Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जोहान्सबर्ग इथे एका कार्यक्रमात पंतप्रधानाचे भाषण

जोहान्सबर्ग इथे एका कार्यक्रमात पंतप्रधानाचे भाषण


नमस्ते,

इथे उपस्थित विशाल जनसमुदाय,

विविध राजकीय पक्षांचे नेते,

बंधू आणि भगिनींनो,

सानिबोनानी,नमस्कार,वणक्कम,केम छो,

दक्षिण आफ्रिकेमध्ये आता उपस्थित असणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.

तुम्हा सर्वांमध्ये उपस्थित असणे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही सर्वजण मला आशिर्वाद देण्यासाठी खूप दुरून आला आहात. तुम्हाला भेटण्याचे सौभाग्य मला लाभले. जोहान्सबर्ग, उर्बन, ब्लुम्फोउनटेन, केपटाऊन तर काही जण बोस्त्स्वाना तसेच लेसोतो येथून आला आहात. मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. तुम्ही सर्वजण आपापल्या कामत खूप व्यस्त असता. सर्वांच्या खांद्यावर काही ना काही जबाबदाऱ्या आहेत. आज मला भेटण्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून आलात यासाठी मी तुमचा आभारी आहे.

तुम्ही माझे जे स्नेहपूर्वक आणि प्रेमाने स्वागत केले त्यासाठी धन्यवाद. तुमच्या या प्रेम आणि स्नेहामुळे या महान देशाचा माझा दौरा अधिकच विशेष झाला आहे. हिंद महासागर पार करुन मी माझ्यासोबत 1.25 भारतीयांची मैत्री आणि स्नेह घेऊन आलो आहे. माझ्या आजच्या भाषणाबद्दल तुमची मते आणि विचार जाणून घेण्यासाठी, माझा हा दौरा सुरु होण्याआधीच मी तुम्हा सर्वांना ईमेल केले होते. नरेंद्र मोदी ॲपवर मला हजारो नवीन आणि उपयुक्त सूचना मिळाल्या आणि त्या सूचनांमुळे तुमच्या सोबतचा संवाद अधिक चांगला करायला मला मदत झाली.
मित्रांनो,

• आपण जरी वेगळ्या किनाऱ्यांवर राहत असलो;

• आपली प्रमाणित वेळ वेगळी असली;

• इतिहासात आपले वंशज जरी वेगळे झाले असले;

• आपले राष्ट्रीयत्व जरी वेगळे असले;

• आपण जरी दोन भिन्न क्रिकेट संघांना पाठिंबा देत असलो.

तरीही, आपली सामाईक संस्कृती, धर्म आणि आध्यात्मिक वारसा याची खात्री देतो की, आपण हृदय आणि बुद्धीने एकसंघ आहोत.

मित्रांनो,

परवा १० जुलै आहे. आपल्याला ह्या दिवसाचे महत्त्व माहित आहे का? याच दिवशी वर्ष १९९१ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट वरून आंतरराष्ट्रीय मंजुरी हटवण्यात आली होती. या घटनेच्या काही महिन्यानंतरच दक्षिण अफ्रिकेच्या संघाने आपला पहिला सामना भारतात खेळला होता आणि इतिहासाचा दुसरा पैलू बघा की, वर्णद्वेषा दरम्यान ज्या भारताने दक्षिण अफ्रिकेवर बहिष्कार टाकला होता त्याच भारताने वर्णद्वेषा नंतर दक्षिण अफ्रिकेला सर्वात आधी जवळ केले.

मित्रांनो,

जेव्हा मी तुम्हाला बघतो, तेव्हा मला तुमचे पूर्वज आणि त्यांच्या वेदनांची आठवण येते, त्याचसोबत त्यांची बहादुरी देखील आठवते.

शतकांपूर्वी आपले पूर्वज प्रवास करत दक्षिण अफ्रिकेच्या अनभिज्ञ किनाऱ्यावर पोहोचले. त्यांना तिथे अथक परिश्रम आणि भयंकर दारिद्र्याचा सामना करावा लागला. त्या परीस्थितही ते डगमगले नाहीत आणि आपले कार्य करत राहिले. वर्णद्वेषाच्या जाचाखाली दशके घालवल्या नंतरही त्यांनी केवळ त्यांची संस्कृती, परंपरा आणि भाषेचे जतन केले नाही तर त्यांनी ते अधिक समृद्ध होण्यासाठी नवीन पंख दिले. आणि, आज, हिंदी, तमिळ, गुजराती, उर्दू आणि तेलगु भाषेची सुंदरता निरंतर दक्षिण अफ्रिकन समाजाची रचना समृद्ध करत आहेत. होळीचे रंग, दिवाळीचा झगमगाट, पोंगलची चव आणि ईदचा सण हे केवळ भारतीय सांस्कृतिक परंपरेचे इंद्रधनुष्य नाही तर ते चैतन्यमय दक्षिण अफ्रिकेचे प्रतिक देखील आहे. या देशात तुमच्या पूर्वजांच्या कथा ह्या कदाचित गरिबी आणि गुलामगिरीच्या असतील परंतु, त्यांचा वारसा हा गर्व आणि त्यागाचा आहे आणि त्याचे प्रतिबिंब तुमच्या यशात आणि भरभराटीमध्ये दिसून येते. या महान देशाच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याणासाठी तुम्ही केलेले विशाल योगदान हे एक उघड सत्य आहे जे कोणी नाकारू शकत नाही. वसुधैव कुटुम्बकम् या भारतीय लोकस्वभावातील कुटुंब या शब्दाची कल्पना ही तुम्ही दुसऱ्यांची काळजी घ्या अशी आहे; आणि त्याच अनुषंगाने उमुन्तु नगुमुन्तु नागबंतू या दक्षिण अफ्रिकन लोकस्वभावाचे तुम्ही पालन केले आहे.(तुम्ही जे आहात ते इतर व्यक्तींमुळे आहात.)

मित्रांनो,

तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे माहित नसेल की, तुमच्या पूर्वजांनी एक असे योगदान दिले आहे की, ज्याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. भारताचा किनारा सर्वात आधी सोडणाऱ्यामध्ये तुमचे पूर्वज होते. त्यांचा त्याग, आपली सांस्कृतिक पाळेमुळे जतन करण्याचा त्यांचा निश्चय आणि सर्व विपरीत परिस्थितींमध्ये त्यांना मिळालेलं यश यामुळे दक्षिण अफ्रिकन भारतीय पिढीला एक आकार प्राप्त झाला. जगभरातल्या भारतीय समाजाच्या बौद्धिक क्षमतेवर याचा प्रभाव पडला. सर्व अडचणींवर मात करत तुमच्या पूर्वजांनी जे यश संपादन केले त्यामुळे भारतीय समाज आज संपूर्ण जगात मानाने उभा आहे.

मित्रांनो,

हे शहर आणि इथल्या लोकांचे आमच्यासाठी खूप महत्त्व आहे. इथेच महात्मा गांधीनी आपल्या राजनीतीला मूर्त स्वरूप दिले. सत्याग्रहाची ही जन्मभूमी आहे. दक्षिण अफ्रिकेने मोहनदासला महात्मा बनविले वंशभेदाच्या जुलुमाविरुधच्या लढयात गांधी एकटे नव्हते. दक्षिण अफ्रिकन स्वातंत्र्य संग्रामातील अनेक हिरो तुमच्यामध्ये आहेत. १६ वर्षाच्या वाल्लींमाचा त्याग, निडर थंबी नायडू आणि निस्वार्थी मोहम्मद काच्लिया यांना कोण विसरेल? आज मला अहमद कथ्रडा यांना भेटण्याचे सौभाग्य लाभले. त्यांनी नेलसन मंडेला यांच्यासोबत २६ वर्ष तुरुंगात काढली. रोबबेन बेट तुरुंगाचा कठोरपणा लालू चिबा, मैक महाराज किंवा बिली नायर यांचे मनोधैर्य खच्ची करू शकले नाही. आणि माझ्यासाठी ही खूपच आनंदाची बाब आहे की ह्या सर्वांना भेटण्याची संधी मला आज मिळाली. त्यांनी ज्या यातना सहन केल्या आहेत त्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न भाव बघून मी एक नवीन उर्जा, एक नवीन प्रेरणा घेऊन भारतात जाईन. या सर्वांनी आपल्या मुल्यांकरिता अनेक कष्ट सहन केले, या भूमीवर असा एकही भारतीय नसेल ज्याला भारत मातेच्या या पुत्रांवर गर्व नसेल.

सर्व दक्षिण अफ्रिकेला मोकळा श्वास घेता यावा यासाठी अफ्रिकन बंधू भागिनींसोबत भारतीयांच्या अनेक पिढ्यांनी संघर्ष केला आहे. या देशासोबत एकनिष्ठ राहिलेल्या तुम्हा सर्वांना आणि तुमच्यासारख्याच अगणित लोकांना मी वंदन करतो. भारतीय परंपरेची तुम्ही अभिमानी मुले आणि मुली आहात. तुम्ही दक्षिण अफ्रिकेचे निष्ठावान नागरिक आहात. तुम्ही दक्षिण अफ्रिकेचे कष्टाळू नागरिक आहात. तुम्ही जागतिक भारतीय कुटुंबाला विस्तृत करणारे घटक आहात. तुम्ही आपल्या या दोन महान देशांदरम्यान एक अनोखा बंध निर्माण केलात. आपली सामाईक मूल्य आणि संघर्षाने तो बंध अधिक दृढ झाला आहे. बंध जो आधार आहे आपल्या समृद्ध भविष्याच्या वचनांचा.

मित्रांनो,

दक्षिण अफ्रिकेची भूमी पवित्र आहे. ही मादिबाची भूमी आहे आणि महात्मा गांधींची कर्मभूमी आहे. या दोन महान व्यक्तींनी जो आपल्याला मार्ग दाखवला आणि जे स्वातंत्र्य त्यांनी आपल्यासाठी मिळवले ते संपूर्ण मानवसमाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे अथक चैतन्य, धैर्य आणि नैतिक बळ हे येणाऱ्या पिढ्यांकरिता नेहमी मार्गदर्शक ठरेल. महात्मांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांच्या विरुद्ध सुरु केलेला स्वातंत्र्याच्या लढ्याने आधुनिक भारताला जन्म दिला. नेलसन मंडेलांची क्षमाशीलता आणि त्यांच्या अखंड स्वातंत्र्य लढ्याने इंद्रधनुष्य राष्ट्राचा उदय झाला.
महात्मा गांधी हे नेहमी म्हणायचे की या भूमीवर त्यांचा पुन्हा एकदा जन्म झाला आहे.

वर्ष १९१४ मध्ये दक्षिण अफ्रिकेतील त्यांच्या निरोप समारंभात ते म्हणाले होते की, “ माझ्या जन्मभूमी नंतर हे उपमहाद्वीप माझ्यासाठी पवित्र आणि प्रिय स्थान आहे. मी जड अंतकरणाने दक्षिण अफ्रिकेच्या किनाऱ्यावरून जात आहे, आता हे अंतर मला दक्षिण आफ्रिकेपासून दूर करेल पण मला या महान देशाच्या अधिक समीप घेऊन येईल आणि ह्या देशाचे कल्याण हा माझ्यासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण विषय राहील” आणि आज १०० वर्षांनंतरही जेव्हा आम्ही दक्षिण आफ्रिकेचा आणि तुमचा विचार करतो तेव्हा हे शब्द आमच्या कानात दुमदुमतात.
बंधू आणि भगिनींनो,

आपण अशा जगात राहतो जे एकमेकांवर अवलंबून आहे आणि एकमेकांना जोडले गेले आहे. तुमच्यापैकी बरेचजण आता भारतातील विकासप्रक्रियेशी जोडले गेला असाल. तुमच्या पूर्वजांच्या भूमीशी जोडले जाणे ही तुमची भावनिक इच्छा असेल.

भारत ही आज संधींची भूमी देखील आहे जे,

• जोडले आणि एकत्र येऊ इच्छितात,

• नाविन्य आणि शोध;

• व्यापार आणि गुंतवणूक; आणि

• उत्पादन आणि अभियांत्रिकी.

जागतिक अर्थव्यवस्थेत आज भारताचे स्थान महत्वपूर्ण आहे.जागतिक विकासदर कमी होत असताना आणि आर्थिक मंदीचे सावट असताना भारताने यावर्षी ७.६ टक्के विकासदर नोंदवला आहे. आगामी वर्षांमध्ये हा दर ८ आणि त्याहून अधिक करण्याच्या दृष्टीने आम्ही कार्य करत आहोत. भारतीय गतिशीलता हा केवळ एक शब्द नाही. ही एक ठोस कृती आहे जी भारतीय अर्थव्यवस्थेचा चेहरा बदलण्याच्या आमच्या वचनबद्धतेला केवळ शाश्वत गतिमान आर्थिक वृद्धीच्या माध्यमातूनच आणि तर विविध परिवर्तनाच्या माध्यमातून देखील प्रदर्शित करते. आणि म्हणूनच मी सांगतो आहे की, तुम्ही एकदा येऊन बघा की भारताचा कसा कायाकल्प झाला आहे.

परिवर्तन ज्याचा उद्देश :

• भारताच्या सव्वा अब्ज नागरिकांचे;

• ५०० शहरांचे;

• ६०० हजार गावांचे जीवनमान सुधारणे आहे.

उद्योग समृद्ध व्हावे, व्यापाराचा विकास व्हावा आणि देशाची प्रगती व्हावी अशी आमची इच्छा आहे. यासाठी आम्ही आधीच योजना आराखडा तयार केला आहे, जो जगातील इतर देशांसोबत व्यापार, वस्तुनिर्माण, नाविन्य आणि गुंतवणूक भागीदारीच्या भारतीय क्षमतेला मजबुती प्रदान करेल. आमचे लक्ष्य व्यापार सुलभीकरणावर आहे ज्याचा उद्देश भारतामध्ये सार्वजनिक, खाजगी आणि वैयक्तिक व्यापाराचा विकास त्यांच्या पूर्ण क्षमतेनुसार व्हाव आणि यासोबतच पायाभूत सुविधांचा विकास व्हावा अशी देखील आमची इच्छा आहे. पायाभूतसुविधा ज्या केवळ लोकांना मुलभूत गरजा जसे घर, निवारा, वीज, पाणी आणि आरोग्यविषयक व्यवस्थाच देणार नाही तर आपल्या लोकांना आर्थिक समृद्धीची कवाड खुली करून देणारी बंदरे, विमानतळे, रेल्वे आणि रस्ते यासारख्या आधुनिक सेवा देखील प्रदान करतील. १०० स्मार्ट शहरे उभारण्याच्या आमच्या योजनेचा उद्देश हा शहरी समाज तयार करणे जो शाश्वत आणि पर्यावरण सुलभ आणि उपलब्ध स्रोतांचा योग्य वापर करेल. जगातल्या सर्वोत्तम माहिती तंत्रज्ञान विशेषज्ञांचा सहाय्याने आम्ही देखील डिजीटल क्रांती घडवून आणत आहोत.

क्रांती जी मार्ग बदलेल:

• सरकारचे नागरिकांप्रती कर्तव्य;

• व्यापाराचे आपल्या ग्राहकासोबतचे संपर्क; आणि

• समाजाचा आपल्या जुन्या आणि नवीन वास्तूंसोबतचा संबंध.

क्रांती, जी डिजीटल पायाभूत सुविधांवर अवलंबून आहे ती माहितीच्या महामार्गावरील माहिती, नाविन्य आणि सूचनांच्या खुल्या आदान प्रदानाला मंजुरी देते.

मित्रांनो,

भारत हा दक्षिण अफ्रीकेप्रमाणेच एक तरुण देश आहे. आपल्या ८०० दशलक्ष युवकांची उर्जा ही संपूर्ण देशाच्या ध्येय आणि इच्छेचे इंधन आहे. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि समाजाला प्रगतीच्या दिशेने नेणारे इंजिन बनावे अशी आमची इच्छा आहे. आणि, यासाठी भारतीय युवकांचे कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही अभियान राबवीत आहोत. वर्ष २०२२ पर्यंत भारतात ५०० दशलक्ष नवीन नोकऱ्या निर्माण करण्याची योजना आहे. या युवकांनी केवळ भारताचीच गरज भागवू नये तर कुशल मनुष्यबळाची वाढती जागतिक मागणी देखील पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे. केवळ अर्थव्यवस्था आणि समाजाचा विकास होतोय असे नाही तर आपल्या लोकांचा वैचारिक दृष्टीकोण देखील बदलत आहे. आणि मी ज्या बदलांबद्दल बोलत आहे ते केवळ कागदोपत्री आणि आमच्या योजनांमध्ये नाहीत तर ते वास्तवात दिसून येत आहेत. आपल्या गावांमध्ये उर्जेची एक नवीन लाट दिसून येत आहे. शहरे उद्योग आणि उर्जेने पूर्ण आहेत. आपल्या युवकांमध्ये आत्मविश्वास आला आहे. आणि, भारतीय नागरिक आशावादी झाला आहे.

भारताचा उदय ही गोष्ट आहे:

• दुर्लभ लवचिकपणा

• नवीन पुनरुत्थान

• अद्वितीय वेग; आणि

• नेत्रदीपक प्रमाणांची.

आज भारताची कथा केवळ ४ अक्षरांमध्ये सांगू शकतो, ही ४ अक्षर आहेत HOPE. जिथे:

• एच म्हणजे : हार्मोनी (एकोपा)

• ओ म्हणजे : ऑप्टीमिझम (आशावाद)

• पी म्हणजे : पोटेनशियल (क्षमता)

• ई म्हणजे : एनर्जी (ऊर्जा)

आणि ह्याचे श्रेय केवळ मोदीला नाही तर सव्वा अब्ज भारतीय नागरिकांना जाते. आणि त्यांनी माझ्या सरकारवर ठेवलेल्या विश्वासाला जाते.

असे करताना त्यांनी अवलंब केला:

• बोलण्यापेक्षा कृती करणे;

• नकारात्मक दृष्टीकोनाऐवजी सकारात्मक दृष्टीकोण;

• ध्येयपूर्तीसाठी लक्ष्य केंद्रित करणे;

• आंतरराष्ट्रीय विषयांवर केवळ प्रतिक्रया देण्याऐवजी त्याच्या जडणघडणीमध्ये सहभागी होण्याची इच्छा; आणि

• वाढीव बदलांपेक्षा परिवर्तनीय उडी मारणे.

बंधू आणि भगिनींनो,

आपल्या दोन्ही देशांची महत्त्वाकांक्षा आणि आव्हाने समान आहेत. या देशातील स्वातंत्र्याच्या आंतरराष्ट्रीय चळवळीमधील भारत हे एक नेतृत्व होते. वर्णद्वेषा विरुद्धच्या जागतिक लढयात आपण अग्रस्थानी होतो. पण, मी या आधीच सांगितल्याप्रमाणे, जेव्हा या इंद्र्धानुष्यी राष्ट्राचा उदय झाला तेव्हा आम्ही सर्वप्रथम मैत्रीचा हाथ पुढे केला. आणि, त्यानंतरचा इतिहास तर वेगळाच आहे.

यासोबतच आपल्या बंधाच्या नवीन आणि तेजस्वी अध्यायाला सुरुवात झाली. आपल्या आर्थिक निवडींमध्ये, आपल्या युवक आणि लोकांसाठी आपण एकत्रित अनेक गोष्टी करू शकतो. भारत आणि दक्षिण अफ्रिका दोघांकडे अमाप जनसांख्यिकीय संधी आहेत. आपल्या दोघांकडे युवकांची लोकसंख्या खूप आहे. भारतामध्ये दोन तृतीयांश लोकांचे वय ३५ हून कमी आहे. हीच गोष्ट अफ्रिकन खंड आणि दक्षिण अफ्रिकेची आहे. आपल्या विकासाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आपण आपले अनुभव, भागीदारी आणि तज्ञांची देवाणघेवाण करायला हवी. दक्षिण अफ्रिका त्यांच्या लोकांच्या आर्थिक समृद्धी, सुरक्षा आणि संरक्षणासाठी काम करत असताना भारताकडे ते विश्वसनीय भागीदार म्हणून पाहू शकतात.

तुमच्या या प्रवासात भारत तुमच्या सोबत येण्यासाठी तयार आहे. आपली विकास आणि व्यापार भागीदारी खूप चांगल्याप्रकारे कार्यरत आहे. परंतु त्याला अधिक वेगवान करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. एकत्रित आपण नवीन उद्योग, नवीन कौशल्य आणि नवीन सामाजिक मूल्य तयार करू शकतो. भारत आणि दक्षिण अफ्रिका हे धोरणात्मक भागीदार आहेत. आपण अशी भागीदारी उभारू जी समस्त मानवी प्रयत्नांचा विस्तार करेल.
भागीदारी जी विभिन्न क्षेत्रांमध्ये नवीन उंची गाठेल:

• कृषी ते आरोग्यसेवा;

• संस्कृती ते वाणिज्य;

• परंपरा ते व्यापार;

• उद्योग ते संस्था उभारणी;

• गुंतवणूक ते माहिती तंत्रज्ञान;

• खाण ते निर्माण;

• क्रीडा ते विज्ञान व तंत्रज्ञान; आणि

• संरक्षण ते विकास.

प्रादेशिक भागीदारीत देखील आम्ही सक्रीय आहोत. अफ्रीकेमधील आपल्या मित्रांकारिता आपण एकत्रितपणे आपण नवीन मूल्य देखील तयार करू शकतो. आपल्या कंपन्यांमध्ये याआधीच भागीदारी झाली असून आपल्या नागरिकांना त्याचा आर्थिक लाभ मिळत आहे. गरिबी, कुपोषण, रोग आणि भूक याविरुद्ध लढण्यासाठी आपण आपल्या युवकांना एकत्रितपणे सक्षम करू शकतो. आणि, पुन्हा हे केवळ आपल्या देशांसाठीच नाही तर, अफ्रिका आणि इतर विकसनशील क्षेत्राच्या पलीकडे याचा उपयोग होऊ शकतो. आपण जागतिक आव्हानांच्या युगात रहात आहोत. दहशतवाद आणि चाचेगिरीविरुद्ध लढा देत आहोत, एड्स आणि इबोला हे आपल्या भागीदारीमधील काही प्राधान्याने सोडवण्याचे विषय आहेत. आर्थिक समृद्धीसाठी करण्यात आलेली आपली भागीदारी हवामान बदलाबत देखील संवेदनशील आहे. paris कराराला आम्ही मंजुरी दर्शवली आहे. वातावरण समृद्ध जगासाठी नवीन उर्जा मार्ग शोधण्याकरिता आणि तंत्रज्ञान पर्यायाकरिता आपण मजबूत भागीदार म्हणून एकत्रित येवून काम करायला हवे. जागतिक कृतीला प्रवाही करण्याकरिता, भारताने आंतरराष्ट्रीय सौर युती सुरु केली आहे ज्याला १२० हून अधिक देशांचा पाठिंबा आहे. या कार्यक्रमामध्ये सौर उर्जा समृद्ध दक्षिण अफ्रिका महत्त्वपूर्ण देश आहे. जागतिक विषयसूची अंतर्गत इब्सा IBSA (भारत, ब्राझील आणि दक्षिण अफ्रिका) आणि ब्रिक्सच्या माध्यमातून आपल्या भागीदारीने अनेक महत्तवपूर्ण विषयांना हाताळले आहे.

बंधू आणि भगिनींनो,

पुनरुत्थानित भारत तुमची वाट बघत आहे. आणि प्रवेशामधील अडथळे दूर करण्यासाठी आम्ही अनेक उपाययोजना केल्या आहेत. ओसीआय आणि पीआयओ या त्यातल्याच योजना. यावर्षी फेब्रुवारीमध्ये आम्ही दक्षिण आफ्रीकेकारिता ई – व्हिसा योजना सुरु केली. आता तुम्हाला भारताचा व्हिसा घरी बसून तुमच्या ईमेलद्वारे मिळू शकतो आणि तो ही मोफत!

बंधू आणि भगिनींनो,

भारत आणि दक्षिण अफ्रिकेला या दृढ भागीदारीचा अजून लाभ होणार आहे. तुम्ही भारताचा वारसा, आमच्या रूढी आणि मुल्यांचा झरोका आहात. दक्षिण अफ्रिकेच्या राजकीय स्वातंत्र्यासाठी तुमच्या पूर्वजांनी संघर्ष केला, दक्षिण आफ्रिकेच्या आर्थिक विकासाचे आज तुम्ही महत्वपूर्ण योगदानकर्ते आहात. आणि, या भूमिसोबत आमचे बंध जीवित ठेवण्यामध्ये तुम्ही महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

माझ्या भाषणाचा समारोप करताना मी ही सांगू इच्छितो की, तुमची कामगिरी, तुमचे योगदान आणि तुमचे यश या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे. तुमच्यासोबत जोडले जाणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. ही एक खूप मोठी संधी होती. आणि, तुम्ही जर माझ्यासोबत संवाद साधायला इच्छित असाल तर ते शक्य आहे. तुम्ही नरेंद्र मोदी ॲप डाउनलोड करून माझ्या संपर्कात राहू शकता. तुमच्या सर्वांमध्ये उपस्थित रहायला मला खूप आवडले.

खूप खूप धन्यवाद!

नमस्ते!

B.Gokhale/S.Mhatre