Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

माध्यमे, तंत्रज्ञान आणि दूरसंवाद क्षेत्रातील प्रमुखांशी पंतप्रधानांची गोलमेज बैठक – भारताची यशोगाथा

माध्यमे, तंत्रज्ञान आणि दूरसंवाद क्षेत्रातील प्रमुखांशी पंतप्रधानांची गोलमेज बैठक – भारताची यशोगाथा


अमेरिकेतील प्रसारमाध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रातील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोलमेज बैठक घेतली.

या बैठकीला न्यूज कॉर्प आणि 21st सेंच्युरी फॉकस कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष रुपर्ट मरढोक, याच कंपनीचे सीईओ जेम्स मरढोक, न्यूज कॉर्प कंपनीचे सीईओ रॉबर्ट थॉम्सन, स्टार इंडिया कंपनीचे सीईओ उदय शंकर, डिस्कव्हरी कम्युनिकेशन्‍सचे सीईओ डेव्हिड झास्लाव, सोनी एंटरटेनमेन्टचे सीईओ मायकल लिन्टन, इंटर पब्लिक ग्रुप ऑफ कंपनीजचे सीईओ मायकल रॉथ, व्हाईस मिडिया कंपनीचे सीईओ शेन स्मिथ, डब्ल्यूपीपी कंपनीचे सीईओ मार्टिन सॉरेल, टाईम वॉनरचे सीईओ जेफ बिव्हकेस, ए अँड ई नेटवर्कच्या सीईओ नॅन्सी डयूबक, व्हीसी इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ॲन्टनी प्राट, रुट वन इन्व्हेस्टमेंट कंपनीचे विल्यम दुहामेल आणि व्हॅल्यू ॲक्ट कॅपिटल कंपनीचे सीईओ जेफ उबेन उपस्थित होते.

पंतप्रधानांच्या ऊर्जात्मक आणि धडाडीच्या नेतृत्वाचे या प्रमुखांनी यावेळी कौतुक केले आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याविषयी सकारात्मक भावना व्यक्त केल्या. भारतात होत असलेल्या डिजिटल क्रांतीविषयी या प्रमुखांनी विशेषत्वाने उत्साह दाखवला. भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या सुरु असलेले महत्त्वपूर्ण बदल आणि वाढ यामुळे या क्षेत्रात विकासाला मोठी चालना मिळाली असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दूरचित्रवाणी क्षेत्रात डिजिटायझेशन आणि मोबाईल क्षेत्रात पायाभूत सुविधा अधिक भक्कम होण्याची गरज असल्याचे मत या प्रमुखांनी यावेळी व्यक्त केले.

प्रसारमाध्यमे आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या होत असलेले बदल यामुळे ज्ञानाचा प्रसार शेवटच्या व्यक्तीपर्यंत होत आहे, एका अर्थाने हे ज्ञानाचे लोकशाहीकरणच आहे असे निरिक्षण यावेळी पंतप्रधान आणि कंपन्यांच्या प्रमुखांनी व्यक्त केले. सध्याचे युग हे तंत्रज्ञान युग आहे त्यामुळे भौतिक पायाभूत विकासाइतकेच डिजिटल पायाभूत विकासाचे महत्त्व आहे असे पंतप्रधान म्हणाले. भारत हे प्रसारमाध्यम आणि तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक संधी आणि एक आव्हानही आहे, असे सांगत भारतात गुंतवणूक करतांना प्रादेशिक भाषांमधील प्रसारमाध्यमेही लक्षात घ्यावी अशी सूचना पंतप्रधानांनी केली. येत्या काळात 600,000 गावे ब्रॉड-बॅण्ड सेवेने जोडण्याची सरकारची योजना असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. एकविसाव्या शतकातील भारतीय नागरिकांची कल्पना करा, त्यांची मूल्ये, त्यांच्या समोरील आव्हाने या सर्वांचा विचार करावा असा सल्ला पंतप्रधानांनी यावेळी दिला. मनुष्यबळ विकासात डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची ठरु शकेल असेही पंतप्रधानांनी सूचित केले. लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आणि भारताचा विकास करण्यासाठी देखील डिजिटल टेक्नॉलॉजीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

R.Aghor/S.Tupe