पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2026
माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार.
मन की बात च्या आजच्या नवीन भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण जाणताच की हे एक असं व्यासपीठ आहे जिथं नेहमी नवनवीन उपक्रमांवर प्रकाश टाकला जातो आणि देशवासियांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांवर चर्चा केली जाते. या नवनवीन कल्पना तुम्हा सर्वांच्या अथक उर्जेतून आणि समर्पणातूनच निर्माण होत असतात.
मित्रांनो काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने सामाजिक माध्यमांवर लिहिलं होतं की “आषाढी एकादशीच्या शुभप्रसंगी, इतिहास रंजक बनवण्यासाठी एका उपक्रमाची सुरूवात करताना मला आनंद होत आहे”.त्याने पुढे स्पष्ट केले की, ही कल्पना अतिशय सोपी आहे. तुम्ही त्या वेबसाईटला भेट द्यायची आणि कोणतेही एक वर्ष निवडायचं. तुम्हाला सहजपणे समजेल की, त्या काळात भारताच्या विविध भागांवर कोणत्या राज्यकर्त्याचे वर्चस्व होते. मलाही ही गोष्ट खूप रंजक वाटली आणि त्याविषयी अधिक माहिती गोळा करण्याचे मी ठरवले. मला असं समजलं की, हे काम मुंबईत राहणाऱ्या श्री. कृष्ण शेषाद्री यांनी केलं आहे. विशेष म्हणजे, कृष्णजींनी या वेबसाईटसाठी www.bhartrajya.com असं अत्यंत सोपं नाव निवडलं आहे. त्यांनी घेतलेल्या मेहनतीची माहिती तुमच्या सर्वांपर्यंत नक्कीच पोहचायला हवी, म्हणूनच मला वाटलं की आपण थेट श्री कृष्णजींशीच संवाद साधावा.
मित्रांनो, कृष्णजी आपल्याशी फोनवरून जोडले गेले आहेत.
प्रधानमंत्री – नमस्कार, कृष्णजी.
कृष्ण शेषाद्री – नमस्कार, सर. नमस्कार.
प्रधानमंत्री – भाऊ (भाई) मला समजलं आहे की, तुमचा तंत्रज्ञान क्षेत्राशी काहीही संबध नाही किंवा तुम्ही इतिहासाचे शिक्षकही नाही आहात, तरीही तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून इतिहासाला समर्पित अशी एक वेबसाईट तयार केली आहे. मला खूप उत्सुकता आहे -हे सर्व कसं घडलं?
कृष्ण शेषाद्री – धन्यवाद सर, आपल्याशी संवाद साधायला मिळाला ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची घटना आहे. माझ्याबद्दल सांगायचे तर, मी सुरूवातीला अभियंता(इंजिनिअर) म्हणून काम केलं त्यानतंर एमबीए(MBA) केलं आणि त्यानंतर मार्केटिंगच्या क्षेत्रात उतरलो. मात्र या सर्व प्रवासामध्ये माझी इतिहासातील रूची कायम होती; मला लहानपणापासूनच या विषयाचं आकर्षण वाटत आलं आहे. मला नेहमीच इतिहासाशी संबधित काहीतरी करायचं होतं. विशेषत: इतिहास अधिक रंजक आणि आकर्षक कसा करता येईल यावर काम करण्याची माझी खूप इच्छा होती. त्याबरोबरच इतिहास शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा आणि बदलांना भरपूर वाव आहे, असंही मला वाटत होतं. त्यामुळे लोकांपर्यंत इतिहास प्रभावीपणे पोहचण्यासाठी आपण इतिहास गोष्टींच्या स्वरूपात मांडू शकतो, असा माझा विश्वास होता.
प्रधानमंत्री : कृष्णजी, भारतीय इतिहासातला कोणता पैलू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा असे तुम्हाला वाटते? आणि ज्याबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांना व्हावी असे तुम्हाला वाटते?
कृष्ण शेषाद्री: सर आपल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भारतीय इतिहास ज्या प्रकारे शिकवला जातो यावरून तुमच्याही लक्षात आलं असेलच की तो अनेकदा एखाद्या विशिष्ट साम्राज्याच्या किंवा राज्याच्या दृष्टिकोनातून मांडला जातो आणि अशा साम्राज्यांवरच प्रमाणाबाहेर भर दिला जातो. या प्रक्रियेत आपण इतर महान साम्राज्यांबद्दल अनभिज्ञ राहिलो आहोत- जसे की चोल, पल्लव, काश्मीरचे कारकोटा घराणे आणि अहोम ज्यांनी आसाममध्ये किमान 600 वर्षे आपली संस्कृती आणि मूल्यव्यवस्था जपली. याकरिताच लोकांना या भव्य साम्राज्याची ओळख करून देण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करण्याचा विचार मी केला.
प्रधानमंत्री : कृष्णजी, आपण खूप कठोर परिश्रम करत आहात. मी तुम्हाला एक काल्पनिक प्रश्न विचारतो. जर तुम्हाला भारतीय इतिहासातल्या कोणत्याही तीन व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी मिळाली, तर तुम्ही कोणाची निवड कराल आण का?
कृष्ण शेषाद्री: हो सर, सर्वप्रथम मला राजाराजा चोल किंवा राजेद्र चोल- जे चोल साम्राज्यातील अत्यंत शक्तिशाली आणि महत्वपूर्ण राजे होते. त्यांच्याशी संवाद साधायला आवडेल. बृहदीश्वर मंदिर किंवा गंगैकोंड चौलपूरम यांसारखी भव्य शिवमंदिरे उभारण्याची दूरदृष्टी त्यांना कशी सुचली हे मला समजून घ्यायचे आहे. याबाबतची कल्पना कशी सुचली, त्याचे नियोजन कसे केले आणि पुढील एक-दोन हजार वर्षांपर्यंत लोकांना प्रेरणा देत राहील अशी निर्मिती करण्याचा विचार त्यांना कशामुळे सुचला हे मला जाणून घ्यायचे आहे. त्यांच्याकडून मला हेच शिकायचे आहे.
दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे हेमू- ज्यांच्याकडे माझ्या मते भारतीय इतिहासात खूप कमी लभ दिलं गेलं आहे. भारतीय इतिहासाच्या पुस्कांमध्ये आपण त्यांच्याबद्दल सहसा दोन-तीन ओळींपेक्षा काही वाचत नाही. हेमू हे एक सामान्य माणूस-एक सामान्य नागरिक आणि व्यापारी होते. त्यांनी पुढे जाऊन एक साम्राज्य उभारले, या घटनांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. ते केवळ साम्राज्य निर्मातेच नव्हते, तर एक लष्करी विचारवंत आणि प्रतिभावान व्यक्तीही होते; त्यांनी आपल्या कारकिर्दीत २३ युद्धे लढली आणि त्यापैकी २२ जिंकली. त्यांची विचारप्रक्रिया आणि एका सामान्य माणसापासून अशा महान राजापर्यंतचा त्यांचा प्रवास समजून घेण्यात मला विशेष रस आहे.
आणि तिसरी व्यक्ती—एक अत्यंत रंजक व्यक्तिमत्त्व—म्हणजे त्रिभुवन महादेवी नावाची स्त्री. त्या ओदिशामधल्या भौमकर घराण्यातल्या होत्या आणि त्यांची कथाही अतिशय वेधक आहे. साधारणपणे इसवी सन 850 च्या सुमारास, शेजारील पाल साम्राज्याने त्यांच्या राज्यावर आक्रमण केले आणि त्या युद्धात त्यांचे पती—जे राजा होते—वीरगतीला प्राप्त झाले. परिणामी, साम्राज्याच्या विस्तारावर याचा परिणाम झाला. त्यांचे सरदार आणि नेते त्यांना सोडून जाऊ लागले होते, अशा कठीण परिस्थितीत त्रिभुवन महादेवींनी प्रशासनाची धुरा आपल्या हाती घेतली. त्या भारतातल्या पहिल्या स्वतंत्र महिला राज्यकर्त्यांपैकी एक ठरल्या. त्यांनी केवळ सरकारला स्थैर्यच दिले नाही, तर पुढील शंभर वर्षे कलिंग आणि आसपासच्या प्रदेशावर आपली सत्ता टिकवून ठेवण्याइतपत त्याला सामर्थ्यवानही बनवले. तर सर, अशा या तीन रंजक ऐतिहासिक व्यक्ती आहेत ज्यांना मला भेटायला आवडेल.
प्रधानमंत्री : कृष्ण-जी, असे वाटते की तुम्ही जणू एक ‘जिवंत इतिहास’ बनले असून त्यात पूर्णपणे तल्लीन झाला आहात. मी आपली वेबसाइट अतिशय उत्सुकतेने पाहिली आणि मला त्यात सर्वात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे तो ‘टॅब’ (विभाग), ज्याद्वारे लोक या वेबसाईटवर सुधारणा आणि सूचना पाठवू शकतात. अशा विधायक प्रतिक्रियांचे स्वागत करण्याची तयारी असणे, हीच मुळात एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपल्याला लोकांकडून सूचना मिळण्यास सुरुवात झाली आहे का? आणि आपण त्यावर कशा प्रकारे कार्यवाही करता?
कृष्ण शेषाद्री: हो सर, आम्हांला लोकांकडून अनेक सूचना मिळतात. या सूचनांचे साधारणपणे दोन प्रकार पडतात. एका प्रकारात सुधारणांचा समावेश असतो—उदाहरणार्थ, एखाद्या विशिष्ट काळात एका विशिष्ट राजाने विशिष्ट प्रदेशावर राज्य केले होते किंवा एखादी विशिष्ट लढाई विशिष्ट वेळी झाली होती, यांसारख्या गोष्टी निदर्शनास आणून देणे. दुसऱ्या प्रकारात वेबसाइटवर नवीन वैशिष्ट्ये (features) जोडण्याबाबतच्या सूचनांचा समावेश असतो. आम्हाला अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत असतात, त्यामुळे, जेव्हा आम्हाला एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट राजाने विशिष्ट प्रदेशावर राज्य केल्याबाबतची सूचना मिळते, तेव्हा आम्ही ती माहिती घेऊन आमच्याकडील स्रोतांशी (sources) तिची पडताळणी करतो. उदाहरणार्थ,आम्हाला एक अशी सूचना मिळाली की, आम्ही भारतासाठी जी माहिती प्रदर्शित केली होती, ती राज्यांच्या पातळीवरही दर्शवणे अधिक चांगलं ठरेल, म्हणूनच आम्ही ती सुविधा लगेच अंमलात आणली. तसंच मुलांसाठी ही माहिती अधिक आकर्षक वाटावी, या उद्देशाने आम्ही सर्व राज्यांची सांख्यिकीय माहिती ट्रम्प कार्ड च्या स्वरूपात सादर करणारी आणखी एक सुविधा सुरू केली. त्यानंतर ही सर्व माहिती एकाच ठिकाणी एकत्रित केली जेणेकरून ती कोणालाही डाऊनलोड आणि शेअर करता येईल अशी सूचना करण्यात आली, सध्या आम्ही या सुविधेवर काम करत आहोत.
आपण सगळेच परिपूर्ण नसल्यामुळे आपल्याकडून चुका होऊ शकतात, हे मान्य करणे महत्त्वाचे आहे; आणि म्हणूनच आम्ही यात ‘दुरुस्ती’ची (correction) सुविधा समाविष्ट केली आहे. आम्हाला ही साइट सर्वांच्या उपयोगाची असावी असे वाटते; काळाच्या ओघात लोकांचे योगदान सामावून घेऊन आम्हाला असे एक व्यासपीठ उभारायचे आहे जे इतिहासाला पुढील अनेक वर्षांसाठी एक रंजक विषय बनवेल.
प्रधानमंत्री : कृष्णजी आपण खरंच एक उल्लेखनीय काम केलं आहे. इतिहासाव्यतिरिक्त आपल्याला नक्कीच अनेक छंद असतील, आपण आणखी काय करता ?
कृष्ण शेषाद्री : नाही सर, मी तसा थोडा कंटाळवाणा माणूस आहे.
प्रधानमंत्री : (हसतात)
कृष्ण शेषाद्री : मला तंत्रज्ञान आणि इतिहासामध्ये खूप रस आहे, आणि जेव्हापासून या दोन विषयांची सांगड घातलेल्या उपक्रमावर मी काम करत असल्यामुळे दिवसभर त्यातच पूर्णपणे मग्न असतो.
प्रधानमंत्री : ठीक आहे, कृष्णजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही अतिशय चांगली सुरूवात केली असून मला खात्री आहे की तुमचा हा दृष्टीकोन लोकांना नक्कीच भावेल व त्यांना आकर्षित करेल. तुम्हाला माझ्या शुभेच्छा.
मित्रांनो, कृष्णजींचा हा उपक्रम केवळ इतिहासाच्या विद्यार्थ्यांनाच नव्हे तर आपल्या सर्वांनाच भूतकाळाबद्दल रंजक पद्धतीने जाणून घ्यायला मदत करेल. तुमच्याकडेही अशा उपक्रमांविषयी काही माहिती असल्यास कृपया नक्की शेअर करा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘विकसित भारतासाठी अमली पदार्थ मुक्त युवा’ ही मोहीम सध्या संपूर्ण देशभरात राबवली जात आहे. या उपक्रमाचं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे. ‘अमली पदार्थमुक्त युवा पिढी आणि अमली पदार्थमुक्त भारत’. या मोहीमेत मोठ्या संख्येने देशाची युवा पिढी सहभागी होत आहे. हा उपक्रम भारताच्या तरूणांच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि उज्जवल भविष्यासाठीचा सामूहिक संकल्प आहे.
मित्रांनो अंमली पदार्थाचे व्यसन केवळ त्या व्यक्तीलाच उद्ध्वस्त करत नाही तर त्या व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब आणि समाजालाही परिणाम भोगावे लागतात.
