Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केरळ मंदिर आग : पंतप्रधान घटनास्थळी तातडीने रवाना, पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना सानुग्रह अनुदानाची घोषणा केली

केरळ मंदिर आग :  पंतप्रधान घटनास्थळी  तातडीने रवाना, पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना सानुग्रह अनुदानाची घोषणा केली


केरळमधल्या कोल्लम जिल्हयातल्या मंदिरात आज पहाटे झालेल्या आग दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या दुर्देवी घटनेनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान तातडीने केरळला रवाना होत आहे.

“कोल्लम मधल्या मंदिरात झालेली आग दुर्घटना हृदयविदारक आणि धक्कादायक आहे. मृत व्यक्तींच्‍या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आणि जखमी व्यक्तींसाठी प्रार्थना.

मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्याशी कोल्लम येथील मंदिरातल्या आगीबाबत बोललो. गंभीर रित्या जखमी झालेल्यांना हेलिकॉप्टरद्वारे त्वरीत हलवण्यासाठी व्यवस्था करत आहे.

मंत्रीमंडळातील माझे सहकारी आणि आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांच्याशी बोलून त्यांना कोल्लम येथील आग दुर्घटनेच्या स्थळी पोहोचायला सांगितले आहे.

कोल्लम येथील आग दुर्घटनेमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मी लवकरच केरळला पोहोचत आहे” असे पंतप्रधानांनी ट्विट्‌रमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून कोल्लम येथील आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या आगीत जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांची मदतही जाहीर केली आहे.

पंतप्रधान परिस्थितीवर कायम लक्ष ठेवून असून अधिकाऱ्यांशी संपर्कातही आहेत. गंभीर जखमी झालेल्यांना हेलिकॉप्टरद्वारे हलवण्यासाठी हवाईदल आणि नौदलाने मदत करावी, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. पंतप्रधान लवकरच केरळला जात आहेत आणि केरळमध्ये आगमन झाल्यानंतर शिष्टाचाराची औपचारिकता पाळू नये आणि मदत तसेच बचाव कार्यावर लक्ष्य केंद्रीत करावे, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथकही पंतप्रधानांसोबत केरळला जात आहे.

J.Patnakar/S.Tupe/M.Desai