Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनाप्रसंगी पंतप्रधानांच्या संबोधनाचा मूळ मजकूर

PM's speech during release of former President Shri Ram Nath Kovind's autobiography


आपले माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद जी, लोकसभेचे सभापती आदरणीय ओम बिर्ला, श्रीमती सविता कोविंद, सभागृहात उपस्थित सर्व ज्येष्ठ मान्यवर, सर्वांचा उल्लेख करता येणार नाही; मात्र माझ्यासाठी हा कार्यक्रम एका कौटुंबिक कार्यक्रमासारखा वाटत असल्याने मला खूप आनंद होत आहे.

बंधू-भगिनींनो,

आज आपल्याला रामनाथ कोविंद जी यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्याची संधी मिळाली आहे. मला आनंद आहे की, या कार्यक्रमाचा भाग होण्याचे सौभाग्य मलाही मिळाले. कोविंद जी यांच्याशी माझा खूप जुना परिचय आहे. त्यांना जवळून जाणून घेण्याची संधी मला मिळाली. राष्ट्रपती म्हणून त्यांचे मार्गदर्शन आणि त्यासोबतच माझ्याप्रती त्यांचे विशेष स्नेह व आत्मीयता ही माझ्यासाठी खूप मोठी संपत्ती राहिली आहे. त्यांच्या जीवनाचा मी जितका अभ्यास केला आहे आणि त्यांच्या कार्यक्षमतेला जितके जाणून घेतले आहे, त्यावरून मी पूर्ण विश्वासाने सांगू शकतो की, रामनाथ कोविंद जी यांचे आत्मचरित्र हे भारतीय लोकशाही आणि भारतीय समाजासाठी स्वतःमध्येच एक अमूल्य ठेवा ठरेल. कोविंद जी यांचा जीवनप्रवास, समाज आणि राष्ट्रासाठी त्यांचे योगदान, असे अनेक विषय आहेत ज्यावर मी सविस्तर बोलू शकतो. मात्र पुस्तक प्रकाशनाच्या वेळी केवळ ‘कर्टन रेझर’ एवढेच असावे. आपण सर्वांनी हे पुस्तक पूर्णपणे वाचून त्याचा लाभ घ्यावा, हेच अधिक चांगले.

मित्रांनो,

कोविंद जी यांचा जीवनप्रवास त्यांच्या शब्दांतून जाणून घ्या. त्यांचे लेखन आणि त्यांचे अनुभव देशातील नव्या पिढीने वाचले, तर प्रत्येकाला त्यातून बरेच काही शिकायला मिळेल. मी रामनाथ कोविंद जी यांचे या आत्मचरित्रासाठी मनःपूर्वक अभिनंदन करतो.

मित्रांनो,

कोविंद जी यांनी आपल्या या पुस्तकाला अतिशय समर्पक नाव दिले आहे—“Triumph of the Indian Republic: My Life, My Struggles”. याचा भाव असा आहे की, जीवन आणि जीवनातील संघर्ष हे त्यांचे वैयक्तिक आहेत; मात्र त्या संघर्षांतून मिळालेला विजय हा भारताच्या गणराज्याचा आणि भारताच्या लोकशाहीचा आहे.

मित्रांनो,

आपण सर्वजण अनेकदा अनुभवतो की, माणसाचा एक स्वभाव असतो. लोक आपल्या यशाचे श्रेय स्वतःला देतात आणि जीवनातील अडचणी, संकटे यासाठी समाजाला जबाबदार धरतात. मात्र, जेव्हा हृदय उदार असते आणि भारतीय संस्कार असतात, तेव्हा व्यक्ती समाजातील उणिवा शोधण्यात वेळ वाया घालवत नाही, तर समाजाच्या सकारात्मक बाजूवर लक्ष केंद्रित करते. ती आपल्या यशामध्ये समाजाला समान भागीदार मानते. कोविंद जी यांचे आत्मचरित्र आणि त्याचे शीर्षक याचे उत्तम उदाहरण आहेत. आपण त्यांचे जीवन पाहा. कानपूर देहातमधील एका अत्यंत सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कोविंद जी यांनी नुकतेच काही वर्णन केले आणि आपल्या पुस्तकातही लिहिले आहे की, उन्हाळ्याच्या दिवसांत एकदा त्यांच्या घराला आग लागली. त्यांच्या मातोश्री स्वतःची चिंता न करता घरातील वस्तू वाचवत होत्या. शेवटी, एका सामान्य कुटुंबात आईसाठी प्रत्येक वस्तू ही मुलांच्या पालनपोषणाचे साधन असते. त्याच प्रयत्नात आगीत अडकून त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. आपण कल्पना करू शकता, लहान वयात अशी घटना घडणे, आईला अशा प्रकारे गमावणे, हे किती वेदनादायक ठरले असेल. मी स्वतः भाग्यवान आहे की, माझी आई 100 वर्षांहून अधिक काळ जिवंत राहिली आणि मला आशीर्वाद देत राहिली. तरीसुद्धा, आजही मला आईची उणीव जाणवते.

मित्रांनो,

त्यांच्या जीवनातील हा एक अत्यंत वेदनादायक प्रसंग होता. यामुळे कोणीही खचून जाऊ शकले असते. मात्र, या अडचणींनी कोविंद जी यांना अधिक बळकट केले. शेजारी राहणाऱ्या एका माताजींनी त्यांच्या पालनपोषणात मदत केली. यातून त्यांना समाजातील एकता आणि सौहार्दाच्या शक्तीची जाणीव झाली.

या घटनेनंतर कोविंद जी यांच्या जीवनात त्यांच्या वडिलांची भूमिका आणखी महत्त्वाची झाली. त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळली आणि मुलांना संस्कार दिले, त्यामुळेच कोविंद जी आपल्या वडिलांना आपला नायक मानतात.

मित्रांनो,

बालपणीच्या या संघर्षांमध्ये कोविंद जी यांनी शिक्षणाला आपले सामर्थ्य वाढवण्याचा मार्ग बनवले. त्यांनी मेहनत केली आणि संसाधनांची कमतरता ही आपली कमजोरी होऊ दिली नाही. आणि अशा उंचीवर पोहोचले, ज्याची त्या काळी लोकांनी कल्पनाही केली नव्हती. ते भारतासारख्या विशाल देशाचे राष्ट्रपती झाले.

मित्रांनो,

एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्यानंतरही कोविंद जी यांचे विनम्र व्यक्तिमत्त्व आणि त्यांची साधेपणाची वृत्ती कायम राहिली. मला आठवते, पंतप्रधान म्हणून मी राष्ट्रपती भवनात त्यांना भेटायला जायचो. प्रोटोकॉलनुसार ज्या गोष्टी करता येत नाहीत, त्या गोष्टी ते करायचे. ते पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी गाडीच्या दरवाजापर्यंत यायचे. सुरुवातीला मी त्यांना वारंवार विनंती करायचो, “कृपया आपण असे करू नका”, पण त्यांनी अखेरपर्यंत आपल्या त्या विनम्रतेचा कधीही त्याग केला नाही. राष्ट्रपती झाल्यानंतर जेव्हा ते आपल्या परौंख या गावात गेले, तेव्हा त्यांनी तेथे आपल्या गुरूंच्या चरणांना स्पर्श करून त्यांना प्रणाम केला. गावच्या मातीला नमन करून त्यांनी गावातील सामान्य जनतेचे आभार मानले. संपूर्ण देशाने ते भावूक दृश्य पाहिले होते. त्यांच्या या आचरणातून जगासमोर भारतीय संस्कारांचे असे चित्र उभे राहिले, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो.

मित्रांनो,

शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या काळात आपल्या देशाने आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या बरेच काही गमावले होते. आपल्या पूर्वजांनी शतकानुशतके संघर्ष केला. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले अशा अनेक महान विभूतींनी भारताच्या नवनिर्माणाचे स्वप्न पाहिले होते. असा भारत, जिथे गरीबातील गरीब आणि वंचितातील वंचित व्यक्तीलाही शिखरावर पोहोचण्याची संधी मिळू शकेल. कोविंद जी यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांनी आपल्या कष्टाने आणि क्षमतेने केवळ स्वतःचे जीवन बदलले असे नाही, तर शतकानुशतके पाहिले गेलेले ते स्वप्न आणि तो दृष्टिकोन साकार करण्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आणि या दिशेने आपले सर्वांचे प्रयत्न आजही सुरू आहेत. आपल्याला भविष्यात कोविंद जी यांच्यासारखे अनेक युवक हवे आहेत, जे परिस्थितीसमोर पराभूत होणार नाहीत, अडचणींसमोर निराश होणार नाहीत, तर आपल्या मेहनतीने प्रत्येक ध्येयाचा मार्ग सुकर करण्याचे धैर्य बाळगतील. याच परिवर्तनातून सशक्त भारताच्या निर्मितीचा संकल्प पूर्ण होईल. याच मार्गाने आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा मार्ग प्रशस्त होईल.

मित्रांनो,

अशा युवाशक्तीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली प्रेरणा देण्याचे काम कोविंद जी यांचे आत्मचरित्र एक महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून करू शकते.

मित्रांनो,

कोविंद जी यांनी आपल्या आत्मचरित्रात मोरारजी भाई देसाई यांच्यासोबतच्या अनुभवांबद्दलही सविस्तर सांगितले आहे. कोविंद जी यांच्या मनात देशसेवेची जी भावना होती, मोरारजी भाईंसोबत काम करताना त्यांना जे शिकायला मिळाले, जो मार्ग मिळाला, त्यातून त्यांनी राजकारण आणि समाजसेवा हा आपला मार्ग निवडला. ते आपल्या कर्तव्यांप्रती समर्पित राहिले. सेवेला आपले ध्येय मानून त्यांनी कार्य केले. संसदेमधील त्यांचा कार्यकाळ याचा साक्षीदार आहे. राज्यपाल म्हणूनही त्यांनी एक आदर्श निर्माण केला. राष्ट्रपती म्हणूनही त्यांची हीच कर्तव्यनिष्ठा आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली. इतकेच नव्हे, तर राष्ट्रपतींसारख्या सर्वोच्च पदावरून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी विश्रांती घेतलेली नाही. ते आजही ‘एक देश, एक निवडणूक’ यांसारख्या महत्त्वाच्या विषयावर काम करत आहेत. देशाला जागृत करत आहेत. हा असा विषय आहे, ज्याचे समाधान देशाच्या लोकशाहीचा एक नवा अध्याय सुरू करू शकते. माझ्या मते, कोविंद जी यांच्या या कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभावातून देशातील लोकांना बरेच काही शिकता येईल.

मित्रांनो,

सामाजिक जीवनात सक्रिय असताना आत्मचरित्रासाठी वेळ काढणे खूप कठीण असते. कोविंद जी यांनी हे काम आपल्या सर्वांसाठी केले आहे. कारण त्यांच्या जीवनात असे बरेच काही आहे, ज्यामध्ये गरीब आणि वंचित वर्गातून आलेले अनेक लोक आपल्या जीवनाचे प्रतिबिंब पाहू शकतात.

एक सामान्य कुटुंब कठीण परिस्थितीतही जीवनातील शुचिता आणि प्रामाणिकपणाशी कशाप्रकारे तडजोड करत नाही, तेच आदर्श पुढे जाऊन आपल्या जीवनाचा आधार कसे बनतात, कठीण काळातील मूल्ये आयुष्यभर आपल्याला कशा प्रकारे प्रकाश देतात आणि या पावित्र्यातून आपल्याला राष्ट्रसेवेची शक्ती कशी मिळते—या सर्वांची प्रेरणा कोविंद जी यांनी विविध पदांची जबाबदारी सांभाळताना समाजाला सातत्याने दिली आहे.

साथींनो,

मला विश्वास आहे की, कोविंद जी यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या जीवनातीलच नव्हे, तर आपल्या लोकशाहीतीलही अनेक महत्त्वपूर्ण आठवणी सुरक्षित राहतील. मी पुन्हा एकदा त्यांच्या आत्मचरित्रासाठी त्यांना शुभेच्छा देतो. आणि विशेषतः युवा पिढीला मी आग्रह करू इच्छितो—आज रील्सचा जमाना आहे, सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्स आपल्याला खेचून कुठे-कुठे घेऊन जातात. या शॉर्टकटच्या युगातही आपण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे. रेल्वे स्थानकांवर लिहिलेले असते तरीही, काही लोकांना रेल्वे रुळांवरून उडी मारून जाण्याची सवय असते, ते पुलाचा वापर करत नाहीत. तिथे लिहिलेले असते, शॉर्टकट विल कट यू शॉर्ट. आणि जर शॉर्टकटच्या मार्गानेही कुठेतरी पुढे जायचे असेल, तर मी युवकांना सांगू इच्छितो की, तुम्हाला ज्याचे आवडते त्याचे आत्मचरित्र नक्की वाचा. आत्मचरित्र आपल्याला त्या कालखंडातील ऐतिहासिक घटनांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी देते. आत्मचरित्राचा कालखंड हा इतिहासाच्या अगदी जवळचा असतो. आणि म्हणूनच, कोविंद यांनी घेतलेले हे कष्ट येणाऱ्या पिढ्यांच्या आणि विशेषतः युवा पिढीच्या उपयोगी पडावेत, अशी माझी मनापासून इच्छा आहे.

खूप-खूप शुभेच्छा.

खूप-खूप धन्यवाद.