पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या (एसआरसीसी) शताब्दी सोहळ्यात सहभागी झाले. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की अनेक पिढ्या एकत्र आल्याने हा प्रसंग महाविद्यालय आणि देशाच्या शिक्षण क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला आहे. “मी संस्थापक श्रीरामजींना आदरांजली वाहतो आणि त्यांच्या दूरदृष्टीला नमन करतो,” असे मोदी म्हणाले.
महाविद्यालय आणि देशाच्या शिक्षण क्षेत्रासाठी या 100 वर्षांच्या टप्प्याचे असलेले गहन महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधानांनी संस्थापक श्रीरामजी यांना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या चिरस्थायी दूरदृष्टीला वंदन केले. “जेव्हा एखादी संस्था 100 वर्षांची होते तेव्हा ती कर्तृत्व आणि प्रेरणांचा सागर बनते,” असे मोदी म्हणाले.
दर्यागंजमधील एका सामान्य संस्थेपासून ते एका उत्तुंग शैक्षणिक संस्थेपर्यंतच्या महाविद्यालयाच्या भव्य प्रवासाचा आढावा घेताना पंतप्रधानांनी नमूद केले की या संस्थेने अनेक पिढ्या घडवल्या आहेत. आज या संस्थेच्या नावाशी निगडित असलेल्या प्रचंड अभिमानाचीही त्यांनी दखल घेतली. “आजही दिल्ली विद्यापीठात तुम्ही एसआरसीसीचे आहात असे म्हणणे, ही एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे,” याची मोदी यांनी पुष्टी केली.
महाविद्यालयाच्या देदीप्यमान वारशाची प्रशंसा करताना पंतप्रधानांनी एसआरसीसीच्या माजी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये संस्थेला जागतिक स्तरावर उंचावणारे मूळ मार्गदर्शक म्हणून गौरविले. त्यांनी दिवंगत अरुण जेटली आणि संजीव सन्याल यांसारख्या नामवंत माजी विद्यार्थ्यांसोबत काम करण्याच्या आपल्या वैयक्तिक अनुभवांना उजाळा दिला आणि पदवीधरांनी कलाकार, राजकारणी आणि न्यायाधीश म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याचे नमूद केले. “याचा अर्थ, एसआरसीसीच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे,” असे मोदी म्हणाले.
आजच्या कार्यक्रमाभोवती असलेल्या व्यापक जुन्या आठवणींच्या भावनेबाबत भाष्य करताना पंतप्रधानांनी नमूद केले की लोक त्यांचे महाविद्यालयातील 2013 सालचे भाषण मोठ्या आपुलकीने आठवत आहेत आणि त्याचे पुनरावलोकन करत आहेत. त्यांनी सांगितले की त्या भाषणाने एक चिरस्थायी लाट निर्माण केली होती, जिचा सकारात्मक प्रभाव 13 ते 14 वर्षांनंतरही पूर्णपणे कायम आहे. “देशासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित करणे हीच माझी आंतरिक तळमळ होती जी त्या दिवशी माझ्या शब्दांतून व्यक्त झाली,” असे मोदी यांनी ठामपणे सांगितले.
भूतकाळातील संघर्षावर मात करुन आज मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना दहशतवादाचा बीमोड झाल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी भर दिला. सैन्य दले आत्मविश्वासाने शत्रुला त्यांच्या घरात शिरुन पराभूत करत आहेत. जम्मू काश्मीरपासून ईशान्येपर्यंत शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे असे पंतप्रधान म्हणाले. जग आता भारताच्या धोरणात्मक पैलूंचे आणि वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून कौतुक करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “पश्चिम आशियातील युद्ध आणि जागतिक व्यापारातील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर पहिल्या तिमाहीत भारताने 7.8 टक्के आर्थिक वाढ नोंदवली. यातून भारतामध्ये असलेली अद्भुत क्षमता निदर्शनास येते,” असे मोदी म्हणाले.
