माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार.
मन की बात च्या आजच्या नवीन भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आजपासून १२ वर्षांपूर्वी, विजयादशमीच्या पवित्र मुहूर्तावर आपण ‘मन की बात’ या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. तेव्हापासून आजपर्यंत हा प्रवास सातत्याने सुरू आहे. या प्रवासाचे सहप्रवासीही तुम्हीच आहात आणि मार्गदर्शकही तुम्हीच आहात.
मित्रांनो,
माझ्यासाठी ‘मन की बात’ हा देशातल्या सामान्य माणसाच्या परिश्रमांचा, पराक्रमाचा, त्याच्या प्रतिबद्धतेचा, समर्पणाचा आणि सेवाभावाचा गौरव करण्याची एक चांगली संधी म्हणून समोर आला आहे.
आपल्या देशात शतकानुंशतके तीर्थयात्रेची परंपरा चालत आली आहे. माझ्यासाठी ‘मन की बात’ हा कार्यक्रमदेखील देशातल्या लोकांचे प्रयत्न जवळून जाणून घेण्याचा आणि त्यांच्या योगदानाला वंदन करण्याचा तीर्थयात्रेइतकाच पवित्र अनुभव आहे.
मित्रांनो,
जे लोक समाजासाठी आणि राष्ट्रासाठी जगतात, ते स्वतःमध्येच एका तीर्थस्थळासारखे असतात. गेल्या १२ वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यातून असे अनेक लोक समोर आले आहेत, ज्यांच्या असाधारण कार्यांकडे सामान्यतः समाजाचे कधी लक्ष जात नाही.
‘मन की बात’ ने अशा असंख्य प्रेरणादायी कथा आपणा सर्वांसमोर आणण्याचे काम केले आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एकप्रकारे देशातल्या लोकशक्तीची आराधना करतो. या कार्यक्रमामुळे मला देशातल्या प्रत्येक कुटुंबाशी जोडले जाण्याची संधी मिळते. मला शंभरपेक्षा जास्त असे संदेश आलेत, ज्यामध्ये लोक सांगतात की, ‘मन की बात’ ऐकल्यानंतर त्यांना असे वाटतं की, जणू मी त्यांच्यामध्ये, त्यांच्या कुटुंबात बसून, कुटुंबातल्या एका सदस्याप्रमाणे त्या सर्वांशी संवाद साधत आहे. माझ्याकरिता तुम्हा सर्व श्रोत्यांची ही आत्मीयता आणि तुमचे हे प्रेम हीच अत्यंत अमूल्य अशी पुंजी आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्या देशात असे अनेक पारंपरिक कौशल्यप्रकार आहेत, जे पिढ्यान्पिढ्या आपल्या ओळखीचा एक भाग बनले आहेत. आनंदाची बाब म्हणजे, आता या परंपरांशी जोडले जाऊन अनेक नवनवीन प्रयोगही केले जात आहेत आणि या परंपरांना आजच्या काळानुरूप पुढे नेलं जात आहे.
पंजाबमध्ये असाच एक प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. इथं ‘खेती विरासत मिशन’ नावाच्या एका संस्थेने सेंद्रिय शेती आणि पारंपरिक कृषिपद्धतींना नवसंजीवनी देण्यास सुरुवात केली आहे. या संस्थेने पंजाबच्या मालवा प्रदेशातल्या कापसाच्या नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नव-त्रिंजन’ या नवीन उपक्रमाची सुरूवात केली.
या उपक्रमांतर्गत इथं कोणत्याही रासायनिक पदार्थांचा वापर न करता सेंद्रिय कापसाचे उत्पादन घेतले जाते. येथे नैसर्गिक रंग असलेल्या कापसाचीही लागवड केली जाते. या कापसापासून तयार होणाऱ्या धाग्यांना आणि कापडाला रंग देण्यासाठी वेगळ्या रासायनिक पदार्थांचा वापर करण्याची गरज पडत नाही. यामुळे पर्यावरणाला किती मोठा फायदा होत असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता.
