Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेच्या (इकोसॉक) 70व्या वर्धापनदिनानिमित्त व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी केलेले भाषण

न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेच्या (इकोसॉक) 70व्या वर्धापनदिनानिमित्त व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी केलेले भाषण


पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक व सामाजिक परिषदेच्या(इकोसॉक) 70व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून भाषण केले. त्यांच्या भाषणाचा मजकूर खालीलप्रमाणे आहे.

इकोसॉकचे अध्यक्ष, मान्यवर, सर्व स्त्री-पुरुषहो, मला आर्थिक व सामाजिक परिषदेच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित या विशेष बैठकीत आमंत्रित केल्याबद्दल मी या परिषदेच्या अध्यक्षांचे आभार मानतो. याप्रसंगी मी संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्यांना मनापासून शुभेच्छा देतो व त्यांचे अभिनंदन करतो.

श्रीयुत अध्यक्ष, मान्यवर, आर्थिक व सामाजिक परिषद संयुक्त राष्ट्रांच्या रचनेतील प्रमुख स्तंभांपैकी एक आहे. या संघटनेची निर्मिती संयुक्त राष्ट्रांची एक महत्त्वाची शाखा म्हणून करण्यामागे संयुक्त राष्ट्रांच्या संस्थापकांची विकासाविषयीची दृष्टी दिसून येते. या जगात शांतता व समृद्धी निर्माण करण्यासाठी, सर्वात पहिल्या व महत्त्वाच्या अटी म्हणजे तातडीने सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देणे, मानवाच्या स्थितीत सुधारणा आणि भूक आणि वंचित राहणाऱ्‍या प्रवृत्तींचा शेवट या आहेत. या परिषदेच्या निर्मितीमध्ये भारताचा अभिमानास्पद सहभाग होता. भारताचे प्रतिष्ठित नागरिक असलेले अरकॉट रामस्वामी मुदलियार हे इकोसॉकचे एक प्रमुख शिल्पकार होते. 1946 मध्ये या परिषदेचे उद्घाटन झाले त्या वेळी या परिषदेचं पहिले अध्यक्षपद भूषवण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला. इकोसॉकच्या पहिल्या अधिवेशनामध्ये उद्घाटनाच्या भाषणामध्ये रामस्वामी यांनी या परिषदेला आगामी वर्षांमध्ये पार पाडाव्या लागणाऱ्‍या भूमिकेचे त्यांना जे चित्र दिसत होते ते मांडले.

“या परिषदेचे कार्य आणि गुंतागुंतीच्या स्वरूपातील आर्थिक समस्या सोडविण्याची क्षमता भविष्यात जगामध्ये खऱ्‍या अर्थाने शांतता आणि सुरक्षितता निर्माण करण्यावर अवलंबून असेल,” असे ते म्हणाले होते. त्यामुळेच इकोसॉकचे कार्य, विशेषकरून ज्या प्रकारे ही परिषद मानवी स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणत आहे आणि सर्वांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देत आहे, ते लक्षात घेता, संयुक्त राष्ट्रांच्या एकंदर उद्दिष्टांच्या केंद्रस्थानी आहे. ही परिषद स्थापन होऊन 70 वर्षं उलटली आहेत. 21व्या शतकाची पंधरा वर्ष उलटून गेली आहेत. मात्र आपल्या संस्थापकांनी जी स्वप्ने पाहिली होती ती पूर्ण करण्यात या परिषदेला यश आले आहे का? गेल्या सत्तर वर्षांत आपण उल्लेखनीय प्रगती पाहिली आहे. विसाव्या शतकामध्ये दारिद्रय निर्मूलन हे सर्वात मोठे पूर्ण होऊ न शकलेले उद्दिष्ट ठरले. संयुक्त राष्ट्रांचे देखील ते सर्वाधिक महत्त्वाचे पूर्ण होऊ न शकलेले उद्दीष्ट ठरले.

मान्यवरहो, इकोसॉकचा सत्तरावा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ दुसरी असू शकत नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाने अलीकडेच विकासाच्या नव्या सर्वसमावेशक दृष्टीकोनाला अंगिकारले आहे. 2030 च्या शाश्वत विकास आराखड्याने संयुक्त राष्ट्रांना त्यांची भूमिका, उद्दिष्टे यांचा फेरविचार करण्याची आणि स्वतःला अधिक परिणामकारक बनवण्याची संधी दिली आहे. हे आव्हान स्वीकारण्याची आणि हा जाहिरनामा यशस्वी करण्यासाठी योगदान देण्याची जबाबदारी आता इकोसॉकवर आहे.

गरीब देशांना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते त्याचे प्रतिबिंब 2030 च्या जाहीरनाम्यात आहे.

विकसनशील जगातील आपल्याला चांगल्या जीवनमानाच्या जनतेच्या रास्त अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केवळ गरीबीचा आणि भूकेचाच अंत करायचा नाही आहे तर आपल्याला हे सर्व आपल्या पृथ्वीचे व पर्यावरणाचे रक्षण लक्षात घेऊन करायचे आहे.

दुसरीकडे विकसित देशांच्या खांद्यावर अतिशय मोठी जबाबदारी आहे आणि ती म्हणजे त्यांच्या अर्थव्यवस्थांना तातडीने शाश्वत विकासाच्या मार्गावर आणायचे आहे. त्यांना शाश्वत जीवनशैलीकडे वळवायचे आहे. तसेच त्यांना विकसनशील देशांना आर्थिक आणि सामाजिक तंत्रज्ञान उपलब्ध करून द्यायचे आहे.

त्याच वेळी आपल्याकडे मुबलक प्रमाणात संसाधने आहेत आणि सध्याच्या काळात उपलब्ध होणारे तंत्रज्ञान यापूर्वीच्या काळात लक्षात न आलेले उपाय निर्माण करत आहे.

आपल्याला भेडसावणाऱ्‍या समस्यांची हाताळणी करण्यासाठी उपलब्ध संसाधाने व तंत्रज्ञानाचा वापर यांची सांगड घालण्याचे मोठे आव्हान आहे.

ही संधी लक्षात घेण्याचे आवाहन मी तुम्हाला करत आहे. या परिषदेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी, तिला अधिक कृतिशील बनवण्यासाठी, धोरणांशी सुसंगत आणि आपल्या जनतेच्या ज्या अपेक्षा व गरजा आहेत त्या ओळखून त्यानुसार अधिकाधिक प्रतिसादकारक बनवणे गरजेचे आहे. हे करत असताना इकोसॉकचे मार्गदर्शक तत्वज्ञान नेहमीच गरिबातील गरीबांचे कल्याण हे असले पाहिजे किंवा भारतीय विचारातील अंत्योदय हे असले पाहिजे.

जोपर्यंत जगामध्ये गरिबी आहे तोपर्यंत आपली जनता मग ती कोणत्याही देशातील का असेना, मुलभूत मानवी सोयीसुविधा, स्वातंत्र्य, हक्क आणि संधी यांपासून वंचित राहिल. इकोसॉकचे काम तोपर्यंत पूर्ण होणार नाही. संयुक्त राष्ट्रांच्या संस्थापकांचे स्वप्न इकोसॉक पूर्ण करेल असा मला विश्वास आहे.

धन्यवाद

S. Patil/ S. Tupe/ M. Desai