Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

ओदिशात भुवनेश्वरमध्ये आरबीआयच्या डेटा सेंटर आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन


पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशात  भुवनेश्वर येथे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या  नवनिर्मित डेटा सेंटर आणि सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेचे  उद्घाटन केले. महाप्रभू जगन्नाथांचे आशीर्वाद घेऊन पंतप्रधानांनी, नव्या भारताला एक महत्त्वाची नवी संस्था दिल्याबद्दल भुवनेश्वरचे कौतुक केले. या दोन्ही सुविधा सुरू केल्याबद्दल त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) आणि या उपक्रमात सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन केले. “या दोन्ही सुविधा, ओदिशा आणि देशातील जनतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील,” असा विश्वास  मोदी यांनी व्यक्त केला.

हा कार्यक्रम देशाच्या प्रशासकीय दृष्टिकोनातील एक मूलभूत बदल दर्शवतो, असे पंतप्रधानांनी देशाच्या प्रशासकीय दृष्टिकोनातील व्यापक बदल अधोरेखित करताना सांगितले. आजचे प्रशासन हे विकासाला प्राधान्य देणे, त्याचा विस्तार करणे आणि विकासाचे लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे यावर आधारित आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “भारतात प्रशासनाच्या दृष्टिकोनात कसा बदल झाला आहे, याचा पुरावा म्हणजे आजचा कार्यक्रम आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

संतुलित प्रादेशिक विकास, गरिबांचा सन्मान आणि कोणताही नागरिक मागे राहणार नाही हे सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या, लोकहितैषी, सक्रिय सुशासन प्रारुपाकडे झालेल्या बदलाची पंतप्रधानांनी सविस्तर माहिती दिली. आज द्रुतगती मार्ग लहान शहरांना एकमेकांशी जोडत आहेत, एम्स (AIIMS) सारख्या संस्था अनेक राज्यांमध्ये विस्तारल्या आहेत, लहान शहरांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये उघडली जात आहेत, गावांमध्ये सुमारे 1.75 लाख आयुष्मान आरोग्य मंदिरे स्थापन करण्यात आली आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले. तसेच, दुर्गम भागांमध्ये डिजिटल संपर्क व्यवस्था विस्तारत आहे, असे त्यांनी सांगितले. “नागरिकांचे जीवन सुकर करणे आणि त्यांच्या स्वप्नांना नवीन संधी देणे हाच आता शासनाचा खरा उद्देश आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले.

1960 आणि 70 च्या दशकात गरिबांच्या कल्याणासाठी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले होते, तरीही 2014 पर्यंत निम्म्याहून अधिक लोकसंख्या बँकिंग व्यवस्थेच्या कक्षेबाहेर राहिली होती, हे पंतप्रधानांनी लक्षात आणून दिले. त्या काळात मध्यमवर्गासाठी बँक कर्ज हे एक दूरचे स्वप्न होते, तसेच अल्पभूधारक, भूमिहीन आणि महिलांसाठी कर्ज मिळवणे अकल्पनीय होते, असेही त्यांनी सांगितले. आर्थिक समावेशनाच्या आधुनिक युगाने देशभरातील हे चित्र पूर्णपणे बदलून टाकल्याचे त्यांनी सांगितले. “आज भारतात, डिजिटल बँकिंग द्वारे प्रत्येकजण 24-तास बँकिंग सेवांशी जोडला गेला आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

“आज, डिजिटल बँकिंगमुळे देशातील प्रत्येक कुटुंब लाभार्थी बनले आहे,” असे त्यांनी सांगितले. आज सरकारी योजनांच्या लाभ वितरणात होणारी कोणत्याही प्रकारची गळती पूर्णपणे संपुष्टात आल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. केंद्र सरकारकडून वितरित केला जाणारा प्रत्येक रुपया आता लाभार्थ्याच्या खात्यात कोणत्याही गळतीशिवाय सुस्थितीत पोहोचत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. “देशात उघडलेल्या जवळपास 60 कोटी जन धन खात्यांमुळेच हे शक्य झाले आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

कर्ज मिळवण्यासाठी तारण ठेवण्यासाठी काहीही नसलेल्या व्यक्तींनाही आता व्यवसाय सुरू करण्यासाठी परवडणारे औपचारिक कर्ज मिळू शकते, यावर पंतप्रधानांनी भर दिला. लक्ष्यित उपाययोजनांमुळे छोटे उद्योजक, पारंपरिक कारागीर, फेरीवाले आणि असंघटित कामगार भरभराटीला येत आहेत, हे त्यांनी अधोरेखित केले. मुद्रा योजनेअंतर्गत 13 कोटी लोक प्रथमच उद्योजक बनले, पीएम स्वनिधी आणि पीएम विश्वकर्मा योजनांच्या माध्यमातून लाखो फेरीवाले आणि कुशल कारागिरांना औपचारिक कर्ज मिळाले, तसेच 10 कोटी ग्रामीण महिलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बचत गटांना बँकेकडून हजारो कोटी रुपयांची मदत मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. “पहिल्यांदाच त्यांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेचा लाभ मिळाला आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