मित्रांनो,
काही वर्षांपूर्वी ‘नव-त्रिंजन’ने विणकामाची एक शाळाही सुरू केली. विणकामाचे कौशल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या शाळेचा उद्देश आहे. या शाळेने अनेक महिलांचे जीवन आज बदलून टाकले आहे.
रमनदीप कौरजी या त्याचं उत्तम उदाहरण आहेत. पूर्वी त्या मजूर म्हणून काम करत होत्या; परंतु या शाळेत प्रशिक्षण घेतल्यानंतर आज त्यांची ओळख एक कुशल विणकर म्हणून निर्माण झाली आहे.
रेखा राणीजी यांनी तर प्रशिक्षण घेण्यापूर्वी हातमाग कधी पाहिलाही नव्हता. पंरतु आज त्यांनी तयार केलेली शाल भारताच्या माननीय राष्ट्रपतींना भेट म्हणून देण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे, सुनेहा देवीजी पूर्वी घरांमध्ये काम करायच्या त्या आता हातमागावर सुंदर आणि अद्भुत प्रकारचे कापड तयार करत आहेत.
रजनी कौरजी पूर्वी शेतात मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होत्या; मात्र आता नव्याने आत्मसात केलेल्या कौशल्यामुळे त्यांना आपले घर चालविण्यास या कौशल्याची मोठी मदत होत आहे.
या शाळेत प्रशिक्षण घेतल्यानंतर अशा अनेक महिला आता स्वदेशी सेंद्रिय कापसापासून तयार केलेल्या धाग्यांचा वापर करून शाली, टॉवेल आणि इतर प्रकारचे कापड तयार करत आहेत. या प्रयत्नांमुळे त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी येत आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त मला या चमूला भेटण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी त्यांच्या कामाप्रती असलेली जिद्द आणि समर्पणभाव मी अनुभवला होता. या संपूर्ण चमूला त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्या देशात निसर्गाप्रती आदर बाळगण्याची अतिशय प्राचीन परंपरा आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवले आहे की, आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणं आणि जलस्रोतांची काळजी घेणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. देशातल्या अनेक लोकांनी ही भावना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवली आहे, हे पाहून मला आनंद होतो.
उत्तराखंडमधील टिहरी गढवाल इथंही असाच अनुभव आला. इथल्या लोकांनी एकत्र येऊन एका नदीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला. या नदीचे नाव आहे ‘हेवल’ (Havel). काही काळापूर्वी हेवल नदीतल्या पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागले होते. आसपासचे नैसर्गिक जलस्रोतही आटू लागले होते. अशा परिस्थितीत स्थानिक प्रशासन आणि गावातल्या लोकांनी एकत्र येऊन हेवल नदी वाचविण्यासाठी मोहीम सुरू केली. या मोहिमेदरम्यान पावसाचे पाणी अडविण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या, जमिनीत पाणी मुरविण्यासाठी काम करण्यात आले आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. आज या प्रयत्नांमुळे हेवल नदीला नवसंजीवनी मिळाली आहे. त्याचबरोबर अनेक नैसर्गिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करण्यासही मदत झाली आहे.
मित्रांनो,
जेव्हा समाज अशा भावनेने एकजुटीने काम करतो, तेव्हा परिवर्तनाची हमी निश्चित होते. याची एक झलक आपल्याला आपल्या सण-उत्सवांमध्येही पाहायला मिळते. अवघ्या काही दिवसांत दिवाळी आणि छठ या पवित्र सणांचे आगमन होणार आहे. या सणांच्या निमित्ताने ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. आपण जिथे राहतो, त्या परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आपले छोटे-छोटे प्रयत्नही आपल्या सभोवतालच्या परिसरात मोठे परिवर्तन घडवून आणू शकतात.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
सणासुदीच्या या काळात तुम्हा सर्वांनी आपल्या आजूबाजूला एक बदल नक्कीच अनुभवला असेल. आता लोक खरेदी करताना स्वदेशी उत्पादनांना अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. ‘व्होकल फॉर लोकल’ ही भावना आता आपल्या उत्पादनांना जगभरातल्या बाजारपेठांपर्यंत पोहोचवत आहे.
बिहार इथल्या पूर्णियामधील मखाना आता ग्रीस देशापर्यंत पोहोचत आहे. कर्नाटकातल्या कलबुर्गी इथली तूरडाळ आता मालदीवला पाठवली जात आहे. म्हणजेच, भारतातील शेतकऱ्यांसाठी जगभरातल्या नवनवीन बाजारपेठा खुल्या होत आहेत.
मित्रांनो,
स्थानिक उत्पादनांविषयी बोलताना मला आणखी एका विषयाकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे. कोणत्याही उत्पादनाच्या गुणवत्तेइतकेच त्याचे पॅकेजिंग म्हणजेच वेष्टनही महत्त्वाचे असते. अनेकदा आपण बाजारात एखादी वस्तू पाहतो, तेव्हा तिचे आकर्षक पॅकेजिंग पाहूनच ती हातात घेतो. त्या उत्पादनाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छाही आपल्याला त्याचे पॅकेजिंग पाहूनच होते. ही बाब लक्षात घेऊन आता पॅकेजिंगवरही विशेष भर दिला जात आहे.
मित्रांनो,
महाराष्ट्रातल्या आदिवासी समुदायांनी स्वतः तयार केलेल्या उत्पादनांच्या पॅकेजिंगवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. येथे ‘शबरी नेचुरल्स’ या उपक्रमाच्या माध्यमातून मध, मोहफुले, चारोळी आणि बांबूपासून तयार केलेली उत्पादने बाजारात आणली जात आहेत. त्यांच्या पॅकेजिंगवर आदिवासी कलेची सुंदर छाप दिसून येते. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की, या पॅकेजिंगला जपानचा प्रतिष्ठित ‘गुड डिझाइन पुरस्कार’ मिळाला आहे.
आपले तरुणही या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करत आहेत. कर्नाटकातील ‘बॅम्बू’ (Bamboo) हे स्टार्टअप बांबू आणि शेतीतून निर्माण होणाऱ्या अवशेषांपासून पॅकेजिंगसाठी आवश्यक साहित्य तयार करत आहे.
मित्रांनो,
जेव्हा स्थानिक उत्पादनांचा विषय निघतो, तेव्हा खादीचा उल्लेख होणं स्वाभाविक आहे. यंदा गांधी जयंतीच्या दिवशी केवळ एका दिवसात खादी ग्रामोद्योगाच्या उत्पादनांची विक्री २८ कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही विक्री दीड कोटी रुपयांनी अधिक आहे. म्हणजेच, खादीची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. याचा लाभ त्या लोकांपर्यंतही पोहोचत आहे, ज्यांच्या कौशल्यातून आणि मेहनतीतून खादी, हस्तकला आणि अशा अनेक वस्तू तयार होतात.
मित्रांनो, सणांच्या काळात आपण आपल्या कुटुंबीयांसाठी आणि प्रियजनांसाठी अनेक वस्तू खरेदी करतो. यंदाही खरेदी करताना स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंना प्राधान्य द्या. तुमच्या खरेदीमुळे त्यांचा उत्साह वाढेल. तुमच्या या आपुलकीमुळे ‘व्होकल फॉर लोकल’ अभियानाला आणखी बळ मिळेल. हे अभियान जितक्या वेगाने पुढे जाईल, तितक्याच वेगाने आत्मनिर्भर भारताचे स्वप्नही साकार होईल. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना वैयक्तिकरीत्या आग्रह करतो की, स्थानिक कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना अधिक प्राधान्य आणि महत्त्व द्या.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
आपल्या देशातल्या लोकांचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. आपण नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार अतिशय लवकर करतो. तसंच, तंत्रज्ञानाला सहजपणे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवतो. ‘ई-संजीवनी योजना’ हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. लोकांचे जीवन अधिक सुलभ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा किती प्रभावी वापर करता येतो, हे या योजनेतून दिसून येते.
या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास ५० कोटी टेलि-कन्सल्टेशन पूर्ण झाल्या आहेत, हे पाहून मला अतिशय समाधान वाटते. हा आकडा खूप मोठा आहे. तंत्रज्ञानाची ताकद, आपल्या डॉक्टरांची सेवाभावी वृत्ती आणि देशवासीयांचा विश्वास यांचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
मित्रांनो,
आज ई-संजीवनी ही सेवा आपल्या व्यापक नेटवर्कच्या माध्यमातून देशातल्या दुर्गम भागांपर्यंतही पोहोचली आहे. या सेवेचा लाभ घेणाऱ्या लोकांच्या कथा तुम्हाला भावूक करतील.
अंदमान-निकोबारमधील बाराटांग बेटावर ओहो-ताहाने नावाच्या जरावा जमातीतील मुलाला तीव्र ताप आला होता. त्याला श्वास घेण्यासही त्रास होत होता. अशा वेळी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी ई-संजीवनीच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधला. त्या मुलाला न्यूमोनिया झाला होता. तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू झाल्यानंतर त्याच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होऊ लागली.
मित्रांनो,
लक्षद्वीपमधील कल्पेनी येथे राहणाऱ्या सुमारे ६० वर्षांच्या कुन्ही कोया यांची प्रकृती एके दिवशी अचानक बिघडली. त्यावेळी समुद्रापलीकडे कवरत्ती इथं असलेल्या अनुभवी डॉक्टरांशी ई-संजीवनीच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला. त्या अनुभवी डॉक्टरांनी स्थानिक वैद्यकीय पथकाला मार्गदर्शन केले आणि कुन्ही कोया यांना आराम मिळण्यास मदत झाली.
लडाख इथल्या झांस्करमध्ये कुंजांग डोलमा यांना गर्भावस्थेदरम्यान काही गुंतागुंत निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत ई-संजीवनी त्यांच्यासाठी उपयुक्त ठरली असून तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांना तातडीने मदत केली.
नागालँडमधील पेरेन इथं राहणाऱ्या मुशेम नावाच्या १२ वर्षांच्या मुलाला कानाचा संसर्ग झाला होता आणि तापही आला होता. त्यालाही ई-संजीवनीचा फायदा झाला. तज्ज्ञ डॉक्टरांनी तातडीने त्याच्या आजाराचे निदान केले आणि योग्य औषधे सुचवली.
मित्रांनो,
एक काळ असा होता की, डॉक्टरांना दाखवण्यासाठी किंवा साधी आरोग्य तपासणी करून घेण्यासाठीही लोकांना बराच वेळ खर्च करावा लागत असे. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. आज देशभरात जवळपास १ लाख ९० हजार आयुष्मान आरोग्य मंदिरे लोकांच्या जीवनात नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत आहेत. ही आरोग्य मंदिरे एकप्रकारे ग्रामपंचायतींच्या परिसरातील आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रे म्हणून विकसित होत आहेत.
सर्वांत आनंदाची बाब म्हणजे, आता गावांमधील लोकही निरोगी राहण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करून घेत असून ई-संजीवनी यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
या महिन्याच्या सुरुवातीला मी चेन्नईला गेलो होतो. तिथे देशातल्या अनेक शास्त्रज्ञ, संशोधक आणि प्रतिभावान युवकांना मी भेटलो. मानवी समाजाचं भवितव्य बदलू शकणाऱ्या विषयांवर आज आपले युवक संशोधन करत आहेत. अशाच विषयांपैकी एक आहे – ब्रेन रिसर्च. सुधा गोपाल कृष्णन ब्रेन सेंटरचं मी आयआयटी मद्रास इथं लोकार्पण केलं होतं. या सेंटरने जगासाठी आदर्श ठरेल असं एक ब्रेन इमॅजिंग टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म तयार केलं आहे. या तंत्रज्ञानाद्वारे मानवी मेंदुच्या डिजिटल थ्री डी प्रतिमा बनवल्या जात आहेत. येत्या काळात शंभर मानवी मेंदुंचे थ्री डी मॅपिंग करून त्याचं अध्ययन करणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. अशा प्रकारची जगातली ही पहिलीच मोहीम आहे. या मोहिमेत सुपर कम्प्युटरचा वापर केला जात आहे.
मित्रांनो,
या ब्रेन सेंटरच्या निर्मितीत देशातल्या उद्योग जगताने सरकारच्या सहकार्याने मोठी भूमिका निभावली आहे. आयआयटीचे अनेक संशोधक विद्यार्थी आणि अभ्यासक या रिसर्च सेंटरच्या मोहिमेसाठी एकत्र आले आहेत. विज्ञानाची इतकी प्रगती होऊनही मानवी मेंदू हा विज्ञानासाठी आजही एक कोडं आहे, त्यामुळे या संशोधनाचं महत्त्व खूप मोठं आहे. आज सुद्धा अल्जायमर आणि डिमेन्शियासारख्या आजारावर कोणताही नेमका इलाज नाही. त्यामुळेच मानवी मेंदूचा जितका बारकाईने अभ्यास केला जाईल, तितकी शक्यतांची दार खुली होतील. शंभर मानवी मेंदूंचा हा डेटा त्यानंतर विविध क्षेत्रातल्या संशोधनासाठी उपलब्ध करून दिला जाईल हेही या मोहिमेत ठरलं आहे.
मित्रांनो,
या प्रकारच्या प्रगत संशोधनात अवयव दानाची भूमिका खूप मोठी असते. जे लोक अवयव दान करतात, ते अनेक लोकांना जीवदान तर देतातच, शिवाय संशोधनातही मदत करतात. मध्यप्रदेशातील नर्मदापुरम इथल्या शिवानीजी यांचं यासंदर्भातलं उदाहरण आहे. शिवानीजी यांनी एका रस्ते अपघातात आपले प्राण गमावले. त्यांच्या कुटुंबीयांवर मोठं संकट कोसळलं. मात्र अशा कठीण परिस्थितीतही त्यांच्या कुटुंबीयांनी असा निर्णय घेतला जो आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. हा निर्णय होता शिवानीजी यांचं अवयव दान करण्याचा. शिवानीजी यांच्या कुटुंबीयांचा हा निर्णय समाज आणि देशासाठी मोठा संदेश आहे. अशा मानवतावादी कृतीमुळे एखाद्या कुटुंबाचा हिरावलेला आनंद पुन्हा परतून येतो, तसंच संशोधनाच्या कामातही मोठी मदत होते.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
माझ्या चेन्नई भेटीतल्या इतर अनुभवांविषयी सुद्धा मला तुमच्याशी चर्चा करायची आहे. माझा पहिला अनुभव होता – मेट्रो मध्ये युवकांशी संवाद. तर दुसरा कार्यक्रम होता, आयआयटी मद्रासला भेट. आपली युवा पिढी विविध समस्यांवर कशी अभिनव उत्तरं शोधते हे मला या दौऱ्यात पाहायला मिळालं. ज्या स्टार्टअप्स संस्थांना मी भेट दिली, त्यापैकी एक सोन्याची गुणवत्ता तपासण्याचं काम करते. यामुळे सोने खरेदी करताना होणारी फसवणूक टाळली जाते. युवकांचा एक गट असं एक व्यासपीठ बनवण्यासाठी काम करत आहे, ज्यामुळे फसवणुकीने बँकेतून काढून घेतली गेलेली रक्कम जलदरितीने परत मिळवता येईल. तर दुसरा गट सर्वायकल कॅन्सरच्या स्क्रीनींगमधे कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत कशी घेता येईल त्यावर काम करत आहे. मित्रांनो, आयआयटी मद्रासमध्ये विद्यार्थ्यांशी झालेला संवाद डीप फेकवर केंद्रित होता. या स्टार्टअप्सना आयआयटी मद्रासची इनक्युबेशन इकोसिस्टम मदत करत आहे. यातीलच एक स्टार्टअप संस्था समुद्राच्या वर उडणारं वाहन विकसित करत आहे. दुसरी एक स्टार्टअप संस्था ड्रोन आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या जलद गतीने चार्ज होणाऱ्या बॅटरी बनवत आहे. तर एक गट संरक्षण तंत्रज्ञानात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा केला जाऊ शकतो यावर संशोधन करत आहे.
मित्रांनो,
आपले युवा इतकी अनन्यसाधारण कामगिरी करू शकत आहेत, कारण त्यांना योग्य वातावरण आणि मदत मिळत आहे. आपल्या देशात प्रतिभावान युवकांची कमतरता कधीच नव्हती. आजपासून काही दिवसांनी म्हणजे ३१ ऑक्टोबरला भारताचे महान शास्त्रज्ञ नरिंदर सिंह कपानी यांची शंभरावी जयंती आहे. त्यांना जग फादर ऑफ फायबर ऑप्टिक्स म्हणून ओळखते. त्यांचा जन्म पंजाबमधल्या मोगा जिल्ह्यात झाला होता. प्रकाशाला ऑप्टिक्सच्या माध्यमातून पुढे नेण्याच्या तंत्रज्ञानात त्यांनी केलेल्या संशोधनाने दळणवळण क्षेत्राला एक नवी दिशा दिली. इंटरनेट आणि डिजिटल दळणवळणाच्या ज्या जगात आज आपण जगत आहोत त्याची कल्पना फायबर ऑप्टिक्सच्या शिवाय करणं अशक्य आहे. आज या निमित्ताने नरिंदर सिंह कपानीजी यांना आपण नमन करू या. प्रत्येक युवकाने कपानीजींसारख्या शास्त्रज्ञाबद्दल वाचावं, त्यांना जाणून घ्यावं आणि त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी अशी माझी इच्छा आहे.
मित्रांनो,
थोड्याच दिवसांनंतर ३१ ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. हा दिवस एकता दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. या निमित्ताने देशभरात एकता दौड म्हणजेच रन फ़ॉर युनिटीचं आयोजन केलं जातं. आपली एकता बळकट करण्यासाठी , देशाप्रती आपल्या संकल्पाचा पुनरूच्चार करण्यासाठी रन फॉर युनिटी खूप मोठी संधी आहे. यंदाच्या एकता दौडीत आपण सर्वांनी सहभागी व्हावं असं माझं तुम्हाला आवाहन आहे. आपले कुटुंबीय, मित्र आणि आसपासच्या लोकांनाही यात सहभागी करून घ्या.
मित्रांनो,
तुम्हाला लक्षात असेल की भारताच्या आवाहनानंतर २०२३ वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरा केलं गेलं. याला जगभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. श्री अन्न अर्थात भरडधान्य हे आपल्या संस्कृतीचा किती अभिन्न भाग आहे हे यामुळे लोकांना समजलं. ईशान्य भारतातही भरडधान्य शेतीची एक समृद्ध परंपरा आहे. मात्र कालौघात लोक यापासून दुरावले होते. पण आता परिस्थिती बदलत आहे.
मित्रांनो,
मेघालयमधल्या पश्चिम जयंतीया हिल्स जिल्ह्यात खांडुली नावाचं एक गाव आहे. इथे अनेक पिढ्यांपासून भरडधान्य स्थानिक खाद्य संस्कृतीचा भाग आहे. पण, गेल्या काही काळापासून भरडधान्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होत होती. अशा परिस्थितीत दोन मैत्रिणींनी एक नवी सुरूवात केली. त्यांनी भरडधान्यापासून नवीन उत्पादनं बनवायला सुरुवात केली. भरडधान्याचं मूल्यवर्धन करत त्यांनी कूकीज, केक आणि मफीन्ससोबतच लहान मुलांचं खाद्य तयार केलं. त्यामुळे भरडधान्यापासून बनलेल्या उत्पादनांची विक्री वाढली आणि भरडधान्याला मागणी वाढली. इथल्या शेतकऱ्यांनीही पुन्हा एकदा भरडधान्याची शेती सुरू केली आहे. मित्रांनो, मेघालयच्या पश्चिम गारो हिल्स जिल्ह्यात सादोलपाडा गावातदेखील काही नवे प्रयोग होत आहेत. इथले शेतकरी चेकजिंग संगमा यांनी भरडधान्याचं महत्त्व इतरांना समजावत आधुनिक पद्धतीने शेती सुरू केली आहे. यामुळे त्यांचं उत्पन्न वाढलं आणि गावातही जागरूकता वाढीस लागली. याचप्रकारे नागालँडच्या कोहिमामधे केजोमा नावाचं एक गाव आहे. या गावात दशकभराहून अधिक काळापासून भरडधान्याची शेती बंद होती. त्यामुळे एक संपूर्ण पिढी भरडधान्यापासून अनभिज्ञ होती. जे धान्य त्यांचे आजी-आजोबा उगवायचे, त्या धान्याला गावकरी विसरून गेले होते. २०२४ मध्ये इथल्या गावकऱ्यांनी भरडधान्याची शेती पुन्हा सुरू केली. २०२५ मध्ये केजोमाने आपला पहिला भरडधान्य उत्सव साजरा केला. आता इथे सुद्धा भरडधान्यापासून बनलेल्या उत्पादनांची मागणी वाढत आहे. मित्रांनो, भरडधान्याच्या शेतीची ही उदाहरणं सकारात्मक संदेश देणारी आहेत. आपले युवक पारंपरिक पिकांची सांगड नव्या संधीशी कशी घालत आहेत, आणि आपली गावं परंपरेचं पालन करत कशी समृद्धीच्या दिशेने वाटचाल करत आहेत, हे या उदाहरणांवरून स्पष्ट होतं.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
उद्या २६ ऑक्टोबरला महर्षी वाल्मिकी यांची जयंती आहे. हजारो वर्षांनंतरही वाल्मिकीजींचं रामायण आपल्याला काहीतरी नवी शिकवण देतं. महर्षी वाल्मिकी यांनी रामायणाच्या माध्यमातून आपल्याला जीवनाची खोल शिकवण दिली आहे. एकिकडे ते सातत्यपूर्ण प्रयत्न करायला सांगतात, तर दुसरीकडे सेवा, करूणा आणि सामाजिक समरसतेचं महत्त्व सांगतात. वाल्मिकी रामायणात भगवान रामाचं चरित्र या मूल्यांचं खूप सुंदर उदाहरण आहे. भगवान रामाने माता शबरीच्या प्रेम आणि भक्तीचा स्वीकार केला. निषादराजाच्या मैत्रीचा आदर केला. त्यांची सर्वांना सोबत घेऊन चालायची शिकवण आजही आपल्यासाठी दिशादर्शक आहे. या भावनेचं प्रतिबिंब अयोध्येतल्या भव्य राम मंदिरातही दिसून येतं. तिथे महर्षी वाल्मिकी, निषादराज आणि माता शबरी यांची मंदिरंही बनवण्यात आली आहेत. अयोध्येतल्या विमानतळालाही महर्षी वाल्मिकींचं नाव देण्यात आलं आहे याचा मला आनंद आहे. ही बाब आपल्या महान परंपरेला समृद्ध बनवते.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
भारताच्या मातीमध्ये असे कितीतरी महान व्यक्तिमत्त्वं जन्माला आली, ज्यांनी आपली कर्तृत्वाची अमिट छाप सोडली आहे. असेच एक महान व्यक्तिमत्त्व आहे भाई परमानंदजी. ४ नोव्हेंबरला आपण त्यांची १२५ वी जयंती साजरी करणार आहोत. आर्य समाजाशी त्यांचं नातं हीच त्यांची सर्वात मोठी प्रेरणा होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच भाई परमानंद आर्य समाजाच्या कामासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. तिथे त्यांची भेट पूज्य बापूंसोबत झाली. त्यांनी गुयाना इथे गिरमिटिया समाजासाठीही काम केलं. त्याकाळी ते आर्य समाजाचं मोठं केंद्र होतं. माझ्या गुयाना दौऱ्यात मला आर्य समाजाच्या स्मारकाच्या ठिकाणी जाण्याचं भाग्य लाभलं. मित्रांनो, भाई परमानंद यांनी स्वातंत्र्य लढ्यात मोठी भूमिका निभावली होती. लाला हरदयाल यांना अमेरिकेला जायला भाई परमानंद यांनीच प्रोत्साहन दिलं असं सांगितलं जातं. ते गदर पार्टीच्या संस्थापकांपैकी एक होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा प्रभाव एवढ्या प्रमाणावर होता की इंग्रजांनी त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली होती. ‘आपबीती – काले पानी की कारावास कहानी’ नावाचं त्यांचं एक पुस्तक आहे. स्वातंत्र्यसैनिकांचं बलिदान जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवं. शिक्षा भोगून आल्यानंतर भाई परमानंद यांनी शिक्षण क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, त्यांनी वीर भगतसिंग यांना सुद्धा शिकवलं आहे. त्यानंतर त्यांनी हिंदू महासभेच्या कामातही सहभाग घेतला. म्हणजे गांधीजींपासून गुयाना पर्यंत, गदरपासून अंदमानपर्यंतचा त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप प्रेरणादायक आहे. भाई परमानंद यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. युवा मित्रांना माझं आवाहन आहे की त्यांनी भाई परमानंद यांच्याविषयी जाणून घ्यावं आणि इतरांना प्रेरित करावं.
माझ्या प्रिय देशवासियांनो,
येणाऱ्या दिवसांत दिवाळी, छट महापर्व आणि अनेक इतर सण-उत्सवांचा उत्साह असेल. तुम्ही निरोगी आणि सुरक्षित राहून कुटुंबासह सण साजरे करा, आणि इतरांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घ्या. येणाऱ्या सणांच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा….नेहमीसारखंच यावेळीही तुमच्या सूचनांची मी वाट पाहीन. तुमच्या सूचनांमधूनच मन की बातसाठी नवे विषय सापडतात आणि नवी दिशा मिळते. देशवासियांच्या नव्या प्रयत्न आणि नव्या यशोगाथांसह पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटू. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
***
हर्षल अकुडे/आकाशवाणी मुंबई/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
Join LIVE... #MannKiBaat
— PMO India (@PMOIndia) October 25, 2026
#MannKiBaat is, for me, nothing less than a pilgrimage - a journey to closely understand the efforts of our people and to salute their contributions: PM @narendramodi https://t.co/GjvgZuitXU
— PMO India (@PMOIndia) October 25, 2026
An inspiring initiative is reviving traditional farming practices in Punjab... #MannKiBaat https://t.co/YGKv7c5hZ0
— PMO India (@PMOIndia) October 25, 2026
A commendable community effort in Uttarakhand is helping revive the Heval River and restore natural water sources... #MannKiBaat https://t.co/ZT6IgpPDIv
— PMO India (@PMOIndia) October 25, 2026
Bihar's Makhana and Karnataka's Arhar Dal are finding new markets across the world. Maharashtra's tribal products are gaining recognition through packaging that reflects the richness of tribal art. The popularity of Khadi is growing, supporting the artisans whose skills keep our traditions alive. Let's strengthen Vocal for Local by choosing products made by our local artisans. #MannKiBaat
— PMO India (@PMOIndia) October 25, 2026
Technology is bringing healthcare closer to people, even in the remotest corners of India. e-Sanjeevani is making timely medical advice more accessible to all. #MannKiBaat https://t.co/l5O5olBkPD
— PMO India (@PMOIndia) October 25, 2026
IIT Madras is advancing brain research to help scientists better understand the human brain. #MannKiBaat https://t.co/PsDfzdd9j8
— PMO India (@PMOIndia) October 25, 2026
Remembering Narinder Singh Kapany Ji, the Father of Fiber Optics, whose pioneering work transformed modern communication. #MannKiBaat https://t.co/G2XhoEg6Ut
— PMO India (@PMOIndia) October 25, 2026
Traditional millet farming is making a comeback in Meghalaya and Nagaland. It is creating new opportunities for farmers in the Northeast. #MannKiBaat https://t.co/AMMMS5sEak
— PMO India (@PMOIndia) October 25, 2026
Tributes to Maharishi Valmiki, whose Ramayan continues to inspire generations with its timeless wisdom and teachings. #MannKiBaat https://t.co/I9cQPINwyy
— PMO India (@PMOIndia) October 25, 2026
Bhai Parmanand Ji's life is a story of courage, sacrifice and dedication to the nation. Remembering his invaluable contribution to India's freedom struggle. #MannKiBaat https://t.co/Ckm9vmY7pL
— PMO India (@PMOIndia) October 25, 2026
Very inspiring efforts from across India highlighted in today’s #MannKiBaat. Join in… https://t.co/1QIa12bGCo
— Narendra Modi (@narendramodi) October 25, 2026