Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक संपन्न


नवी दिल्ली,30 जुलै 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक झाली.पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेणे, तसेच विविध मंत्रालये आणि विभागांनी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेणे हा या बैठकीचा उद्देश होता. या विषयाशी संबंधित ही चौथी विशेष बैठक होती.

मंत्रिमंडळ सचिवांनी समितीसमोर सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीची माहिती दिली. द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी), द्रवरूप पेट्रोलियम वायू (एलपीजी) तसेच खतांचा पुरेसा पुरवठा व्हावा यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.एलपीजीच्या खरेदी स्रोतांचे विविधीकरण केले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख पेट्रोलियम पदार्थांचा एकूण साठा आणि पुरवठा स्थिती समाधानकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले. कच्च्या तेलाची उपलब्धता पुरेशी असल्यामुळे केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये 100% पेक्षा अधिक क्षमतेने कार्य सुरू असून पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थांचे उत्पादन अखंडपणे सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.

पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या (पीएनजी) जोडण्यांमध्ये अधिक वाढ करण्यासाठी विविध उपक्रम हाती  घेण्यात आले आहेत, ज्यामुळे पीएनजी च्या जोडण्यांमधे लक्षणीय वाढ दिसून आली आहे. सरकार, उद्योगधंद्यांमध्ये देखील विविध उपाययोजनांद्वारा द्रवीभूत पेट्रोलियम वायु अर्थात एलपीजी वायु ऐवजी नैसर्गिक वायुचा वापर करण्याला प्रोत्साहन देत आहे. यात, नॅशनल गॅस ग्रिड’चा विस्तार, LNGच्या आयातीत वाढ  आणि पुनर्वायूकरणाच्या (regasification)  पायाभूत सुविधांची क्षमता वाढवणे, ‘शहरी गॅस वितरणाची’ व्याप्ती आणि जाळ्याचा विस्तार आणि ‘पाईपलाईन पायाभूत सुविधा आदेश, 2026’ अंतर्गत पाईपलाईन आणि शेवटच्या टोकापर्यंत कनेक्टिव्हिटीला  विहित मुदतीत मंजुरीसाठी एलपीजीच्या औद्योगिक पर्यायाला प्रोत्साहन यांसारख्या उपाययोजनांचा समावेश आहे.

या बैठकीत, आगामी रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या खतांच्या गरजेचा आढावा घेण्यात आला, त्याचबरोबर खतांच्या पर्यायी स्रोतांबाबतही चर्चा करण्यात आली. खतांचा पुरवठा अव्याहतपणे सुरू राहील याची खात्री करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले.

संघर्षग्रस्त क्षेत्रांत, देशी तसेच परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवर काम करणाऱ्या खलाशांच्या परिस्थितीवरदेखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. या जहाजांवरील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना वेळेवर माहिती, आपत्कालीन मदत आणि समुपदेशन उपलब्ध करून देण्यासाठी एक यंत्रणा उभारण्याचे निर्देशही पंतप्रधानांनी दिले.

या संघर्षाच्या परिणामांपासून देशातील नागरिकांचे तसेच परदेशातील भारतीय समुदायाचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी होण्यासाठी, सौर ऊर्जा आणि अन्य बिगर-जीवाश्मआधारित  इंधन स्रोतांसारख्या नविकरणीय ऊर्जा स्रोतांवर भर दिला गेला पाहिजे, असं पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, या संकटामुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी संपूर्ण सरकारी दृष्टीकोन कायम ठेवण्याची गरज आहे. नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी, कराव्या लागणाऱ्या योग्य उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने  या सर्व घडामोडींवर नियमित देखरेख ठेवेल अशी एक एकीकृत आणि समन्वित यंत्रणा स्थापन केली जावी, असे त्यांनी नमूद केले.

सुषमा काणे/सविता म्हसकर/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai