पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्यात औषध क्षेत्रातील सहकार्याबाबत करार करायला आज मंजुरी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेबरोबर दीर्घकालीन सहकार्यामुळे आयुष प्रणालीला आंतरराष्ट्रीय स्वीकृती मिळेल तसेच शिक्षण, कौशल्य विकास, कार्यशाळा, प्रकाशन आणि देवाणघेवाण कार्यक्रमांच्या माध्यमातून आयुष औषध प्रणालीबाबत जागरुकता निर्माण व्हायला मदत होईल. तसेच सदस्य देशांमध्ये आयुष प्रणालीच्या माहितीचा प्रसार आणि जागतिक आरोग्य संघटना पारंपारिक औषध धोरण 2014-2023च्या अंमलबजावणीत सुसूत्रता आणण्यास मदत होईल.
एकत्रित कार्यासाठी येणारा खर्च आयुष मंत्रालयाच्या सध्याच्या योजनांतर्गत असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून केला जाईल.
उभय पक्षांमध्ये करारावर स्वाक्षऱ्या झाल्यावर एकत्रित कार्य सुरु होईल. दीर्घकालीन सहकार्यातील पहिले पाऊल म्हणून भारत आरोग्य संघटनेला पुढील तांत्रिक कागदपत्रे विकसित करायला सांगेल, ज्यामुळे भारतीय प्रणालींना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळायला मदत होईल.
1. योगामधील प्रशिक्षणासाठी निकष
2. आयुर्वेदामधील वैद्यकीय सेवेसाठी निकष
3. युनानी औषध पध्दतीसाठी निकष
4. पंचकर्म पध्दतीसाठी निकष
दीर्घकालीन सहकार्याअंतर्गत, पारंपारिक आणि पूरक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी उभय पक्षांकडून परस्परांना पूरक उपक्रम हाती घेतले जातील.
या कराराचा लाभ आयुष प्रणालीचा अभ्यास करणाऱ्यांना होईल.
S.Kane/S,Tupe/M.Desai