Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उझबेकिस्तानच्या अध्यक्षांसोबतच्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकातील पंतप्रधानांचे निवेदन

उझबेकिस्तानच्या अध्यक्षांसोबतच्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकातील पंतप्रधानांचे निवेदन


नवी दिल्‍ली, 30 ऑगस्‍ट 2026

 

महोदय, माझे मित्र, अध्यक्ष महोदय,

दोन्ही देशांचे प्रतिनिधी,

माध्यम सहकारी वर्गहो,

नमस्कार!

ताश्कंदमध्ये माझे आणि माझ्या प्रतिनिधी मंडळाचे ज्या अगत्याने आणि मनःपूर्वक स्वागत झाले, त्याबद्दल मी अध्यक्ष महोदयांचे आणि उझबेकिस्तानच्या जनतेचे मनापासून खूप खूप आभार मानतो.

उझबेकिस्तानचा हा माझा चौथा दौरा आहे. यावरून दोन्ही देशांमधील घनिष्ठ संबंध, उत्तम समन्वय आणि दृढ मैत्री स्पष्टपणे दिसून येते.

गेल्या जवळपास एका दशकापासून मला अध्यक्ष महोदयांसोबत काम करण्याचे भाग्य लाभले आहे. या काळात मी त्यांना दहाहून अधिक वेळा भेटलो आहे, मला त्यांना भेटण्याची संधी मिळाली आहे.

त्यांचा सकारात्मक आणि दूरदृष्टीचा दृष्टिकोन, तसेच सतत शिकत राहण्याची वृत्ती खरोखरच खूप प्रेरणादायक आहे. भारताप्रति असलेल्या त्यांच्या सखोल मैत्रीच्या भावनेबद्दल आणि अढळ बांधिलकीबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

मित्रांनो,

उझबेकिस्तान हा देश मध्य आशियाच्या मध्यभागी आहे आणि या एकंदर प्रदेशासोबतच्या भारताच्या संबंधांच्या केंद्रस्थानी आहे.

भारत आणि उझबेकिस्तानच्या विचारांमध्ये आणि आकांक्षांमध्ये कमालीचे साम्य आहे. ‘यांगी उझबेकिस्तान’ आणि ‘विकसित भारत 2047’ या दोन्ही संकल्पनांच्या केंद्रस्थानी युवा, नवोन्मेष, सर्वसमावेशक विकास आणि आधुनिक तंत्रज्ञान हे घटक आहेत. या सामायिक दृष्टिकोनाच्या आधारे आपण दोन्ही देशांतील जनतेच्या कल्याणासाठी सातत्याने कार्य करत आहोत.

या वर्षी भारत आणि उझबेकिस्तानमधील धोरणात्मक भागीदारीला 15 वर्षे पूर्ण होत आहेत. या विशेष प्रसंगी, आमच्या संबंधांना ‘सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी’चा दर्जा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आज आम्ही या भागीदारीच्या नव्या पर्वात तीव्र गतीने आणि ठोस परिणामांसह पुढे जाण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी कृती-आराखडा तयार केला आहे.

आपला द्विपक्षीय व्यापार 1 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. आता 2030 पर्यंत तो 5 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आपण निश्चित केले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी बाजारपेठेतील प्रवेश, संपर्क-सुविधा, बँकिंग आणि आर्थिक व्यवहार(पेमेंट) व्यवस्थेशी संबंधित मुद्द्यांवर आपण पद्धतशीरपणे आणि समन्वयाने पुढे वाटचाल करू.

पायाभूत सुविधा विकासाच्या क्षेत्रात परस्पर हिताचे सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आपण एकत्रितपणे काम करू. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता, महत्त्वाची खनिजे, स्वच्छ ऊर्जा, अंतराळ आणि अणुऊर्जा या क्षेत्रांतील सहकार्यामुळे आपले द्विपक्षीय संबंध भविष्यातील गरजांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी सज्ज होत आहेत.

मित्रांनो,

कृषी आणि आरोग्य क्षेत्रातील आपल्या क्षमता एकमेकांना पूरक आहेत. उझबेकिस्तानचा फलोत्पादन आणि बागायती क्षेत्रातील अनुभव आणि भारताच्या आधुनिक कृषी पद्धती यांचा समन्वय साधून आपण दोन्ही देशांच्या अन्नसुरक्षेत महत्त्वपूर्ण योगदान देऊ.

उझबेकिस्तानमधील औषधी वनस्पती आणि भारताचे आयुर्वेदविषयक कौशल्य यांचा मेळ हा एक नैसर्गिक संगम आहे. पारंपरिक औषधोपचाराच्या क्षेत्रात आज झालेल्या करारामुळे आपल्या सामायिक प्रयत्नांना अधिक बळ मिळेल.

आपली भागीदारी केवळ दोन राजधान्यांपुरती मर्यादित राहू नये, हा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच आपल्या शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये भागीदारी प्रस्थापित करण्याच्या दिशेने आम्ही पुढे जात आहोत. या भागीदारीच्या माध्यमातून शहरी व्यवस्थापन, उद्योग, शिक्षण, पर्यटन आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये थेट संपर्क सातत्याने वाढत राहतील.

दोन्ही देशांमधील घनिष्ठ संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य हे आपल्या परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे. आगामी काळात दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांमधील थेट संपर्कामुळे संयुक्त उत्पादन आणि संयुक्त विकासाला प्रोत्साहन दिले जाईल.

दहशतवाद, अतिरेकीवाद आणि फुटीरतावाद ही संपूर्ण प्रदेशासाठी गंभीर आव्हाने आहेत, असे आमचे मत आहे. त्यांच्याविरोधात शून्य सहनशीलता हे आपले सामायिक धोरण राहिले आहे आणि पुढेही तेच कायम राहील.

मित्रांनो,

आपल्या संबंधांची सर्वांत खोल मुळे आपल्या सामायिक वारशात आहेत. आज हा वारसा अधिक बळकट करण्यावर आम्ही विशेष भर दिला.

उझ्बेकिस्तानमधील बौद्ध वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी आपण संयुक्तरित्या काम करू. दोन्ही देशांतील युवक, विशेषतः विद्यार्थी आणि व्यावसायिक यांच्यातील देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. दोन्ही देशांमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी आज सहकार्याच्या कार्यक्रमावर सहमती झाली आहे. उझ्बेकिस्तानमध्ये हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आज आम्ही शिष्यवृत्ती जाहीर करणार आहोत, याचा मला आनंद आहे.

क्रीडा क्षेत्र हे देखील आपल्या सहकार्याचा एक महत्त्वाचा आयाम म्हणून उदयास येत आहे. गेल्या वर्षी गोव्यात उझ्बेकिस्तानच्या 20 वर्षीय ग्रँडमास्टर सिंदारोव्ह यांनी FIDE विश्वचषक जिंकला. आता नोव्हेंबरमध्ये त्यांचा सामना भारताचा 20 वर्षीय बुद्धिबळ विजेता गुकेश याच्याशी होणार आहे. बुद्धिबळाच्या पटावर जेव्हा हे दोन युवा तारे आमनेसामने येतील, तेव्हा साहजिकच या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले जाईल. पुढील महिन्यात समरकंद येथे होणाऱ्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठीही मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो. आगामी काळात कुराश आणि कबड्डी यांसारख्या पारंपरिक खेळांमुळेही आपल्या क्रीडा भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल.

आजच्या चर्चेतून आपल्या संबंधांच्या भविष्यासाठी एक स्पष्ट दिशा निश्चित झाली आहे.

भारत-उझबेकिस्तान अधिक मजबूत भागीदारी मध्य आशियातील शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी एक प्रभावी शक्ती ठरेल.

महामहिम,

आपल्या मैत्रीबद्दल आणि आजच्या फलदायी चर्चेबद्दल पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार.

दोन दिवसांनंतर उझबेकिस्तान आपल्या स्वातंत्र्याचा 35वा वर्धापनदिन साजरा करणार आहे. 140 कोटी भारतीयांच्या वतीने मी आपणास आणि उझबेकिस्तानच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपले अभिनंदन करतो.

खूप-खूप धन्यवाद.

 

* * *

शैलेश पाटील/आशुतोष सावे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai