे जीवन सातत्याने सुरक्षित होत आहे,” असे मोदी म्हणाले.

क्षय रोगाविरोधातील जास्त तीव्रतेने राबवल्या जाणाऱ्या  देशव्यापी मोहिमेची रूपरेषा मांडताना पंतप्रधानांनी लोकसहभागावर आधारित टीबी मुक्त भारत अभियानात वेळेवर तपासणी आणि उपचारांवर दिलेल्या भराविषयी सविस्तर माहिती दिली. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक आरोग्य संघटना – डब्ल्यूएचओच्या अहवालाचा उल्लेख करत त्यांनी गेल्या दशकात क्षय रोगाच्या संसर्गामध्ये 21 टक्क्यांची घट झाल्याचे आणि उपचारांची व्याप्ती 90 टक्क्यांहून अधिक झाल्याचे सांगितले. “सक्रिय लोकसहभागाद्वारे मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे,” असे मोदी म्हणाले.

निम्न आणि मध्यम उत्पन्न गटांतील कुटुंबे या आरोग्य सेवा क्रांतीचे मोठे लाभार्थी ठरली आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. आरोग्य सेवांमध्ये सर्वांना समान प्रवेश मिळावा या दृष्टीने देशाच्या दृष्टिकोनात मूलभूत वैचारिक बदल झाला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. “भारतातील आरोग्य सेवा आता विशेषाधिकार राहिलेली नाही; ती प्रत्येकाचा हक्क बनत आहे,” असे मोदी यांनी आग्रहपूर्वक सांगितले.

वैद्यकीय शिक्षणातील ऐतिहासिक अडथळ्यांवर भाष्य करताना पंतप्रधानांनी सांगितले की, पूर्वी वैद्यकीय शिक्षणासाठी उपलब्ध जागांची कमतरता असल्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांची स्वप्ने अपुरी राहिली. मात्र,आता देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या आता जवळपास दुप्पट झाली असून पदव्युत्तर शिक्षणाच्या जागांमध्येही विक्रमी वाढ करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. तसेच स्थानिक संस्थेमध्ये एमबीबीएस महाविद्यालयाला बहुप्रतिक्षित मंजुरी नुकतीच मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. “वाढत्या व्याप्तीमुळे गुणवंत युवांना उत्कृष्ट संस्थांमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळेल आणि देशाला सर्वोत्तम डॉक्टर मिळतील,” असे मोदी यांनी नमूद केले.

शैक्षणिक, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय संशोधन संस्था या शहरात एकवटलेल्या असण्याच्या अनोख्या वैशिष्ट्याची प्रशंसा करत, सध्या होत असलेल्या या जलद प्रगतीमुळे हे शहर लवकरच स्टार्टअप्स आणि तांत्रिक नवोन्मेषाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल, असे भाकीत पंतप्रधानांनी वर्तवले. या शैक्षणिक वाटचालीस गती मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधील ‘कुरुक्षेत्र बॉईज हॉस्टेल’चे त्यांच्या हस्ते उद्घाटन तसेच संशोधन करणाऱ्यांसाठीच्या नवीन निवासस्थानांची पायाभरणी करण्यात आली. “आपल्या देशातील युवकांना प्रगत संशोधनासाठी सर्वोत्कृष्ट प्रयोगशाळा आणि उत्तम प्राध्यापक वर्ग मिळावा, हाच आमचा प्रयत्न आहे,” असे मोदी म्हणाले.

जिथे अत्यंत परिश्रमपूर्वक अभ्यास केला जातो अशा शैक्षणिक वातावरणाचा तांत्रिक क्षेत्रात क्रांतिकारी यश मिळण्याशी असलेला थेट संबंध विशद करत, कृत्रिम प्रज्ञा, सेमीकंडक्टर आणि डीप-टेक क्षेत्रातील प्रगतीला चालना देण्यासाठी सशक्त संशोधन परिसंस्था असणे अत्यंत आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी  स्पष्ट केले. देशाचे हे प्रमुख उद्दिष्ट साध्य करण्यात स्थानिक शिक्षक आणि विद्यार्थी अग्रभागी असतील  असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. “संशोधनासाठी आवश्यक असणारे वातावरण खऱ्या अर्थाने सशक्त असेल, तरच आणखी जलदपणे नवोन्मेषाला गती मिळेल,” असेही मोदींनी ठामपणे सांगितले.

भक्कम पायाभूत सुविधा हा आर्थिक समृद्धीचा अंतिम आराखडा असतो अशी व्याख्या करत पंतप्रधानांनी सरकारचा नाविन्यपूर्ण आणि समावेशक विकास दृष्टिकोन यशस्वी ठरला असल्याचे सांगितले. विमानतळाच्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘आयटी सिटी’ ते ‘कुराली’ दरम्यान बांधण्यात आलेल्या सहा-पदरी ‘ग्रीनफील्ड’ महामार्गाचे त्यांनी उद्घाटन केले; तसेच ‘पीआर-सेव्हन स्पर’ ची पायाभरणी केली, त्यामुळे या भागातील प्रवाशांना ये-जा करणे अधिक सुलभ होणार आहे. “अशा धोरणात्मक विकासकामांमुळे उद्योग आणि व्यवसायांना अभूतपूर्व अशी नवी गती मिळेल,” असे मोदी यांनी नमूद केले.

प्रादेशिक संपर्क व्यवस्था (कनेक्टिव्हिटीच्या) या विषयाचा सविस्तर उहापोह करत पंतप्रधानांनी जालंधर येथे रेल्वे प्रकल्पांचे एकाच वेळी उद्घाटन झाल्याची तसेच  जिंद ते सोनीपत या मार्गावर देशातील पहिली स्वच्छ (प्रदूषण न करणाऱ्या) इंधनावर चालणारी ऐतिहासिक हायड्रोजन ट्रेन सुरू झाल्याची घोषणा केली. शाश्वत आणि पर्यावरणपूरक वाहतुकीच्या क्षेत्रात देशाने केलेल्या या उल्लेखनीय प्रगतीबद्दल त्यांनी जनतेचे अभिनंदन केले. “पूर्णपणे स्वच्छ इंधनावर चालणाऱ्या या रेल्वेमुळे देशात खरोखरच अत्यंत महत्त्वपूर्ण पर्वाची सुरुवात झाली आहे,” असे उद्गार मोदी यांनी काढले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी ‘विकसित भारता’च्या दूरदर्शी दृष्टिकोनाचा उल्लेख करत भविष्यासाठी सज्ज असणारे तंत्रज्ञान, वाहतूक व्यवस्था आणि आरोग्य सुविधांची संरचना या गोष्टींवर सातत्याने लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. भावी पिढ्यांना ज्यांचा लाभ होईल अशा चिरस्थायी संस्थांच्या उभारणीसाठी विद्यमान सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी पंजाब, हरियाणा आणि चंदीगडच्या जनतेला दिली. “आपल्या सर्व भावी पिढ्यांना सहजपणे जास्तीत जास्त लाभ होऊ शकेल, असे धाडसी निर्णय आपण ठामपणे घेतले पाहिजेत” असे मोदी म्हणाले.

निलीमा चितळे/शैलेश पाटील/सुषमा काणे/भक्‍ती सोनटक्के/श्रद्धा मुखेडकर/संपदा पाटगावकर/रेश्मा बेडेकर/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर