Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिनलंडच्या पंतप्रधानांसोबत बैठक

तिसऱ्या भारत नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फिनलंडच्या पंतप्रधानांसोबत बैठक


नवी दिल्‍ली, 19 मे 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दि. 19 मे 2026 रोजी ओस्लो इथे आयोजित तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर फिनलंडचे पंतप्रधान पेटेरी ओर्पो यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध डिजिटलायझेशन आणि शाश्वततेअंतर्गतच्या धोरणात्मक भागीदारी पातळीवर नेण्यात आल्याची दखल दोन्ही नेत्यांनी घेतली. या पार्श्वभूमीवर, उद्योग क्षेत्र, संशोधन संस्था आणि शैक्षणिक संस्थांअंतर्गतचे परस्पर सहकार्य अधिक वृद्धींगत करण्याचे महत्त्व दोन्ही नेत्यांनी अधोरेखीत केले. भविष्यातील आर्थिक प्रगती आणि विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने शाश्वतता आणि डिजिटलायझेशनची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचेही  त्यांनी ठळकपणे अधोरेखित केले. व्यापार आणि गुंतवणूक, डिजिटलायझेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता , 5जी/6जी, क्वांटम तंत्रज्ञान, अंतराळ क्षेत्र, शाश्वतता, नवीकरणीय ऊर्जा, चक्रीय अर्थव्यवस्था, नवोन्मेष, शिक्षण, दोन्ही देशांमधील व्यावसायिक तज्ञांची परस्पर देशांमधील ये-जा, आणि दोन्ही देशांच्या नागरीकांमधील परस्पर संबंध या क्षेत्रांअंतर्गत सुरू असलेल्या सहकार्याचा व्यापक आढावाही दोन्ही नेत्यांनी या भेटीत घेतला.

सद्यस्थितीत अनेक जागतिक आव्हाने असतानाही वस्तूमाल आणि सेवांमधील द्विपक्षीय व्यापारात होत असलेल्या सातत्यपूर्ण वृद्धीचे दोन्ही देशांनी स्वागत केले. यासोबतच 2030 पर्यंत सध्याचा द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याच्या  वचनबद्धतेचाही दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला.याव्यतिरिक्त, दोन्ही देशांतील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांचे विस्तारीत कार्यान्वयन आणि भागीदारीच्या माध्यमातून एकमेकांच्या बाजारपेठेतील अस्तित्व अधिक वाढत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. फिनलंडच्या तंत्रज्ञान क्षेत्राची प्रगती आणि नवोन्मेषामध्ये भारतीय व्यावसायिक तज्ञांनी दिलेल्या महत्त्वाच्या योगदानाचेही फिनलंडच्या पंतप्रधानांनी कौतुक केले. येत्या सप्टेंबर 2026 मध्ये गुजरातमध्ये गांधीनगर इथे भारत आणि फिनलंड संयुक्तपणे जागतिक चक्रीय आर्थिक मंचाचे आयोजन करणार असल्याची घोषणाही दोन्ही नेत्यांनी यावेळी केली.

भारत आणि फिनलंडची व्यवस्था ही परस्पर सामायिक लोकशाही मूल्यांवर आधारित आहे, आणि दोन्ही देशांमध्ये अत्यंत सौहार्दपूर्ण, मैत्रीपूर्ण तसेच बहुआयामी संबंध आहेत. युरोपीय महासंघ आणि नॉर्डिक प्रदेशातील फिनलंड हा भारताचा एक अत्यंत मोलाचा भागीदार देश आहे. या बैठकी दरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि युरोपीय महासंघामधील धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीबद्दलही समाधान व्यक्त केले, तसेच भारत आणि युरोपीय महासंघादरम्यानाचा मुक्त व्यापार करार लवकरात लवकर अंमलात आणणे महत्वाचे असल्याची बाबही दोन्ही नेत्यांनी यावेळी अधोरेखीत केली. या बैठकी दरम्यान दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरील घडामोडी, तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांमधील अधिक व्यापक सहकार्याबाबतचे परस्परांचे विचारही मांडले.

 

* * *

निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai