पीएम्इंडिया
नवी दिल्लीत सुरु असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, 12 सप्टेंबर 2026 रोजी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली.
या दोन्ही नेत्यांमध्ये ऑगस्ट 2025 मध्ये तियानजिन इथे झालेल्या या आधीच्या भेटीपासून भारत आणि चीन मधील द्विपक्षीय संबंधात झालेल्या स्थिर प्रगतीचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. दोन्ही देशांनी आपल्या परस्पर संबंधांकडे धोरणात्मक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, ही बाब या बैठकीच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. मतभेदांचे रूपांतर वादात होऊ नये, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केले, तसेच दोन्ही देशांनी परस्पर आदर, परस्पर संवेदनशीलता आणि परस्पर हितसंबंध या तीन मूल्यांना धरून वाटचाल करावी असेही त्यांनी सांगितले.
परस्परांच्या सीमाभागात शांतता आणि सुव्यवस्था राखणे हाच दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सातत्यपूर्णतेने विकसित होत राहण्यासाठीचा अत्यंत महत्वाचा पाया असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. सीमाभागासंबंधीच्या मुद्द्यांवरचे विद्यमान करार आणि परस्पर सहमतीचे दोन्ही देशांनी पालन करण्याची गरजही पंतप्रधानांनी अधोरेखित केली. दोन्ही देशांमधील एकंदरित द्विपक्षीय संबंधांच्या राजकीय दृष्टिकोनातून तसेच दोन्ही देशांमधील जनतेच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून, सीमाप्रश्नाचा न्याय्य, व्यवहार्य आणि परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढण्यासाठीची वचनबद्धताही दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.
दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संबंधांतील प्रगतीचीही दोन्ही नेत्यांनी दखल घेतली. यासोबतच सांस्कृतिक देवाणघेवाण, उद्योग व्यावसायिक संबंध आणि अधिक सुलभ देवाणघेवाणीला चालना देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. परस्परांमधील आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. संरचनात्मक व्यापारातील असमतोल, पुरवठा साखळीशी संबंधित समस्या तसेच अर्थपूर्ण आणि अंदाज मांडता येण्याजोग्या बाजारपेठांमध्ये सुलभतेने पाऊल टाकण्याची संधी, या आणि अशा परस्परांच्या समस्या सोडवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांच्या बाबतीत तसेच समोर असलेला आव्हानांचा सामना करण्याकरता दोन्ही देशांनी परस्परांना मान्य असलेल्या दृष्टीकोनाचा विस्तार करणे सुरू ठेवले पाहिजे, यावर दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.
भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेपदाच्या काळात चीनने पुरवलेल्या पाठबळाबद्दल आणि ब्रिक्स शिखर परिषद-2026 च्या यशातील चीनच्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे आभारही मानले.
***
शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai