पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सीएस आयआर अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद बैठक झाली. राष्ट्राच्या आव्हानांचा मुकाबला करताना सीएसआयआरने केलेल्या कार्याची माहिती यावेळी पंतप्रधानांना देण्यात आली.
सीएसआयआर प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या संशोधनातून मोठया प्रमाणात स्टार्टअप्सच्या शक्यतांचा सदस्यांनी यावेळी उल्लेख केला. प्रयोगशाळांमधल्या संशोधनाचे वाणिज्यक उपयोगात रुपांतर करण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला. वैद्यकीय उपकरणे उत्पादन, ऊर्जा, कचरा व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांचा उल्लेख करत यामध्ये सीएसआयआर महत्वाची भूमिका बजावू शकते याबाबतही पंतप्रधानांना माहिती देण्यात आली. सीएसआयआर प्रयोगशाळांच्या कामगिरीचे मूल्यमापन, करण्यासाठीची मानके, तसेच विविध प्रयोगशाळात अंतर्गत स्पर्धा राहील अशी यंत्रणा निर्माण करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
भारतातल्या विविध भागातल्या जनतेला भेडसावणाऱ्या किमान शंभर समस्यांची यादी सीएसआयआरच्या वैज्ञानिक समुदायाने तयार करावी आणि तांत्रिकदृष्टया तसेच विशिष्ट कालमर्यादेत त्याचे निराकरण करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी या समुदायाला केले.
आदिवासी जनतेला सिकलसेल ॲनिमिया, संरक्षण साधने उत्पादन, जवानांसाठी जीवरक्षक उपकरणे, सौर ऊर्जेशी संबंधित नाविन्यपूर्ण शोध, कृषी क्षेत्राशी संबंधित शोध यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांचा उल्लेख करत येथे सीएसआयआर पुढाकार घेऊन त्यात यश संपादन करु शकते असे पंतप्रधान म्हणाले. सामान्य जनतेचे जीवन अधिक चांगले व्हावे यासाठी सीएसआयआरने काम करावे तसेच समाजातल्या गरिब आणि शोषितांच्या समस्यांसाठी तांत्रिक उत्तर पुरवावे यावर पंतप्रधानांनी जोर दिला.
N.Chitale/B.Gokhale/M.Desai