यापूर्वी केवळ श्रीमंतांपुरतेच मर्यादित असलेली डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स, आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक बनलेल्या कोट्यवधी ‘रुपे’ (RuPay) कार्ड्सच्या माध्यमातून आज प्रत्येक सामान्य नागरिकाच्या हाती पोहोचली आहेत. या परिवर्तनाची नोंद घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाचे श्रेय संपूर्ण बँकिंग क्षेत्राला दिले. त्यांनी मध्यवर्ती बँक, व्यावसायिक बँका आणि देशातील प्रत्येक बँकिंग कर्मचाऱ्याच्या सामूहिक प्रयत्नांचे कौतुक करत, “तुम्ही सर्वजण या गौरवाचे समान भागीदार आहात.” असे नमूद केले.

‘नागरिक देवो भव’ या मंत्राच्या प्रेरणेने आर्थिक सक्षमीकरणासोबतच सामाजिक सुरक्षा कवचाचा अभूतपूर्व विस्तार कसा झाला, याचा सविस्तर उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला. अटल पेन्शन योजनेचा लाभ आज 9 कोटी नागरिकांना मिळत असून त्यात ओडिशातील 38 लाख लोकांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, वर्षाला अवघ्या 20 रुपयांच्या हप्त्यात 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण देणारी ‘पीएम सुरक्षा विमा योजना’ आणि वर्षाला 430 रुपयांहून कमी हप्त्यात आयुष्य विमा देणारी ‘पीएम जीवन ज्योती योजना’ यामुळे एकेकाळी लक्झरी मानला जाणारा विमा आता गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांच्या सहज शक्य झाला असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.

इतर सरकारांनी अशा विमा दाव्यांच्या वाटपाची मोठी प्रसिद्धी केली असती, मात्र आपल्या सरकारने कठीण काळात कुठलाही गाजावाजा न करता, 25,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे दावे पीडित कुटुंबांच्या खात्यात वितरीत केले आहेत, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. “यालाच सुशासन म्हणतात,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मागील दशकात ‘बँकिंग व्यवस्थेपासून वंचित राहिलेल्या घटकांना बँकेशी जोडण्यावर’ लक्ष केंद्रित करण्यात आले होते, तर येणारे दशक ओदिशाचे नवीन डेटा सेंटर आणि अत्याधुनिक संगणकीय प्रणालींच्या मदतीने बँकिंग व्यवस्था अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी समर्पित असेल, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. आधुनिक युद्धतंत्रात बदलत्या सायबर धोक्यांद्वारे थेट अर्थव्यवस्थांना लक्ष्य केले जात असल्याचा इशाराही त्यांनी दिला. एक उदयोन्मुख आर्थिक महासत्ता म्हणून आपल्या वित्तीय व्यवस्थेला सायबर फसवणूक करणाऱ्यांपासून आणि सायबर दहशतवाद्यांपासून सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. जुनी आणि कालबाह्य झालेली प्रशिक्षण साधने बदलून त्याऐवजी आधुनिक पायाभूत सुविधा आणि कुशल मानवी संसाधने तयार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. “याच ठिकाणी या नवीन सायबर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते,” असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

‘विकसित भारता’चे एक शक्तिशाली विकासाचे इंजिन म्हणून पूर्व भारताकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले, आणि ओदिशाच्या विद्यमान सरकारच्या वतीने सुरू असलेल्या विकासकामांचा उल्लेख केला. राज्य आपले पारंपरिक खनिजांवर आधारित उद्योग आणि सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, डेटा सेंटर्स तसेच प्रगत संगणन यांच्या नवीन व्यवस्थेची सांगड घालून ‘खाणींपासून ते मायक्रोचिप्सपर्यंत’ एक नवीन भविष्य घडवत असल्याचे त्यांनी नमूद केले. हे नवनवीन मार्ग ओदिशाच्या तरुणांसाठी अमर्याद संधी उपलब्ध करून देतील आणि त्यांची मोठी स्वप्ने पूर्ण करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या भाषणाचा शेवट पंतप्रधानांनी, आगामी सण-उत्सवांच्या हार्दिक शुभेच्छा देऊन ‘जय जगन्नाथ’च्या जयघोषाने केला. “तुम्ही पाहाल, ओदिशा ‘खाणींपासून मायक्रोचिप्सपर्यंत’ एक नवीन भविष्य लिहायला सज्ज असेल,” असा दृढ विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

***

राधिका अघोर/शैलेश पाटील/आशुतोष सावे/श्रद्धा मुखेडकर/वैभवी जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]