पीएम्इंडिया
शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी जी, माझे मित्र हरीश साळवे जी, प्रोफेसर अभय करंदीकर, आयआयटी दिल्लीचे संचालक प्रोफेसर रंगन बॅनर्जी, सर्व प्राध्यापक, इतर मान्यवर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो,
आज देशातील आपल्या सर्व प्रतिभावान युवकांच्या जीवनातील एका नव्या प्रवासाची सुरुवात होत आहे. तुम्ही सध्या आयुष्यातील एका अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घेत आहात. उत्साह, उमंग, स्वप्ने आणि भावनांनी भारलेल्या या क्षणाचा भाग होणे, आयआयटी दिल्लीच्या या संकुलामध्ये येणे आणि तुमच्यासोबत हा अनुभव सामायिक करणे, माझ्यासाठीही खूप विशेष आहे. मागील वेळी जेव्हा मी दीक्षांत समारंभात सहभागी झालो होतो, तेव्हा संपूर्ण देश कोविडच्या काळातून जात होता. त्यावेळी मी आभासी माध्यमातून जोडला गेलो होतो, मात्र आज मी आपल्या सर्व युवकांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित आहे. त्यामुळे मलाही खूप आनंद होत आहे.
मित्रांनो,
आज जसे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तुमचा अभिमान वाटत आहे, तसेच मलाही तुमचा सर्वांचा अभिमान आहे. कारण तुम्ही केवळ एक पदवी घेऊन येथून बाहेर पडत नाही आहात, तर देशासाठी काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न घेऊन येथून पुढे जात आहात. आज अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पदकेही मिळाली आहेत. त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. मात्र एक-दोन मुली असत्या तर आणखी चांगले झाले असते. सॉरी, एक-दोन का, मुलींची संख्या अधिक असायला हवी होती. आज आयआयटी दिल्लीमध्ये एआय शी संबंधित काही नवीन उपक्रमही सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी मी आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
आज तुम्ही सर्व आणि सर्व विद्यार्थी या कार्यक्रमात उपस्थित आहात, मात्र मनाच्या एखाद्या कोपऱ्यात काहीतरी वेगळेही सुरू असेल. मी बाबा बागेश्वर नाही, पण काहीतरी विचार सुरू असणारच. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात येणाऱ्या उद्याचे आपापले चित्र असेल. अनेक विद्यार्थी आपल्या पहिल्या पगाराची वाट पाहत असतील. कोणी नवीन शहरात नव्याने सुरुवात करण्याची तयारी करत असेल. अनेक विद्यार्थी आपल्या पहिल्या स्टार्टअपचे स्वप्न पाहत असतील. कुणी पुढील स्पर्धा परीक्षेचे लक्ष्य निश्चित केले असेल.
प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, प्रत्येकाचे स्वप्न वेगळे आहे. मात्र या सगळ्यानंतरही एक भावना अशी आहे, जी तुमच्या सर्वांच्या मनात सारखीच असेल. तो दिवस आठवा, जेव्हा तुमचा आयआयटी दिल्लीतील पहिला दिवस होता आणि आजचा हा दिवस. तुम्ही विचार करत असाल की, कालचीच तर गोष्ट आहे, जेव्हा परिचय सत्र झाले होते आणि आता हा दीक्षांत समारंभाचा क्षणही आला आहे. त्यामुळे परिचय सत्रापासून दीक्षांत समारंभापर्यंतच्या या प्रवासाचे तुम्हाला भरपूर समाधानही असेल. आणि त्याचबरोबर आयुष्याच्या एका नव्या अध्यायाच्या सुरुवातीचा उत्साहही तुमच्यामध्ये असेल.
आणि म्हणूनच मी एवढेच सांगेन की, आजचा हा क्षण मनापासून जगा. येणाऱ्या काळात तुमच्यावर मोठ्या-मोठ्या जबाबदाऱ्या असतील, तेव्हा येथील जुन्या आठवणी तुम्हाला पुन्हा जुन्या दिवसांमध्ये घेऊन जातील. त्या तुम्हाला नव्या ऊर्जेने भरून काढतील.
प्रत्येक हॉस्टेलसोबत जोडलेल्या तुमच्या आठवणी — कुमाऊं, आरा, कारा, विंडी, नील, कैलाश, हिमाद्री, इंटर-हॉस्टेल स्पर्धांचे किस्से, जुने वादविवाद — असे कितीतरी क्षण असतील, जे निरोप घेण्यापूर्वी तुम्ही पुन्हा एकदा नक्की आठवा.
आणि मित्रांनो,
गोष्ट केवळ अभ्यासाची नाही, कदाचित आज काही जणांना जिया सरायचा पोहाही खुणावत असेल. आता वेळही झाली आहे, त्यामुळे सतपुडा मेसमधील पराठे आठवत असतील. तुमच्यापैकी अनेक मित्रांना विंड टीवर आणखी काही क्षण घालवावेसे वाटत असतील आणि विंड टीवर गेलात तर मलाही आठवा. कोणाला आपल्या विभागात पुन्हा एकदा जायची इच्छा असेल. कोणाला आपल्या आवडत्या अड्ड्यावर आणखी काही वेळ बसावेसे वाटत असेल.
आणि मित्रांनो,
या भावूक क्षणी मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन. जेव्हा-जेव्हा आयुष्य तुम्हाला मागे वळून पाहण्याची संधी देईल, तेव्हा हे कॅम्पस जीवन, तुमचे मित्र, शिक्षक, मार्गदर्शक आणि सपोर्ट स्टाफ, जे तुमचे कुटुंब बनले आहेत, तुमचे प्राध्यापक, ज्यांनी तुमच्यासारख्या प्रतिभावान विद्यार्थ्यांना घडवण्याची जबाबदारी स्वीकारली आणि तुमचे हे ‘इन्स्टी’, जे हळूहळू तुमचे स्वतःचे घर बनले आहे—या सर्वांची तुम्ही तुमच्या प्रत्येक यशात आठवण ठेवाल. या सर्वांप्रती तुम्ही कृतज्ञ राहाल.
आणि म्हणूनच, यांना एक मौल्यवान ठेवा म्हणून येथून सोबत घेऊन जाणे विसरू नका, त्यांना मागे सोडू नका, सोबत घेऊन जा. माझा सल्ला असेल की, येथून जाताना संस्थेतील प्रत्येक सदस्याची भेट घेऊन जा आणि तुम्ही कुठेही असा, हे नाते कायम ताजे आणि जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करा.
मित्रांनो,
आज तुम्ही अशा काळात या संस्थेतून बाहेर पडत आहात, जेव्हा जग अतिशय वेगाने बदलत आहे. आज जगातील सामरिक समीकरणे अतिशय वेगाने बदलत आहेत. जागतिक सत्तासंतुलन देखील प्रत्येक क्षणी बदलत आहे. आणि यामागील सर्वात मोठी शक्ती आहे—तंत्रज्ञानाचा वेग. पुढील 20-30 वर्षांचे जग कसे असेल, हे आज निश्चितपणे कोणीही सांगू शकत नाही.
पण मित्रांनो,
जेव्हा-जेव्हा बदलाचा काळ येतो, तेव्हा-तेव्हा आव्हानेही येतात आणि नव्या संधीही निर्माण होतात. जग बदलेल, तंत्रज्ञान बदलेल, उद्योग बदलतील, व्यवसाय आणि व्यावसायिक क्षेत्रेही बदलतील. पण या सगळ्यांच्या दरम्यान माझी एक गोष्ट लक्षात ठेवा—जो शिकेल, तो जिंकेल. जो नव्या आव्हानांसाठी नवे उपाय शोधण्याचे धैर्य ठेवेल, त्याच्यासाठी आव्हानेच संधींमध्ये रूपांतरित होतील.
आणि हेच तर तुम्ही आयआयटी दिल्लीमधून शिकलात. शेवटी तुमची ही पदवी काय सांगते? ती केवळ तुम्ही परीक्षा उत्तीर्ण केली, चांगला सीजीपीए मिळवला किंवा चांगले नोकरी मिळेल याचा पुरावा आहे का? निश्चितच या सर्वांचे स्वतःचे महत्त्व आहे. पण मला वाटते, तुमची पदवी जगाला हे सांगते की तुम्हाला कठीण समस्यांचे समाधान शोधता येते.
तुमचा आयआयटी दिल्लीतील प्रवास आठवा. इथपर्यंत पोहोचणे सोपे नव्हते, इथला अभ्यासही सोपा नव्हता. पण तुम्ही हार मानली नाही. ही पदवी तुम्हाला एका दिवसात मिळालेली नाही. एक-एक विषय, एक-एक प्रकल्प, मिड-सेम, एंड-सेम, अशाच छोट्या-छोट्या पायऱ्यांनी तुम्हाला इथपर्यंत आणले आहे.
आयुष्यही याच तत्त्वावर चालते. जेव्हा एखादे आव्हान खूप मोठे वाटेल, तेव्हा घाबरू नका, त्याचे छोट्या-छोट्या भागांमध्ये विभाजन करा. तुम्ही स्वतः पाहिले आहे की, प्रयोगशाळेत एखादी समस्या कधी अंतापर्यंत पोहोचल्यासारखी वाटायची. अनुकरणामध्ये समाधान शोधण्यात तास किंवा दिवस निघून जायचे. पण त्यानंतर तुम्ही ती समस्या सोडवलीच आणि काहीतरी नवीन घेऊनही पुढे आलात.
त्याचप्रमाणे, आयुष्यातही अडचणी येतील. पण अडचणींचा स्वभावच असा असतो की त्या एकट्या येत नाहीत. अडचण जेव्हा येते ना, तेव्हा ती सोबत संधीही घेऊन येते. प्रत्येकाने फक्त सतर्क आणि जागरूक राहायचे आहे. या संस्थेने जे शिकवले आहे, ते वारंवार आठवत राहायचे आहे.
मित्रांनो,
मला तुमच्यासोबत जीवनातील काही व्यावहारिक गोष्टीही शेअर करायच्या आहेत. कॅम्पसमधील जीवन आणि कॅम्पसबाहेरील जीवन, या दोन्हींमध्ये खूप मोठा फरक असतो. आयआयटीच्या परीक्षेला अभ्यासक्रम असतो, पण आयुष्याच्या परीक्षेत सर्व काही अभ्यासक्रमाच्या बाहेरचे असते. तुम्ही आठवा, कॅम्पस जीवनात सर्व गोष्टी स्पष्ट असायच्या. कोणता अभ्यास करायचा, कोणती असाइनमेंट पूर्ण करायची, कोणती परीक्षा द्यायची, हे सर्व आधीच ठरलेले असायचे. पण आयुष्य काही वेगळ्या पद्धतीने चालते. तिथे ना कोणता निश्चित अभ्यासक्रम असतो, ना प्रश्नपत्रिका असते. अनेकदा तर खरा प्रश्न काय आहे, हेही कोणी सांगत नाही; तो प्रश्नही तुम्हालाच ओळखावा लागतो.
मी आयआयटीच्या अनेक माजी विद्यार्थ्यांचा प्रवास पाहिला आहे. त्यांच्या यशाचे कारण केवळ त्यांनी योग्य उत्तरे दिली हे नव्हते; त्यांच्या यशाचे कारण हे होते की त्यांनी असे प्रश्न ओळखले, ज्यांना जगाने प्रश्न मानणेच सोडून दिले होते. त्यांनी अशा समस्यांवर उपाय शोधले, ज्यांच्याशी इतरांनी तडजोड करून घेतली होती. म्हणूनच, आयुष्यात जिज्ञासा कायम ठेवा, शिकण्याची वृत्ती जागृत ठेवा आणि सजग राहा. ज्या गोष्टी कोणताही विचार न करता स्वीकारल्या जातात, त्यांची जरा पडताळणी करा, त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करा. पण केवळ प्रश्न विचारून थांबू नका, त्यांचे समाधान शोधण्याचे धैर्यही ठेवा. हाच विचार तुमची वेगळी ओळख निर्माण करेल.
मित्रांनो,
तुम्हा सर्वांना माहीत आहे की, प्रत्येक पिढीसमोर त्या काळाच्या स्वतःच्या आव्हानांचा सामना असतो आणि प्रत्येक पिढीचे स्वतःचे एक राष्ट्रीय कर्तव्यही असते. आपल्या देशाने गुलामगिरीचा तो काळही पाहिला आहे, जेव्हा त्या पिढीसमोर केवळ एकच ध्येय होते—भारताचे स्वातंत्र्य. त्यासाठी त्यांनी त्याग केला, दीर्घ संघर्ष केला. आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत, त्यामागे त्या पिढीची तपश्चर्या, त्याग आणि बलिदान आहे.
आणि मित्रांनो,
आजच्या काळात आपल्यासमोरील आव्हानेही वेगळी आहेत आणि त्यामुळे आपली कर्तव्येही वेगळी आहेत. आपल्या आयुष्यातील पुढील 30-35 वर्षांत तुम्ही जे काही कराल, त्याचा परिणाम विकसित भारताच्या आपल्या प्रवासावर होणार आहे. त्यामुळे तुमच्या प्रत्येक निर्णयाचा आधार हा देखील असायला हवा की, याचा देशाला काय फायदा होईल? यामुळे देशाची कोणती गरज पूर्ण होईल?
आज भारत आर्थिक आत्मनिर्भरता, तांत्रिक आत्मनिर्भरता, औद्योगिक आत्मनिर्भरता अशा प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी काम करत आहे. हाच विकसित भारताच्या मजबूत पायाचा पुरावा आहे. या मजबूत पायावर तुम्हाला एक भव्य आणि सुंदर विकसित भारताची उभारणी करायची आहे.
मित्रांनो,
विकसित भारताच्या या प्रवासात तुमची भूमिका खूप मोठी आहे. देशाचा युवक जितका सशक्त असेल, तितकाच देश सशक्त होईल. याच विचाराने आम्ही अनेक अशी क्षेत्रे खुली केली आहेत, जिथे युवकांसाठी प्रवेश एकेकाळी जवळजवळ बंदच होता. सरकारच्या आधुनिक धोरणांमुळे आज देशात युवकांसाठी नवनवीन क्षेत्रेही निर्माण होत आहेत.
मित्रांनो,
गेल्या वेळी जेव्हा मला तुमच्या वरिष्ठांच्या दीक्षांत समारंभाशी आभासी माध्यमातून जोडले जाण्याची संधी मिळाली होती, तेव्हा मी युवकांसाठी अंतराळ क्षेत्रात होत असलेल्या सुधारणांबद्दल चर्चा केली होती. तेव्हा या क्षेत्रातील जवळजवळ संपूर्ण काम सरकारच करत होती. पण आज तेच अंतराळ क्षेत्र हजारो युवकांसाठी नव्या संधींचे आकाश बनले आहे. आज आपले युवक स्वतःची प्रक्षेपण वाहने तयार करत आहेत, रॉकेट प्रक्षेपित करत आहेत आणि अशा उपलब्धी मिळवत आहेत, ज्या जगातील मोजकेच देश साध्य करू शकले आहेत.
मला विश्वास आहे की, आज कुठेतरी देशातील एखादा युवा अभियंता अभिमानाने म्हणत असेल—“माझ्या कुटुंबाच्या वंशपरंपरेत रॉकेट तयार करणारा मी पहिला आहे.”
सेमीकंडक्टर क्षेत्राचे उदाहरणही आपल्यासमोर आहे. जेव्हा आपण या दिशेने पावले उचलली, तेव्हा काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले. असे म्हटले गेले की, भारत हे करू शकणार नाही. पण आज पहिल्या सेमीकंडक्टर युनिट्समध्ये उत्पादन सुरू झाले आहे.
मी स्पष्टपणे मानतो की, चिपपासून शिपपर्यंत सर्व काही याच भूमीत, तुमच्याच हातांनी तयार होईल. आणि कुठेतरी एखादा युवक पूर्ण आत्मविश्वासाने म्हणत असेल—“भारतात चिप तयार करणारा माझ्या कुटुंबाच्या वंशपरंपरेतील मी पहिला आहे.”
मित्रांनो,
आज आपल्या ड्रोन क्षेत्राकडेही पहा. आज या क्षेत्रात युवक नव्या-नव्या शक्यता निर्माण करत आहेत. कुठे ड्रोनच्या माध्यमातून शेतांमध्ये काम केले जात आहे, ड्रोनच्या माध्यमातून औषधे पोहोचवली जात आहेत, तर ड्रोन देशाच्या संरक्षण आणि सुरक्षेत मदत करत आहे. आणि आज कुठेतरी एखादा युवक अभिमानाने म्हणत असेल—“माझ्या कुटुंबाच्या वंशपरंपरेत ड्रोन तयार करणारा मी पहिला आहे.”
मित्रांनो,
भारताच्या स्टार्टअप क्रांतीला तुमच्यासारख्या याच पिढीतील युवकांनी घडवले आहे आणि बळ दिले आहे. याच संस्थेतून कितीतरी संस्थापक घडले आहेत. एका संस्थेतून इतके काही घडू शकते, तर विचार करा, संपूर्ण देशात किती मोठी ताकद निर्माण होत आहे. युनिकॉर्नस, डिजिटल पेमेंट आणि फिनटेक क्रांती यांनी देशातील लाखो युवकांना पहिल्यांदाच काहीतरी नवीन करण्याची संधी दिली आहे.
मित्रांनो,
आजही अशी अनेक क्षेत्रे आहेत, जिथे भारत आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे आणि मोठ्या जबाबदारीने व मोठ्या अपेक्षांनी देश तुमच्यासारख्या युवकांकडे पाहत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा केंद्रे, महत्त्वपूर्ण खनिजे, खोल समुद्रातील अन्वेषण, बॅटरी, ऊर्जा साठवणूक, ऊर्जा सुरक्षा, विद्युत गतिशीलता, क्वांटम संगणन अशी अनेक क्षेत्रे तुमच्या प्रतिभेची, तुमच्या नवोन्मेषाची आणि तुमच्या नेतृत्वाची वाट पाहत आहेत. आणि मीही वाट पाहत आहे.
मित्रांनो,
आता आणखी एक मोठी शक्यता तुमच्यासमोर आहे आणि ती म्हणजे संशोधन. आज देशाला नव्या-नव्या संशोधनाची अत्यंत गरज आहे आणि संशोधनावर आपले तितकेच लक्ष आहे. पंतप्रधान संशोधन फेलोशिप आपल्या प्रतिभावान युवकांना संशोधन करण्याची संधी देत आहे. कल्पनांना पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजना सुरू करण्यात आली आहे. अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानाचीही स्थापना करण्यात आली आहे, जेणेकरून देशातील विज्ञान आणि संशोधनाला नवी ताकद मिळू शकेल. संशोधन क्षेत्रात 1 लाख कोटी रुपयांपर्यंतच्या निधीची व्यवस्था केली जात आहे. इंग्रजीत सांगायचे तर, One Lakh Crore. हे खास तुमच्यासाठी सांगत आहे.
याचप्रमाणे, मित्रांनो,
शैक्षणिक संसाधनांची उपलब्धताही सुलभ करण्यात आली आहे. एक देश, एक सदस्यतेच्या माध्यमातून आज जगातील प्रतिष्ठित संशोधन नियतकालिके देशातील छोट्यातील छोट्या शहरापर्यंत कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय पोहोचत आहेत.
मित्रांनो,
मला माहीत आहे की, या दिशेने आपल्याला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे आणि हे काम संशोधनाप्रती तुमच्या सर्वांच्या वचनबद्धता मुळेच शक्य होईल. यासाठी देशाला तुमच्याकडून अपेक्षाही आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्यावर विश्वासही आहे.
मित्रांनो,
आता मी तुमच्याशी थोड्या लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींबद्दल बोलणार आहे. जेव्हा आपण मोठी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सुरुवात करतो आणि पुढे निघतो, तेव्हा आपल्यासमोर एक मोठे विचलनही येते. हे विचलन असते—एकमेकांशी तुलना करण्याचे. कोणाला किती वेतन मिळाले, कोण कोणत्या कंपनीत गेले, कोणत्या शहरात गेले, कोणत्या देशात गेले, कोणी स्टार्टअप सुरू केले.
आजच्या सोशल मिडियाच्या युगात ही तुलना कधीच संपत नाही. पण लक्षात ठेवा, आयुष्य हे कोणतेही गुणफलक नाही. तुमची खरी स्पर्धा इतर कोणाशी नसून स्वतःशीच आहे. दररोज कालपेक्षा अधिक चांगले होण्याचा प्रयत्न करत राहा. त्याचबरोबर, आपल्या शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्याचीही काळजी घ्या.
मित्रांनो,
मी सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन करतो. तुमच्या आई-वडिलांचे आणि कुटुंबीयांचे विशेष अभिनंदन करतो. तुमच्या शिक्षकांना आणि या संपूर्ण प्रवासात प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत उभ्या राहिलेल्या सर्व व्यक्तींनाही माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.
तुमचे भविष्य उज्ज्वल असो, तुम्ही सातत्याने नव्या उंचीवर पोहोचत राहा, या मंगलकामनेसह —
खूप-खूप धन्यवाद!
नमस्कार!
Delighted to join the Convocation Ceremony of IIT Delhi. My best wishes to all the graduating students.@iitdelhi https://t.co/Lhuq4yUzJW
— Narendra Modi (@narendramodi) August 8, 2026
Those who learn, win! pic.twitter.com/lWCEzFLeNL
— PMO India (@PMOIndia) August 8, 2026
Keep your curiosity alive in life... Keep your learning instinct alive. pic.twitter.com/nsPmpNlRfk
— PMO India (@PMOIndia) August 8, 2026
Today, India is working towards becoming self-reliant in every sector. pic.twitter.com/D3a2CSPHWY
— PMO India (@PMOIndia) August 8, 2026
Today, new sectors are emerging in the country for our youth. pic.twitter.com/NRWRmP9YXf
— PMO India (@PMOIndia) August 8, 2026
Delighted to attend the Convocation Ceremony at IIT Delhi. My best wishes to the graduating students as they begin a new chapter. May they dream big, embrace challenges and contribute to building a Viksit Bharat. @iitdelhi pic.twitter.com/u5WUbPGVZP
— Narendra Modi (@narendramodi) August 8, 2026
At IIT Delhi, spoke about the special journey from orientation to convocation. From hostel memories and friendships to favourite campus addas, these are experiences that will remain for a lifetime.
— Narendra Modi (@narendramodi) August 8, 2026
As our young graduates step into a new chapter, I urged them to cherish everyone… pic.twitter.com/RetE9wbz8F
It is important to prepare for a world that is changing at an unprecedented pace. Technology is transforming industries, professions and a lot more.
— Narendra Modi (@narendramodi) August 8, 2026
Challenges will come, but those who have the courage to find new solutions will turn challenges into opportunities! pic.twitter.com/5PWTBTYqU2
Among the things I told the IIT Delhi students was…exams have a syllabus, life does not. Life is often completely out of syllabus!@iitdelhi pic.twitter.com/UzBgjferdV
— Narendra Modi (@narendramodi) August 8, 2026
An earlier generation devoted itself to the struggle for India’s freedom. The responsibility before today’s youth is different, but equally significant. From economic and technological self-reliance to industrial strength, they have a vital role in building a Viksit Bharat. pic.twitter.com/ejW5pThLjq
— Narendra Modi (@narendramodi) August 8, 2026
A lot of youngsters are saying…First in my bloodline to build a rocket, a chip and a drone! pic.twitter.com/HJOoybv6H8
— Narendra Modi (@narendramodi) August 8, 2026