Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांच्या हस्ते सरदार सरोवराचे राष्ट्रार्पण, गुजरातमधल्या दोन सभांना पंतप्रधान करणार संबोधित


पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधल्या केवडिया इथे 17 सप्टेंबर 2017ला सरदार सरोवराचे राष्ट्रार्पण करणार आहेत. धरणाची उंची अलीकडेच 138-68 मीटरपर्यंत वाढवण्यात आली असून, उपयुक्त साठा 4.73 दशलक्ष एकर फूट करणे शक्य होणार आहे. याचा मोठा फायदा गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या सहभागी राज्यांना होणार आहे.

या प्रकल्पामुळे नर्मदा नदीचे पाणी कालवे आणि जलवाहिन्यांच्या माध्यमातून गुजरातमधल्या टंचाईग्रस्त भागात पोहोचवण्यासाठी मदत झाली आहे. या प्रकल्पातून होणाऱ्या सिंचनाचा फायदा सुमारे 10 लाख शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे. तसेच विविध गावे आणि शहरातल्या सुमारे 4 कोटी नागरिकांना यामुळे पेयजल पुरवणे शक्य होणार आहे. जलवहनाचा सर्वात मोठा मानवी प्रयत्न, असे या प्रकल्पाचे वर्णन केले जाते. या प्रकल्पातून वर्षाला अब्जावधी एकक जलविद्युत निर्मिती अपेक्षित आहे.

धरणाचे राष्ट्रार्पण केल्यानंतर पंतप्रधान साधू बेटाला भेट देतील. या बेटावर सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मृतिस्थळ आणि एकता पुतळा यांची निर्मिती केली जात आहे. या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा पंतप्रधान घेतील. प्रकल्पांतर्गत 182 मीटर उंचीचा पुतळा, प्रदर्शन सभागृह, स्मृती बगिचा आणि अतिथी केंद्र यांचा समावेश आहे.
नर्मदा महोत्सवाच्या सांगता समारंभाला पंतप्रधान उपस्थित राहतील आणि डभोई इथे ते सभेला संबोधित करतील. कार्यक्रमादरम्यान ते ‘राष्ट्रीय आदिवासी स्वातंत्र्य सैनिक’ संग्रहालयासाठी भूमिपूजन करतील.

त्यानंतर पंतप्रधान अमरेलीला भेट देतील. एपीएमसीच्या नव्या मार्केट यार्डचे उद्‌घाटन ते करतील. अमर दूधसंघाच्या नव्या प्रकल्पांचे उद्‌घाटन ते करतील, तसेच मध निर्मिती केंद्रासाठी ते भूमिपूजन करतील. अमरेली इथे सहकार संमेलनालाही ते संबोधित करतील.

B.Gokhale/S.Kakade/D.Rane