Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

झारखंड येथील खुंटी जिल्हा न्यायालयाच्या सौर ऊर्जा संयत्राच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

झारखंड येथील खुंटी जिल्हा न्यायालयाच्या सौर ऊर्जा संयत्राच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

झारखंड येथील खुंटी जिल्हा न्यायालयाच्या सौर ऊर्जा संयत्राच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

झारखंड येथील खुंटी जिल्हा न्यायालयाच्या सौर ऊर्जा संयत्राच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

झारखंड येथील खुंटी जिल्हा न्यायालयाच्या सौर ऊर्जा संयत्राच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण


माझ्या प्रिय बंधु आणि भगिनिंनो, मी विचार करत आहे की आज इतिहासात अनेक नव्या नोंदी होणार आहेत. देशात प्रथमच न्यायालयाच्या एखाद्या कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक जमले असल्याचे पाहावयास मिळत आहे. काळा कोट घालून यायचे आणि खुर्चीत बसायचे, एवढेच तेथील वातावरण असते. हे जे दृश्य मी पाहत आहे, तो एक चमत्कारच म्हणावा लागेल. मी झारखंडला शुभेच्छा देतो. तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो विशेष अभिनंदन यासाठी की एवढ्या मोठ्या संख्येने माता-भगिनी मला दिसत आहेत. मी या सर्वांचे सहृदय स्वागत करतो आणि अभिनंदन करतो.

आज 2 ऑक्टोबर आहे. महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री या महापुरुषांची आज जयंती आहे. काही दिवसांपूर्वीच मला ताश्कंदला जाण्याची संधी मिळाली. ताश्कंदची भूमी ज्याठिकाणी भारतमातेने आपला लाल गमावला होता, लाल बहादूर शास्त्रीजींनी त्याठिकाणी शेवटचा श्वास घेतला होता. मी ताश्कंदला गेलो होतो व त्याठिकाणी मला लाल बहादूर शास्त्रीजींच्या प्रतिमेचे अनावरण करण्याचे भाग्य लाभले. काही दिवसांपूर्वीच भारताने 1965 च्या युद्धाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय पर्व साजरे केले. शौर्य पर्व साजरे करुन देशाने त्या पराक्रमींचे स्मरण केले, ज्यांच्या पंतप्रधानापदाच्या कारकिर्दीत भारतीय सैन्याने आपला पराक्रम दाखवला आणि देशाला विजय मिळवून दिला होता.

आज पूज्य बापूजींची जयंती आहे. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की, या कार्यक्रमात पंतप्रधान कसे पोहचले, एकप्रकारे मी हा कार्यक्रम समोरून हिसकावून घेतला आहे. न्यायमूर्ती जी एन पटेलजी यांचा एकेदिवशी फोन आला की आम्ही असे काम केले आहे. त्यांनी फोन का केला, हे मी विचारले नाही. मी सरळ सांगितले की 2 ऑक्टोबरला मी येणार आणि आज गांधी जयंती आहे. गांधी स्वत: पर्यावरणाविषयी फार जागरुक होते. पूर्ण आयुष्यभर त्यांनी अतिशय साधेपणाने निसर्गाचे रक्षण कसे केले ते दाखवले आहे. मी सांगितले मी तुमच्याकडे येणार. त्यांनाही काही बॉम्बगोळा फुटल्यासारखे वाटले. अचानक पंतप्रधान म्हणत असेल की मी येणार. तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल आणि विशेषतः प्रसारमाध्यमांतील मित्रांना चांगला मसाला मिळेल. मसाला यासाठी मिळेल की, देशाचा पंतप्रधान आणि तो जिल्हा न्यायालयात जात आहे. हा कसला पंतप्रधान आहे जो 175 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेचे स्वप्न पाहतो आहे आणि 185 किलोवॅट साठी खूंटी गावापर्यंत येत आहे. याचे कोणालाही आश्चर्य वाटेल की कुठे 175 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेचे स्वप्न आणि कुठे 185 किलोवॅट वीज. पण, मला या ठिकाणी यावे वाटले कारण आजची दोन ऑक्टोबर जी माझी प्रेरणा आहे. महात्मा गांधींची जयंती माझी प्रेरणा आहे आणि पूर्ण विश्वाचीही.

नुकताच मी संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीसाठी गेलो होतो. पूर्णवेळ जगातील सर्व देशांची एकाच विषयावर चर्चा होती की, पर्यावरणाचे काय होणार. ग्लोबल वॉर्मिंगमुळे कशी समस्या येणार, पावसाचे प्रमाण अनिश्चित होत आहे काय होणार, समुद्राची पातळी वाढत आहे, काय होणार, काय छोटे-छोटे देश बुडून जातील का. चोहोबाजूंनी समस्त जगाला एकच चिंता भेडसावत आहे. परंतु, मी आज सव्वाशे कोटी देशवासियांच्या वतीने जगाला सांगू इच्छितो की, हे जे संकट आले आहे त्या पापाचे आम्ही वाटेकरी नाहीत. आमच्या पूर्वजांनी आम्हाला कधीच विनाशाचा रस्ता दाखवला नाही. पण, जरी कोणाच्या पापाची शिक्षा कोणाला भोगावी लागत असेल, मानवतेच्या रक्षणासाठी भारतालाही आपले योगदान द्यावे लागेल. आणि आम्ही ते देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि मी इथे येण्यामागे आणखी एक महत्वाची बाब आहे. गुजरात असेल, राजस्थान असेल त्याठिकाणच्या लोकांनी सौर ऊर्जेसाठी प्रयत्न करावे. हे तर कोणालाही समजावून सांगता येईल की, काय करणार कोळसा नाही, मग सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. परंतु, झारखंड जे कोळशाचे भांडार आहे, तो झारखंड जेंव्हा सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रयत्न करतो, तेंव्हा जगासाठी तो नवीन आदर्श प्रस्थापित करतो, एक नवा संदेश देतो. या अर्थाने फक्त भारतच नाही तर पूर्ण जगाने ही गोष्ट समजून घ्यावी की, मी खुंटी या प्रदेशातून बोलत आहे, ज्याठिकाणची मोठी संख्या माझ्या आदिवासी बंधू-भगिनींची आहे. ज्यांनी कैक शतकांपासून जंगलांचे रक्षण केले आहे. ज्याठिकाणी कोळशाचे साठे मुबलक आहेत त्या भागातील जनता मानवकल्याणासाठी आज सौर ऊर्जेचा वापर करण्याचा संकल्प करत आहे, म्हणून मी खास यासाठी आलो आहे. झारखंडला शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे.

आणखी एक कारण म्हणजे मी जेंव्हा गुजरातचा मुख्यमंत्री होतो, तेंव्हा मुख्यमंत्री म्हणून दरवर्षी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमंडळाकडून बोलावलेल्या बैठकीसाठी जात होतो. सर्व मुख्यमंत्री येत असत, सर्व उच्च न्यायालयांचे न्यायाधीश येत असत आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पण असत. पंतप्रधान येऊन आपले भाषण देऊन जात व नंतर दिवसभर आमची बैठक चालत असे. त्यावेळी सर्व समस्यांवर चर्चा होत असे, की न्यायलयांमध्ये खटले का प्रलंबित आहेत, खटले का पूर्ण होत नाहीत. इथे आमच्यामध्ये आता प्रदीप भट बसले आहे, त्यावेळी ते रजिस्ट्रार होते. तेही त्या बैठकीला उपस्थित होते. त्यावेळी उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी जे सांगितले ते आश्चर्यचकीत करणारे होते. ज्यावेळी त्यांना विचारले की, एवढे खटले का प्रलंबित आहेत, निकाल का लागत नाही. त्यांनी जे उत्तर दिले, मी ज्या राज्यातून आलो, मी तेथील परिस्थिती पाहिली होती, ते माझ्यासाठी फार आश्चर्यकारक होते. त्यांनी सांगितले होते, आमच्याकडे आठवड्यातून एक किंवा दोन दिवसच वीज उपलब्ध असते. आणि आमच्या न्यायालयाचे बांधकाम असे आहे, की तिथे कायम अंधार असतो. वीज असते त्यावेळीच न्यायालयाचे कामकाज चालवणे शक्य होते. आठवड्यातून तीन- चार दिवस तर आम्ही वीज नसल्यामुळे कामकाज चालवू शकत नाही. यामुळे खटले चालत नाहीत आणि लोकांना न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागते. मी आश्चर्यचकीत झालो होतो. देशाच्या स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षातही माझ्या देशात वीज नसल्यामुळे सामान्य व्यक्ती न्यायासाठी तळमळतो आहे. आज मी याठिकाणी येण्यामागची प्रेरणा आहे की, ती गोष्ट मला आठवली आणि आज झारखंडच्या न्यायमूर्तींनी या समस्येवर उपाय शोधून काढला. याठिकाणी आता सौर ऊर्जेवर न्यायालयाचे कामकाज चालेल. पर्यावरणाचे रक्षण तर होईलच पण न्याय दानासाठी एक नवे क्षेत्र खुले होईल.

मागील काही दिवसांमध्ये तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये वाचले असेल, मला माहित नाही की झारखंडमधील वर्तमानपत्रांमध्ये अशा चांगल्या बातम्या येतात की नाही. पण मागच्या काही दिवसांमध्ये तुम्ही कदाचित वृत्तवाहिन्यांवर पाहिले असेल, काही जणांनी ते दाखवले होते, काही जणांनी लिहिलेही होते, जगातील सौर ऊर्जेवर पूर्णपणे चालणारे पहिले विमानतळ कोची आहे, आता एक दोन महिने झाले असतील. काही दिवसांपूर्वीच मी फरीदाबाद ते दिल्ली मेट्रो रेल्वेच्या उद्‌घाटनासाठी गेलो होतो. तेथील मेट्रोची सर्व स्थानके सौर ऊर्जेवर चालणारी आहेत. ते फार मोठे काम झाले आहे. जर तुम्ही वैष्णोदेवीला जाल तर जे शेवटचे स्थानक आहे, ते पूर्ण स्थानक आम्ही सौर ऊर्जेवर केले आहे. आज देशातील पहिले न्यायालय, जिल्हा न्यायालय पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणार आहे. देशासाठी ही नवीन भेट असल्याचे मी मानतो. ही महात्मा गांधींना उत्तम आदरांजली आहे, कारण गांधी आयुष्यभर यासाठी आग्रही होते. आणि त्या अर्थाने मी मानतो की हा महत्वपूर्ण प्रयत्न आहे.

आमच्या इथे शास्त्रांमध्ये या विषयांवर हजारो वर्षांपूर्वी फार काही सांगितले आहे. ऋगवेदात पाच हजार वर्षांपूर्वी एक महत्वपूर्ण संदेश देण्यात आला आहे. ऋगवेदात म्हटले आहे-‘सूर्य आत्‍मा जगतास तथुष:’ म्हणजे सूर्यदेव चल आणि अचल यांचा आत्मा आहे. चल आणि अचल काहीही असो त्याचा आत्मा सूर्यदेव आहे. त्या सूर्यशक्तीकडे आज जगाचे लक्ष वेधले आहे. भारताचे स्वप्न आहे 175 गिगावॅट, भारतात पूर्वी जेव्हा विजेविषयी चर्चा होत होती, तेंव्हा ती मेगावॅटच्यापुढे सरकत नसे. पूर्ण हिशोब मेगावॅटचा होत असे. प्रथमच देशात गिगावॅटची चर्चा होत आहे. जेव्हा मी जगाला सांगतो की, 2022 जेव्हा आम्ही स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करू, आम्ही 175 गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेच्या उद्दिष्टामध्ये यशस्वी होऊ. हे आकडे ऐकूनच जगाला आश्चर्य वाटते. सर्वजण आम्हाला शुभेच्छा देतात, स्वागत करतात. एवढी मोठी मोहीम आम्ही निर्धारित केली आहे, जी आगामी काळात पर्यावरणाचे रक्षण करेल.

या महत्वपूर्ण योजनेसाठी मी पुन्हा एकदा झारखंडचे अभिनंदन करतो. मी झारखंडच्या नागरिकांना एक गोष्ट सांगू इच्छितो, काय तुम्ही माझे म्हणणे ऐकाल? सर्वजण तुम्ही तयार असाल तरच सांगतो. माता-भगिनिंनो तुम्ही सांगा तुम्ही माझे म्हणणे ऐकाल? नक्की ऐकाल? तुम्हाला असे वाटते का, तुमच्या घराचे वीज बिल कमी आले पाहिजे. ज्यांच्याकडे वीज आहे, त्यांना वाटते विजेचे बिल कमी असले पाहिजे. तुम्हाला वाटते पैसे वाचले पाहिजेत. वाचलेल्या पैशातून तुम्ही तुमच्या मुला-बाळांना दूध पाजाल. तर एक मार्ग आहे, विज्ञानाने एक नवीन शोध लावला आहे तो आहे एलईडी दिव्यांचा. सुरुवातीला थोडे महाग वाटेल पण जर तुमचे 100 रुपये बिल येत असेल. जर तुम्ही एलईडी वापराल, प्रकाश चांगला मिळेल शिवाय तुमचे बिल अर्ध्यापेक्षाही कमी होईल. पैशांची बचत होईल की नाही? मग लावाल ना एलईडी बल्ब, या मोहिमेत सहभागी व्हा. देशभर जशी सौर ऊर्जेच्या मार्गाने जाण्याची आवश्यकता आहे तशीच वीज बचतीचीही आवश्यकता आहे. मानवासाठी वीज बचत काळाची गरज आहे. जर आम्ही नैसर्गिक संसाधनाचा वापर करुन संपवून टाकले तर येणाऱ्या पिढीचे काय? आज आमच्याजवळ जे आहे ती आमच्या घामाची कमाई नाही. आज आमच्या नद्यांमध्ये पाणी वाहत आहे, ती आमची कमाई नाही. आमचे पूर्वज आमच्यासाठी हे सोडून गेले आहेत. आमचे वाडवडिल हे सर्व सोडून गेले आहेत, त्यामुळे आम्हाला हे सर्व मिळत आहे. जर त्यांचे पुण्य आमच्या कामी येत असेल तर आमचे पुण्य येणाऱ्या पिढ्यांच्या उपयोगी आले पाहिजे. ही जबाबदारी आमची आहे. मला खात्री आहे की, देशात याची जागृती करण्याविषयी वातावरण तयार होईल.

पूज्य बापूजींच्या जयंतीदिनी, आणि पूज्य बापू स्वतः बॅरिस्टर होते. त्यांचाही न्यायाशी व न्यायालयाशी संबंध होता. आयुष्यभर ते न्याय देण्यासाठी लढत राहिले. त्यांच्या जयंतीदिनी आज एक न्यायालय जे पूर्णपणे सौर ऊर्जेवर आधारित आहे ते देशाप्रती समर्पित होत आहे. खूप-खूप शुभेच्छा, खूप-खूप धन्यवाद.

S. Kulkarni/S.Tupe