Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

उझबेकिस्तानच्या दौऱ्यात पंतप्रधानांची उझबेकिस्तानच्या अध्यक्षांशी औपचारिक चर्चा

उझबेकिस्तानच्या दौऱ्यात पंतप्रधानांची उझबेकिस्तानच्या अध्यक्षांशी औपचारिक चर्चा


नवी दिल्‍ली, 30 ऑगस्‍ट 2026

 

उझबेकिस्तानच्या शासकीय दौऱ्याचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उझबेकिस्तानचे अध्यक्ष महामहीम शौकत मिर्झियोयेव्ह यांच्याशी औपचारिक चर्चा केली. पंतप्रधान ‘कुक्सारॉय’ या अध्यक्षीय प्रासादात पोहोचले असता राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव्ह यांनी त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत केले तसेच त्यांचे समारंभपूर्वक औपचारिक स्वागतही करण्यात आले. उझबेकिस्तानच्या स्वातंत्र्याच्या 35 व्या वर्धापनदिनानिमित्त त्यांनी या देशाच्या जनतेला मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या.

दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, नवोन्मेष आणि स्टार्ट-अप्स, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तसेच यूपीआय, संरक्षण आणि सुरक्षा, आरोग्यसेवा आणि औषधनिर्माण, अत्यंत महत्त्वाची (क्रिटिकल) खनिजे, कृषी, शिक्षण, पर्यटन, अंतराळ आणि उभय देशांमधील लोकांदरम्यानचे परस्पर संबंध या क्षेत्रातील द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारीच्या सर्व पैलूंवर शिष्टमंडळ स्तरावर सविस्तर आणि भरीव चर्चा केली. उझबेकिस्तानकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा केला जावा यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेत झालेल्या प्रगतीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली तसेच अत्यंत महत्त्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रातील सहकार्य बळकट करण्याच्या महत्त्वाचा पुनरुच्चार केला. या संबंधांची व्याप्ती आणि महत्त्व लक्षात घेऊन, त्यांनी या क्षेत्रातील द्विपक्षीय ‘धोरणात्मक भागीदारी’ उंचावून ती ‘सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत परिवर्तित करण्याचा निर्णय घेतला. तसेच,द्विपक्षीय व्यापारात  वाढ करून 2030 पर्यंत  तो 5 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर नेण्याचेही मान्य करत त्या दृष्टीने आर्थिक व गुंतवणूक संबंध अधिक दृढ करण्यासाठी ‘व्यापार शिखर परिषदेचे आयोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ‘सर्वंकष धोरणात्मक भागीदारीत खऱ्या अर्थाने लक्षणीय प्रगती होण्यासाठी, परराष्ट्र मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील यंत्रणा स्थापन करण्यास तसेच ‘आंतर-सरकारी आयोगा’चा दर्जा मंत्रालयीन पातळीपर्यंत वाढवण्याबाबत सहमती व्यक्त केली.

नेत्यांनी प्राचीन काळापासून उभय देशांच्या सभ्यतांमधील परस्पर संबंधांचा उल्लेख करत सध्याच्या काळात दोन्ही देशांच्या लोकांदरम्यान असलेल्या परस्पर संबंधांनी ही भागीदारी कायम जिवंत ठेवली असल्याचे नमूद केले. या संदर्भात, पंतप्रधानांनी उझबेकिस्तानमध्ये योगाला लोकप्रियता मिळाल्याची प्रशंसा केली. तत्पूर्वी, त्यांनी ‘योगा फेडरेशन ऑफ उझबेकिस्तान’द्वारे आयोजित योगाभ्यास सत्राला हजेरी लावली. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या 60 व्या पुण्यतिथीनिमित्त, पंतप्रधान मोदींनी उझबेक विद्यार्थ्यांसाठी हिंदी भाषेसाठी ‘लाल बहादूर शास्त्री शिष्यवृत्ती’ जाहीर केली. उझबेकिस्तानचा ‘यशिल माकोन’ हा पर्यावरणविषयक उपक्रम आणि भारताचा ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम यांच्यातील साधर्म्याचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी अरल समुद्र क्षेत्रात सुरू असलेल्या  पर्यावरण पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांमध्ये उझबेकिस्तानसोबत भागीदारी करण्याची घोषणा केली; तसेच या प्रकल्पासाठी दहा लाख अमेरिकन डॉलर्सचे अनुदानही जाहीर केले. दोन्ही नेत्यांनी अध्यक्षीय प्रासादाच्या आवारातील बागेत संयुक्तपणे वृक्षारोपणही केले.

चर्चेनंतर, नेत्यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांदरम्यान संस्कृती, उच्च शिक्षण आणि संशोधन, क्षमता बांधणी, अभिलेखागार, आर्थिक सहकार्य, पर्यावरण, पर्यटन, खाणकाम, आयुर्वेद आणि भगिनी-राज्य संबंध यासह विविध क्षेत्रांतील सामंजस्य करारांची देवाणघेवाण करण्यात आली. उझबेकिस्तानमधील फयाझ टेपा आणि कारा टेपा या बौद्ध स्थळांच्या जीर्णोद्धारासंबंधीच्या इरादा पत्रावरही स्वाक्षरी करण्यात आली. ताश्कंद राज्य प्राच्यविद्या विद्यापीठात आयसीसीआर संस्कृत अध्यासन स्थापन करण्यासाठीच्या सामंजस्य करारालाही अंतिम स्वरूप देण्यात आले. सामंजस्य करार आणि करारांची संपूर्ण यादी येथे पाहता येईल.

पंतप्रधानांच्या सन्मानार्थ राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव्ह यांनी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष मिर्झियोयेव्ह यांनी केलेल्या स्नेहपूर्ण आदरातिथ्याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच त्यांना भारत भेटीचे निमंत्रणही दिले.

 

* * *

शैलेश पाटील/मंजिरी गानू/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai