Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाने शोक व्यक्त केला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्यात चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात ५ डिसेंबर २०१६ रोजी निधन पावलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला.

मंत्रिमंडळाने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन मिनिटे शांतता पाळली आणि शोक प्रस्ताव पारित केला. प्रस्तावाचा मसुदा पुढीलप्रमाणे:-

१. चेन्नई येथील अपोलो रुग्णालयात ५ डिसेंबर २०१६ रोजी निधन पावलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळ तीव्र दुःख व्यक्त करत आहे. त्यांच्या निधनाने ‘अम्मा’ या नावाने लोकप्रिय असलेल्या ज्येष्ठ आणि असामान्य नेत्या देशाने गमावल्या आहेत.

२. २४ फेब्रुवारी १९४८ रोजी जन्मलेल्या जे. जयललिता यांचे शालेय शिक्षण बंगळुरूच्या बिशप कॉटन गर्ल्स हायस्कुल आणि चेन्नईतील प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट चर्च पार्क येथे झाले. तामिळ, तेलगू, कन्नड, हिंदी, इंग्रजी आणि मल्याळम भाषेतील चित्रपटातील त्यांची कारकीर्द विशेष गाजली. भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, कथक आणि मणिपुरी यासारख्या शास्त्रीय नृत्यामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला होता. १९७२ मध्ये तामिळनाडू सरकारने त्यांना कलाईममणी पुरस्काराने गौरवले होते.

३. १९८२ मध्ये त्या राजकारणात आल्या आणि एआयएडीएमकेच्या सदस्य बनल्या. १९८४ मध्ये त्या राज्यसभेवर निवडून गेल्या. १९८९ मध्ये तामिळनाडू विधानसभेवर त्या निवडून गेल्या. १९८४ मधील लोकसभा आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये एआयएडीएमकेच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा होता. १९८९ मध्ये तामिळनाडू विधानसभेत त्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या बनल्या.

४. १९९१ मध्ये त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या. त्यांनी जून १९९१ ते मे १९९६ , मे २००१ ते सप्टेंबर २००१, मार्च २००२ ते मे २००६, मे २०११ ते सप्टेंबर २०१४ आणि मे २०१५ ते ५ डिसेंबर २०१६ या कालावधीत तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद भूषवले.

५. तामिळनाडूच्या जनतेने त्यांच्या लोकप्रिय नेत्या गमावल्या आहेत. सरकार आणि संपूर्ण देशाच्या वतीने केंद्रोय मंत्रिमंडळ तामिळनाडूच्या जनतेप्रती शोकभावना व्यक्त करत आहे.

B.Gokhale/S.Kane/Anagha