Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

बाबा बंदा सिंग बहादूरजी यांच्या 300 व्या हौतात्म्य दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण

बाबा बंदा सिंग बहादूरजी यांच्या 300 व्या हौतात्म्य दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण

बाबा बंदा सिंग बहादूरजी यांच्या 300 व्या हौतात्म्य दिनानिमित्त पंतप्रधानांचे भाषण


इस साल बाबा बंदा सिंह बहादुर दा 300 साला शहीदी दिवस ना सिर्फ पंजाब जां हिन्दुस्तान दी धरती ते ही सगों संसार भर विच जिथे-जिथे वी हिन्दुस्तानी वसदे हन, बड़े उत्साह नाल मनाया जा रिहा है। हुण जदों असी सारे उन्हां दी लासानी शहीदी नू याद करके नतमस्तक हुन्दे हां, उदों मैं तुहाड़े नाल इस महान योद्वे बारे कुछ गल्लां सांझीया करना चाहंवांगा।

आज कवीवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या बाबा बंदा सिंह यांच्या त्याग आणि बलिदानाची गाथा एका खूपच सुंदर कवितेच्या माध्यमातून आपण ऐकली आणि जणू काही तो कालखंडच आपल्या समोर जिवंत झाला. या कवितेतून ही गोष्ट स्पष्ट झाली की बंदा बहादूर हे अशा व्यक्तिमत्वाचे नांव होते, जिथे त्याग आणि बलिदानाच्या वारश्यावर, समाजाच्या प्रति संवेदना, समाजाच्या सुख-दु:खासाठी स्वत:ला झोकून देण्याची इच्छा, केवळ शौर्यच नाही, केवळ बलिदानच नाही तर समाज सुधारणा, सामान्य मानवतेचा आधार यासारख्या मजबूत पायावर ज्‍या महापुरुषाने, ज्या वीर योध्दयाने रचला, त्यांच्या 300 व्या बलिदानाच्या निमित्त, आज त्यांच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी, त्यांच्यापासून शिकण्यासाठी आणि त्यांची शिकवण आपल्या आचरणात आणण्यासाठी आज आपण त्यांचे पुण्य स्मरण करत आहोत.

बाबा बंदा सिंह यांचे जीवन पंजाब किंवा उत्तर भारतापर्यंतच मर्यादित नाही. त्यांचे जीवन एक आदर्श आहे, जो 300 वर्षांहून लोकांना प्रेरणा देत राहिले आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की, बंदा बहादुरजीं यांनी एक महान योध्दा होण्याबरोबरच सामान्य मानवतेच्या प्रति अत्यंत संवेदनशील प्रशासकाच्या रुपात इतिहासात आपले नाव कोरले आहे. परंतु जेव्हा गुरुदेव टागोर यांनी त्यांच्याबद्दल लिहिले तेव्हा त्यांच्यातील मानवतेचे गुण आपल्या समोर मांडले, जे इतरांसाठी आदर्श असतात, जे इतरांना आयुष्यभर प्रेरणा देतात. युध्दाच्या काळात अतिशय खडतर परिस्थितीतही बंदा बाबा बहादूर यांच्यासारखे दुसरे कोणीही कुठेही शोधूनही मिळणार नाहीत ही काही छोटीशी गोष्ट नाही.

बंदा सिंह हे संपूर्ण आयुष्यात केवळ हातात तलवार घेऊन होते, असेही नाही. ते तलवारीच्या धारेवर जीवन जगत होते आणि त्याचमुळे आयुष्यातला एवढा संघर्षमय कालखंड शासन काळ. पण कधीही मार्गापासून विचलित न होणे, लक्ष्यावरुन नजर न हटवणे. मला वाटते की, इतिहासात अशा शक्ती फारच कमी वेळा नजरेला पडतात. बंदा सिंह बहादुर यांचे साहस हेच त्यांचे कर्तव्य होते. ते रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणा बनले. हे एक आगळे-वेगळे उदाहरण आहे. विपरीत परिस्थितीतही आयुष्यात धाडसाच्या स्वाभिमानाच्या सोबतीने मुकाबला करता येतो हे जर कुणाकडून शिकायचे असेल, तर बंदा बहादूरजी यांच्यावर गुरुदेव रवींद्रनाथजी यांनी जी कविता लिहिली आहे, त्या कवितेच्या एक-एक शब्दातून आपल्याला तसेच जीवन जगण्याची प्रेरणा मिळते, आपला मार्ग अधिक स्पष्ट होतो.

18 व्या शतकाच्या ज्या कालखंडात बंदा बहादुर सिंग यांचा जन्म झाला, त्या वेळी देशात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय उलथा-पालथ होत होती. तुमचे वय कितीही असो, तुम्ही देशाच्या कुठल्याही भागात राहात असा, परंतु अशा बदलांचा थेट परिणाम समाजाच्या प्रत्येक घटकावर पडतोच. बंदा बहादूरजी यांचे लहानपणही या गोष्टींपासून दूर राहिले नाही. ते आजूबाजूची परिस्थिती पाहात होते, ती समजून घेण्याचा प्रयत्न करत होते परंतु असे म्हणतात की माणसाच्या आयुष्यात अनेकदा केवळ एखादीच घटना त्याच्या भावी आयुष्याची सफलता निश्चित करत असते. बंदा सिंह बहादुरजी यांच्या बाबतीतही असेच घडले. किशोरावस्थेत एका जनावराला मारल्यानंतर ते इतके दु:खी झाले, त्यांना एवढा आत्मक्लेश झाला, ते वैरागी बनले.

आपण भगवान बुध्दांची कथा ऐकतो. दोन भाऊ जंगलात जातात, आपण त्या मारणाऱ्याची किंवा वाचवणाऱ्याची कथा ऐकतो… आणि जो वाचवणाऱ्याचा पक्ष घेतो तो सिध्दार्थ बुध्द होतो ! बंदा बहादुर सिंह.. एका घटनेमुळे त्यांच्या मनात आंदोलने निर्माण झाली आणि ते वैरागी झाले. हेच वैराग्य त्यांना गुरु गोविंद सिंहाच्या चरणांपाशी घेवून गेले. नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंहजी यांची भेट झाल्यानंतरच, त्यांच्या जुन्या आयुष्याची ओळख मागे राहिली. त्यांनी जगाचा हात सोडून दिला, सोबत सोडून दिली. कधी ते माधव दास या नांवाने परिचित होते, ही गोष्ट इतिहासाच्या पानांमध्ये बुडून गेली आणि बंदा सिंह हे नांव धारण करत या भेटीनंतर किशोरवयीन वैरागी गुरु गोविंद सिंहजी यांच्याकडून प्रेरणा घेत एक महान सैनिक बनण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करु लागला. बाबा बंदा सिंह बहादूरजी यांनी गुरु गोविंद सिंह यांच्या शिकवणुकीला आपल्या मनात आणि जीवनक्रमात सामावून घेतले. कदाचित गुरुच्या प्रति एवढे समर्पण जे बंदा बहादुरजींनी दाखवले, त्याला गुरु-शिष्य परंपरेचे एक उज्ज्वल उदाहरण म्हणून सांगू शकतो आणि याला इतिहास साक्षी आहे की त्यांनतर गुरु गोविंद सिंहजी यांनी बंदा सिंह समवतेत स्वत:ला हजारो लोकांशी जोडले. परिस्थितीत परिवर्तनाची नवी सुरुवात झाली. एका महान रुपात त्यांनी समाजाच्या प्रत्येक अंगाला आपल्याशी जोडून घेतले. जसे की छत्रपती शिवाजी महाराजांनी छोटया-छोटया मावळयांना आपल्याशी जोडून घेत एका महान सैन्यशक्तीची निर्मिती केली. बंदा सिंह बहादुर यांनी देखील समाजाच्या प्रत्येक घटकातल्या लोकांना आपल्या समवेत जोडून घेत, एका महान सैन्य शक्तीमध्ये, आपल्या संघटन कौशल्याचे, एक महान संघटक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. आणि संघटनेच्या शक्तीतून कुठलेही मोठयात मोठे ध्येय साध्य करता येते हे दाखविले. त्यांच्याजवळ ना कुठली साधने होती, ना रुपये-पैसे होते, आणि जे ठरवले ते करण्यासाठी जीवनभर खपण्यासाठी आपल्या सर्व शक्तीनिशी स्वत:ची आहुती देण्यासाठी ते प्रत्येक क्षणी तयार होते. बंदा सिंह बहादूर यांच्या राजवटीत पहिल्यांदाच पंजाबच्या भूमीवर गरीब शेतकरी जमिनीचा मालक झाला. जो पेरणार तोच खाणार या सिध्दांताप्रमाणे बंदा सिंह बहादूर यांनी शेतकऱ्यांना त्यांचा अधिकार परत दिला. बंदा सिंहांना हे माहित होते की, जर गरीबांचे उत्थान करायचे असेल, त्यांचा उध्दार करायचा असेल, तर त्यांना त्यांचे अधिकार द्यायलाच हवेत. ते शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. जे आज समाजवादी विचारधारेची विचारसरणीची चर्चा करतात, त्यांनी बंदा सिंह यांच्या राजवटीतील एक एक निर्णय पाहावा. समाजातल्या सामान्य माणसाचे सक्षमीकरण कसे करायला हवे, त्यांच्यामध्ये विकासाची ज्योत कशी निर्माण करायची आणि सामान्य माणसांच्या शक्तींच्या भरवश्वावर संपूर्ण देशाला स्वातंत्र्याकडे कसे घेऊन जायचे हे सर्व येथे बंदा सिंहजी यांच्या संपूर्ण राज्यातल्या प्रत्येक निर्णयात दिसून येते. या देशातली गरीबी तेव्हा दूर होईल, जेव्हा समाजाच्या प्रत्येक घटकाचा विकास होईल, हे त्यांना माहीत होते. असंतुलित विकासातील प्रत्येक अडचण त्यांनी दूर केली. त्यांच्या काळात गरीब आणि मागास जातींचे हित पूर्णपणे सुरक्षित होते आणि त्यांना कुठल्याही भेदभावाशिवाय संपूर्ण न्याय मिळत असे. एक महान योध्दा असूनही, त्या काळात लोकशाहीप्रती बंदा सिंह बहादूर यांचे समर्पण आज ही एक उत्तम उदाहरण आहे, प्रेरणादायी आहे. त्यांनी सरकारमधली सर्व ताकद फक्त आपल्याच हातात ठेवली नाही. ते स्वत:ला केवळ राज्याचा एक भागीदार मानत असत. एवढेच नाही, तर नाणी आणि मोहराही त्यांनी आपल्या नावाने नाही, तर गुरु नानक देवजी आणि गुरु गोविंद सिंहजी यांच्‍या नांवाने काढल्या. आपले नांव कधीही पुढे आणले नाही. आजच्या युगातले राजकारण पाहा.. खरे तर ते तलावारीच्या धारेवर जीवन समर्पित करुन राज्यावर बसले होते. त्यांचा तो हक्क होता, पण त्यांनी कधीही स्वत:साठी या हक्काचा उपयोग केला नाही. त्यांच्या अंतर्मनात लोकशाही मूल्यांचे कसे जतन झाले असेल, हयाची जाणीव आपल्याला या गोष्टीतून जाणवते, आपण ते अनुभवू शकतो.
ते या देशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक विविधतेचा सन्मान करत असत तसे पहायला गेले तर शीख इतिहासाच्या प्रत्येक पानावर… आणि हे मी खूप जिम्मेदारीने बोलतो आहे. शीख इतिहासाच्या प्रत्येक पानावर शहीदांची गाथा लिहिली गेली आहे. पंरतु, बाबा सिंह बहादूरजी यांच्या हौतात्म्यासारखे कदाचित आणखी एखादेच उदाहरण आपल्याला मिळू शकेल. जे कधी विरागी होते, त्यांना राष्ट्रभक्तीने एवढी ताकद शक्ती दिली होती की ते यातनांना घाबरले नाहीत ना मृत्यूला घाबरले !

या हौतात्म्याच्या 300 व्या वर्षदिन कार्यक्रमात मी बंदा सिंहजी यांची विलक्षण प्रतिभा, त्यांचे साहस आणि त्यांचे हौतात्म्य यांना शतश: प्रणाम करतो. गुरु ग्रंथ साहिब मधल्या भक्त कबीरजी यांच्‍या शब्दातच सांगायचे झाले तर सांगतो – सूरा सो पहचानिये, लो लडे दीन केहेज, पूर्जा-पूर्जा कर मरे, कबहू न छोडे खेत !

मला आनंद वाटतो की, आदरणीय प्रकाश सिंहजी बादल यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारने 2010 मध्ये चप्पड चिडीच्या ऐतिहासिक मैदानात फतह बुरुज निर्माण करुन बाबा बंदा सिंह बहादुर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याला श्रध्दांजली वाहिली, एक खूप मोठा ऐतिहासिक सन्मान केला. हा फतेह बुरुज केवळ पंजाब मध्येच नाही, तर देशाच्या इतर भागातही, तरुणांसाठी तसेच भावी पिढयांसाठी एक प्रेरणा स्रोत आहे.
गेल्या एका वर्षात पंजाब सरकार सह शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती आणि दिल्ली, शीख गुरुद्वारा प्रबंधक समिती यांनी बाबा बंदा सिंह बहादुर यांच्या 300 व्या हौतात्म्य दिनानिमित्त अनेक कार्यक्रमकांचे आयोजन केले आहे आणि या नंतरही अनेक कार्यक्रम आयोजित होणार आहेत. मी या महापुरुषाला वंदन करण्याबरोबरच, या कार्यक्रमांसाठीही अनेक-अनेक शुभेच्छा देतो.

यावर्षी देशातल्या कोटी-कोटी जनतेला आणखी एका भाग्याचा लाभ होणार आहे आणि हे भाग्य आहे गुरु गोविंद सिंहजी यांची 350 वी जयंती, भारत सरकार खूप सन्मानपूर्वक साजरी करणार आहे आणि ही जयंती देशाच्या कानाकोपऱ्यात साजरी केली जाईल. जगभरात जिथे जिथे भारतीय पोहोचले आहेत, त्या सर्व ठिकाणी ती साजरी केली जाईल. या कार्यक्रमासाठी भारत सरकारने 100 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. समारंभाच्या आयोजनासाठी एक उच्च स्तरीय राष्ट्रीय समितीही स्थापन केली जात आहे.

माझा विश्वास आहे, की इतिहासातील या घटना, आपल्या भावी पिढयांना, आपल्या पाळामुळांशी जोडतील. जे इतिहास विसरतात, ते कधीही इतिहास निर्माण करु शकत नाहीत. असेच लोक इतिहास निर्मित करु शकतात, जे इतिहासाच्या मुळांशी जोडले गेले आहेत. त्यामुळेच कदाचित जेव्हा आपण 300 वर्ष साजरी करतो, आपण 350 वे वर्ष साजरे करतो आपण शताब्दी साजरी करतो, त्यावेळी आपण त्या महान परंपरांशी जोडले जातो, ऐतिहासिक वारश्यासोबत जोडले जातो आणि त्यातूनच भविष्याचा मार्ग निश्चित करण्यासाठी आपल्याला नवी ऊर्जा मिळते, नवी प्रेरणा मिळते, एक नवचेतना मिळते.

मला विश्वास आहे की, आपण बाबा बंदा सिंह बहादुरजी यांचे जे स्मरण करत आहोत, ते त्यांच्या शौर्यासोबत, त्याग आणि बलिदान यांच्या सोबतच एका प्रशासकाच्या रुपात, समान सुधारकांच्या रुपातही समाजापर्यंत पोहोचतील. मी त्यांच्या श्रीचरणांना प्रणाम करतो आणि त्यांच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन आपण समाजाची सेवा करु शकू, देशाची सेवा करु शकू, अशी भावना व्यक्त करतो आणि या समारंभात येण्याची संधी मला मिळाली, मला जो सन्मान मिळाला, त्यासाठी मी सर्वांचा खूप-खूप आभारी आहे. वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतह !

J.Patnakar/B.Gokhale