Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टार्ट-अप इंडिया अभियानाचे उद्घाटन, स्टार्ट अप ला प्रोत्साहन देण्यासाठीची कृतीयोजना जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टार्ट-अप इंडिया अभियानाचे उद्घाटन, स्टार्ट अप ला प्रोत्साहन देण्यासाठीची कृतीयोजना जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्टार्ट-अप इंडिया अभियानाचे उद्घाटन, स्टार्ट अप ला प्रोत्साहन देण्यासाठीची कृतीयोजना जाहीर


पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी नवी दिल्ली इथे शनिवारी स्टार्ट अप इंडिया अभियानाचे औपचारिक उद्घाटन केले. या उद्घाटनाच्या आधी दिवसभर उद्यमशीलाता या विषयाशी निगडीत विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी व्हर्चुअल प्रदर्शनाला भेट दिली आणि स्टार्ट अप उद्योजकांशी चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी दहा स्टार्ट अप उद्योजकांनी या अभियानांविषयी आपले विचार मांडले. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की जेव्हा त्यांनी १५ ऑगस्टला लाल किल्यावरुन या अभियानाची घोषणा केली होती , तेव्हा कोणी त्याकडे विशेष लक्ष दिले नव्हते. मात्र आज खूप लोक या योजनेला समर्थन देत आहेत.

जे लोक एक खास विचार घेऊन समाजात काम करतात किंवा कोणासमोर असलेल्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करतात , असेच लोक एक यशस्वी स्टार्ट अप योजना चालवू शकतात. पैसे कमावणे हा त्यांचा प्राथमिक उद्देश नसतो ,मात्र नेहमी त्यांची काही उप उत्पादने असतात , ज्याद्वारे अनेकांना रोजगार मिळतो. पंतप्रधान म्हणाले की स्टार्ट अप उद्योजक आणि संशोधक नेहमी इतरांविषयी सहानुभूती बाळगत आपल्यासोबत अनेकांना प्रगतीपथावर घेऊन जातात.

भारतीय युवकांनी नोकरी शोधत बसण्यापेक्षा छोटे मोठे उद्योग सुरु करून इतरांना नोकऱ्या देण्याचे ध्येय ठेवावे अशी त्यांची इच्छा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. जर एका स्टार्ट अप मधून पाच जणांना रोजगार मिळाला तरी ती राष्ट्राची मोठी सेवा ठरेल. आज नैसर्गिक संकटांमुळे होणारे शेतीचे नुकसान आणि सायबर सुरक्षा या देशापुढच्या मोठ्या समस्या असून देशातील युवा संशोधकांनी या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी संशोधन करावे , असे आवाहन पंतप्रधानानी केले.

स्टार्ट अप योजनेच्या प्रमुख वैशिष्ट्यांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. या अभियानाअंतर्गत वित्तव्यवस्था करण्यासाठी १०००० कोटी रुपयांचा एक विशेष निधी बनवला जाईल. स्टार्ट-अपच्या पहिल्या तीन वर्षात झालेल्या नफ्यावर प्राप्तीकर भरावा लागणार नाही.स्टार्ट अप साठी थेट पैसे काढण्याच्या धोरणावर सरकार काम करत असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. स्टार्ट-अप अभियानाअंतर्गत पेटंट मिळण्याविषयीच्या अर्जाचे काम गतिमानतेने पूर्ण करण्याच्या दिशेने सरकारचे काम सुरु असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

स्टार्ट-अप उद्योगांसाठीच्या पेटंट शुल्कात ८० टक्क्यांपर्यंत सवलत देण्याची घोषणाही पंतप्रधानानी यावेळी केली. तसेच, या संबधी श्रम आणि पर्यावरण विभागाच्या नऊ परवानग्यांसाठी स्वप्रमाणीत कागदपत्रे सादर करण्याविषयीची व्यवस्था लवकरच सुरु केली जाईल, असेही पंतप्रधान म्हणाले. नवनवीन संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच अटल इनोवेशन योजना सुरु केली जाईल अशी घोषणाही यावेळी पंतप्रधानांनी केली.

R Aghor /S.Tupe/M.Desai