Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून नोएडा सेक्टर-51 ते ग्रेटर नोएडा सेक्टर-04 या मार्गावरील 8.449 किलोमीटर लांबीच्या आणि 5 स्थानके असलेल्या ॲक्वा लाईन मेट्रो रेल्वे मार्गिकेच्या विस्ताराला मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोएडा मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत नोएडा सेक्टर-51 ते ग्रेटर नोएडा सेक्टर-04 या ॲक्वा लाईन मेट्रो रेल्वे मार्गिकेच्या विस्ताराला मंजुरी देण्यात आली. या मार्गिकेची लांबी 8.449 किलोमीटर असून त्यावर 5 उन्नत स्थानके असतील. ही मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर नोएडा आणि ग्रेटर नोएडा शहरांमधील सक्रिय मेट्रो रेल्वे नेटवर्कची एकूण लांबी 71.878 किलोमीटर होईल.

लाभ आणि विकासाला चालना

नोएडा मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत नोएडा सेक्टर-51 ते ग्रेटर नोएडा सेक्टर-04 या ॲक्वा लाईन मेट्रो रेल्वे मार्गिकेचा विस्तार हा शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रकल्पामुळे शहरातील मेट्रो रेल्वे नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे.

सुधारित दळणवळण सुविधा

नोएडा मेट्रो प्रकल्पांतर्गत नोएडा सेक्टर-51 ते ग्रेटर नोएडा सेक्टर-04 या ॲक्वा लाईन मेट्रो रेल्वे मार्गिकेच्या विस्तारामुळे सुमारे 8.449 किलोमीटर लांबीची नवीन मेट्रो मार्गिका उपलब्ध होईल. सध्या कार्यक्षम दळणवळण सुविधांचा अभाव असलेल्या नोएडा आणि ग्रेटर नोएडा शहरांमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत यामुळे लक्षणीय सुधारणा होईल. तसेच नोएडा सेक्टर-61 येथील ब्लू लाईन मेट्रोशी अदलाबदल सुविधेसह अधिक प्रवासी मागणी असलेल्या महत्त्वाच्या मार्गिकांशी थेट जोडणी उपलब्ध होईल.

या टप्प्यामुळे नोएडामधील खालील महत्त्वाच्या क्षेत्रांना मेट्रो नेटवर्कशी सुरळीतपणे जोडण्याचे उद्दिष्ट आहे :

• गौर सिटी मॉल, एच अँड एस मॉल आणि कार्यालयीन जागा, ब्लू सॅफायर मॉल तसेच ग्रेटर नोएडा सेक्टर-04 येथील व्यावसायिक जागा, नोएडा सेक्टर-51 येथील आयकिया आणि नोएडा सेक्टर-73 येथील अँथुरियम मॉल यांसारखी व्यावसायिक केंद्रे.

• नोएडा सेक्टर-60 येथील टेक महिंद्रा आणि टीसीएल टेकची कार्यालये, नोएडा सेक्टर-73 येथील ऑइल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बोर्ड तसेच ग्रेटर नोएडा सेक्टर-04 येथील गोल्डन आय कार्यालय आणि व्यावसायिक जागा यांसारखी प्रमुख बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आणि माहिती तंत्रज्ञान केंद्रे.

• नोएडा सेक्टर-122 येथील दिल्ली पब्लिक स्कूल यांसारख्या शैक्षणिक संस्था.

• नोएडा सेक्टर-70 येथील कैलाश हॉस्पिटल आणि रामा हॉस्पिटल, नोएडा सेक्टर-51 येथील क्लाउडनाईन हॉस्पिटल तसेच नोएडा सेक्टर-62 येथील रामा हॉस्पिटल यांसारख्या महत्त्वाच्या आरोग्य सुविधा.

• नोएडा सेक्टर-122 येथील क्लिओ काउंटी निवासी संकुल तसेच ग्रेटर नोएडा सेक्टर-04 येथील गौर सिटी 1 आणि 2 यांसारख्या प्रमुख निवासी संकुलांना जोडणी मिळेल.

या महत्त्वाच्या क्षेत्रांना मेट्रो नेटवर्कशी जोडल्यामुळे नोएडा सेक्टर-51 ते ग्रेटर नोएडा सेक्टर-04 या ॲक्वा लाईन मेट्रो रेल्वे मार्गिकेच्या विस्तारामुळे केवळ दळणवळण सुविधाच सुधारतील असे नाही, तर आर्थिक व्यवहारांनाही चालना मिळेल. तसेच रोजगार, व्यवसाय, शिक्षण आणि सर्वसाधारण प्रवासासाठी रहिवासी आणि प्रवाशांना शहरी वाहतूक अधिक सुलभ होईल.

PM India

***

Nitin Fulluke / Gajendra Devda / Madhura Nerurkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai