पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2025
केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अन्नपूर्णा देवी, सावित्री ठाकूर, रवनीत सिंह, हर्ष मल्होत्रा, दिल्ली सरकारचे मंत्री महोदय, इतर मान्यवर, देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे उपस्थित असलेले सर्व अतिथी आणि माझ्या प्रिय बालकांनो !
आज देश‘वीर बाल दिवस’ साजरा करत आहे. आत्ताच वंदे मातरमचे अतिशय सुंदर सादरीकरण झाले, त्यामध्ये तुमची मेहनत स्पष्टपणे दिसून येत आहे.
मित्रांनो,
आज आपण त्या वीर साहिबजाद्यांचे स्मरण करत आहोत, जे आपल्या भारताचा अभिमान आहेत; जे भारताचे अदम्य साहस, शौर्य आणि वीरतेची पराकाष्ठा आहेत. ते वीर साहिबजादे, ज्यांनी वय आणि अवस्थेच्या सीमा ओलांडल्या, जे क्रूर मुघल सल्तनतीसमोर एका खडकासारखे अशा प्रकारे उभे राहिले की धार्मिक कट्टरता आणि दहशतीचे अस्तित्वच हादरून गेले. ज्या राष्ट्राला असा गौरवशाली इतिहास लाभला आहे, ज्याच्या युवा पिढीला असा प्रेरणादायी वारसा मिळाला आहे, ते राष्ट्र काय साध्य करू शकणार नाही?
मित्रांनो,
जेव्हा कधी 26 डिसेंबरचा हा दिवस येतो, तेव्हा मला या गोष्टीचे समाधान वाटते की, आमच्या सरकारने साहिबजाद्यांच्या वीरतेने प्रेरित होऊन ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्यास सुरुवात केली. गेल्या 4 वर्षांत वीर बाल दिवसाच्या या नवीन परंपरेने साहिबजाद्यांची प्रेरणा नवीन पिढीपर्यंत पोहोचवली आहे. वीर बाल दिवसाने धाडसी आणि प्रतिभावान तरुणांच्या घडणीसाठी एक व्यासपीठही तयार केले आहे. दरवर्षी जी बालके वेगवेगळ्या क्षेत्रांत देशासाठी काहीतरी विशेष करून दाखवतात, त्यांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित केले जाते.
यावेळी देखील, देशाच्या विविध भागांतून आलेल्या 20 बालकांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत. हे सर्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत, आत्ताच मला त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्याची संधी मिळाली. यापैकी कोणी असाधारण शौर्य दाखवले आहे, तर कोणी समाजसेवा आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात कौतुकास्पद काम केले आहे. काहींनी विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये नवनवीन शोध लावले आहेत, तर अनेक तरुण मित्र क्रीडा, कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात योगदान देत आहेत. मी या पुरस्कार विजेत्यांना सांगेन की, तुमचा हा सन्मान केवळ तुमचाच नाही, तर हा तुमच्या आई-वडिलांचा, तुमच्या शिक्षकांचा आणि मार्गदर्शकांचा, तसेच त्यांच्या कष्टांचा देखील सन्मान आहे. मी सर्व पुरस्कार विजेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
वीर बाल दिवसाचा हा दिवस भावना आणि श्रद्धेने भरलेला दिवस आहे. साहिबजादा अजित सिंह जी, साहिबजादा जुझार सिंह जी, साहिबजादा जोरावर सिंह जी आणि साहिबजादा फतेह सिंह जी यांना अगदी लहान वयात त्या काळातील सर्वात मोठ्या सत्तेशी लढा द्यावा लागला. ती लढाई भारताचे मूळ विचार आणि धार्मिक कट्टरता यांच्यातील होती; ती लढाई सत्य विरुद्ध असत्य अशी होती. त्या लढाईत एका बाजूला दशम गुरु श्री गुरु गोविंद सिंह जी होते, तर दुसरीकडे क्रूर औरंगजेबाची राजवट होती. आमचे साहिबजादे त्यावेळी वयाने लहानच होते. परंतु, औरंगजेब आणि त्याच्या क्रूरतेला त्याने काहीही फरक पडत नव्हता. त्याला माहित होते की, जर त्याला भारतातील लोकांमध्ये भीती निर्माण करून त्यांचे धर्मांतर करायचे असेल, तर त्यासाठी त्याला भारतीयांचे मनोधैर्य खच्ची करावे लागेल. आणि म्हणूनच त्याने साहिबजाद्यांना लक्ष्य बनवले.
पण मित्रांनो,
औरंगजेब आणि त्याचे सेनापती हे विसरले होते की, आमचे गुरु हे काही सामान्य मनुष्य नव्हते, तर ते साक्षात तप आणि त्यागाचा अवतार होते. वीर साहिबजाद्यांना तोच वारसा त्यांच्याकडून मिळाला होता. म्हणूनच, भलेही संपूर्ण मुघल राजवट त्यांच्या मागे लागली, तरीही ते त्या चारपैकी एकाही साहिबजाद्याला आपल्या ध्येयापासून ढळवू शकले नाहीत. साहिबजादा अजित सिंह जी यांचे शब्द आजही त्यांच्या हिंमतीची साक्ष देतात- “नावाने मी ‘अजित’ आहे, कधीही जिंकला जाणार नाही; आणि जर युद्धात हरलोच, तर कधीही जिवंत परत येणार नाही!”
मित्रांनो,
काही दिवसांपूर्वीच आपण श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या बलिदान दिनानिमित्त त्यांचे स्मरण केले. त्या दिवशी कुरुक्षेत्रात एक विशेष कार्यक्रमही पार पडला. ज्या साहिबजाद्यांकडे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या बलिदानाची प्रेरणा होती, ते मुघलांच्या अत्याचाराला घाबरतील, असा विचार करणेच चुकीचे होते.
मित्रांनो,
माता गुजरी, श्री गुरु गोविंद सिंह जी आणि चारी साहिबजाद्यांची वीरता आणि आदर्श आजही प्रत्येक भारतीयाला शक्ती देतात, ते आपल्यासाठी प्रेरणास्थान आहेत. साहिबजाद्यांच्या बलिदानाची गाथा देशातील प्रत्येकाच्या ओठावर असायला हवी होती. परंतु दुर्दैवाने, स्वातंत्र्यानंतरही देशात गुलामीची मानसिकता कायम राहिली. ज्या गुलामीच्या मानसिकतेचे बीज ब्रिटीश राजकारणी मॅकॉले याने 1835 मध्ये पेरले होते, त्या मानसिकतेतून देशाला स्वातंत्र्यानंतरही मुक्त होऊ दिले गेले नाही. म्हणूनच स्वातंत्र्यानंतरही अनेक दशके देशातील अशी सत्ये दाबून टाकण्याचा प्रयत्न केला गेला.
पण मित्रांनो,
आता भारताने ठरवले आहे की, गुलामीच्या मानसिकतेतून मुक्ती मिळवावीच लागेल. आता भारतीयांचे बलिदान आणि आमच्या शौर्याच्या स्मृती दाबल्या जाणार नाहीत. आता देशाच्या नायक-नायिकांना उपेक्षित ठेवले जाणार नाही. म्हणूनच आपण ‘वीर बाल दिवस’ पूर्ण मनोभावाने साजरा करत आहोत. आणि आपण इतक्यावरच थांबलो नाही आहोत; मॅकॉलेने जो कट रचला होता, त्याला 2035 मध्ये 200 वर्षे पूर्ण होतील. यासाठी आता केवळ 10 वर्षांचा काळ बाकी आहे. याच 10 वर्षांत आपण देशाला पूर्णपणे गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त करूनच राहू. हा 140 कोटी देशवासियांचा संकल्प असायला हवा. कारण देश जेव्हा या गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त होईल, तेव्हाच तो स्वदेशीचा अभिमान बाळगेल आणि तितक्याच वेगाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे जाईल.
मित्रांनो,
गुलामीच्या मानसिकतेतून मुक्तीच्या या मोहिमेची एक झलक काही दिवसांपूर्वी आपल्या देशाच्या संसदेतही पाहायला मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदारांनी हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त इतर भारतीय भाषांमध्ये सुमारे 160 भाषणे दिली.
सुमारे 50 भाषणे तमिळमध्ये झाली, ४० पेक्षा जास्त मराठीमध्ये झाली आणि जवळजवळ २५ भाषणे बंगालीमध्ये देण्यात आली. जगातील कोणत्याही संसदेत असे दृश्य दुर्मिळ आहे. आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे. मॅकॉले यांनी भारताच्या भाषिक विविधतेला दडपण्याचा प्रयत्नही केला होता. आजघडीला आपला देश गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होत असताना, भाषिक विविधता आपली ताकद होते आहे.
मित्रहो,
“मेरा युवा भारत संगठन” या संघटनेशी संबंधित अनेक युवा येथे उपस्थित आहेत. एका अर्थाने, तुम्ही सर्व जेन-झी आहात आणि तुम्ही जेन-अल्फा देखील आहात. तुमची पिढी भारताला विकसित भारताच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. मी जेन-झींच्या क्षमता पाहतो, आणि तुमचा आत्मविश्वास पाहतो आणि जाणतो, आणि म्हणूनच तुमच्यावर माझा खूप विश्वास आहे. आपल्या देशात असे म्हटले जाते, “बालादपि ग्रहीतव्यं युक्तमुक्तं मनीषिभिः” म्हणजे, जरी लहान मूल काही शहाणपणाचे बोलले तरी ते स्वीकारले पाहिजे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कोणीही वयाने लहान नाही आणि कोणीही वयाने मोठे नाही. तुम्ही तुमच्या कृती आणि कामगिरीमुळे महान ठरता. अगदी लहान वयातही, तुम्ही अशा गोष्टी साध्य करू शकता ज्यामुळे इतर तुमच्याकडून प्रेरणा घेऊ शकतील. तुम्ही हे दाखवून दिले आहे. पण या कामगिरीकडे फक्त सुरुवात म्हणून पाहिले पाहिजे. तुम्हाला अजूनही खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. तुम्हाला अजूनही तुमची स्वप्ने आकाशात घेऊन जायची आहेत. आणि तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही या पिढीत जन्माला आला आहात; देश तुमच्या प्रतिभेच्या मागे खंबीरपणे उभा आहे. पूर्वी, युवा पिढी स्वप्न पाहण्यासही घाबरत होती, कारण जुन्या व्यवस्थेने असे वातावरण निर्माण केले होते जिथे काहीही चांगले घडू शकत नव्हते. आजूबाजूला निराशा आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. युवा पिढीला वाटू लागले होते, “कठोर परिश्रम करण्यात काय अर्थ आहे?” पण आज, देश प्रतिभा शोधतो आणि त्यांना एक व्यासपीठ देतो. त्यांच्या स्वप्नांना 140 कोटी देशवासीयांची ताकद आधार देते.
डिजिटल इंडियाच्या यशामुळे, तुमच्याकडे इंटरनेटची ताकद आहे आणि शिकण्यासाठी स्रोत आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान आणि स्टार्टअप जगतात प्रवेश करू इच्छिणाऱ्यांसाठी स्टार्टअप इंडियासारखे उपक्रम आहेत. खेळात रस असलेल्यांसाठी ‘खेलो इंडिया’ मोहीम आहे. दोन दिवसांपूर्वीच मी संसद खेल महोत्सवात भाग घेतला. तुम्हाला पुढे नेण्यासाठी अनेक मंच आहेत. तुम्हाला फक्त लक्ष केंद्रित करावे लागेल. आणि यासाठी, तुम्ही अल्पकालीन लोकप्रियतेच्या झगमगाटात अडकू नये हे आवश्यक आहे. जेव्हा तुमचे विचार स्पष्ट असतील, जेव्हा तुमची तत्त्वे स्पष्ट असतील तेव्हाच हे घडेल. आणि म्हणूनच, तुम्हाला तुमच्या आदर्शांकडून, देशातील महान व्यक्तींकडून शिकावे लागेल. तुम्ही तुमचे यश स्वतःपुरते मर्यादित ठेवू नये. तुमचे ध्येय असे असले पाहिजे की तुमचे यश देशाचे यश बनले पाहिजे.
मित्रहो,
आज, युवा सक्षमीकरण लक्षात घेऊन नवीन धोरणे तयार केली जात आहेत. राष्ट्र उभारणीच्या केंद्रस्थानी युवा वर्गाला ठेवण्यात आले आहे. “मेरा युवा भारत संगठन” सारख्या मंचाच्या माध्यमातून, युवा पिढीला परस्परांशी जोडण्यासाठी, त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांचे नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अंतराळसंबंधी अर्थव्यवस्थेला चालना देण्यापासून, खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी, फिनटेक आणि उत्पादन क्षेत्रांचा विस्तार करण्यापासून ते कौशल्य विकास आणि इंटर्नशिपच्या संधी निर्माण करण्यापर्यंत, अशा प्रत्येक प्रयत्नात माझे युवा सहकारी केंद्रस्थानी आहेत. प्रत्येक क्षेत्रात युवा वर्गासाठी नवीन संधी खुल्या होत आहेत.
मित्रहो,
आज भारतासमोरची परिस्थिती अभूतपूर्व आहे. भारत हा जगातील सर्वात युवा देशांपैकी एक आहे. पुढील पंचवीस वर्षे भारताची दिशा ठरवतील. स्वातंत्र्यानंतर कदाचित पहिल्यांदाच, भारताच्या क्षमता, भारताच्या आकांक्षा आणि भारताकडून जगाच्या अपेक्षा या सर्व गोष्टी एकत्र येत आहेत. आजचे तरुण अशा वेळी मोठे होत आहेत जेव्हा संधी पूर्वीपेक्षा जास्त आहेत. आम्ही भारतातील तरुणांच्या प्रतिभा, आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमतेला अधिक संधी देण्यासाठी वचनबद्ध आहोत.
माझ्या युवा सहकाऱ्यांनो,
विकसित भारताची मजबूत पायाभरणी करण्यासाठी भारताच्या शिक्षण धोरणात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण एकविसाव्या शतकासाठी नवीन शिक्षण पद्धतींवर लक्ष केंद्रित करते. आज व्यावहारिक शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे, मुलांना घोकंपट्टी करून शिकण्याऐवजी विचार करण्याची सवय, प्रश्न विचारण्याचे धाडस आणि उपाय शोधण्याची क्षमता विकसित करण्यास प्रोत्साहित केले आहे. पहिल्यांदाच, या दिशेने अर्थपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. बहुविद्याशाखीय अभ्यास, कौशल्य-आधारित शिक्षण, खेळांना प्रोत्साहन आणि तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांना खूप मदत करत आहे. आज, देशभरातील “अटल टिंकरिंग लॅब”मध्ये लाखो मुले नवोपक्रम आणि संशोधनात सहभागी होत आहेत. शाळांमध्ये मुले रोबोटिक्स, एआय, शाश्वतता आणि डिझाइन अशा संकल्पना जाणून घेत आहेत. या सर्व प्रयत्नांसह, राष्ट्रीय शिक्षण धोरण मुलांना मातृभाषेत अभ्यास करण्याचा पर्याय प्रदान करते. यामुळे मुलांसाठी अभ्यास सोपा होत आहे आणि त्यांना विषय समजणे सोपे होते आहे.
मित्रहो,
मार्ग किती कठीण आहे, हे वीर साहिबजाद्यांनी पाहिले नाही. त्यांनी मार्ग योग्य आहे की नाही, हे पाहिले. आज त्याच भावनेची गरज आहे. मी भारतातील युवा पिढीला आवाहन करतो आणि भारतातील युवा पिढीकडून मी अशीच अपेक्षा करतो: मोठी स्वप्ने पहा, कठोर परिश्रम करा आणि तुमचा आत्मविश्वास कधीही डळमळीत होऊ देऊ नका. भारताचे भविष्य केवळ भारतातील मुलांच्या आणि युवा पिढीच्या भविष्यामुळेच उज्ज्वल होईल. त्यांचे धैर्य, त्यांची प्रतिभा आणि त्यांचे समर्पण देशाच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करेल. या श्रद्धेने, या जबाबदारीने आणि या अथक गतीने, भारत त्याच्या भविष्याकडे पुढे जात राहील. मी पुन्हा एकदा शूर साहिबजादे यांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनापासून अभिनंदन. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.
* * *
नितीन फुल्लुके/शैलेश पाटील/माधुरी पांगे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
Addressing a programme on Veer Baal Diwas. We remember the exemplary courage and sacrifice of the Sahibzades.
— Narendra Modi (@narendramodi) December 26, 2025
https://t.co/kQPb0RmaIj
Today, we remember the brave Sahibzades, the pride of our nation. They embody India's indomitable courage and the highest ideals of valour. pic.twitter.com/gOoSf5FQlE
— PMO India (@PMOIndia) December 26, 2025
The courage and ideals of Mata Gujri Ji, Sri Guru Gobind Singh Ji and the four Sahibzades continue to give strength to every Indian. pic.twitter.com/9mwfF0VL00
— PMO India (@PMOIndia) December 26, 2025
India has resolved to break free from the colonial mindset once and for all. pic.twitter.com/9l6Dt3F0XI
— PMO India (@PMOIndia) December 26, 2025
As India frees itself from the colonial mindset, its linguistic diversity is emerging as a source of strength. pic.twitter.com/6TA3P9JzA9
— PMO India (@PMOIndia) December 26, 2025
Gen Z… Gen Alpha… will lead India to the goal of a Viksit Bharat. pic.twitter.com/XzwUt2nvtt
— PMO India (@PMOIndia) December 26, 2025