Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 नोव्हेंबरला 21,800 कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन


‍नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, म्हणजेच 3 नोव्हेंबर 2026 ला, दुपारी 12.30 च्या सुमाराला, व्हिडिओ कॉन्फरनिंग द्वारे, सुमारे 21,800 रुपयांच्या पुणे मेट्रो प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधितही करतील.

‘पिंक लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका 3 चे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. 8,300 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. तांत्रिक नवोन्मेष आणि आधुनिक वाहतूक उपाययोजनांच्या माध्यमातून पुण्याच्या नागरी दळणवळण पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प,  एक महत्वाचे पाऊल आहे.

सुमारे 23 किलोमीटर लांबीची ही पिंक लाईन माण ते जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक यांना जोडणार आहे. या मेट्रो मार्गिकेमुळे हिंजवडी आयटी हब आणि शिवाजीनगर दरम्यान मेट्रोची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुण्यातील प्रमुख व्यावसायिक केंद्रांपैकी एका ठिकाणी पोहोचणे अधिक सुलभ होईल तसेच हजारो आयटी व्यावसायिक आणि इतर प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुखकर होणार आहे.ही मेट्रो मार्गिका, सध्याच्या मेट्रो नेटवर्कशी जोडली जाणार असून, त्यामुळे पुण्यातील विविध भागांमध्ये अखंडित मेट्रो संपर्क व्यवस्था उपलब्ध होईल. खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करणे, वाहतूक कोंडी आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करणे तसेच प्रमुख व्यावसायिक आणि निवासी क्षेत्रांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ करणे, यासाठी या मार्गिकेची मदत होणार आहे.

पिंक लाईनचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिला सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर देण्यात आलेला भर. या मार्गिकेवरील रेल्वेगाड्या पूर्णपणे महिला चालकांकडून चालवल्या जाणार असून, अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे. या प्रकल्पात पर्यावरणीय शाश्वततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. प्रकल्पाच्या एकूण विजेच्या गरजेपैकी सुमारे 30 टक्के वीज सौरऊर्जेतून मिळवण्याचे नियोजन आहे.

पंतप्रधान पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणीही करणार आहेत. सुमारे 13,500 कोटी रुपये खर्चून हा टप्पा विकसित करण्यात येणार आहे. पुणे मेट्रोच्या 2अ, 2ब, 4 आणि 4अ या मार्गिकांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश असून, त्यामुळे शहरातील मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारेल आणि महत्त्वाच्या निवासी, व्यावसायिक तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमधली संपर्कव्यवस्था अधिक मजबूत होईल.

दुसऱ्या टप्प्यातल्या 2अ आणि 2ब या मार्गिकांची एकूण लांबी सुमारे 12.75 किलोमीटर असेल. 2 अ ही मार्गिका वनाज ते चांदणी चौक, तर 2ब ही मार्गिका रामवाडी ते विठ्ठलवाडी यांना जोडेल. त्यामुळे सध्याच्या पूर्व-पश्चिम मेट्रो जाळ्याचा विस्तार होईल. सुमारे 25.52 किलोमीटर लांबीची मार्गिका क्रमांक 4 खराडी ते खडकवासला यांना जोडेल. तर 6.12 किलोमीटर लांबीची मार्गिका क्रमांक 4 अ नळ स्टॉप ते माणिकबाग यांना जोडेल.

या नव्या मेट्रो मार्गिकांमुळे खराडी, मगरपट्टा, हडपसर, स्वारगेट, माणिकबाग, नांदेड सिटी, पुणे कॅन्टोन्मेंट आणि वारजे यांसारखी अनेक महत्त्वाची ठिकाणे जोडली जातील. रामवाडी ते विठ्ठलवाडी या पूर्वेकडच्या विस्तारित मार्गिकेमुळे खराडी आणि वाघोली इथल्या झपाट्याने विकसित होत असलेल्या निवासी, व्यावसायिक आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांशी संपर्क अधिक सुलभ होईल. स्वारगेट, नळ स्टॉप आणि खराडी बायपास इथल्या अदलाबदल सुविधांद्वारे या मार्गिका आंतरशहरी बससेवा आणि सध्याच्या पुणे मेट्रो जाळ्याशी जोडल्या जातील. त्यामुळे शहराच्या विविध भागांदरम्यान विनाअडथळा प्रवास करणे शक्य होईल.

या प्रकल्पांमुळे पुण्यातली सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधा अधिक मजबूत होईल, शहरातल्या विविध भागांमधली कनेक्टीव्हिटी सुधारेल आणि प्रवाशांना कार्यक्षम तसेच एकात्मिक शहरी वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल.

निलीमा चितळे/राधिका अघोर/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com