अंमली पदार्थांविरुद्ध जनजागृती करणाऱ्या आणि व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचे मी कौतुक करू इच्छितो.
‘अंमली पदार्थ-मुक्त भारता’साठी तुम्ही एखादे प्रभावी घोषवाक्य सुचवू शकाल का? आपले तरुण संगीतकार अंमली पदार्थ-मुक्त जीवनाचा संदेश देणारी गाणी तयार करू शकतील का? विद्यार्थी आणि नाट्यसमूह अशी हृदयस्पर्शी लघुनाटके लिहू शकतील का, ज्यातून अंमली पदार्थांचे धोके अधोरेखित केले जातील आणि त्याचबरोबर व्यसनावर मात करण्याचा मार्गही दाखवतील? आपल्या देशात उत्कृष्ट आशयनिर्मिती करणाऱ्यांची (content creators) कमतरता नाही. मी त्यांना आवाहन करतो की, त्यांनी विविध भाषांमध्ये असा आशय तयार करावा ज्यामुळे समाजाला मदत होईल. तुमचे हे प्रयत्न योग्य हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर नक्की शेअर करा; कारण अनेकदा औपचारिक मोहिमांपेक्षा अशा सर्जनशील प्रयत्नांचा प्रभाव अधिक पडतो. भारताच्या तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी जाण्यापासून आणि व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्याच्या या उदात्त कार्यात आपण सर्वजण आपले योगदान देऊया.
कृपया #NashaMuktYuva हा हॅशटॅग वापरून तुमचे प्रयत्न सोशल मीडियावर शेअर करा.
माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला आपल्या सभोवताली देशभक्तीचे विविध पैलू पाहायला मिळतात. या काळात प्रत्येकाच्या हृदयात देशभक्तीची भावना अधिकच दृढ होत असते. ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ आणि ‘भारत छोडो आंदोलना’च्या स्मृतिदिनापासून ते ‘फाळणीच्या भीषणतेची आठवण सांगणारा दिवस’ (Partition Horrors Remembrance Day) अशा विविध प्रसंगांमुळे हा महिना विशेष ठरला आहे. ‘स्वातंत्र्य दिन’ आणि ‘राष्ट्रीय अंतराळ दिन’ प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतात. ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम या भावनेला अजून बळकट करते. हे वर्ष आणखी एका कारणास्तव अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहे, कारण या वर्षी ‘वंदे मातरम्’ला 150 वर्षे पूर्ण होत आहेत.
यावेळी 8 कोटींहून अधिक ‘तिरंगा सेल्फी’ अपलोड करण्यात आले आणि तिरंग्याचा हा उत्सव केवळ भारतापुरता मर्यादित राहिला नाही; तर यावर्षी ‘सूर्यपथ तिरंगा’ उपक्रमाद्वारे आपल्या तिरंग्याने जगभरात एक अनोखा प्रवास केला. फिजीमधील सुवा इथं सूर्याच्या पहिल्या किरणांसोबत तिरंगा फडकवण्यात आला. त्यानंतर आशिया, आफ्रिका आणि युरोपमधल्या भारतीय दूतावास आणि कार्यालयांमध्ये तो फडकवण्यात आला आणि अखेरीस तो अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोपर्यंत पोहोचला. अशाच प्रयत्नांमुळे समाज एकत्र येत असतो. तसेच, यामुळे देशाशी असलेले आपले नातेही अधिक दृढ होते. या प्रयत्नांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, शहरांपासून ते गावांतील रस्त्यांवर रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाखो महिला आपापल्या कामात व्यग्र असतात. काही जणी भाजीपाला विकतात, काही फळे, काही चहाचे स्टॉल लावतात, तर काही जणी फुले, दिवे आणि पूजेचे साहित्य विकतात. अनेकदा, केवळ भांडवलाच्या अभावामुळे त्यांचा व्यवसाय भरभराटीला येत नाही. पण आता, पीएम स्वनिधी योजना अशा लाखो महिलांना नवी शक्ती देत आहे. महिला सक्षमीकरणाच्या या पैलूवर जितकी चर्चा व्हायला हवी तितकी होत नाही. पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांपैकी जवळपास 46 टक्के महिला आहेत. याचा अर्थ, देशभरातील अंदाजे 35 लाख महिला या योजनेत सामील होत आहेत आणि आपला व्यवसाय वाढवत आहेत.
मित्रांनो, गाझियाबादची बबिता शर्मा हे याचे उत्तम उदाहरण आहे. बबिता पूजेचे साहित्य विकण्याचा एक छोटा स्टॉल चालवत असे. फुले, दिवे, अगरबत्ती आणि नारळ यांसारख्या वस्तू विकून ती आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावत असे. तिने खूप मेहनत केली, पण तिचा व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवलाची गरज होती. तिला पीएम स्वनिधी योजनेतून आर्थिक मदत मिळाली. तिने आपल्या स्टॉलवरील मालाचा साठा वाढवला आणि व्यवसाय वाढवला. ग्राहक वाढले, उत्पन्न वाढले आणि हळूहळू तिच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या स्टॉलचे एका दुकानात रूपांतर झाले.
मित्रांनो, बंगळूरुच्या टी. एस. निंगम्मा यांचे उदाहरणही खूप प्रेरणादायी आहे. निंगम्मा आणि त्यांच्या पतीने इडली, डोसा आणि सांबार विकण्याचा एक छोटा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय यशस्वी झाला, पण त्यांना विस्तारासाठी भांडवलाची गरज होती. निंगम्मा यांनाही पीएम स्वनिधी योजनेतून मदत मिळाली. त्यांनी आपल्या गाडीची सुधारणा केली. मोठ्या प्रमाणात माल खरेदी करण्यास सुरुवात केली आणि मेन्यूमध्ये अनेक नवीन पदार्थांचा समावेश केला. ग्राहक वाढले, उत्पन्न वाढले आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारली. आज त्या आपल्या तीन मुलांना चांगले शिक्षण देऊ शकत आहेत.
मित्रांनो, जेव्हा एखाद्या स्त्रीचा व्यवसाय वाढतो, तेव्हा तिच्या संपूर्ण कुटुंबाचे भविष्यही त्यासोबत प्रगती करते. मुलांचे शिक्षण सुधारते, घरातील गरजा पूर्ण होतात आणि स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो. हे महिला सक्षमीकरणाचे एक जिवंत उदाहरण आहे. रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या सर्व भगिनींना मी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वच्छतेमध्ये एक मोठा सद्गुण आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणचे लोक ते ठिकाण स्वच्छ ठेवण्याचा संकल्प करतात, तेव्हा होणारा बदल केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित राहत नाही. तो त्या जागेची संपूर्ण ओळखच बदलून टाकतो. देशाच्या विविध भागांतील स्वच्छतेसाठीचे असे प्रयत्न आम्हाला सतत प्रेरणा देत राहतात. पटवाई हे उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील एक गाव आहे. तिथे आकाश आणि रोहन नावाच्या दोन मित्रांच्या लक्षात आले की त्यांच्या आजूबाजूचा परिसर घाणीने भरलेला आहे. मग, आकाश आणि रोहनने कचऱ्याच्या पिशव्या उचलल्या आणि साफसफाईसाठी निघाले. हळूहळू, इतर तरुणही त्यांच्यात सामील होऊ लागले. क्लीन-अप पटवाई नावाचा एक गट तयार झाला. या तरुणांनी आतापर्यंत गंगेचे चार घाट स्वच्छ केले आहेत आणि एक टनाहून अधिक प्लास्टिक कचरा त्यांनी हटवला आहे. त्यांनी असंख्य तलाव आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ केली आहेत.
मित्रांनो, यावर्षी श्री अमरनाथ यात्रेदरम्यान, स्वच्छता आणि सार्वजनिक सहभागाचे असेच एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. हजारो स्वच्छता कर्मचाऱ्यांनी खडतर मार्गांवर रात्रंदिवस सेवा बजावली. या वर्षीच्या यात्रेदरम्यान 400 मेट्रिक टनांहून अधिक कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. या प्रयत्नातील एका गोष्टीचे मला विशेष कौतुक वाटले: या स्वच्छता मोहिमेत भाविकांनीही सहभाग घेतला. 16,000 हून अधिक यात्रेकरूंनी स्वच्छता राखण्याची शपथ घेतली. 10,000 हून अधिक यात्रेकरूंना जबाबदार यात्री प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. येथे एक अनोखा प्रयोगही करण्यात आला. यात्रेदरम्यान घोडे आणि खेचरांच्या शेणाचा बायोगॅसमध्ये रूपांतर करण्यात आले आणि त्या स्वच्छ ऊर्जेने स्वच्छ ज्योत प्रज्वलित करण्यात आली. अशाप्रकारे, बाबा बर्फानींच्या या पवित्र यात्रेदरम्यान, स्वच्छता ही सेवा आणि श्रद्धेचे एक रूप बनली.
मित्रांनो, आपली गावे असोत वा शहरे, आपल्या नद्या असोत वा तीर्थक्षेत्रे, त्यांची ओळख आपल्या वागणुकीनेही घडते. आणि जेव्हा या वागणुकीत स्वच्छतेचा समावेश होतो, तेव्हा त्या ठिकाणाचे सौंदर्य अधिकच वाढते. माझ्या प्रिय देशवासियांनो, कधीकधी एक छोटा छंद जीवनातील मोठ्या संधींचे दरवाजे उघडतो. नागालँडच्या फेक जिल्ह्यातील वेसालू पुरो यांचा प्रवासही असाच आहे. वेसालू एका शेतकरी कुटुंबात वाढल्या. लहानपणापासूनच त्यांनी आपल्या आई-वडिलांना शेती करताना पाहिले होते आणि त्यांना फुलांबद्दल खूप प्रेम होते. 2021 मध्ये, हा छंद जोपासत त्यांनी लहान प्रमाणावर फुलांची लागवड करण्यास सुरुवात केली. हळूहळू, त्यांना त्यात क्षमता दिसू लागली. त्यांच्या लक्षात आले की, लग्नसमारंभ असो वा इतर सण, फुलांना नेहमीच मागणी असते. वेसालू यांनी हा छंद जोपासण्याचा निर्णय घेतला. या प्रवासात, त्यांनी स्थानिक कृषी विज्ञान केंद्रातून शास्त्रीय पद्धतीने फुलशेतीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी केवळ पाव एकर जमिनीवर हजारो ग्लॅडिओलसची रोपे लावली. त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात 5,000 हून अधिक फुले उमलली. मित्रांनो, हे यश वेसालू यांच्यासाठी एका नव्या पर्वाची सुरुवात ठरले. त्यांनी आपला पुष्पशेतीचा व्यवसाय आणखी विस्तारला. जी फुले एकेकाळी केवळ स्थानिक बाजारपेठेपुरती मर्यादित होती, ती आता नागालँडमधून दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये पोहोचत आहेत. वेसलू पुरो यांचा प्रवास आपल्याला दाखवून देतो की, जेव्हा एखाद्या छंदाला कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शनाची जोड मिळते, तेव्हा तो नवीन संधींची दारे उघडू शकतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे एक छोटासा प्रयत्न सुरू करतात आणि अल्पावधीतच त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांच्या जीवनात बदलाचा मार्ग मोकळा होतो. ओडिशाच्या देब्रीगडमध्ये ‘धोदारोकुसुम’ नावाचे एक गाव आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत, या गावातील रहिवासी मैथिली भुये जवळजवळ दररोज जंगलात जायची—कधी लाकूडफाटा गोळा करायला, कधी महुआ आणि तेंदूची पाने गोळा करायला, तर कधी बांबूचे कोंब आणि इतर जंगलातील वस्तू गोळा करायला. तिच्या आणि इतर अनेक कुटुंबांच्या गरजा या जंगलातून भागत होत्या, पण मग मैथिली जी देब्रीगड इको-टुरिझममध्ये सामील झाल्या. येथून, जंगलासोबतच्या त्यांच्या नात्याला एक नवीन वळण मिळाले. आता, वन संवर्धन हे त्यांच्या उपजीविकेचे साधनही बनले. मित्रांनो, मैथिलीजी च्या आयुष्यातील या बदलाने इतर महिलांना प्रेरणा दिली. आज, 60 हून अधिक महिला वन संवर्धनात सहभागी आहेत. काही वन्यजीवांच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळतात, काही गवताळ प्रदेशांच्या विकासात गुंतलेल्या आहेत, तर काही महिला पर्यावरण-पर्यटन उपक्रमांमध्ये योगदान देत आहेत. मित्रांनो, मैथिलीजी आणि देबरीगडच्या या भगिनींनी दाखवून दिले आहे की निसर्गाचे रक्षण करता येते आणि जीवन समृद्ध होऊ शकते. या सर्व भगिनींचे प्रयत्न आपल्या सर्वांसाठी एक मोठी प्रेरणा आहेत. मित्रांनो, आज आपल्या मुलींची स्वप्ने पृथ्वीवरून अवकाशात झेप घेत आहेत आणि तुम्हाला हे जाणून अभिमान वाटेल की, भारत जगभरातील अशा हजारो मुलींना एकत्र आणत आहे ज्यांची स्वप्ने अशीच आहेत. या उपक्रमाला ‘मिशन शक्तीसॅट’ असे म्हटले जाते. याच्या माध्यमातून 108 देशांतील 12,000 विद्यार्थिनींना उपग्रह तंत्रज्ञान शिकण्याची आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळत आहे. 23 ऑगस्ट रोजी, राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त, उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे या मोहिमेचे एक सुंदर चित्र पाहायला मिळाले. ‘मिशन शक्तीसॅट’च्या दुसऱ्या टप्प्याला गौतम बुद्ध विद्यापीठात सुरुवात झाली. याप्रसंगी विविध देशांतील आणि भारतातील सुमारे 100 विद्यार्थिनी एकत्र जमल्या. भारतातील दुर्गम भागांतील निवडक विद्यार्थिनीदेखील यात सहभागी होत आहेत. या संपूर्ण प्रयत्नाचे उद्दिष्टही खूप खास आहे. संपूर्णपणे विद्यार्थिनींच्या सहभागाने तयार केलेला एक उपग्रह चंद्राच्या कक्षेत पाठवण्याची तयारी सुरू आहे. मित्रांनो, मला खात्री आहे की भविष्यात यापैकी अनेक विद्यार्थिनी विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रात स्वतःची एक नवीन ओळख निर्माण करतील.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आजकाल अॅव्होकॅडो हे फळ खूप लोकप्रिय झाले आहे. पूर्वी या फळाबद्दल फार कमी लोकांना माहिती होती. त्याचे मूल्य आणि मागणी दोन्ही कमी होते, पण आज ते जेवणाच्या ताटांवर मोठ्या प्रमाणात दिसत आहे. आज ते आरोग्य आणि प्रीमियम बाजारपेठांमध्येही एक आवडते फळ बनले आहे. ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि भगिनींसाठीही खूप उपयुक्त आहे. आंध्र प्रदेशातील कडपा येथील वरदराजजी हे याचे एक उदाहरण आहे. ते अनेक वर्षांपासून आपल्या शेतात टोमॅटो आणि केळी पिकवत होते. एके दिवशी, त्यांनी आपल्या मित्राच्या शेतात अॅव्होकॅडोचे पीक पाहिले. यानंतर त्यांनी यूट्यूबवरून त्याबद्दल माहिती मिळवली. आतापर्यंत त्यांनी सुमारे 4 टन अॅव्होकॅडोचे उत्पादन केले आहे. आज ते थेट स्थानिक दुकानांना त्याचा पुरवठा करत आहेत. नवीन पिके, वैज्ञानिक सल्ला आणि थेट विपणनाने त्यांच्या छोट्या शेताचे उत्पन्न पूर्णपणे बदलून टाकले आहे. तामिळनाडूतील कोडाईकनाल येथील शेतकरी चंद्रशेखरन यांनी अर्ध्या हेक्टर जमिनीवर अॅव्होकॅडोची लागवड सुरू केली आहे. त्यांना त्यासाठी चांगला भाव मिळत असून त्यांचे उत्पन्नही वाढले आहे. कर्नाटकातील चिक्कमगलूरू येथील काही शेतकरी बंधू-भगिनींनी त्यांच्या कॉफीच्या मळ्यांमध्ये अॅव्होकॅडोची लागवड केली आहे. यामुळे त्यांना कॉफी आणि मिरीसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे. मित्रांनो, आपण शहरातील रेस्टॉरंटमध्ये अनेकदा अॅव्होकॅडो टोस्टबद्दल ऐकतो, पण याच अॅव्होकॅडोच्या माध्यमातून आपल्या कल्पक शेतकऱ्यांनी कमाईचा एक नवीन मार्ग शोधला आहे. याचा अर्थ असा की, आपल्याच अॅव्होकॅडोने तुमच्या टोस्टची चव वाढवली आहे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढवले आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांतच, 3 सप्टेंबर रोजी, आपण महान अभिनेते उत्तम कुमार यांची जन्मशताब्दी साजरी करणार आहोत. मित्रांनो, उत्तम कुमार हे एक अष्टपैलू अभिनेते होते, ज्यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली. चित्रपटप्रेमींचा असा विश्वास आहे की, श्री. सत्यजित रे यांनी ‘नायक – द हीरो’ या चित्रपटाची संपूर्ण पटकथा महान अभिनेते उत्तम कुमार यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती. श्री. सत्यजित रे म्हणाले की, त्यांच्यामध्ये प्रतिष्ठेसोबतच विलक्षण भावनिक खोली होती. त्यांनी आपल्या पात्रांना जिवंत करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. उत्तम कुमार त्यांच्या साधेपणा आणि परोपकारासाठी ओळखले जात होते. त्यांचे जीवन आपल्याला एक धडाही शिकवते: कधीही हार मानू नका. त्यांचे सुरुवातीचे चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत, पण ते आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून राहिले आणि त्यामुळेच ते इतके यशस्वी झाले. मित्रांनो, मला आठवतंय की जेव्हा मी कोलकात्यात रोड शो करत होतो, तेव्हा मी उत्तम कुमार यांच्या घरासमोरून गेलो होतो. तिथल्या एका व्यक्तीने मला त्यांचा एक फोटो भेट दिला. मी महान नायक उत्तम कुमार यांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करतो. ते सदैव आपल्या हृदयात राज्य करतील.
