पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2026
माननीय राष्ट्राध्यक्ष महोदय,
दोन्ही देशांचे प्रतिनिधी,
प्रसारमाध्यमांमधले मित्र ,
नमस्कार!
स्वित्झर्लंडच्या राष्ट्राध्यक्षांचे भारतात हार्दिक स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे.
सर्वप्रथम, मी भारत-स्वित्झर्लंड संबंधांप्रती त्यांच्या वचनबद्धतेचे कौतुक करतो. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, त्यांच्या व्यक्तिगत पाठिंब्याने, आम्ही भारत आणि यूरोपीय मुक्त व्यापार संघटना (एफ्टा) देशांमध्ये एका ऐतिहासिक व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार लागू केला.यूरोपमधल्या एखाद्या आर्थिक गटासोबतचा भारताचा हा पहिलाच मुक्त व्यापार करार आहे.
ही गुंतवणूक, नवोन्मेष, रोजगार आणि सामायिक समृद्धीची महत्त्वाकांक्षी ब्लूप्रिंटदेखील आहे. यातून आम्ही पुढल्या 15 वर्षात भारतामध्ये 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणि 10 लाख थेट रोजगारांचे लक्ष्य साकार करू.
मित्रांनो,
भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात शतकानुशतकांची मैत्री आहे. एकोणिसाव्या शतकात स्वामी विवेकानंदांनी स्विस आल्प्समध्ये हिमालयाची झलक पाहिली होती. महात्मा गांधी यांनीही स्वित्झर्लंडमध्ये काही काळ व्यतीत केला होता आणि तिथल्या लोकांशी संवाद साधला होता. या ऐतिहासिक भेटींच्या स्मृती आजही आपल्या मैत्रीत प्रतिध्वनित होतात.
आज, नवोन्मेष, पायाभूत सुविधा आणि प्रगत तंत्रज्ञान, आपल्या भागीदारीचे मजबूत स्तंभ आहेत आणि आजच्या या शिखर परिषदेद्वारे आम्ही आपल्या भागीदारीला एक नवी गती आणि नवी उंची देत आहोत.
मित्रांनो,
आम्ही भारतीय निर्यातीची स्वित्झर्लंडमधल्या बाजारपेठांमध्ये पोहोच वाढवण्यासाठी आणि दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक अधिक सुगम करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
यामुळे भारताची कृषी, औषध , वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी वस्तूंची स्वित्झर्लंडमधली निर्यात वाढेल. आणि त्याचसोबत भारतातील जैव तंत्रज्ञान, जीवन विज्ञान, बँकिंग, विमा, अन्न प्रक्रिया आणि शाश्वतता यांसारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रात स्वित्झर्लंडकडून आपण नवी गुंतवणूक आकर्षित करू शकू. या पुढाकारांच्या माध्यमातून आम्ही एकत्र मिळून संपूर्ण जगासाठी विश्वासार्ह पुरवठा साखळ्या आणि विश्वसनीय उपाययोजना विकसित करू.
मित्रांनो,
आज आम्ही लष्करी आदानप्रदान आणि संरक्षण उत्पादन सहयोगाच्या नव्या शक्यतांचा वेध घेतला. अणुऊर्जा क्षेत्रातील सहयोग अधिक दृढ करण्यावरही सहमती झाली.
वाराणसी रोपवे, नोएडाचा जेवर विमानतळ आणि डोंगराळ भागातील रेल्वे व बोगदा प्रकल्प ही आपल्या पायाभूत सुविधा सहयोगाची उत्तम उदाहरणे आहेत. दोन्ही देशांमधील सहयोग अधिक वृद्धिंगत करण्यासाठी, आज आम्ही वाहतूक, गतिशीलता आणि पायाभूत सुविधांसंबंधी करार केला आहे.
आम्ही स्वित्झर्लंडमधल्या पायाभूत सुविधा कंपन्यांना भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यासाठी आणि क्षमता बांधणी, डिझाईन आणि वस्तुनिर्माण क्षेत्रातील भागीदारीसाठी आमंत्रित करत आहोत.
मित्रांनो,
विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य हा देखील आमच्या भागीदारीचा एक भक्कम आधारस्तंभ आहे. आम्ही लवकरच आरोग्य, स्वच्छ ऊर्जा आणि अवकाश यांसारख्या प्राधान्य क्षेत्रांमध्ये नवीन संयुक्त संशोधन प्रकल्प सुरू करणार आहोत, हे कळवताना मला अत्यंत आनंद होत आहे. भारतीय विज्ञान स्टार्टअप्सची क्षमता वाढवण्यासाठी झुरिच विद्यापीठासोबत झालेल्या कराराचेही आम्ही स्वागत करतो.
स्वित्झर्लंडमधील योग आणि आयुर्वेद यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता, आज आम्ही या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यावरही अर्थपूर्ण चर्चा केली.
मित्रांनो,
नागरिकांचे आपापसातील संबंध ही आपल्या भागीदारीची सर्वात मोठी ताकद आहे. आज स्वाक्षरी झालेल्या स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करार आणि युवा व्यावसायिक करारामुळे भारतीय विद्यार्थी, संशोधक, व्यावसायिक आणि तरुणांसाठी स्वित्झर्लंडमध्ये अनेक नवीन संधी उपलब्ध होतील.
मित्रांनो,
भारत आणि स्वित्झर्लंड हे दोन्ही देश लोकशाही मूल्ये, कायद्याचे राज्य, संवाद आणि मुत्सद्देगिरीवर विश्वास ठेवतात. आम्ही जागतिक शांतता आणि स्थिरतेसाठी एकत्र काम करत राहू.
युक्रेन असो वा पश्चिम आशिया; शांततेसाठीच्या प्रत्येक महत्त्वपूर्ण प्रयत्नांना भारत नेहमीच पाठिंबा देत आला आहे.
वाढत्या जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करणे अत्यावश्यक आहे, यावरही आमचे एकमत झाले आहे.
मित्रांनो,
स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष एका मोठ्या व्यावसायिक शिष्टमंडळासह भारताला भेट देत असल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. 7 ऑक्टोबर रोजी, त्यांच्या उपस्थितीत आम्ही भारत-एफ्टा व्यावसायिक नेत्यांसोबत ‘समृद्धी शिखर परिषदे’चे आयोजन करणार आहोत. ही शिखर परिषद आपल्या व्यापार आणि गुंतवणूक भागीदारीच्या आश्वासनांना ठोस परिणामांमध्ये रूपांतरित करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल. या शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या सर्व व्यावसायिक दिग्गजांनाही मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो.
महामहीम,
या वर्षी फेब्रुवारीमध्ये भारताने जगातील सर्वात मोठ्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत (एआय) शिखर परिषदेचे आयोजन केले होते. पुढील वर्षी, स्वित्झर्लंड जिनिव्हा एआय शिखर परिषदेच्या माध्यमातून हा प्रवास पुढे नेण्यात येईल. जिनिव्हा एआय शिखर परिषदेच्या यशासाठी स्वित्झर्लंडला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की, आपण सर्व मिळून एआयला जबाबदार, सर्वसमावेशक आणि मानवकेंद्रित बनवण्याच्या दिशेने पुढे वाटचाल करत राहू.
भारताला दिलेल्या या भेटीबद्दल आणि भारत-स्वित्झर्लंड संबंधांचे खंबीर समर्थक असल्याबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.
निलिमा चितळे/सोनाली काकडे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai