पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेला संबोधित केले आणि राज्यसभेचे उपसभापती म्हणून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या हरिवंश यांचे हार्दिक अभिनंदन केले. हे एक ऐतिहासिक यश असल्याचे अधोरेखित करत, हरिवंश यांच्यावर आणि त्यांच्या प्रदीर्घ अनुभवावर, सभागृहाने दाखवलेला दृढ विश्वास यातून प्रतिबिंबीत होतो, असे पंतप्रधान म्हणाले. “ सलग तिसऱ्यांदा उपसभापती म्हणून निवडून येणे, हे त्यांच्या अनुभवांवर, त्यांच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनावर आणि आणि त्यांच्या प्रतिष्ठित कार्यशैलीवर, सभागृहाने केलेले शिक्कामोर्तब आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.
यावेळी पंतप्रधानांनी, 17 एप्रिल या दिवसाचे विशेष महत्त्व सांगत, आज माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांची जयंती असल्याचे नमूद केले. चंद्रशेखर यांच्याशी, हरिवंश यांचे जवळचे संबंध होते, हे लक्षात आणून देत, चंद्रशेखर यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत, हरिवंश यांनी त्यांना साथ दिली, इतकेच नाही, तर हरिवंश यांनी, चंद्रशेखर यांचा राजकीय जीवनप्रवासावर पुस्तकही लिहिले असल्याचे पंतप्रधानांनी सांगितलं.चंद्रशेखर यांच्या जयंतीदिनी हरिवंश यांच्या या तिसऱ्या कार्यकाळाची सुरवात, हा प्रसंग अधिकच अर्थपूर्ण करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
हरिवंश यांची पत्रकरितेतील कारकीर्दही अत्यंत उमदी होती, असं सांगत, उच्च मूल्ये आणि प्रभावी लेखनशैलीप्रती त्यांची बांधिलकी, वाखाणण्याजोगी होती, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या गुजरातमधील काळातही, हरिवंश यांचे लेख नियमितपणे वाचत असू, ज्यातून त्यांचा सखोल अभ्यास आणि ठाम भूमिका दिसत असे, असे पंतप्रधान म्हणाले. “त्यांच्या लेखणीला मोठी तिखट धार होती, मात्र त्यांची वाणी आणि वर्तणूक कायम सौम्य आणि विनम्र राहिली” असे पंतप्रधान म्हणाले.
“हमारा सांसद कैसा हो” या त्यांच्या स्तंभलेखनातून, त्यांनी या क्षेत्राचा पाया रचण्याचे काम केले. त्यांच्या पत्राकरितेच्या काळातला त्यांचा अनुभव अत्यंत मौल्यवान असल्याचे सांगत, दोन्ही सभागृहांतील नव्या खासदारांना, त्यांच्याकडून,संसदेतील वर्तणूक, प्रतिष्ठा जपणे आणि जबाबदाऱ्यांची जाणीव याबाबत जाणून घेता येईल असे सुचविले. “कदाचित, त्यांना कल्पना नसेल, की ते एके दिवशी या खुर्चीवर बसतील, पण त्यांच्या लिखाणाने अत्यंत सखोलतेने विषयाचा योग्य परामर्श घेतला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
हरिवंश यांचा वक्तशीरपणा, शिस्तबद्ध जीवन आणि कर्तव्याप्रति गांभीर्य याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली, आणि या गुणांमुळेच त्यांचे व्यक्तिमत्व सर्वमान्य ठरल्याचे सांगितले. त्यांनी नमूद केले की, राज्यसभा सदस्य झाल्यापासून हरिवंश यांनी सभागृहात पूर्णवेळ उपस्थिती कायम ठेवली असून, पीठासीन नसतानाही ते अधिवेशनांना उपस्थित राहिले. “यावरून त्यांची आपल्या जबाबदाऱ्यांप्रति असलेली दृढ बांधिलकी दिसून येते, आणि आपल्या सर्वांसाठी हा आदर्श आहे,” मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी हरिवंश यांच्या संसदीय कर्तव्यांपलीकडील उल्लेखनीय लोकसहभागाकडे, विशेषतः युवकांसाठीच्या त्यांच्या कार्याकडे लक्ष वेधले. याबाबतची आकडेवारी सादर करताना, त्यांनी नमूद केले की, 2018 मध्ये उपसभापतीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून, हरिवंश यांनी देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये 350 हून अधिक कार्यक्रम आयोजित केले. “तरुणांशी जोडले जाणे, विषयांची तयारी करणे आणि ‘विकसित भारताच्या संकल्पनेने त्यांना प्रेरित करणे, याप्रती असलेल्या असाधारण वचनबद्धतेचे हे प्रतीक आहे,” मोदी यांनी अधोरेखित केले.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर उपसभापतींनी भर दिल्याबद्दल प्रशंसा करून, पंतप्रधानांनी नमूद केले की, भारत पूर्वी अपेक्षित गतीने प्रगती का करू शकला नाही आणि आता देशाला मोठी झेप घेण्यासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत, हे स्पष्ट करण्यासाठी हरिवंश ऐतिहासिक संदर्भांचा वापर करतात. समाजाच्या विविध घटकांवर प्रभाव पाडणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमधील साहित्य महोत्सवांमध्ये हरिवंश यांचा सक्रिय सहभाग असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी हरिवंश यांच्या 1994 मधील पहिल्या अमेरिका भेटीचा एक रंजक किस्सा सांगितला. पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा हरिवंश विचारण्यात आले की, विकसित देशात तुम्हाला काय बघायला आवडेल, तेव्हा त्यांनी विद्यापीठांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली, जेणेकरून, नेमक्या कोणत्या प्रकारच्या शिक्षणामुळे आणि संस्कृतीमुळे अशी प्रगती साध्य झाली, हे त्यांना जाणून घेता येईल.
“त्या दौऱ्यादरम्यान त्यांनी आपला मौल्यवान वेळ अमेरिकन विद्यापीठांचा अभ्यास करण्यात व्यतीत केला, यामधून विकसित भारतासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक उत्कृष्टतेप्रति असलेली त्यांची गाढ निष्ठा दिसून येते,” मोदी यांनी नमूद केले.
हरिवंश यांनी एमपीएलएडीएस (खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना) निधीचा केलेला उत्कृष्ट वापर, इतर खासदारांसाठी एक आदर्श ठरेल, असे मोदी यांनी अधोरेखित केले. उपसभापतींनी स्थापन केलेल्या विविध अभ्यास आणि संशोधन केंद्रांची पंतप्रधानांनी माहिती दिली. यामध्ये आयआयटी पाटणा येथील लुप्तप्राय भारतीय भाषांसाठीचे केंद्र, बिहारच्या प्रदेशांची भूकंपीय संवेदनशीलता लक्षात घेऊन भूकंप अभियांत्रिकी केंद्र तसेच जमीनीची धूप समस्येवर उपाययोजना करण्यासाठी पाटणा येथील आर्यभट्ट ज्ञान विद्यापीठातील नदी अभ्यास केंद्राचा समावेश आहे. “दीर्घकालीन परिणाम साधण्यासाठी खासदार निधीचा (एमपीएलएडीएस) वापर एका केंद्रित दिशेने कसा करता येतो, हे त्यांनी दाखवून दिले आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी हरिवंश यांनी निधी दिलेल्या इतर उपक्रमांचाही उल्लेख केला. चंद्रगुप्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथील बिझनेस इनक्युबेशन आणि नवोन्मेष केंद्र तसेच मगध विद्यापीठातील कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्राचा समावेश आहे. शहरी भागात स्थलांतरित होऊनही उपसभापतींनी आपल्या गावाशी असलेले नाते जपल्याबद्दल त्यांचे कौतुक करत पंतप्रधान म्हणाले, “हरिवंशजींनी आपल्या गावाशी आपली नाळ घट्ट जोडून ठेवली असून समाजाच्या सुख-दुःखात ते सतत योगदान देत आहेत.”
नवीन संसद भवनाच्या बांधकामादरम्यान हरिवंश यांच्यासोबत काम करण्याचा आपला वैयक्तिक अनुभव सांगताना पंतप्रधानांनी त्यांचे सहकार्य किती मौल्यवान होते याबद्दल सांगितले. पंतप्रधान मोदींनी आठवण करून दिली की, हरिवंश कसे दोन दिवसांच्या चर्चेत नामकरण समारंभ, सभागृहांची ओळख, कलादालने आणि संसद भवनातील विविध प्रवेशद्वारांची नावे ठरवण्याबाबत चर्चा झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात ते कल्पना पूर्ण करत असत अशी आठवण पंतप्रधानांनी सांगितली. “संसद भवनाच्या बांधकामादरम्यान एकत्र काम करणे हा एक अत्यंत आनंददायक आणि फलदायी अनुभव होता,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
प्रशिक्षण आणि क्षमता विकासाच्या माध्यमातून राज्य विधानसभा, विधान परिषदा आणि त्यांच्या पीठासीन अधिकाऱ्यांना साहाय्य करण्याच्या हरिवंश यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. तसेच, राष्ट्रकुल संसदीय संघटनेत भारताच्या लोकशाही व्यवस्थेचा जागतिक स्तरावर एक मजबूत ठसा उमटवण्यात हरिवंश यांच्या सक्रिय भूमिकेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. 21 व्या शतकाच्या पाव कालखंडानंतर सभागृहाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर विश्वास व्यक्त करून आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण जबाबदारीवर भर देऊन पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
Speaking in the Rajya Sabha. https://t.co/0MhP3145LO
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2026
***
निलिमा चितळे/राधिका अघोर/राजश्री आगाशे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Speaking in the Rajya Sabha. https://t.co/0MhP3145LO
— Narendra Modi (@narendramodi) April 17, 2026