Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जलसंवर्धनाच्या कामी शासकीय युवा संघटनांना एकत्रित प्रयत्न करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

जलसंवर्धनाच्या कामी शासकीय युवा संघटनांना एकत्रित प्रयत्न करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन


राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एन सी सी , एन एस एस, भारत स्काऊट आणि गाईड, भारतीय रेड क्रॉस सोसायटी तसेच एन वाय के एस, सह सर्व शासकीय युवा संघटनांच्या कार्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी आढावा घेतला.

दोन तास चाललेल्या या बैठकीत युवा संघटनांच्या कार्यात ताळमेळ असण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी वारंवार व्यक्त केली.

येत्या काही महिन्यात मनरेगा अंतर्गत जलसंरक्षण आणि जलभंडारणासाठी व्यापक मोहिम राबवली जाणार आहे. युवा संघटनांनी या कामी जनजागृती करुन नागरिकांना सक्रीय करावे आणि सर्वतोपरी योगदान द्यावे, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

युव संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी आपले कामकाज आणि समाजातील आपल्या भूमिकेबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. यासंदर्भात पंतप्रधानांनी युवा संघटनांना अनेक सूचना केल्या. विशेषत: स्वच्छता, उघड्यावर शौच करण्यापासून पूर्ण मुक्ती आणि युवा वर्गात राष्ट्रीय भावना विकसित करणे, या बाबींचा पंतप्रधानांनी आवर्जून उल्लेख केला. हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी युवकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले.

बालकांच्या लसीकरणासाठी सुरु करण्यात आलेल्या इंद्रधनुष मोहिमेच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी चर्चा केली आणि याकामी युवकांनी योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी दरवर्षी 12 जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनी सादर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमधे ताळमेळ राखण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. शासकीय युवा संघटनांनी सोशल मिडीयावर सक्रीय रहावे आणि युवा वर्गाशी उत्तम संपर्क राखावा, असे पंतप्रधानांनी सांगितले.

M.Pange / B. Gokhale