Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्टार्ट-अप कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण (27 सप्टेंबर 2015, सॅन होजे, कॅलिफोर्निया

स्टार्ट-अप कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण 
(27 सप्टेंबर 2015, सॅन होजे, कॅलिफोर्निया

स्टार्ट-अप कार्यक्रमातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण 
(27 सप्टेंबर 2015, सॅन होजे, कॅलिफोर्निया


तुम्हा सर्वांचे आभार !

आज याठिकाणी जमलेल्या अद्वितीय अशा तरुणाईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.

रविवारच्या दिवशी तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने जमा झाल्याबद्दल धन्यवाद.

रेड हॉफमन, तुमचे लिंकडेन हे अतिशय उत्कृष्ट उत्पादन आहे. इथे जमलेल्यांसाठी आणि भारतातील कित्येकजणांसाठी तुम्ही प्रेरणादायी आहात.

मोहन, व्यंकी, राजदूत तुमचे धन्यवाद.

इथे उपस्थित राहताना मला अतिशय आनंद होत आहे. माझ्यासाठी ही विशेष बाब आहे, कारण स्टार्टअप ही संकल्पना माझ्या हृदयाशी निगडीत आहे.

तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, असे का, कारण सरकारे व राष्ट्रीय राजधान्या स्टार्टअपसाठी नाही तर वेग मंदावण्यासाठी ओळखली जात होती.

एकेकाळी सिलिकॉन व्हॅलीबद्दल वॉशिंग्टनचा हाच दृष्टीकोन होता, आणि अगदी तशाचप्रकारे बेंगळुरूतील तंत्रज्ञान व्यावसायिकांचा दिल्लीकडे पाहण्याचा दृष्टीकोन होता.

आणि, मला माहित आहे, तुमच्यापैकी बऱ्याचजणांना असे वाटत असेल की ज्या समस्यांचे लिखित ऍप अजून निर्माण झाले नाहीत, त्याच समस्यांचे निराकरण बाकी आहे.

मी जेंव्हा गेल्यावर्षी दिल्लीत आलो, त्यावेळी माझे सरकार स्टार्टअप असेल असा विचार मी केला. म्हणूनच तुम्हाला या मार्गावर काही अडथळेही दिसत असतील.

मी तुमच्यासमोर असलेल्या आव्हानांना समजू शकतो, पण त्याचवेळी काहीतरी नवनिर्मितीची भावना सुखद आहे.

मानवी इतिहास आणि प्रगतीने कल्पनाशक्ती, प्रेरणा, संशोधन आणि नावीन्यपूर्ण कल्पना या माध्यमातून आकार घेतला आहे.

मी नेहमी म्हणतो, जर जोराचे वारे वाहत असेल तर, काही लोक खिडकी बंद करु इच्छितात. तर काही जण पवनचक्की उभारू पाहतात तर काहीजण समुद्रावर आपले शिड घेऊन जातात.

काही गोष्टींबाबतचे आकलन ही आव्हान व संधी आहे, जी मानसिक शैथिल्य आणि पुढाकार यातील फरक दर्शवते, तसेच जैसे-थे स्थिती आणि प्रगती यातीलही फरक दर्शवते.

स्टार्टअप्स ही संकल्पना या जगाएवढीच प्राचीन आहे. प्रत्येक आर्थिक युग हे पूर्वीच्या अडथळ्यांमुळे ओळखले जाते, जुनाट व परंपरागत विचार आणि उत्पादनांच्या जागी नवनवीन विचारांची उत्क्रांती होते.

स्टार्टअप्स हे नेहमीच विकासाचे इंजिन राहिले आहे. आजची मोठमोठी महामंडळे ही पूर्वीची स्टार्टअप्स आहेत.

फरक एवढाच आहे की आज डिजीटल युगामुळे स्टार्टअप्ससाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे.

आजचे जग असे आहे, की तुम्ही यातून संसाधनांना वगळून नाही तर नवनवीन संकल्पनांच्या आधारे पुढे जाऊ शकता. निर्मात्यापेक्षाही हा उपभोक्ता आहे, जो अनुप्रयोग शोधत राहतो.

आज स्टार्टअप्समुळे विकासाचे नैसर्गिक मापदंड निर्धारित केले जात आहेत. एका वर्षाच्या आतच एखादी कल्पना जगभर पसरत आहे. करोडोंच्या संख्येने ग्राहक जोडले जात आहेत, हजारोंच्या संख्येने कर्मचारी जोडले जात आहे, आणि कोट्यवधींच्या दराने मुल्यांकन केले जात आहे.

तंत्रज्ञानाचे अभिसरण, वैविध्यपूर्ण क्षेत्रातील एकात्मता, वितरित स्थापत्यकला आणि कल्पनांना मिळणारा जनमताचा पाठिंबा यामुळे उद्योजकांना एक नवे विश्व खुले झाले आहे.

पर्यावरणीय संस्थेचा जन्मच सिलिकॉन व्हॅलीत झाला आहे. कॅलिफोर्नियाच्या तटावरील समुदायाने ज्यापद्धतीने आपल्या जगाला आकार प्रदान केला आहे, तशी कामगिरी कोणत्याच समुदायाने केली नाही.

फक्त मोठमोठी नावेच नाही तर, लहान कंपन्यांनीही दरदिवशी मानवी जीवन अधिक संपन्न केले आहे.

हेच अमेरिकेच्या यशाचे गमक आहे आणि जगासाठी प्रेरणा ठरले आहे.

म्हणून स्टार्टअप्स, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषी कल्पना ही भारताच्या परिवर्तनासाठी
रोमांचक आणि प्रभावी साधन आहे तसेच यामुळे युवकांसाठी रोजगारनिर्मितीचे नवे दालन खुले होईल.

आमच्याकडे वय वर्ष 35 पेक्षा कमी असलेल्या तरुणांची संख्या 800 मिलियन आहे. ते परिवर्तनासाठी उत्सुक आहेत, त्याच्या पाठपुराव्यासाठी त्यांच्याकडे ऊर्जा आहे, आणि यश संपादन करण्याविषयी आत्मविश्वास आहे.

जर पाचशे शहरांनी दहा स्टार्टअप्स सुरू केले आणि आमच्या सहा लाख खेड्यांनी सहा छोटे उद्योग नियमितपणे सुरू केले तर, आम्ही प्रचंड अशी आर्थिक गती प्राप्त करु व आमच्या देशात मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती करू शकू.

स्टार्टअप्ससाठी भारताची स्वतःची परिसंस्था वेगाने विकसित होत आहे. जी आमच्या युवकांच्या ऊर्जा, उद्योजकता आणि नवोन्मेषी संकल्पांनी भरलेली आहे.

आमची बाजारपेठ प्रत्येक क्षेत्रातील विकासाचा प्रचंड वेग आणि संधी निर्माण करणारी आहे. नवनवीन प्रकल्पांसाठी आमच्याकडे आज संस्था, प्रोत्साहन आणि रुची आहे. आमच्याकडे कल्पनांचा पाठपुरावा करणारे आणि जोखीम पत्करणारे लघु उद्योजक (इनक्युबेटर्स), ऍक्सलरेटर्स आणि गुंतवणूकदार आहेत.

भारत आज स्टार्टअप्स समुहाच्या संभाव्यतांसाठी प्रचंड उत्साह आणि ऊर्जेने जागा झाला आहे. मागच्या काही वर्षात त्यांचा प्रचंड वेगाने विकास झाला आहे.

याठिकाणी भारतातून आलेला स्टार्टअप्सचा मोठा समूह आहे. हे लोक आता आरोग्यक्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, कृषी, स्वच्छ ऊर्जा, सुरक्षा, गरिबांची आर्थिक समावेशकता आणि स्वच्छ पाण्याची उपलब्धता यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

आमचे स्टार्टअप्स समूह हे केवळ व्यावसायिक यशोगाथा सांगत नाही तर ते सामाजिक नवोन्मेषाचे मोठे उदाहरण आहे.

भारतीयांकडून डिजीटल साधनांचा ज्या वेगाने वापर होत आहे ते आमच्या विकासाची, शैक्षणिकतेची, भाषेची आणि उत्पन्नाची परिभाषा दर्शवते.

भारतात सुमारे एक अब्ज लोकांकडे मोबाईल फोन आहे, स्मार्ट फोन्स आणि इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या शंभर मिलियन आहे, जी वेगाने वाढत आहे.

भारताच्या विकासाच्या गरजांचे प्रमाण फार मोठे आहे, आणि या तात्काळ पूर्ण करण्याची गरज आहे.

आम्हाला विकासाच्या पारंपरिक मार्गावरुन चालणे आता मंजूर नाही.

डिजीटल इंडियाच्या मागे हीच प्रेरणा आहे आणि दूरदृष्टी आहे, ज्याबाबत मी काल रात्री बोललो आहे. तंत्रज्ञानाचा वापर सुशासन, नागरिकांचे सबलीकरण, संधींची उपलब्धता, सामाजिक परिवर्तन, विकासाचे परिमाण आणि वेग वाढवण्यासाठी, सेवांच्या वितरणात सुविधा, गरीबांसाठी अनुकूल अशा उत्पादनांची निर्मिती, काही विशिष्ट गटांसाठी सेवांचे वर्गीकरण आणि आमच्या वसुंधरेच्या शाश्वत भविष्यासाठी झाला पाहिजे.

आमची ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्टार्टअप्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

पायाभूत सुविधांची निर्मिती ते सेवांची उपलब्धता, उत्पादन निर्मिती ते मनुष्यबळ विकास, नागरिकांना डिजीटल साक्षरतेसाठी प्रवृत्त करण्यासाठी सरकारांना पाठिंबा देणे, यासाठी डिजीटल इंडिया ही सायबर जगातील प्रचंड मोठी संधी आहे.

माझ्या दृष्टीने स्टार्टअप्स ही अल्पकालीन गुंतवणूक नाही तर ती दीर्घकालीन वचनबद्धता आहे.

आमचे अनुप्रयोग आणि उद्योग हे केवळ आमच्या कल्पनाशक्तीपुरते मर्यादीत आहेत.
आज आम्हाला याठिकाणी आमच्या अंतराळ संशोधन विभागाकडून पोर्टलवर सर्व तपशील पुरवला जातो. मागच्या काही महिन्यांमध्ये आम्ही अंतराळ संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित 170 ऍप्लीकेशन्स सुशासन आणि विकासासाठी एकत्रित केली आहेत.

यापैकी बहुतेक उपकरणे ही आगामी काळात भारतासाठी नवीन संशोधन प्रकल्प सुरू करणारी ठरतील.

पण, हे फक्त शहरी उद्योजकांनी डिजीटल व्यासपीठावर आणि प्रगत शास्त्राच्या माध्यमातून निर्माण केलेल्या संधी असणार नाहीत.

स्टार्टअप्सच्या कल्पना आणि चैतन्यातून भारतातील आर्थिक परिस्थिती गरीब लोकांचे जीवन बदलणारी ठरावी, असे मला वाटते. हातमाग उद्योगापासून ते पर्यटनापर्यंत, भारतातील संधी अमर्यादीत आहेत.

मला हे प्रामुख्याने ग्रामीण महिलांसाठी केलेले पाहायचे आहे, ज्यांनी संधी मिळताच उद्योगांमध्ये प्रचंड यश संपादन केले आहे. त्यांनी केवळ ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्येच नाही तर आमच्या समाजामध्येही परिवर्तन घडवून आणले आहे.

विकासाच्या प्रारुपात आम्ही सार्वजनिक क्षेत्र आणि खासगी क्षेत्र यापुरतेच बोलतो. मी आता तिसऱ्या क्षेत्राविषयी बोलणार आहे ते आहे व्यक्तीगत क्षेत्र, ज्यात लघु उद्योजक आणि सुक्ष्म वित्त यांचा समावेश आहे.

म्हणूनच मी यावर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या संबोधनात स्टार्टअपवर लक्ष केंद्रीत केले होते.

या मोहिमेला बळकटी देणाऱ्या योजना आम्ही सुरू करत आहोत. मी तुम्हाला आश्वस्त करतो की, दीर्घ सरकारी प्रक्रियेमुळे तुमच्या सर्जनशीलतेला अडकाठी ठरणार नाहीत.

एक आहे अटल नाविन्यता मोहीम (अटल इनोवेशन मिशन), जे नवोन्मेषाला चालना देण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने सुरू केले आहे.

दुसरे आहे सेतू, ज्याचा अर्थ जोडणी असा होतो- स्वयं रोजगार आणि प्रतिभा वापराचा सेतू (सेल्फ एम्पलॉयमेंट अँड टॅलेन्ट युटिलायजेशन). हा लघुउद्योजक आणि सुविधा प्रदाता असा कार्यक्रम असणार आहे.

नवीन उत्पादनांसाठी आम्ही इलेक्ट्रॉनिक विकास निधीची उभारणी करणार आहोत.
भारतात उद्योग सुरू करण्यासाठी आम्ही नियमन व प्रक्रिया यात सुधारणा करत आहोत, आणि भारतात उद्योग सुरू करणे सुलभ होईल याकडे लक्ष देत आहोत.

आम्ही डिजीटल संरचना आणि सुविधा सर्वांना सहज आणि स्वस्त दराने उपलब्ध होतील, तसेच सहा लाख खेड्यांमध्ये ब्रॉडबॅण्डचे जाळे आणि शाळा, विद्यापीठे आणि सार्वजनिक ठिकाणांवर मोफत वाय-फाय उपलब्ध करुन देणार आहोत.

आम्ही सर्व तपशील गोपनीय आणि सुरक्षित ठेवण्याला सर्वोच्च महत्त्व देत आहोत. तसेच बौद्धीक संपदा अधिकार आणि सायबर सुरक्षेला प्राधान्य दिले आहे.

म्हणून मेक इन इंडिया, स्किल इंडिया आणि डिजाईन इंडिया यामुळे अमर्यादीत संधी निर्माण होणार आहेत.

म्हणून मित्रांनो, जेंव्हा आम्ही स्टार्टअप्सचा विचार केला तेंव्हा आपसूकच पहिल्या परदेशी कार्यक्रमासाठी आम्ही सिलिकॉन व्हॅलीची निवड केली.

भारत आणि अमेरिका दोघांमध्ये ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी नवोन्मेषी कल्पना आणि तंत्रज्ञानात नैसर्गिक भागीदारी आहे.

मला असे सांगण्यात आले की, याठिकाणच्या स्टार्टअप्समध्ये 15 टक्के भारतीयांची वाट आहे. याठिकाणाहून आणि भारतातून हजारोंच्या संख्येने भारतीय व्यावसायिक अमेरिकी उद्योगाच्या जागतिक यशात भागीदार आहेत. तर काही याचे नेतृत्वही करत आहेत.

आमची विद्यापीठे, प्रयोगशाळा आणि कंपन्या पुढील पिढ्यांसाठी जैवइंधन, सौर ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता या क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे काम करत आहेत.

स्टॅनफोर्डमधील तरुण बुद्धीजीवी भारतात दिल्लीतील भारतीय सहकाऱ्याबरोबर भागीदारी करुन ग्रामीण भारतासाठी परवडण्याजोग्या दराने बायोमेडिकल उपकरणांची निर्मिती करण्यावर काम करत आहे. एमआयटी टाटा सेंटरच्या ‘खेतवर्क’ कार्यक्रमामुळे सौर ऊर्जेवर आधारित साधनांच्या माध्यमातून लहान शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणले आहे.

आता इथे मनू प्रकाश उपस्थित आहे, स्टॅनफोर्डमधील युवा भारतीय शास्त्रज्ञ, ज्याच्या नावाची स्टॅनफोर्डमध्ये प्रयोगशाळा आहे.

हीच आमच्या सहकार्याची आणि सहयोगाची शक्ती आहे. इथे बसून तुम्ही एखाद्या सदूर गावातील युवकाच्या आयुष्याची माहिती घेऊ शकता.

मला विश्वास आहे की, भारतातील एका छोट्या गावातील लहान मुलगी आपल्या स्वप्नातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आज प्रदर्शकांकडे पाहते आहे. आणि मुंबई अथवा कुठल्यातरी समुद्रकिनाऱ्यावरील देवदूत तिच्या स्वप्नांची पूर्तता करतो आहे.

डिजीटल सेतूमुळेच हे शक्य आहे- सदूर जीवांना एकत्र आणणे आणि त्यांचे भविष्य बदलणे.

हेच नवोन्मेषी कल्पनांचे आणि तरुणांचे सामर्थ आहे.

यामुळे भारत व अमेरिकादरम्यानची भागीदार प्रज्वलित होणार आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमध्ये भरभराट येईल आणि भागीदारीला एका नवा आयाम प्राप्त होईल.

यामुळे आपल्याला डिजीटल शतकामध्ये प्रवेश करता येईल आणि मानवी जीवनाच्या समस्यांवर निराकरण करता येईल व जागतिक आव्हानांचा मुकाबला करता येईल.

मला आनंद होत आहे की, आज मोठ्या प्रमाणात भागीदार निर्माण झाले.

भारत फंडाचा शुभारंभ ही माझ्यासाठी गौरवाची बाब होय- जे केवळ भारतासाठी नाही तर उत्तम आरोग्य, कृषी, तंत्रज्ञानासाठी उपयुक्त आहे.

मला आनंद होत आहे की, क्वालकॉमने भारतातील स्टार्टअपसाठी 150 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा निधी जाहीर केला. टीआयईच्या अमूल्य अशा प्रस्तावांसाठी आणि स्टार्टअप्ससाठी अनुकूल वातावरण तयार करुन दिल्याबद्दल आभार.

मी जाणतो की, तुम्ही तुमच्या बुद्धीमत्तेच्या आणि उद्योजकतेच्या जोरावर यश संपादन कराल. पण, जेंव्हा केंव्हा तुम्हाला मदतीची गरज असेल वा तुमच्या मार्गात काही अडथळे निर्माण झाले तर आम्ही तुमच्यासाठी आहोत.

नॅसकॉम, भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद आणि टीआयई, सिलिकॉन व्हॅलीचे या खास कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आभार.

मला विश्वास आहे की, तुम्ही भारतातील तरुणांमध्ये प्रेरणा निर्माण केली असेल, हजारो नवीन स्वप्नांना जन्म दिला असेल, आणि यातूनच तुम्ही भारत-अमेरिका भागीदारीची बिजे रोवली आहेत.

धन्यवाद.

S.Thakur/M. Desai