“महाननायक उत्तम कुमार चेरोदिन मानुषेर हृदये राज कोरबेन”
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपले सण आणि उत्सव, आपल्या परंपरांसोबतच, आपल्याला एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही देतात. येत्या काळात आपण आणखी अनेक महत्त्वाचे सण साजरे करणार आहोत. 4 सप्टेंबर रोजी जन्माष्टमीचा शुभ सण आहे. सप्टेंबर महिन्यात आपण विश्वकर्मा पूजा देखील साजरी करणार आहोत. या निमित्ताने, आपण आपल्या सभोवतालच्या कारागिरांचा, हस्तकलाकारांचा आणि विश्वकर्मा मित्रांचा सन्मान केला पाहिजे. काही महिन्यांत दिवाळीसुद्धा येत असून, तिची तयारी हळूहळू सुरू होत आहे. या सणासुदीच्या काळात, मी तुम्हाला पुन्हा एकदा ‘व्होकल फॉर लोकल’ (स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन) देण्याचे आवाहन करू इच्छितो, आणि ‘व्होकल फॉर लोकल’ म्हणजे केवळ मातीचे दिवे विकत घेण नाही, तर त्याचा दृष्टिकोण खूप मोठा आहे. आपण आपल्या घरासाठी जे सामान विकत घेतो ते भारतात बनवलेले आहे हे एकदा बघून घ्या. भारताचा आत्मनिर्भर बनण्याचा मार्ग हा भारतीय वस्तूंचा गरवाने स्वीकार करण्यानेच विस्तारत जाईल. हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या creative world मधील मित्रांची, Influencers ची आणि celebrities ची यात महत्वाची भूमिका आहे. माझ्या आपल्याला आग्रह आहे की स्वतः vocal for local चा स्वीकार करा आणि इतरांना त्यासाठी प्रेरित करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे आपल्या छोट्या छोट्या प्रयत्नातून समाजात एक मोठा बदल घडवून आणत आहेत. कृपया ‘मन की बात’साठी त्यांच्याबद्दल लिहा. तुमचे अनुभव देशाच्या कानाकोपऱ्यातील कोणासाठी तरी एक नवी प्रेरणा ठरू शकतात. मी तुमच्या सूचना आणि अनुभवांची वाट पाहत आहे.
खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
* * *
हर्षल आकुडे/आकाशवाणी मुंबई/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
#MannKiBaat has begun. Tune in! https://t.co/sLZaQ83YUp
— PMO India (@PMOIndia) August 30, 2026
A unique website created by Shri Krishna Seshadri Ji is making learning history even more interesting.#MannKiBaat pic.twitter.com/6Tp10CsJHO
— PMO India (@PMOIndia) August 30, 2026
Let us come together to build a drug-free India and a stronger future for our youth.#MannKiBaat#NashaMuktYuva pic.twitter.com/ep2f0WDzXA
— PMO India (@PMOIndia) August 30, 2026
The Tiranga brought people together across India and around the world.#MannKiBaat pic.twitter.com/RCaucEJue2
— PMO India (@PMOIndia) August 30, 2026
PM SVANidhi Yojana is helping lakhs of women street vendors expand their businesses, increase their incomes and build a better future for their families.#MannKiBaat pic.twitter.com/MOtKlVkXOK
— PMO India (@PMOIndia) August 30, 2026
From young volunteers in Uttar Pradesh's Rampur cleaning their neighbourhoods to pilgrims joining the cleanliness drive during the Shri Amarnath Ji Yatra, Swachhata is becoming a people's resolve.#MannKiBaat pic.twitter.com/xPLghWi7D6
— PMO India (@PMOIndia) August 30, 2026
From Phek district in Nagaland, Vesalu Puro Ji turned her passion for flowers into a thriving venture.#MannKiBaat pic.twitter.com/IkCztlKsLf
— PMO India (@PMOIndia) August 30, 2026
In Odisha's Debrigarh region, Maithili Bhue Ji's journey from depending on forest produce to becoming part of eco-tourism has inspired several women to contribute towards forest conservation.#MannKiBaat pic.twitter.com/g41BNVwfGJ
— PMO India (@PMOIndia) August 30, 2026
Mission ShaktiSAT is bringing together girl students from 108 countries and giving them the opportunity to learn about satellite technology as well as explore new frontiers in science, technology, and innovation.#MannKiBaat pic.twitter.com/0jydyhtTrV
— PMO India (@PMOIndia) August 30, 2026
Avocado is finding a new place in India's farms and markets. #MannKiBaat pic.twitter.com/oEnZfbij0T
— PMO India (@PMOIndia) August 30, 2026
Mahanayak Uttam Kumar continues to inspire generations. His remarkable performances, dedication and ability to bring every character to life made him an unforgettable icon of Indian cinema.#MannKiBaat pic.twitter.com/JayfStHgon
— PMO India (@PMOIndia) August 30, 2026