पीएम्इंडिया
नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतल्या पदकविजेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.
सर्व पदक विजेत्यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले तसेच पदक प्राप्त करण्यात असफल ठरलेल्या मात्र उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
क्रीडा क्षेत्रातली कामगिरी प्रत्येकाला स्फूर्ती देते. पदकविजेत्या खेळाडूंच्या कामगिरीमुळे देशाची मान अभिमानानं उंचावली आहे. जागतिक क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रीडापटूने विजय संपादन केल्यानंतर भारताचा राष्ट्रध्वज डौलाने फडकतो असे पंतप्रधान म्हणाले.
सध्याच्या काळात क्रीडापटूचा कार्यकाळ अनेक दशकांचा राहू शकतो. यासंदर्भात त्यांनी मेरी कोम यांचे उदाहरण देत खासदार असतानाही त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केल्याचे सांगितले. खेळाडू म्हणून आपल्या यशस्वी कारकिर्दीनंतर आता अनेक खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या पुलेला गोपीचंद यांचे उदाहरणही पंतप्रधानांनी दिले.
सध्याच्या काळात कौशल्य, प्रशिक्षण, मेहनत, एकाग्रता याबरोबरच मानसिक दृढताही आवश्यक आहे. यासंदर्भात योगाभ्यास उपयुक्त असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
क्रीडापटूंनी आपल्याला लहानपणापासून मार्गदर्शन करणाऱ्या, घडवणाऱ्या गुरु, शिक्षकांच्या संपर्कात राहावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यावेळी उपस्थित होते.
R.Tidke/N.Chitale/P.Kor