पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4.30 च्या सुमाराला नवी दिल्लीत भारत मंडपम इथे भारत अक्षय ऊर्जा परिषद आणि प्रदर्शन 2026 म्हणजेच भारत रिन्यूएबल एनर्जी समिट अँड एक्सपो 2026 चे उद्घाटन करतील. याप्रसंगी ते उपस्थितांना संबोधितही करतील.
चार दिवस चालणारी ही परिषद 2 ते 5 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेची संकल्पना गुंतवणूक नवोन्मेष व प्रेरणा अशी आहे.
भारत आरई 2026 मध्ये 130 हून अधिक देशांतील प्रतिनिधी सहभागी होतील. यामध्ये 40 हून अधिक मंत्री, धोरणकर्ते, गुंतवणूकदार, वित्तीय संस्था आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींचा समावेश असेल. हे व्यासपीठ स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक, उद्योग सहभाग आणि तंत्रज्ञान भागीदारीसाठी एक जागतिक मंच म्हणून काम करेल. ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, युरोपीय महसंघ, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, नॉर्वे, स्वीडन आणि युनायटेड किंगडम हे देश भागीदार देश म्हणून यात सहभागी होत आहेत.
आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही 13 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, या प्रदर्शनात, आपली अक्षय ऊर्जा क्षमता, गुंतवणुकीच्या संधी आणि उत्पादन क्षमतांचे प्रदर्शन करतील.
आंतरराष्ट्रीय सौर आघाडी महासभेचे नववे सत्र आणि हरित हायड्रोजन विषयक चौथी आंतरराष्ट्रीय परिषद ययांच्या समवेत, ही परिषद आयोजित केली जाईल. भारत आरई प्रामुख्याने स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक, उद्योग आणि तंत्रज्ञान भागीदारीवर लक्ष केंद्रित करेल, तर आयएसए च्या महासभेत सौर ऊर्जेच्या क्षेत्रात—आर्थिक बाबी आणि संस्थात्मक क्षमतांसह—आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देईल. आयसीजीएच हे प्रामुख्याने ग्रीन हायड्रोजन तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि त्याच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करेल. एकत्रितपणे, हे तीनही मंच आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक बळकट करतील आणि स्वच्छ ऊर्जेच्या प्रसाराला गती देतील. भारताची प्रमुख अक्षय ऊर्जा गुंतवणूक शिखर परिषद असलेल्या री-इन्व्हेस्टच्या वारशावर आधारित, भारत आरई 2026 स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात जागतिक सहभागासाठी एक विस्तारित व्यासपीठ उपलब्ध करून देईल. या शिखर परिषदेत गुंतवणूक, भागीदारी आणि प्रकल्प विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी व्यवसाय-ते-व्यवसाय, व्यवसाय-ते-सरकार आणि सरकार-ते-सरकार यांच्यातील संवादासोबतच, पूर्ण सत्रे, मंत्रीस्तरीय चर्चा, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज बैठका आणि देश व राज्यस्तरीय सत्रांचेही आयोजन केले जाईल. या एक्स्पोमध्ये 400 हून अधिक प्रदर्शक सहभागी होतील, जे सौर आणि पवन ऊर्जा, हरित हायड्रोजन, ऊर्जा साठवणूक आणि इतर उदयोन्मुख क्षेत्रांमधील प्रगत तंत्रज्ञान, भारतीय उत्पादन क्षमता आणि स्वच्छ ऊर्जा अशा क्षेत्रातील समस्यांवरच्या त्यांच्या उपाययोजना या प्रदर्शनात मांडतील.
***
राधिका अघोर/राजेश शिरभाते/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai