पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 मध्ये आज झालेल्या राष्ट्रप्रमुखांच्या पूर्ण सत्राला संबोधित केले. भारताने आयोजित केलेल्या एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत सहभागी झालेल्यांचे त्यांनी आपल्या निवेदनातून पुन्हा एकदा स्वागत केले. ही परिषद मानव केंद्रित आणि संवेदनशील, जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्था उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मानवतेने कायमच आव्हानात्मक बदलांचे संधींमध्ये रुपांतरीत केल्याचे इतिहासात अनेकदा घडले असल्याचा दाखलाही त्यांनी दिला. आजच्या काळातही अशाच आव्हानात्मक बदलांना मानवतेसाोठीच्या मोठ्या संधीमध्ये रुपांतरीत करण्याचा क्षण लाभला असल्याचे त्यांनी नमूद केले.
योग्य आकलनातूनच योग्य कृती आकाराला येते या भगवान बुद्धांच्या शिकवणीचे स्मरणही पंतप्रधानांनी आपल्या निवेदनातून करून दिले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मक प्रभाव सुनिश्चित करता यावा यासाठी योग्य वेळेत, सदिच्छेने आणि योग्य निर्णयांच्या आधारे एक आराखडा तयार करणे गरजेचे असल्याचे महत्व त्यांनी आपल्या निवेदनातून अधोरेखित केले.
ज्यावेळी सर्व देश एकत्र उभे राहतात, त्यावेळी अशक्य गोष्टीही शक्य होतात ही बाब कोविडच्या जागतिक महामारीच्या काळात जगाने अनुभवली असल्याचे ते म्हणाले. त्यावेळी लस विकसित करण्यापासून ते पुरवठा साखळीपर्यंत आणि माहितीच्या देवाणघेवाणीपासून ते जीव वाचवण्यापर्यंतच्या उपाययोजनांचा शोध आणि विकास परस्पर सहकार्यामुळेच शक्य झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तंत्रज्ञान कशाप्रकारे मानवतेच्या सेवेसाठी कामी येऊ शकते याचा अनुभव भारताने घेतला असल्याचे त्यांनी नमूद केले. यासंदर्भात त्यांनी लसीकरणासाठीच्या डिजिटल व्यासपीठाचा दाखला दिला. या डिजिटल व्यासपीठामुळे कोट्यवधी लोकांचे योग्य वेळेत लसीकरण करण्यात मदत झाल्याचे त्यांनी सांगितले. युपीआयमुळे अगदी आव्हानात्मक परिस्थितीतही ऑनलाइन व्यवहार सुरळीतपणे होत राहतील याची सुनिश्चित झाली, त्यासोबतच डिजिटल दरी कमी करण्यातही या तंत्रज्ञानाने मोठी भूमिका बजावली ही बाब त्यांनी अधोरेखित केली. गेल्या काही वर्षांत भारताने बहुआयामी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारल्या, त्याचवेळी भारतासाठी तंत्रज्ञान हे सत्तेचे साधन नसून सेवेचे माध्यम आहे, ते वर्चस्व गाजवण्याचे नाही तर सक्षमीकरणाचे माध्यम आहे, म्हणूनच भारत जगासोबत या सुविधा सामायिकही करत असल्याचे त्यांनी सांगितले. मानवजातीचे कल्याण सुनिश्चिती करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचालही याच दिशेने होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
भूतकाळात तंत्रज्ञानाने विभाजन निर्माण केले असले तरी, आता कृत्रिम बुद्धिमत्ता सर्वांसाठी सुलभ आणि प्रत्येकाच्या आवाक्यात असली पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले. एआयच्या भविष्याबाबत चर्चा होत असताना, ग्लोबल साऊथच्या आकांक्षा आणि प्राधान्यांना एआय प्रशासनाच्या केंद्रस्थानी स्थान दिले गेले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
नैतिकता नेहमीच मानवी प्रगतीचा केंद्रबिंदू राहिली आहे, परंतु एआयसह अनैतिक वर्तनाची व्याप्ती अमर्यादित असू शकते, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यामुळे एआयसाठी नैतिक मानके देखील तितकीच व्यापक आणि सक्षम असली पाहिजेत, हे त्यांनी स्पष्ट केले. एआय कंपन्यांवर केवळ नफ्यावरच नव्हे तर हेतूवर देखील लक्ष केंद्रित करण्याची मोठी जबाबदारी आहे असे सांगत त्यांनी दृढ नैतिक बांधिलकीची गरज अधोरेखित केली. वैयक्तिक पातळीवर, एआय आधीच मानवी शिक्षण, बुद्धिमत्ता आणि भावनांवर प्रभाव टाकत असल्याचे त्यांनी नमूद केले.
नैतिक एआय वापरासाठी पंतप्रधानांनी तीन सूचना दिल्या:
आकांक्षी भारत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि ही जबाबदारी ओळखून भारत महत्त्वपूर्ण पावले उचलत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या एआय मिशन अंतर्गत, 38,000 जीपीयू आधीच उपलब्ध असून पुढील सहा महिन्यांत आणखी 24,000 जीपीयू जोडले जातील, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. भारत आपल्या स्टार्टअप्सना अत्यंत परवडणाऱ्या दरात जागतिक दर्जाची संगणकीय क्षमता प्रदान करत आहे, असे त्यांनी सांगितले. भारताने एआयकोश (नॅशनल डेटासेट प्लॅटफॉर्म) देखील तयार केले आहे, ज्याद्वारे 7,500 हून अधिक डेटासेट आणि 270 एआय मॉडेल राष्ट्रीय संसाधने म्हणून सामायिक केले गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी यावर भर दिला की एआय विषयीची भारताची दिशा आणि दृष्टिकोन स्पष्ट आहे. एआय हे मानवतेच्या कल्याणासाठीचे एक सामायिक संसाधन आहे, हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. जे नवोन्मेषाला चालना देईल, समावेशनाला बळकटी देईल आणि मानवी मूल्यांशी सुसंगती साधेल असे यायचे भविष्य घडवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तंत्रज्ञान आणि मानवी विश्वास यांची सांगड घातली गेली तर याचा खरा प्रभाव संपूर्ण जगात दिसून येईल, असे सांगून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
Sharing my remarks during the Leaders’ Plenary session at the India AI Impact Summit. https://t.co/kJhDidUlMM
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2026
सोनाली काकडे/तुषार पवार/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Sharing my remarks during the Leaders’ Plenary session at the India AI Impact Summit. https://t.co/kJhDidUlMM
— Narendra Modi (@narendramodi) February 19, 2026