सतत होणाऱ्या टीकेला उत्तर देताना पंतप्रधानांनी वस्तुनिष्ठ आर्थिक तपशील सादर केले. ते म्हणाले की, एप्रिल ते जून दरम्यान वीजनिर्मितीत 9 टक्के वाढ झाली, दुचाकी वाहनांच्या विक्रीत 20 टक्के आणि तीन चाकी वाहनांच्या विक्रीमध्ये जवळपास 30 टक्के वाढ झाल्यामुळे वाहन विक्रीमध्ये सरासरी 20 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. पोलाद व सिमेंटच्या खरेदीत झालेली 8 टक्के वाढ बांधकाम, गृहबांधणी व व्यावसायिक कामकाजात वेगाने वाढ होत असल्याचे दर्शवते असे त्यांनी सांगितले. “या वस्तुस्थितीनंतरही 2013 मध्ये पेला अर्धा रिकामा आहे म्हणणारे लोक आणि त्यांची मानसिकता आजही बदललेली नाही,” असे मोदींनी नमूद केले.
2013 मध्ये दिलेल्या लोकाभिमुख सुशासनाच्या (पी2जी2) वचनाची आठवण करुन देत पंतप्रधान म्हणाले की, या सरकारने आधीच्या प्रशासनांचा प्रतिक्रियात्मक दृष्टीकोन कायमचा बदलून टाकला आहे. जन धन योजनेचे 12 वर्षांचे यश हे याचे प्रमुख उदाहरण आहे असे ते म्हणाले. मार्च 2014 पर्यंत भारताच्या 125 कोटी लोकसंख्येपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांकडे बँक खाते नव्हते आणि आज या योजनेमुळे सुमारे 60 कोटी नागरिकांकडे स्वतःचे बँक खाते आहे. “आज देशातले जवळपास प्रत्येक कुटुंब बँकिंग प्रणालीशी जोडले गेले आहे, यातूनच भारताच्या फिनटेक क्रांतीचा पाया घातला गेला,” असे मोदी म्हणाले.
‘मेक इन इंडिया’ उपक्रमावर सुरुवातीला झालेल्या टीकेला उत्तर देताना, पंतप्रधानांनी देशाला एका मोठ्या आयातदार देशापासून एका प्रमुख निर्यातदार देशात रूपांतरित करण्याच्या या उपक्रमाच्या प्रचंड यशाचा गौरव केला. स्मार्टफोनची निर्यात आता 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे, तर देशांतर्गत संरक्षण उत्पादनाने सुमारे 2 लाख कोटी रुपयांचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे, असे पंतप्रधानांनी अभिमानाने सांगितले. यामुळे 2013-14 मधील केवळ 600-700 कोटी रुपयांची संरक्षण निर्यात आज 40,000 कोटी रुपयांच्या प्रचंड उद्योगात रूपांतरित झाली आहे, असे त्यांनी सांगितले. “मी छोटी आणि सहज साध्य होणारी ध्येये ठेवणारी व्यक्ती नाही; मी देशासाठी मोठी उद्दिष्टे ठेवतो आणि ती साध्य करण्यासाठी माझे सर्वस्व पणाला लावतो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
तरुण पिढीवर आणि देशातील 140 कोटी भारतीयांच्या क्षमतेवर प्रचंड विश्वास व्यक्त करत, पंतप्रधानांनी आत्मनिर्भर आणि पूर्णपणे विकसित भारताचा महत्त्वाकांक्षी दृष्टिकोन मांडला. कृषी निर्यातीत महासत्ता बनणे, भारतीय अंतराळ स्थानकाची स्थापना करणे आणि ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे, अशी अनेक महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे त्यांनी भविष्यासाठी निश्चित केली. “आणि या केवळ चर्चा नाहीत, हे आपले दृढ संकल्प आहेत,” हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
को-ऑपमधील चहापानाच्या गप्पा, क्रॉसरोड्स आणि बिझनेस कॉन्क्लेव्हमधील उत्साही महाविद्यालयीन जीवनातून बाहेरच्या जगातील वास्तवाकडे वळताना, पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रगतीला सवयीने विरोध करणाऱ्या निंदक व्यक्तींबद्दल सावध राहण्याचा इशारा दिला. जगातील सर्वात उंच पुतळा, हाय-स्पीड ट्रेन, यूपीआय आणि नवीन संसद भवन यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर हे निंदक कसे नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “पण भारताने उत्तर दिले – देशासाठी जे आवश्यक आहे ते करण्यापासून भारताला कोणीही रोखू शकत नाही,” हे त्यांनी अधोरेखित केले.
पायाभूत सुविधा आणि धोरणांची अंमलबजावणी करण्याच्या अभूतपूर्व गतीवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी नमूद केले की, पूर्वी ज्या प्रकल्पांना अनेक दशके लागत होती ते आता केवळ काही वर्षांत पूर्ण होत आहेत. भारतात पहिली विद्युत रेल्वे 1925 मध्ये धावली असली, तरी 2014 पर्यंत देशातील 30 टक्क्यांहून कमी रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण झाले होते. मात्र, आपल्या सरकारने अवघ्या 12 वर्षांच्या कालावधीत जवळपास 100 टक्के रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण पूर्ण केल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले. याचबरोबर भारताने 40 देशांसोबत मुक्त व्यापार करार केले असून, त्यामध्ये चामडे, कापड आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. “यामुळे भारताच्या युवकांसाठी संधींचे एक नवे आकाश निर्माण होत आहे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
कोविड-19 महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धासारख्या अलीकडच्या काळातील गंभीर संकटांचा सामना आपल्या सरकारने अत्यंत संयमाने आणि खंबीरपणे केल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले. “भारताचे वाईट चिंतणाऱ्यांच्या प्रत्येक मनसुब्याला देशातील जनतेच्या आशीर्वादाच्या सामर्थ्यामुळे धक्का बसत आहे. माझ्या देशवासीयांच्या आशीर्वादात एवढी मोठी शक्ती आहे की, भारताचे अहित करू पाहणाऱ्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहेत,” असे ते म्हणाले.
21 व्या शतकातील तरुणांच्या महत्त्वाकांक्षी आणि सर्जनशील वृत्तीचे पंतप्रधानांनी कौतुक केले. नव्या उद्योगांना ‘युनिकॉर्न’च्या स्तरावर नेण्याची तरुणांची क्षमता, ड्रोन तंत्रज्ञानातील नवनवीन प्रयोग आणि अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित उपाय विकसित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी विशेष कौतुक केले. मागील पिढ्यांपेक्षाही मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन त्यांनी तरुणांना केले. जगाचे नेतृत्व करू शकतील अशा जागतिक दर्जाच्या सल्लागार, लेखा, वित्तीय आणि कायदेविषयक कंपन्या भारतातून उभ्या करण्याचे आव्हानही त्यांनी तरुणांसमोर ठेवले. “आज जगातील आघाडीच्या कंपन्यांचे नेतृत्व भारतीय करत आहेत. मग भारतीयांनी उभारलेल्या कंपन्या जगाचे नेतृत्व का करू शकत नाहीत?” असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला.
एसआरसीसीच्या महाविद्यालयीन बोधचिन्हापासून प्रेरणा घेत पंतप्रधान मोदी यांनी, 21 व्या शतकातील तरुणांचा प्रवास, दिशादर्शक सूर्याच्या दिशेने पुढे जाणाऱ्या जहाजाशी जोडला. आत्मनिर्भरतेच्या नव्या मार्गावर वाटचाल करण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रवासात धैर्य, स्वप्ने आणि अंतिम विजय हे सर्वस्वी भारताचेच असले पाहिजेत, असे त्यांनी अधोरेखित केले. “विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना वेगाने पुढे पडणारे प्रत्येक पाऊल आपलेच असले पाहिजे,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
Delighted to join the centenary celebrations of Shri Ram College of Commerce. Over the years, this institution has given generations of students the opportunity to learn, grow and make a difference.@SRCCOfficial
https://t.co/2YyZBJuFAy— Narendra Modi (@narendramodi) September 5, 2026
From policy paralysis to policy dynamism… India has come a long way. pic.twitter.com/DV5KYkAmZb
— PMO India (@PMOIndia) September 5, 2026
India’s 7.8% growth amid global uncertainty reflects its economic strength. pic.twitter.com/AeQ83PHEQH
— PMO India (@PMOIndia) September 5, 2026
Together, 140 crore Indians will make India both Viksit and Aatmanirbhar. pic.twitter.com/0Xj2faEVra
— PMO India (@PMOIndia) September 5, 2026
India is moving forward at a new pace. What once took decades is now happening in just a few years. pic.twitter.com/PykSUe4oMh
— PMO India (@PMOIndia) September 5, 2026
If Indians can lead the world’s top companies, Indian companies can lead the world too. It is all possible. pic.twitter.com/XKi3eHMHLm
— PMO India (@PMOIndia) September 5, 2026
* * *
सुषमा काणे/निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/सुरेखा जोशी/श्रद्धा मुखेडकर/वैभवी जोशी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai